Tuesday, 26 November 2019

आठवण सुखावते


    अनाहूत वेळ
    बेसावध मी
   वेळी-अवेळी
   ती जागते आणि
   जागविते भावना
   ती अशीच अचानक येते
   
    क्षणभरात अगदी
    किती चित्रं दाखवते
    सोबती मला घेऊन
    काळात हरवूनी जाते

    आयुष्य त्या अरुणाचे
   अलगद डोळ्यांपुढे आणते
      माझा मामा गं तो
      मी तिला म्हणते
      माहित आहे मला 
    म्हणूनच तुझ्याजवळ येते

    तिच्या चित्रपटांत
    रुपे त्याची किती मी बघते
    शास्त्रप्रविण तो वैज्ञानिक 
    विनोदवीर तो मार्मिक
    सहजकवी की लेखक
    विद्यार्थी प्रिय शिक्षक
    कोणते रुप वाखाणावे
      प्रश्नांत मी पडते

    पटत नाही मनाला
    त्याचे आता नसणे
    आठवणींच्या पातळीवर
    प्रत्यक्ष त्याचे असणे
    गेले ते दिन गेले तरी
    मन भरुन पुन्हा येते

     पुन्हा पुन्हा ती येते
    कापूसकोंड्याची गोष्ट सांगते
    आजोबांच्या पुस्तकातून बोलते
    'उद्या लग्न आहे' म्हणते
    
     आठवण गाथा त्याची सकळ
     माझी मात्र रिक्त ओंजळ
    तटस्थपणे बघा कशी ती बघते
     उष्णतेच्या तकोट्यात कधी
     कधी थंड वा-याच्या झुळुकीत
     आठवण त्याची सुखावते

     अलगद मग ती उतरते
     पापणींच्या कडांवरती
     भरले नयन अश्रूंचे
     सहज वाहुनी जाते

   ती अशीच अचानक येते

   ती अशीच अचानक येते

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
    २५ नोव्हेंबर २०१९.

Thursday, 21 November 2019

तू माझी लाईफलाईन आहेस


  माझ्या मनांत दोघी राहतात. एकीचं नाव 'मनवा' आणि दुसरीचं नाव 'ऊमी.' -याच दिवसांनी घरी आलेल्या मैत्रिणीला माझं हे बोलणं काही कळलं नाही. म्हणाली, फोड करुन सांग ना! मी म्हणाले, बघ! माझं मन नेहमी माझ्याशी दोन रुपांत बोलतं. मनातल्या सगळ्या भावभावना, सुखद, दुःखद प्रसंग मनवा व्यक्त करते, आणि जर कधी निराश झाली तर ऊर्मी आशेचा आरसा दाखवते. ऊर्मीला अनेक नावं आहेत गं! अंतःप्रेरणा, स्फूर्ती अशी अनेक!! जी आपल्याला सकारात्मकतेकडे तर नेतेच पण आपल्याजवळ असलेल्या छंदांचीही जाणीव करुन देते. त्यामुळे मनवा जशी जवळची ना! त्यापेक्षाही कांकणभर जास्तच ऊर्मी आपल्यात जपावी. तीच आपली खरी लाईफलाईन असते; जी सर्वकाही चांगलंच करण्याची प्रेरणा देते आणि आपण ताजेतवाने राहतो नेहमीच

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
      २१ नोव्हेंबर २०१९.

जीवाचा सखा


    परिसर सदैव गर्दीचा
  शोध कसा घ्यावा माणसांचा?
   अविश्वासी ह्या दुनियेत
  हात कसा धरु विश्वासाचा?

  धावत सुटतो आपण
  शोधात मायामोहाच्या
  ऐकत राहतो कानांनी
  गोष्टी गोड गोड शब्दांच्या

   हसणे आणिक बोलणे
   बरेचदा असते फसवे
   ठाऊक असूनही सारे
  मुकाट वाटा धरायच्या

   ज्यांना मानतो कधी देव
   माणसांतही कधी प्रकटे रावण
   पायाखालची जमीन सरकते
  ओळखू येतो भाव खोट्या चेहऱ्याचा

    म्हणूनच अशा माणसी दुनियेत
     मी निसर्गाला बिलगते
    पाखरांच्या थव्यासंगे
    मीही झाडाजवळ विसावते
    गंध भरुनी घेते फुलपाकळ्यांचा

    नसते जात नि पात सृष्टीजवळ
   नसते ठाऊक त्यास इथली वावटळ
   माणसी दुनियेला कलंक किती सारे
    शोधते निसर्गी दरवळ चंदनाचा
    भेटतो सखा तिथेच जीवाचा

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
     २१ नोव्हेंबर २०१९.

Tuesday, 19 November 2019

जीवन ओढ


जीवन सागर नाही परिपूर्ण
 किनारा त्यासही अपूर्ण 
  कधी अशक्य वाटे शक्य
  कधी शक्य वाटे अशक्य
  कपोलकल्पित स्वप्नांचे
  किती बांधावे उंच मिनार

  तरीही गाठू बघते ध्येयपथ
  अपूर्णता नसतेच उणीव
  जगण्याची सार्थ जाणीव
  मनांस निववी सैरभैर

  अपूर्णतेनेच वाट दावावी
  अंधारातही ज्योत उजळावी
  तमाची तमा बाळगता
  मात करावी भरभर

  अपूर्ण आपण, अपूर्ण सारं
   पूर्णत्त्वासी दूर सागर
  अथांग तरीही, अनंत जरीही
 जगण्याची हरएका ओढ अनावर

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
     १९ नोव्हेंबर २०१९.

स्त्री मना


  निवांत क्षणी तरी गं
  स्वतःला नीट भेटशील कधी?
  अश्रु पुसून नयनांतील 
  काळजातली काळजी लपवशील किती?
  बाहेर कित्येकदा काय काय बघितलंस
  स्वतःच्या आत डोकावशील कधी
  मनाची कवाडं उघडशील कधी?
  सुखांचे स्वागत करशील कधी?
  छोट्या छोट्या गोष्टीतला 
  मनसोक्त आनंद घेशील कधी
  क्षणाक्षणातले हसरे उत्सव
  साजरे करशील कधी
  प्रेमळ काळजाचं स्त्रीमन तुझं
  धडधड त्याची जाणशील कधी?
  स्त्रीजन्मा तुझ्या जगरहाटीत
 स्वतःवर प्रेम करशील कधी?
  अंतर्नाद अंतरीचा
  मनापासून ऐकशील कधी
  स्व छंदातला शब्द निःशब्द 
  व्यक्त करशील कधी
  गं स्त्री गं सखी सांग ना?
  निवांत क्षणी तरी गं
  स्वतःला नीट भेटशील कधी?

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
      १९ नोव्हेंबर २०१९.

Monday, 18 November 2019

पार करत मैलांचे दगड


पार करत मैलांचे दगड
  चालत राहीन तोवर
  दुःखभरला तरी पहाड
  मनांस देईल घट्ट पकड
  काट्याकुट्यातली वाट 
  जीवांत जीव जोवर
  चालत राहीन तोवर
  थकणार नाही आशा
  पदरी नव्हतीच निराशा
  प्रयत्नांच्या पराकाष्ठेत
  थांबणार नाही पळभर
  चालत राहीन तोवर
  उजाड रुक्ष वाळवंट
  सुकला जरी अधरोष्ठ
  तहान ज्ञानाची डोळाभर
  चालत राहीन तोवर
  येणार नाही कधी कंटाळा
  विरक्त होणार नाही चैतन्य 
  श्वासांत श्वास निर्मळ जोवर
   चालत राहीन तोवर
  जीवाजीवांचे सुख चिंतिन
  आयुष्याचे सार्थक करेन
  अंतःप्रेरणेची साद जोवर
   चालत राहीन तोवर
   वेदनांना चिरा देऊन
  सहवेदनांची जाण ठेवून
   प्रेमसुमनें भरुन ओंजळभर
    चालत राहीन तोवर
    जीवांत जीव जोवर
    चालत राहीन तोवर
    
   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
      १८ नोव्हेंबर २०१९.

Saturday, 16 November 2019

गगनीं अबोल तारका


   वाराही आज मंद सारखा
   चंद्राच्या हवेत शिरशिरी का
   फुलांनाही भय काट्याचे का
   हेमंत ऋतुतला दिस आज वेगळा का
  जड मनाला असा वाटे निसर्ग दुःखी का
  मायेची ऊब कधी कुठे हरवली का
   कुणाचीही असो आई ती आईच
   ती आज नाही हे मनाला समजेल का
   माझ्या मनींचे असे खेळ हे का
   मनांस कधी अटळ उत्तर मिळेल का?
   अधुरेपण आईविना मन स्वीकारेल का
   कुणाचीही असो आई ती आईच
   ती आज नाही हे मनाला समजेल का
   
   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
      १६ नोव्हेंबर २०१९.

सातत्याने बदल हे तर विश्वरहस्य आहे.


सातत्याने बदल हे तर विश्वरहस्य आहे. आजतागायत या बदलांमुळेच मानवी मनावर खूप आघात झाले आहेत. बदलण्याच्या, एकदम दृश्यात खूप परिवर्तन करण्याच्या प्रक्रिया, दैवी शक्तींजवळ खूपच कल्पक आहेत. माणसाचे एकाएकी, आजपर्यन्त या जगात वावरलेले असतांना; एकदम निघून जाणे ही तर विचारांना थांबविणारी प्रक्रिया खूपच भंडावून सोडणारी आहे, दुःखद आहे; आणि तरीही माणसाला स्वतःविषयी विचार करायला लावणारी आहे
 श्रीयुत नानासाहेब, श्री भूषण, सौ. अपर्णा, सौ. कविता, सरिता यांच्यावर विजयाताईंच्या जाण्यामुळे जी आपत्ती कोसळली आहे, त्यांच्या त्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. अशा वेळी शब्दांनी सांत्वन होत नसले तरी शब्दांना पर्याय नाही. विजयाताई या अत्यंत प्रेमळ व्यक्तित्त्वाच्या होत्या. शेवटपर्यन्त कार्यरत होत्या. आध्यात्मिक वृत्तीच्या होत्या. भजनी मंडळात जाणाऱ्या होत्या, व्यायाम करणाऱ्या होत्या. ठिकठिकाणी प्रवास करुन सर्वांशी संपर्क साधणा-या होत्या. सर्वांशी आपुलकीने धागा जोडणा-या होत्या. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. चांगले आयुष्य त्या जगल्या. सवाष्ण गेल्या ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नानासाहेबांची आता फारच काळजी घ्यायला हवी
असो. 'जाणे' हा अटळ सत्याचा भाग आहे. दुःखाला समर्थपणाने स्वीकारा. अजून काय लिहू?

   संगीता मुकुंद पाटखेडकर
     १६ नोव्हेंबर २०१९.

Thursday, 14 November 2019

माझं बालपण


काय सांगू? कसं सांगू? बालपण कसं असतं
शब्दातीत असतं
शब्दांच्या पलीकडे कल्पनातीत असतं
 उच्च कोटीचं निरागस असतं
 आई वडीलांच्या मायेने भरलं असतं
 बहीणभावांच्या संगतीत बहरलं असतं
मखमली वाटांच्या मखमालीने मुलायम असतं
अल्लडपणातला हुडपणा जपणारं असतं
बेफिकीर, भयविरहित दिसांचं असतं
वडीलांच्या पोटावर पोट्टूगागा करणारं असतं
वडीलांच्या हातावर हात्तुगागा करणारं असतं
 लाडाकोडात वाढविलेलं इवलंसं पिल्लू असतं
मायपित्याच्या आठवणींशिवाय अधुरं असतं
कितीही मोठी झाले वयाने तरी
बालपण नेहमीच भूतकाळात रमविणारं असतं
आईच्या मागे मागे धावणारं असतं
आईलाच हवं ते देणारी परी मानत असतं
बालपणच संस्कारी आयुष्याचा पाया असतं
भाग्यवान ते माझ्यासारखे ज्यांचं बालपण सुंदर असतं
काय सांगू? कसं सांगू? बालपण कसं असतं
शब्दातीत असतं
शब्दांच्या पलीकडे कल्पनातीत असतं

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
      १४ नोव्हेंबर २०१९.

Monday, 11 November 2019

आला पक्षी


आला पक्षी
   गेला पक्षी
   इथला पक्षी
  स्थलांतर पक्षी
   वेगवेगळे रंग
  विविधांगी नक्षी
  कधी बसतो फांदीवर
  कधी ऐटीत कारवर
  कधी बागडे अंगणी
  ह्या सा-यांस बघण्या
  प्रभातीचा ध्यास मनीं
  दूर रानीं मोर थुई थुई
  तृणातून वाजे कोल्हेकुई
  पात्यांवर डोले फुलपाखरु
  त्यांसवे उडे मनपाखरु
  हरणांचे कळप दिसे पुढे
  काळवीटांचेही दर्शन घडे
  करडा ससा हळूच डोकावे
  बिळात टुणकन् धावे
  गायी, बक-या, म्हशींना
  काय वेगळे नाव द्यावे?
  माझ्या पवन वाटिकेतले
   सजीव हे 
  डोळा भरुनी रोज पाहावे

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
     ११ नोव्हेंबर २०१९.

Monday, 4 November 2019

स्मृतिगंध


  रोज येतो नवा नवा
  दिवस रोजचाच हवा
  नव्या नव्या रोजनिशीत
  आठवणींचा जुना थवा
  
  रोजनिशीतले कागद कोरे
  पृष्ठावरचे चित्र हसरे
  भरगच्च शाईतले अक्षर गहिरे
  वेधती जुन्या खुणांचे धागेदोरे

   अबोल सा-या भावना
   बोलक्या होती संवेदना
   मुक्याच बरं काही वेणा
   क्षीण जाणिव मनांमनां 

   कालवाकालव ही साहवेना
   भार हा तनमना सोसवेना
   आठवणीँच्या ऋणानुबंधा
   रोजनिशीचे पान पुरेना

    रोज येतो नवा नवा
    दिवस रोजचाच हवा
  नव्या नव्या रोजनिशीत
  आठवणींचा जुना थवा

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
      नोव्हेंबर २०१९.

Tuesday, 29 October 2019

ज्योती ज्योतींनी अंगण प्रकाशले


ज्योती ज्योतींनी अंगण प्रकाशले
   मनामनांचे अंतरंग तेजाने उजळले
   तमाचे भवताल भेदक शहारले
   हर्षोल्हासात सारे आसमंत झळाळले
   नात्यांच्या उत्सवाचे महत्त्व आगळे
   फराळ, फटाके, रांगोळ्या, आकाशदिवे
    जणू शुभ दीपावलीचे डोहाळे
   
    ......मृदुला.
          २९/१०/२०१९.