Sunday, 22 January 2023

हुक्की

एकदा अक्षर रुसले, फारच फुगले 

म्हणे! मी स्वतःत काहीच नाही


मग शब्दाने अक्षराला जागवले

अस्तित्वच तुझ्याविना माझे नाही, समजावले


खुद्कन अक्षर हसले, पंगतीत शब्दांच्या बसले

मुळाशी शब्दांच्या मीच, विचारांती सुखावले


एकदा शब्दाला आली आपलीच किळस

म्हणे! मी स्वतःत काहीच नाही


मग वाक्याने त्याला समजावले 

म्हणे! अरे वेड्या, अर्थविहीन तुझ्याविना अस्तित्व माझे


शब्दा तुझी काय करू मीमांसा, विविधरंगी तू

कधी छटा विकारी, तर कधी अविकारी


जेंव्हा असतोस विकारी, बनुनी समोर येशी नाम, सर्वनाम, विशेषण 

जेंव्हा असतोस अविकारी , बनुनी समोर येशी क्रियापद


काय सांगू तुझी करामत, धरून मारून 'ध' चा 'मा' करून

शब्दाचा अनर्थ होई, चिकित्सा तुझी काय करू अजून


किती ओवाळू स्तुतीसुमने, विचारवंत तुझा पाठपुरावा करिती

शब्दकोष तुझे बनविती, कवी तुला सलाम करिती


शब्द एकच भाषा एकच, परंतु अनेक अर्थ देशी

तोच तू भाषा वेगळी, परंतु भिन्न अर्थ होशी


असे तुझे उज्ज्वल चरित्र, का करिसी अट्टाहास

तुझ्याविना मी अनाथ, सोडून दे स्व तिरस्कार


पटवून वाक्याने दिले, तेंव्हा शब्द मानले

रुसणे तेंव्हा हरले, गाली स्मितहास्य आले


मग एके दिवशी, हुक्की वाक्याला आली

रुसणे फुगणे मुसमुसण्याची, स्वतःला कमी लेखण्याची


मग एका विद्वानाने, वाक्याला समजावले

एकामागून एक येतोस तू, बोलीभाषा तुझी होते


ओझरतं वाक्ये येति लेखणीतून जेंव्हा, साहित्य तुझे होते

भावनांना शोधत येशी जेंव्हा, गीत तुझे होते


व्यासपीठावरील वक्त्यांचे, एकमेव शस्त्र तूच

प्रेम व्यक्त करणारा तूच, त्वेष आवेगातही तूच


हलत पान तुझ्याविना नाही, तू शब्दांचा जाणता;अक्षरांचा मानता

पर्याय दुसरा नाही, मी तुझ्याविना पोरका


अक्षर, शब्द, वाक्य एकाच माळेतले मणी, ईर्ष्या कसली एकमेकांशी

सुशोभित तुम्ही, आपापल्या स्थानी


अमोल पाटखेडकर

२३-जानेवारी-२०२३

No comments:

Post a Comment