Thursday, 27 May 2021

विक्षिप्त

 अयोग्य निराळी , विस्तीर्ण पताका

उद्विग्न गुणांचा, विरागी उतारा

 

उल्हासी उग्रता, मतीची मर्यादा

उद्योगा रम्यता, अन्यथा तमाशा

 

किड्याच्या हुकूमे, अडाणी शहाणा

उन्नती भयाची , वर्चस्व उतारा

 

मद्यार्क जिभेचे. मिलाफी चढावा

समीधा गुणांची, भस्माची तुल्यता

 

विनोदी टवाळा, नीतीचा गबाळा

अर्वाच्य मस्करी, बुद्धीच्या दिनाला

 

अमोल पाटखेडकर

२७-मे-२०२१

Tuesday, 25 May 2021

नियती

घाव भरत नाही, अवसर सोडत नाही

कोरडी ममता, सद्गदित!

 

मिथ्योपचार संपत नाही, मत्सर दुरावत नाही

पायात काटा रुतत नाही, वास्तविकतेचा!

 

पाण्यात मी पाहिले, जळले लक्षण मेले

दुसऱ्यास काही झाले, प्रतिकूल!

 

मेंदूचा भार, ग्रंथांचे आभार

अंगीकारणे विचार, अलिप्त!

 

प्रेषितांचे प्रेषित, उद्गारतो अतिशुद्ध

अश्वांचे नियंत्रण, शिथिल!

 

जुने ते सोने, असे जरी खरे

नव्याचे बोलबाले, यथायोग्य!

 

अन्य केले, नगण्य ते होते

कर्म मी केले, महाकठीण!

 

मोळीचा बोझ, कण्याचा दोष

संचित भोग, अनिवार्य!

 

भूतकाळ सावट, वर्तमान प्रतिबिंब

ठरवे भविष्यकाळ , प्रारब्ध!

 

अमोल पाटखेडकर

२५-मे-२०२१

Saturday, 22 May 2021

निर्बंध स्वप्ने

उदरात गुपित काळाच्या, भंगलेले महाल विपरीत स्वप्नांचे

पराकाष्ठा प्रयत्नांची चिकाटीने, विवर विनाशाचे खोदले

 

नीतिमत्ता वेसंगली, निर्भत्सना जाज्वल्य कीर्ती

अपहरली भार्या दुसरी, दूषण कुलकीर्ती

 

दुराग्रही, न माने आप्तेष्टांचे तर्क

वितळले कर्म, युध्दाचे मर्म

 

दुराचारी विचार, त्यात सहचारी पाखंड

राज्य विभाजन, प्रपंच अखंड

 

म्हणे फक्त माझाच, तरूतलावरील सुगंध

दुसऱ्या देणे काडीभरही मात्र, राजकर्तव्य संदिग्ध

 

अघळपघळ व्यभिचारी स्वप्नांचे परिवर्तन, जे नियमास सोडून विलक्षण

अधोगतीत ज्याचे परिमार्जन, मनोविकार विलक्षण


अमोल पाटखेडकर

२३-मे-२०२१

Tuesday, 18 May 2021

मतभेद

गाठ अधिक दृढ होते, आवळल्या जातो पेच!

सामंजस्याचे ठिगळ, सोडू पहाते बंधन हेच!


होता जो निवळला सूर भेसूर, जिंव्हा काढून आहे उभा!

डिवचून वाणीने धारदार, शिरच्छेद करीत आहे भावनांचा!


फुटला बांध, झाले आयुष्य विस्कळीत!

न जुळणाऱ्या, रेषांसारखे समांतर फलित!


एकत्र जरी विभक्त आपण, मार्ग आपुले वेगळे!

कडूगोड आठवणींचे भांडार, हृदयात साठवले!


मुक्तता बंधनात, अत्यावश्यक!

स्वातंत्राला बंधन, रोग विनाशक!


ह्या नियमांचे उल्लंघन, अपघाताचे कारण!

आपुले आपण सर्वस्वी जबाबदार, दोष दुसऱ्या विनाकारण!


अमोल पाटखेडकर

१९-मे-२०२१



Thursday, 13 May 2021

गरिबी

ओरबाडलेले ओरखडे नशिबाचे, कसे पुसावे?

गरिबीत सडलेल्या श्वासांचे उसासे, कसे विझवावे?

कष्टात माखलेले आयुष्य खरबड, कसे जगावे?

रणरणत्या उन्हात विस्तवावर, कसे चालावे?

जाळे विषारी अनुभवांच्या आठवणींचे, कसे तोडावे?

आगपाखड,पाणउतारा केला ज्यांनी त्यांना, कसे विसरावे?

पांग कष्टाचे अगणित माझ्या, कसे फेडावे?

आशेस क्षितिजापलीकडील लांघून कुंपण , कसे मिळवावे?

 

अशांत खळबळ, व्यर्थ नीरवता म्हणते!

डोईवरील सूर्यास, सावली निसटू बघते!

कसली उसंत, तांडव सुरूच असते!

बोकाळत सदैव, निस्तब्ध अस्थिरता असते!

अस्वस्थ घालमेल, व्यर्थ त्रागा करते!

निष्पन्न मात्र, फक्त शून्य असते!

वेदना शारीरिक, जाणीव तात्पुरती असते!

सोडून चिन्ह, घाव मनावर जाते!

 

अमोल पाटखेडकर

१३-मे-२०२१