Thursday, 31 January 2019

राष्ट्रध्वजाने पकडले चोर


   २६ जानेवारी उजाडायच्या चार दिवस आधी पोलिस स्टेशनमधे एक फोन येतो, 'इन्स्पेक्टर, मी विवेक! माझ्या घरी झालेल्या मोठ्या चोरीची तक्रार नोंदवायला मी काही दिवसांपूर्वी येऊन गेलो. काही पत्ता लागला का त्या चोरांचा'! इन्स्पेक्टर सावंत यांनी खाली मान घातली आणि नाईलाजाने 'नाही' उत्तर दिले आणि नंतर बराच वेळ ते याच गोष्टीवर सखोल विचार करु लागले. पाच अट्टल चोरांची टोळी शहरात सक्रिय होती आणि मुख्य म्हणजे चतुराईने ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुक्तपणे कुठेतरी संचार करत होते. निदान येत्या २६ जानेवारीपर्यन्त तरी हे चोर आपल्या हाती लागावे आणि हा दिवस आपल्या कारकीर्दीत संस्मरणीय ठरावा अशी त्यांची इच्छा होती.

      हाश्श! हुश्श्! करत, दम खात, धापा टाकत, जड पावलांनी, आजूबाजूला बघत, ते पाच चोर रात्रीच्या सुनसान वेळी, शहराच्या मध्यभागी, राष्ट्रध्वज जिथे फडकविला जातो, त्या मोठ्या स्टँडखाली बेशरमासारखे येऊन बसले. प्रत्येकाच्या हातात भलामोठा चोरीचा माल होता. 'चोराला पोलिसांचे भय' आणि वर दिसत असलेलं आकाशातलं चांदणं चोरांच्या मनांत नेहमीच असतं'! 'चोराच्या मनांत चांदणं'!! काही वेळच ते तिथे विसावले आणि लगेच पळ काढण्याचे ठरवून, तिथेच लागलेल्या एका फलकाजवळ थांबले. त्या चोरांपैकी एक चोर त्यावर काय लिहिले हे वाचू लागला. येत्या २६ जानेवारीला कुण्या 'विवेक' नावाच्या वक्त्याचे इथे भाषण होणार आहे आणि समाजातील, देशातील प्रतिष्ठित उद्योगपती मंडळी, इतरही व्यवसायातले धनवान लोक इथल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असा मजकूर त्या फलकावर होता. 'विवेक' नाव वाचल्यावर त्या चोराला काहीतरी आठवलं आणि तो दचकला. इतरही चोरांना ते नाव ओळखीचं वाटलं आणि काही दिवसांपूर्वीच्या चोरीची आठवण त्यांना आली.
अंधा-या रात्रीची ती घरफोडी, ते सोनं, चांदी, हि-यांचे दागिने आणि तीच 'विवेक संत' या नावाची मोबाईलच्या उजेडात वाचलेली नावाची पाटी! सगळं काही लख्ख आठवत होतं त्यांना! आता त्या चोरांना दरदरुन घाम फुटला आणि तिथून ताबडतोब ते निघाले.

    विवेकच्या आजीचे आणि आईचे परंपरागत दागिने चोरीला गेले. आजी आणि आई रोज एकमेकींजवळ रडायच्या! कारण चोर सापडत नव्हते. त्या चोरांच्या नावाने आजी बोटं मोडू लागली आणि अंतःकरणातून निघालेले तळतळाट त्यांना देऊ लागली.

  २६ जानेवारीला वेष बदलून शहरातल्या या कार्यक्रमाला जायचे त्या चोरांनी ठरविले. एक चोर विरोध करुन म्हणाला, 'खुळं की काय तुम्ही?' तिथे आपल्याला पोलिसांनी ओळखलं आणि पकडलं तर? सगळी मेहनत वाया जाईल!' त्यावर ते बाकी चोर म्हणाले, 'तू चल तर आमच्यासोबत! बघू तरी! हे उपदेश करणारे विवेकसारखे लोक काय सांगतात?'  पुढे तोच कुत्सितपणे म्हणाला, 'ह्याच्या घरी आपणच चोरी केली! जरा मजा घेऊ त्याच्या बोलण्याची!'

   देशभक्तीपर गीतांनी आणि तिरंग्याच्या तीन रंगात सजलेल्या एकूणच वातावरणाने सभामंडपात येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साहाने भारलेली 'देशभक्ती' दिसत होती. सगळीकडे चोख सुरक्षा व्यवस्था होती. साध्या साळसूद वेषात, इतर लोकांप्रमाणेच ते पाचही चोर तिथे आले आणि सोबतच खुर्च्यांवर बसले. जिल्हाधिका-यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात राष्ट्रध्वजाला सलामी दिली गेली आणि नंतर 'जनगणमन' झाले. काही नेत्यांची भाषणे झाली. आता बोलण्यासाठी व्यासपीठावर 'विवेक' आला.

  त्याने समस्त प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला, 'राष्टध्वजाला हात लावण्यास खरा समर्थ कोण?' कुणाचेच उत्तर नाही आले. आता विवेकने सर्वांना एक प्रयोग सांगितला, सर्वांनी आपल्या दोन्ही हातांची ओंजळ उघडा आणि मग स्वतःलाच प्रश्न करा, मी कधीही कुणाला फसवले नसेल, चोरी, लांडीलबाडी केली नसेल, माझ्या मनांत खोटेपणा, पाप नसेल तर अशा माझ्यासारख्या प्रत्येकाला राष्ट्रध्वजाला हात लावण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही! कारण, मित्रहो! तिरंगा पवित्र आहे आणि त्याची शानही! चोरांनी शरमेने मान खाली घातली, ते धावतच विवेकच्या पाया पडले आणि सर्वांसमोर गुन्हा कबूल करुन पोलिसांच्या स्वाधीन झाले.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

ल्यायले सुख मी


  'सुख आणि दुःख' व्यक्तींच्या रुपात personified करायचं दिग्दर्शक विराजने निश्चित केलं आणि त्याने लगेच अभिनेत्री सुरेखाला फोन लावला. नाटकासाठी काम करणा-या स्टार मंडळींना उद्या रविवारी त्याच्या घरी आमंत्रण होतं. चहा घेता-घेता विराजने सुरेखाला प्रश्न केला, 'तुला कोण व्हायला आवडेल? सुख की दुःख?' सुरेखा काहीही विचार करता पटकन उत्तरली, 'दुःख.' विराज चमकला आणि म्हणाला, 'का गं? मला वाटलं; तुला 'सुख' personified करायला आवडेल.'  त्यावर सुरेखा बोलली, 'सुख म्हणजे नक्की काय असतं? मला माहित नाही. आजवर मी त्याला खूप शोधलं पण माझ्या नशिबातच ते नाही असं दिसतं.' तिच्या या उत्तरावर विराज परत वेगळ्याच विचारात गढून गेला. भानावर आल्यावर 'ओके' म्हणत, उद्यापासून नाटकाची रिहर्सल करण्याचं ठरलं. सुरेखाच्या खाजगी आयुष्यासंबंधी विराजला सगळंच ठाऊक होतं. अत्यंत गरीब परिस्थितीतून ती आजवर इथपर्यंत पोहोचली होती. अभिनेत्री म्हणून तिचा एक खास चाहतावर्ग होता. सुरेखाच्या नव-याला मात्र तिची सततची कटकट कंटाळवाणी होऊ लागली होती. सततचे नाटकाचे प्रयोग, दौरे, शिवाय ज्या दिवशी ती घरी असायची, त्या दिवशी काही ना काहीतरी कामाची जबाबदारी आपणही पार पाडायची, अशी तिची इच्छा असे. सुरेखामध्ये गुणांची काहीच कमतरता नाही हे तिचा नवरा संजय जाणून होता; पण या तिच्या सततच्या चिडचिड्या स्वभावामुळे तिच्याच तब्येतीला धोका आहे आणि हे सुरेखाला कधी समजणार? याची तो चिंता करायचा आणि मुख्य म्हणजे हिला, आजूबाजूला विसावलेलं सुख का दिसत नाही? याच प्रश्नात तो कायम अडकून राही.

  काही दिवस झाले. नाटकाची तालीम जोरात सुरु होती; पण रोज घरी आल्यावर संजयला सुरेखा मात्र अधिकच अस्वस्थ होते, असं जाणवत होतं. रात्री कुठल्यातरी विचारात ती गुंग व्हायची, कधी मधेच झोपेतून उठायची. आधीच तिच्या चिडचिडीमुळे काळजीत असलेला संजय आता नाटकाच्या तालमीनंतर सुरेखाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या गूढ हावभावांनी आणखीनच व्यथित होऊ लागला. अखेर संजयने नाटकाची तालीम बघायला सुरेखासोबत जायचं ठरवलं आणि परवानगीसाठी त्याने विराजला फोन लावला. ह्या नाटकाच्या गोष्टीतच काहीतरी असावं, ज्यामुळे सुरेखा अस्वस्थ होते, असा अंदाज त्याने मनाशी धरला; आणि कळेलच उद्या कारण! तालीम बघितल्यावर! असं मनांत तो पुटपुटला.

   ते नाटक म्हणजे सुखदुःखातला वादविवाद आणि भांडण होतं. 'दुःख' personify करणारी अभिनेत्री सुरेखा, 'सुख' personify करणा-या दुस-या नायिकेच्या वक्तव्यांना फोल ठरविण्याचा प्रयत्न करत होती. रिहर्सलमधील नाटकाचा शेवटचा टप्पा जसाजसा समोर येत होता, तसातसा संजयचा आशावाद बळकट होत होता; कारण या शेवटच्या काही प्रसंगातून तरी सुरेखाला सहज सुख म्हणजे काय हे नक्की कळेल याची खात्री त्याला वाटू लागली, कारण यापूर्वीच्या नाटकाच्या Break मधे भूमिकेतून बाहेर आल्यावर सुरेखा मनाने मात्र वेगळ्याच भूमिकेत शिरत होती; जणू काही सुखदुःखाचं द्वंद्व तिच्या मनांतच रुंजी घालत होतं.

 नाटकाच्या तालमीचे दिवस संपले. नाटक  प्रेक्षकांना पसंत पडू लागलं. नाटकाच्या यशानं सुरेखाला 'सुख' मिळालं होतं आणि ती सगळी प्रसन्नता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. ऐन परीक्षांचे दिवस असल्याने सुरेखाची मुलगी नाट्यप्रयोगांना येऊ शकली नाही, त्यामुळे ती आज सुरेखाच्या मागेच लागली, 'आई, सांग ना गं? असं काय विशेष होतं त्या नाटकात?' सुरेखाने मोबाईल उघडला आणि नाटकाचा video मुलीला बघायला दिला आणि म्हणाली, सुखाचे संवाद ऐक, 'अगं, मी सुख! प्रियकराने साधं गुलाबाचं फुल तुझ्यासारख्या प्रेयसीला दिले तर त्यातही मी असते! गुलाबी प्रेमाचं प्रतीक बनून! ते बघून तुझा चेहरा फुलतो आणि तू प्रसन्न होते! म्हणजेच मनाची प्रसन्नता मीच! साध्या प्रसंगी मी सहज भेटत असते गं! फक्त सुखाची वाट ज्याची त्याने शोधावी, मी भेटतेच'!
सुरेखाच्या मुलीने आणि संजयने दिग्दर्शक विराजला खूप धन्यवाद दिले; कारण हे नाटक त्याने सुरेखाच्या सुखासाठी लिहिलं होतं.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

आजीची डायरी


 आजीच्या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवून असलेली ऋचा आता मात्र मनाशी पक्का निश्चय करुन चुकली की, काहीही करुन आजीची डायरी वाचायचीच! लहानपणापासून तिला; आजीने डायरीत काय लिहलंय याबद्दल प्रचंड औत्सुक्य होतं; पण खूपदा प्रयत्न करुनही तिच्या हाती ती डायरी लागतच नव्हती, कारण बरेचदा आजी घरीच असायची आणि ती डायरी नेहमीच तिच्या उशाखाली! कधी बाहेर जायची वेळ आलीच तर कां कुणास ठाऊक; पण घरातच कुठल्यातरी खोलीत ती डायरी आजी लपवून ठेवायची असा ऋचाने अंदाज केला होता. तिला; तिच्या आई-बाबांनी अनेकदा समजावलंही, 'अगं, डायरी प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे! सोडून दे नाद आजीच्या डायरीचा!'

  काही दिवस गेले. ऋचाला आज कळलं की, आजी तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे, दिवसभरासाठी!
ऋचाचे बाबा अॉफिसला जातांना तिला सोडून देणार होते. हीच नामी संधी आहे असं मनाशी म्हणून, पदविका अभ्यासक्रमाला शिकणा-या ऋचाने आज चक्क कॉलेजला बंक मारायचं ठरवलं आणि बाहेर जाण्यापूर्वी आजी तिची डायरी कोणत्या खोलीत लपवते यांवर डोळ्यांत तेल घालून ती लक्ष देऊ लागली. आजीने डायरी समोरच्या हॉलमधल्या लाकडी शो केसमध्ये एका कप्प्यात पुस्तकांखाली ठेवली. दाराच्या मागे लपून ऋचाने बघितलं आणि तिने आवाज करता हातावर आनंदाची टाळी दिली.

  बाराच्या आत सगळी सामसूम झाल्यावर, आईचं लक्ष नाही बघून, ऋचाने ती डायरी काढली; तिच्या खोलीचे दार लावून घेतले आणि वाचू लागली. डायरी भलीमोठी होती. आजीच्या माहेरच्या, बालपणाच्या, त्यांच्या शेतावरच्या, घरगड्यांच्या, आजोबांच्या अंगणातील फुलझाडांच्या, तिने आजवर केलेल्या संकल्पांच्या, देव धर्माच्या, तिने पाहिलेल्या तीर्थ-स्थळांच्या, तिच्या मैत्रिणींच्या, तिच्या लुगड्यांच्या, तिच्या मुलांच्या-मुलींच्या, शेजा-यांच्या, नातेवाईकांच्या,.....अशा कितीतरी गोष्टी आजीने सुवाच्य अक्षरात, सुंदर लेखणीत व्यक्त केल्या होत्या. डायरीची पानं वाचतांना ऋचा दंग झाली होती; मधेच पानांमधून कधी मोरपीस, कधी गुलाबाच्या पाकळ्या तिला दर्शन देत. अचानक वाचता-वाचता एका पानावर बराच वेळ तिची नजर ठहरली आणि तो वर्णिलेला प्रसंग ती परत वाचू लागली. तिच्या डोळ्यांतून पाणी आलं आणि आजीची अपूर्ण राहिलेली इच्छा आपण पूर्ण करु असा निर्णय तिने घेतला. आजीची बहुतांश वैशिष्ट्ये ऋचामधे उतरली होती; त्यातलंच एक म्हणजे रुचकर पदार्थ करणे! आजीसारखाच सुगरणीचा हात ऋचाचाही होता, म्हणूनच तिला असं वाटलं की, जे आजीचं करायचं राहून गेलं ते आपण करु. संध्याकाळ झाली. आजी घरी यायच्या आत ऋचाने गुपचूप ती डायरी जिथे होती तिथे ठेवली.

 कॉलेजचं वार्षिक स्नेह संमेलन आणि आंतरमहाविद्यालयीन पाककला स्पर्धा. मैत्रिणीसोबत आदल्या दिवशी जाऊन, बाबांनी दिलेल्या पॉकेटमनीतून ऋचाने पदार्थांसाठी लागणारं सर्व साहित्य तयार ठेवलं. आजीने डायरीत सांबार वडी आणि श्रीखंडाची जशी साहित्य-कृती लिहिली होती अगदी तशीच करण्याचा ऋचाने प्रयत्न केला, कारण स्पर्धेची अट होती, दोन पदार्थ स्वहस्ते घरुन करुन आणायचे. सजावटीसाठी फुलांचे गुच्छ, तयार केलेले पदार्थ घेऊन ऋचा उत्साहात आणि जिंकण्याच्या आशेने कॉलेजला गेली. ती बाहेर निघण्यापूर्वीच पदार्थांचा घमघमीत सुवास घरभर पसरला होता. केंव्हा एकदा आपल्या पोटात ऋचाने बनविलेले पदार्थ खातो, असे घरच्या मंडळींना वाटले. कॉलेजमधे खूप स्टॉल लागले होते. परीक्षक एकेका टेबल जवळ येऊन प्रत्येकीच्या पदार्थांची चव घेऊ लागले. काही मनोरंजक कार्यक्रम आणि स्पर्धा यात दिवस कसा निघून गेला कळलेच नाही आणि संध्याकाळी निकाल लागला. प्रथम क्रमांकाचे बक्षिस ऋचाला मिळाले. "माझी आजी तरुण असतांना एका मोठ्या पाककला स्पर्धेत तिच्या आईची तब्येत बरी नसल्याने भाग घेऊ शकली नाही. हेच दोन पदार्थ तिने त्यावेळी केले होते. तिने याविषयी लिहिलेली खंत मी तिच्या डायरीत वाचली आणि नातीच्या रुपाने तिचे स्वप्नं पूर्ण करायचे ठरविले."
ऋचाचे हे दोन शब्द पाठीमागे बसलेली आजी ऐकत होती आणि डोळे भरुन नातीकडे बघत होती.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.