Sunday, 28 February 2016

सिद्ध कवीची साध्य कविता

शार्दूलविक्रीडित - छंदःशास्त्रातल्या एका वृत्ताचे नाव, याच्या चरणात १९ अक्षरे ,,,,,,, हे गण असतात. शार्दूल म्हणजे वाघ, राक्षस, श्रेष्ठ, असे तीन अर्थ, हे सर्व यासाठी सांगितले की, श्री. अरुण सदाशिव मोहरीर या शास्त्रज्ञ कवीने प्रमोद सदाशिव मोहरीर यांच्या 'कौस्तुभ' नामक पुत्रासाठी जी विवाहप्रित्यर्थ 'मंगलाष्टके' केली आहेत ती कोणताही साहित्य निकष लावला तरी किती 'सर्वार्थ' ठरतात हे सांगण्यासाठी! काव्य करणे हेच मुळात 'प्रतिभा' या अलौकिकतेशी संबंधित. त्यात वृत्तावर पकड ठेवणे खूपच कठीण! वाघ चपळ - क्षणात त्याच्या झेपेचा आवाका नजरेच्या पलीकडे, राक्षस क्रूर पण शक्तिमान, विजयाची उन्मत्तता असणारा. 'श्रेष्ठ' म्हणजे वादच नाही. उच्च पदवीला पोचणारा. अरुणची शब्दार्थ, वृत्त भावपरिपोष यावरची पकड चपळतेलाही लाजविणारी आहे. ज्या ज्या देवतांचा व्यक्तींचा उल्लेख मंगलाष्टकात आला आहे त्या व्यक्ती राक्षसासारख्या क्रूर नसल्या तरी शक्तीमान विजयासाठी नेहमीच उन्मुक्त आहेत. क्रूरता हा बाह्य अभिनिवेश घेता आंतरिक गुण इथे अपेक्षित धरले आहेत; आणि आत्ताच सांगितले की काव्य श्रेष्ठत्वास पोहोचले आहे. का बरे मी इतकी सगळी प्रस्तावना करते आहे - बघु या!
मोरेश्वर मार्तंड मोहरीर, सदाशिव मोरेश्वर मोहरीर, प्रमोद सदाशिव मोहरीर, कौस्तुभ प्रमोद मोहरीर ही नामावली बघा! यातील 'मार्तंड' हे मोहरीर शाखा प्रमुख! त्याआधीचे माहीत नाहीत. मार्तंड हे आमचे पणजोबा. 'मार्तंड' म्हणजे सूर्य. 'वाडा' सूर्यप्रकाशाने उजळून निघत असे हा एक अर्थ मार्तंड पणजोबांच्या दिव्य, तेजस्वी आचरणाने, सर्व वाड्याला स्थिरत्व दिले हा दुसरा अर्थ घेऊ या. सरस्वती, गणपती मोरेश्वर यांचे पूजन नित्य होत असे हा वाच्यार्थ. सरस्वती विद्येची देवता - सर्वांवर सरस्वती प्रसन्न हा अर्थ. बाबा(सदाशिवराव मोहरीर) शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेले, मुलांवर शिक्षणाचे संस्कार करणारे - अनेक अर्थ प्रतिमा! गणपती मोरेश्वर दोन्ही एकच - पण वेगवेगळे का लिहिलेश्री गणपतीची पूजा सर्वारंभी ही तर मान्यताच. बाबा अत्यंत धार्मिक वृत्तीचे. 'सुधीर सदाशिवराव मोहरीर' चा जन्म गणेश चतुर्थीचा ही फलश्रुती. पूजापाठ तर घरात असेच असे! 'मोरेश्वर' हे त्यांचे वडील, आई 'राधा'. आईवडिलांची आठवण नेहमीच, त्यांचीही पूजा. आमच्यासारख्यांच्या मनात अनेक संदर्भ दाटून येतात. ही व्यक्तित्वे कुळाला भूषणभूत! अशा कुळात जन्म ही 'प्रस्तावना' अरुणची भावली. 'वाडा' ही वास्तू 'वरदा' या शब्दाने रेखाटली हे खूपच भावले! 'प्रमोद' हे श्रीविष्णूचे नाम, त्याच्या मुलाचे 'कौस्तुभ' होणाऱ्या सुनेचे 'वैजयंती' - किती योगायोग! विष्णूच्या गळ्यातला ताईत म्हणजे कौस्तुभ मणि वैजयंती हार तर विष्णूचे भूषणच. सगळे कसे मंगल जुळून आले असे वाटते की नाही? सदाशिव विष्णूचा जप करतो तर विष्णू सदाशिवाचा असे म्हणतात. हाही अर्थ मी घेते. 'प्रमोद' हे व्यक्तिमत्व आम्हा सर्वांच्या मनात अनेक आठवणींना उजागर करते. वाडा नाही; पण वाडेकरी या लग्नाला नागपुरात सन्मुख होणार! बाबांचे जन्मशताब्दी वर्ष अरुण उत्साहाने साजरे करतो आहे. त्यात या कार्याची भर, नवीन सून घरात येणार याचा आनंद अरुणच्या शब्दातून ओघळतो. बाबा प्रमोदचे डोळे त्याला आकाशात चमकतांनाही दिसतात! भावपूर्णता शब्दांद्वारे साकार करण्याचा प्रयत्न खूपच चांगला! अनुषा- वैशालीची मुलगी, वैशाली, कौस्तुभची बहीण. अनुषा, स्नुषा शब्दप्रयोग लक्षणीय! बाबा प्रमोदसाठी या घटना निश्चितच डोळ्यात सुखाची चमक आणणाऱ्या आहेत. प्रत्येक शब्द त्याद्वारे अर्थाचे संवाहन खूपच वेधक आहे. त्यासर्वांमागील संदर्भ ज्यांना माहीत आहेत त्यांच्यासाठी तर भावनांचा पाझर रोखणे कठीण होते. मंगलाष्टके वाचून अनंत आठवणींनी माझे स्वतःचे डोळे भरभरून वाहिले!  'होळी' म्हणजे वर्ष संपण्याची नांदी. लग्न २० मार्चला आणि होळी २३ मार्चला! गेलेल्या दिवसांची आठवण नेहमी सोबतच असते, पण वसंत ऋतूही मनाला मोहरवतो आणि गुढीपाडवा खुणावतो. वैजयंती नवीन वर्षात(मराठी वर्ष) पदार्पण करणार, चैत्र गुढी या सर्व प्रतिमा अत्यंत समर्पक. काव्याचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे एकही संदर्भ कवीने डावलला नाही. मंगलाष्टकांची सिध्दता खूपच सिध्द हस्ते झाली आहे. गतकाळ 'सुवर्णयुग' होता तरी नित्य नवीन दिवसाला सामोरे जाण्याचा संदेश खूप प्रभावी आहे. मंदाकिनी ही स्वर्गंगा आहे. रात्रीच्या वेळी 'मंदाकिनी चंद्रमा' आकाश उजळते. आकाशात ता-यांचे पुंजके मिळून दिसणारी नदीच्या प्रवाहासारखी आकृती म्हणजे आकाशगंगा. सप्तर्षि(मरीचि, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, ऋतु वसिष्ठ) याच नावाचे धृवाजवळचे सात तारे चंद्र, रोहिणी, असे सगळे संदर्भ घेऊन अरुणने, प्रमिला-सदाशिव, प्रमोद-मंदाकिनी असे सर्व एकत्र गुंफून कौस्तुभ आणि वैजयंतीला या नभात झळका असा मंगल आशिर्वाद दिला आहे. 'उंच निळा' म्हणजे आकाश, त्याला अंत नाही, प्रगतीताटाला काठ नाही. रत्नाकरात रत्ने अनंत, क्षीरसागर- ( विष्णू क्षीरसागरी वास्तव्यास). समुद्रमंथनातून, लक्ष्मी-कौस्तुभ निघाले वगैरे प्रतिमा वापरुन त्याने कौस्तुभ-वैजयंतीला हंसासारखा नीरक्षीरविवेक ठेवण्याची केलेली इच्छा, शब्द भाव यांच्या गुंफणीचे कौशल्य पुनःपुन्हा पटविते. 'सर्व विश्वाचे प्रांगण आपलेच आहे, वाड्याचे दार उघडा, तेथील श्वास ऊरी भरुन घ्या, तेथील ऊब अंगिकारा, दिगंती पंख हलवा' - वगैरे वगैरे शब्दसंपदा अनेक अर्थांचे आकाश खुले करते. वाड्याने निर्माण केलेला इतिहास जाणणे, नवागताला माहीत करुन देणे हीही एक मोठी जबाबदारी. एकूण काय अरुणने एका उत्कृष्ट काव्याला जन्म दिला  आहे.

   'मराठी दिनानिमित्त' हाच खास लेख.
   'राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त' 'विज्ञानकवीचे' अभिनंदन.

'गेले ते दिन, ते सुवर्णयुग' ही चित्ती जरी भावना अस्ता जाउनि तोच सूर्य परते पूर्वेस हो नित नवा सूर्याचा उदयास्त रंग उधळे तो एकची तांबडा संध्या आणि उषा दिशा बदलती, कुर्यात सदा मंगलम्.

वरील मंगलाष्टकातील ओळींचे आणखी केलेले स्पष्टीकरण.

गेलेले दिवस 'सुवर्णयुग' होते यात काहीच संशय नाही, अरुणप्रमाणे सर्वांच्याच मनात ती भावना जागृत आहे; याचे कारण गेलेल्या व्यक्तींनी जो कर्तृत्वाचा दिव्य, तेजःपुंज प्रकाश आसमंतात उजळला आणि त्याच्यात आपण सर्वच न्हाऊन निघालो. तसे दिवस पुन्हा येणे नाही हे तर त्रिवार सत्यच, पण दुसऱ्या दिवशीही सूर्य उगवतोच की! अस्तंगत सूर्य नित्य नवीन रुप घेतल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पूर्वेच्या क्षितिजावर दिसतोच. बाबा नाहीत तर अरुण, प्रमोद नाही तर कौस्तुभ, आपापल्या तेजाने तळपतच राहणार! रंगांची उधळण सतत चालूच राहणार. सूर्योदय, सूर्यास्ताचा तांबडा रंग तर तोच राहणार! संध्याकाळ आणि सकाळ यांच्यात फक्त बदल झाला असतो. मंदाची जागा आता वैजयंती घेणार! दिनक्रम चक्रनेमिक्रमाने चालूच राहणार हा आशावाद ठेवून या लग्नाचे स्वागत करावे! म्हणा, 'कुर्यात सदा मंगलम्'. हा अर्थ निघतो असे मला वाटते.
'जेथे नेति नेति श्रुति l
तेथे चले भाषावित्पत्ती l
परब्रह्म आदिअंती l अनुर्वाच्य'

असे रामदास म्हणतात तेच खरे!

       संगीता पाटखेडकर.

        २८//२०१६

असा वाडा होणे नाही!

 'वाडा', तू माझा प्रेरणास्त्रोत कळते का रे तुला?
 किती व्यापून टाकलेस तू माझे मन, गहिवर दाटतो, भरुन येतो गळा तगराच्या झाडाला लगटून असलेली सोपेची वेल, त्याची चव विसरता विसरत नाही  सहस्त्रकमळाचे आणि सूर्यकमळाचे डोळे भरुन घेतलेले दर्शन, डोळ्यातून जाता जात नाही  टिक्करबिल्ला, कण्हेराच्या झाडाला लपंडावाच्या निमित्ताने घातलेल्या प्रदक्षिणा आणि पडणे, धडपडणे, आणि खेळांची मज्जा कशी काय विसरणार?
तूच सांग मला, इतक्या आठवणींचा कोश साठलाय माझ्या मनात तो रिता करावा लागणारच ना! नाहीतर त्या कोशाच्या भाराखाली दबून जाईल ना मी!
ते मोठमोठे दगडी पाटे, त्याच्यावर सपासप आपटून धुतलेले धुणे, मोठमोठे पाणी साठवण्याचे बंब आणि टाके, कितीक उपसलेले आणि भरलेले पाणी, झाडांची आळे आणि त्यांची फुले, फळे नजरेसमोरुन हटत नाही.
 एकेक दगड, एकेक वीट आणि मातीचा कण अन् कण साद घालतो मला आणि लेखणी हातात घेतल्याशिवाय राहवत नाही.
अरुणने प्रमोदचा मुलगा कौस्तुभ याच्या लग्नाच्या निमित्ताने केली मंगलाष्टके काय एकेक शब्द भावफुलोरा सजवत गेला, मनाला आला मोहर, भावनेला आला बहर आणि लेखणी झाली सज्ज.
 वाड्या ही तुझीच तर साद ना रे!
वाड्याशी संबंधित प्रत्येकजण आपापल्यापरीने प्रस्थापित झाला आहे.
कुणालाच नाही कशाचेच उणे!
हे देणे तुझेच ना रे!
पावित्र्याचे, संयमाचे, ज्ञानाचे अग्निहोत्र चालविणारे बाबा नेहमी व्यासंगात मग्न असलेला प्रमोद तर रोमारोमात भिनून राहिला आहे.
'अखंड सर्वांसाठी कष्टणारी आई', तिचा आशिर्वाद आमच्यावर आहे ही तुझी कृपा कशी विसरु?
किती आठवू तुला? किती आठवू?
साक्षीभूत तू सर्वांचा किती अपार माया तुझी?
मनाचे डोळे नेहमी तुझ्यावरच ही आरस्पानी छाया तुझी!
एक वास्तू किती कोणाला काय देऊ शकते याचा तू मूर्तिमंत 'नमुना'.
सर्वजण आठवतातच तुला, तुझ्यासारखा दुसरा नाही,
   तू आमचा 'दागिना'

     संगीता पाटखेडकर.

      २५//२०१६.

Saturday, 20 February 2016

थोडे 'विष्णूसहस्त्रनामा' विषयी भाग २

कुणी, कुणाला, केव्हा, कोठे कशासाठी हे सर्वच प्रश्न आध्यात्मिक क्षेत्रात फार महत्त्वाचे असतात. 'विष्णूसहस्त्रनाम' या स्तोत्राचे अवतरण ज्या प्रसंगाने झाले तो प्रसंग बघा - भीष्म कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर शरशय्येवर आहेत. इच्छामरणी असल्यामुळे उत्तरायणाची वाट बघत  आहेत. योगबलाने प्राण धरुन ठेवलेले आहेत. अशा वेळेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले की 'भीष्म' हे आठवा वसू आहेत. त्यांच्यासारखा धर्मज्ञ, ज्ञानी, तत्ववेत्ता, भक्त पुण्यात्मा पुन्हा होणे नाही. त्यांच्याबरोबरच त्यांचे सर्व ज्ञान नाहीसे होऊ नये म्हणून तू आत्ताच त्यांची मनधरणी करुन ते सर्व ऐकून घे! मग युधिष्ठिर त्यांना विनंती करतो आणि भीष्म त्याला हे स्तोत्र ऐकवितात. या स्तोत्रातील नामे महाभारत काळातील आहेत असे नाही. अनादिकाळापासून ती प्रचलित आहेत. या नामांवर अनेक कल्पांपासून ऋषीमुनींनी तप केलेले आहे. या नामांमध्ये मंत्रसामर्थ्य आहे. भीष्मांचे ही नामे एकत्र  गुंफण्याचे कौशल्य जाणवते. प्रत्येक नाम भगवंताचे कुठले ना कुठले वैशिष्ट्य सांगणारे असते. विविध संदर्भ, विविध सखोल अर्थ त्या नामाशी निगडीत असतात.
  युधिष्ठिर हा यमपुत्र! यम ही देवता व्यक्तीच्या आयुष्याचा न्यायनिवाडा करुन त्याला सद्गती की दुर्गति हे ठरविणारी मृत्यूदेवता! युधिष्ठिराला 'धर्मराज' म्हंटले जाते. आयुष्यभर 'धर्म' या शब्दाशी अधिष्ठित स्थिर राहिलेला. त्याचे प्रश्न आत्यंतिक धर्मजिज्ञासेचे सर्वांसाठीचे! भीष्म ही व्यक्ती असाधारण त्याग; कृष्णालाही शस्त्र हाती धरायला लावणारी. ' धरी शस्त्र, करी मी' ही कृष्णप्रतिज्ञा! पण स्वतःच्या अतुलनीय पराक्रमाने त्यांनी कौरव-पांडव युध्दात इतके तेजस्वी रणनीतीचे सामर्थ्य दाखविले की कृष्णाला सर्व प्रतिज्ञा बाजूला सारुन सुदर्शन चक्र हाती घ्यावे लागले. भीष्म कृष्णभक्त-विष्णूभक्त - देवाला स्वतःकडे वळविण्याचे सामर्थ्य त्यांच्या भक्तीत होते. अशा या दोन असाधारण व्यक्तींमधला हा संवाद म्हणजे 'विष्णूसहस्त्रनाम' स्तोत्र! या स्तोत्राच्या फलश्रुतीत - स्तोत्राच्या श्रवण-पठनाची वेगवेगळी 'फले' सांगितली आहेत. ती सर्वच तुम्हाला मिळतात तेव्हाच, जेव्हा पूर्ण मनापासून ते स्तोत्र; तुम्ही अवगत केले तरया स्तोत्रातील प्रत्येक नामाला चतुर्थी प्रत्यय लावून आरंभी   शेवटी नमः म्हंटल्याने त्यांचे नाममंत्र तयार होतात. ऐहिक आणि पारमार्थिक दोन्हीही क्षेत्रात अत्यंत यशस्वी करणारे हे स्तोत्र प्रत्येकाने अभ्यासावयास हवे.
   संस्कृत येत नाही म्हणून गडबडून जावयास नको. अत्यंत चिकित्सा आजकाल करावीच लागत नाही. इंटरनेटचा जमाना आहे. सर्व अर्थ मिळू शकतात. मुख्य हवी जिज्ञासा! संस्कृतच्या उच्चारणाने 'शब्दब्रह्म' प्रसन्न होते. हा प्रणव आहे. प्रणव हा वैराग्याशी निगडित असून ज्ञान वैराग्याने स्थिरावते, म्हणून भीष्मांनी विष्णूसहस्त्रनामाची सुरुवात प्रणवाने केली आहे. सर्व मंत्र प्रणवातूनच उद्भवलेले असतात. भगवन्नाम प्रणवरुप मानून जपले तर संसारात राहूनही परमार्थ साधला जातो. ज्ञानेश्वर, त्यांचे भाऊ बहीण हे आध्यात्मिक मार्गातील उच्चतम आदर्श! सर्वांनाच हे कसे शक्य? रामकृष्ण परमहंस सांसारिक होते, एकनाथ सांसारिक, तुकाराम सांसारिक, पण पुढे वैराग्यभावना प्रबळ होऊन, संसारात राहूनही परमार्थवाटेवर अग्रेसर ठरले. सर्वांना रामदास किंवा विवेकानंद होणे शक्य आहे का? मग आपल्याला झेपेल एवढे करावे!
  'विष्णूसहस्त्रनाम' पाठ आहे, हे कळल्यानंतर ऐकणारा विस्मयचकीत होतो, हा माझा अनुभव आहे. आपल्यालाही ते असावे असे वाटणारेही पुष्कळच असतात. अधिकाधिक मी पाठांतर करावे असे मला अनेकांनी नेहमीच सुचविले आहे. त्यात माझे आई-वडील(प्रमिला मोहरीर सदाशिवराव मोहरीर) माझे आजी-आजोबा(आईचे आई वडील - सत्यभामाबाई सास्तीकर मुरलीधरपंत सास्तीकर) प्रमोद मोहरीर-(माझा मोठा भाऊ) या सर्वांचा समावेश आहे. प्रमोदला तर खंतही होती की त्याला इच्छा असून हे सर्व पाठांतर करण्यासाठी पुरेसा वेळ नाही म्हणून! प्रमोद हा अत्यंत व्यासंगी, ज्ञानी अभ्यासू वृत्तीचा! त्याने सर्व धर्मांचा अभ्यास केला होता. त्याची स्मरणशक्ती खूपच प्रभावी होती.
    विष्णूसहस्त्रनामाच्या पारायणाने एक संरक्षक कवच निर्माण होते असा अनुभव अनेकांनी सांगितला आहे. मनःसामर्थ्य वाढते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. घरात शांति, समाधान निर्माण करण्याचे सामर्थ्य 'विष्णूसहस्त्रनाम' स्तोत्राच्या लहरीत आहे.
    नागपूरच्या दक्षिणामूर्ति मंदिरातील बाळशास्त्री हरदासांची चातुर्मास्यातील कीर्तने मला अत्यंत प्रिय असत. ती ऐकण्यासाठी मी आमच्या महाल विभागातील मोहरीरांच्या वाड्यातून भुस्सकन् निघून जात असे. शांता मावशी बाळशास्त्री हरदास हे माझ्या मनावर खोलवर संस्कार करणारे एक आदर्श जोडपे, मला वाटे. गोपालकाल्याचे कीर्तन त्यानंतर 'गोपालकाला' हे सर्वच प्रेक्षणीय असे. मनाच्या गाभाऱ्यात खोलवर दडून बसलेल्या, भक्तीचा संस्कार करणाऱ्या अनेक आठवणींचा उगम 'दक्षिणामूर्ति मंदिरात' आहे. ती वास्तू भलेही नजरेसमोर आज नाही; पण अंतर्मनाच्या नजरेत ती नित्यच आहे. माझ्या सासरचे लोक, माझे पती मुले यांच्यामुळेही मला सतत भक्तीचा अनुभव घेता आला आहे. मला लागणारे सर्व पूजासाहित्य साग्रसंगीत रीतीने मुकुंदरावांनी नेहमीच आणून दिले. अमोलने माझी आवड ओळखून दुर्गा सहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम, शिव सहस्त्रनाम, मला टाईप करुन पाठविले. निरनिराळे भक्तीसंगीत मला नेहमीच ऐकविले. भक्तीची पाळेमुळे तर आईबाबांमुळे रुजलीच होती. ती कधीही नष्ट होऊ नये म्हणूनच की काय अनेकांचा त्याच्या संगोपनासाठी खूपच मोठा हातभार लागला. एम..ला असताना संतसाहित्याचा पेपर म्हणजे नुसते परिक्षार्थी वाचन नव्हते तर खूप उत्सुकतेपोटी मनःपूर्वक केलेला तो अभ्यास होता. अशा अनेकानेक सहस्त्र व्यक्तिमत्चांनी(घर, नातेवाईक, परिसर, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, नोकरीनिमित्ताने संपर्कात आलेले लोक, लग्नानंतर ओळखीच्या मंडळींचा वाढलेला आवाका) भक्तीरसाचा पाया मजबूत केला आहे. श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला विश्वरुपदर्शन घडविले. आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये भगवंताचा साक्षात्कार घेण्याची महान किमया अवगत करणे अशक्य असले तरी कमीतकमी दोषदुर्लक्ष करणे तर शक्य आहे ना! बस्स् तेवढेच पुरे!

       संगीता पाटखेडकर.

        २१//२०१६.