Tuesday, 26 July 2016

प्रमोद, तू तर आनंदाचा कंद!

अखंड ज्ञानगंगेत न्हाऊन निघालास 'ज्ञानयोगी' च होतास
'माझे ज्ञान वाळूच्या कणाएवढेच' म्हणणाऱ्या 'न्यूटन' सारखा विनयीसुद्धा
शालेय प्रथमपायरीपासूनच पहिला नंबर कधी सोडला नाहीस
मॅट्रिकलाही विदर्भातून प्रथम आलास, साऱ्या कुटुंबियांना केलेस विजयी.

'शांतीस्वरूप भटनागर' पुरस्कार असो की 'जगदीशचंद्र बोस' अवॉर्ड
'मित्रा पुरस्कार' असो की देशविदेशातील प्रसिद्ध लेखांचे खूपच मोठे बाड
तुझी 'स्थितप्रज्ञता' कधी ढळली नाही की कधी तू कर्तव्याला चुकलास
सदा नम्र आणि गोड वाणी तुझी, अपरंपार मायेचा वारसा तू दिलास.

मुंबई असो की बंगलोर, पिलानी असो की रुरकी, कानपूर असो की हैदराबाद
स्वतः च्या गुणवैशिष्ट्यांनी तू ठरलास नाबाद
सर्वच ठिकाणच्या सहकर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना तू तुझ्या प्रतिभेने केले आश्चर्यचकित
ते ते ठिकाण सोडायची वेळ आली की तुझ्या उदारपणाने सर्वच होत अचंबित.

वैशाली व कौस्तुभ तुझी मुले तुझ्या कर्तृत्वाला उत्तुंग पोहोचविणारी
मंदा तुझी प्रिय पत्नी व आम्ही सर्वच तुझे ऋणानुबंधी, तुझी खूप वाट पाहणारी
तुझ्या आठवणीने होतो आम्ही सर्वच व्याकुळ
तुझ्या स्मृतींना वाहते ही भावपुष्पे; होऊन शोकाकूल.

लेखिका: संगीता पाटखेडकर.

पितृदेवो भव, आचार्यदेवो भव

वरदहस्त होता तुमचा अनेकांवरी
आदर्शाचे; संस्कारांचे शिक्षण दिधले कितीतरी
सदाशिव नाम तुमचे, आचरण अवघे कृतार्थ
सत्यम, शिवम, सुंदरम हाच तुमच्या जीवनाचा अर्थ.

अनेकानेक सद्गुणांचा तुमच्यामध्ये होता अधिवास
मनामध्ये नाही येऊ दिला तुम्ही कधी दुर्गुणांचा निवास 
व्यवहारी कुशलता असो की धार्मिक पूजापाठ 
लेखनकामाठी असो की नित्यकर्माचा परिपाठ.

जिद्द आणि चिकाटीच्या बळावरच तुम्ही जिंकला गड
आईवडिलांचे छत्र नसतांनाही तुम्ही फुलविला संसाराचा वड
तुमच्याच ध्यासपर्वातून घडले तुमचे शिष्य आणि मुले
तुमच्याच निष्ठयेतून व भक्तीतून तुमच्याहाती आली यशाची फुले
मुलांची व अनेकानेक शिष्यांची उत्तुंग आकाशभरारी तुम्ही पाहिली 
यश मुलांचे असो वा इतरांचे, पहिली आनंदाची ओंजळ तुम्ही वाहिली.

तुमची स्वतःची पुस्तके अधोरेखितात तुमची जीवनाची जिज्ञासा
मग ते 'अमृतकलश' असो की 'मज्जीवनमणिमाला' की 'अध्यक्ष महाराज'
सांगतात पूर्ण तुमच्या 'जीवनवादाची' गाथा.

'कलेकरिता कला' तुम्ही कधीच मानली नाही 
'जीवनाकरिता लढा' याची तुम्ही नेहमीच दिली ग्वाही
सी. पी. अँड बेरार शाळेसाठी तुम्ही घेतले नेहमीच वाहून.

प्रमोद, विश्राम, अरुण, सुधीर ही तुमची मुले व
गीता, विजया, वृंदा या तुमच्या मुली, एवढाच नव्हता तुमचा परिवार 
तर अगणित शिष्य व कितीतरी नातलग यांनी तुमचा परिवार झाला अपार.

प्रमिला ही तुमची सहधर्मचारिणी, तिच्यासह केल्या तुम्ही सर्वच तीर्थयात्रा
त्यामुळेच ओलांडून गेलात तुम्ही सारी जीवनजत्रा
मोहरीर वंशाची यथोगाथा उंचावरच जाणार आहे; असा विश्वास तुमचा होता
आमच्याजवळ आहेत तुमच्या अनेकानेक स्मृती, आज तुम्ही हवे होता.  

लेखिका: संगीता पाटखेडकर.

गतीशील आयुष्य

आयुष्य कसे आहे याचे उत्तर देणे फारच कठीण आणि अगम्य!
यश-अपयश, सुख-दुःख, मान-हानि, जय-पराजय यांच्या चक्रात सतत फिरत असतो माणूस, त्याला तारेवरची करावी लागते कसरत आणि ठेवावे लागते नेहमीच तारतम्य! (())
  यशाचा आनंद उपभोगताना अवचित ठेच लागते आणि वेदनेचा कढ गिळावा लागतो जय आटोक्यात येतो आहे असे वाटते ना वाटते तोच पराजयाचे मळभ दाटून आलेले असते. टाळ्या वाजविता वाजविता लोक अपमानाचे शब्द दगडासारखे भिरकवतात  हृदयाला जखम होऊन कंठशोषाचे विष प्यावे लागते विष पचविण्याची ताकद प्रत्येकात कशी असणार?
हाय रे दैवा! वेदनेचा कढ गिळावा लागतो (())
   प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे जीवन-मरणामधली एक मोठी 'गाथा' असते. कितीतरी घातपात, अपघात, अडथळे, संकटे आणि आसन्नमरण दुःखाचा तो मोठ्ठा पाढाच असतो. अधूनमधून सुखाचा शिडकावा मनाला हर्षित करतो. चार सुखाचे, आनंदाचे क्षण त्याचे जीवन प्रफुल्लीत करतात. प्रसन्नतेची झालर डोलायला लागते. याच चार क्षणांनी त्याची बिकट पाऊलवाट, हिरवीगार झालेली असते आणि माणूस आनंदाचा झुला झुलतो. झुला खूप उंच उंचही जातो. नैराश्याचे दुःख विसरायला लावण्याची ताकद या चार सुखाच्या शिंतोड्यात असते. किती ही आनंदाची ताकद! ती वाढवू या! आणि आयुष्याची गाथा रसभरीत करु या! (())
  "काठोकाठ भरु द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या, प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या" - असे कुणी कवी महाशयांनी म्हंटलेच आहे ना! आयुष्य हे हारण्यासाठी नाही. प्रसंगांवर मात करण्याचे नाव आहे आयुष्य! दुःखाशी फुगडी खेळा, अपयशाशी हुतूतू खेळा, पराजयाचा लपंडाव ओळखा आणि क्रिकेटमध्ये द्विशतक झळकविणा-या सामनावीरासारखे ताठ मानेने आयुष्याची बाजी लढा म्हणजे बघा कसे आनंदाने ऊर भरुन येतो. दुःख लांब पळालेले असते. पराजय तर आसपास फिरकायलाच घाबरतो. अपयश खूपच ठेंगणे, खुजे, बुटके झाले असते आणि मानाचा तुरा तुमच्या आयुष्याच्या शिरपेचात झळकत राहतो; अखंड आणि अविरत! (())
   आयुष्याची वाटचाल करता करता कितीतरी कामें करण्याची राहून गेलेली असतात. ती सुखाव्याच्या क्षणी आठवा. ती कामें तशीच राहून जातील तर काय उपयोग? कामें खुणावतात, ती करा. त्यांना न्याय द्या! म्हणजे बघाः- आयुष्याची टोपली कितीतरी फळाफुलांनी लगडलेली दिसेल! कोणतेच काम कमी दर्जाचे नाही. रस्त्यात मोठ्ठा दगड पडलेला आहे. तो तसाच पडलेला राहू देता बाजूला करा. इतरांचाही मार्ग सुकर करा. आनंदाचे देणे हे इतके साधे आणि सोपे असते. (())
   अनेकांनी असे जिकीरीचे जीवन इतरांसाठी जगून त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची वाट निरामय केली आहे. प्रत्येक क्षण तुम्हाला साद घालतो आहे.
  आला क्षण, गेला क्षण, असे क्षणभंगुर आयुष्य चिरंतन करण्याचा सोपा मार्ग म्हणजे क्षणांची महत्ता समजणे! अखंड प्रयत्नरत राहूनच या क्षणांची किंमत चुकविता येऊ शकते. विवेकानंद महिन्यात फ्रेंच भाषा शिकले त्यांनी फ्रान्समध्ये फ्रेंच भाषेतून व्याख्यान दिले. विनोबा भावे अनेक भाषांचे नुसते जाणकारच नव्हते तर त्या-त्या भाषेतील साहित्याचाही ते जवळून परिचय करुन घेऊन त्यावर अस्खलित बोलू लिहू शकत असत. कामांना कमी नाही. कर्तृत्वाचा भरधाव रथ कुणीच रोखू शकत नाही. (())
  इतिहासातील सनावळ्या लक्षात ठेवणे कठीण आहे खरेच! पण माणसांनी दाखविलेले कर्तृत्व तर विसरु म्हंटले तरी विसरता येणार नाही. भूगोल पालथा  घाला. इतिहास धुंडाळा, आत्मचरित्रें वाचा आणि आकाशाला गवसणी घालण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवा. बघा, आकाश कसे ठेंगणे होते ते!
  "उत्तिष्ठत, जाग्रत प्राप्य वरान् निबोधत" - हे विवेकानंदांचे आवाहन नुसते पाठ करावयाचे नसून ते आचरावयाचे आहे.
"घड्याळाचा टोल वाजे ठणाणा
आयुष्याचा नाश होतो राम कां रे म्हणाणा"! - अशी एक उपहासात्मक कविता आठवते. मला उपहास करावयाचा नाही. प्रयत्नरततेतील आनंदाचा आस्वाद घेण्याची वृत्ती ठेवल्याने खाचखळगे बाजूला सरुन पायवाट तयार करण्याचे सामर्थ्य येते हे सांगायचे आहे. (())

      संगीता पाटखेडकर.

         २६//२०१६.

Thursday, 21 July 2016

विदर्भातील निसर्गरमणीय सौंदर्यस्थळः 'वारी हनुमान'

श्री समर्थ रामदासस्वामींनी ४०० वर्षांपूर्वी स्थापन केलेले पहिले हनुमानाचे मंदीर म्हणजेच 'वारी हनुमान.' रामदासांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक हनुमान मंदिरं स्थापित केली.,विदर्भातील अकोला या गावापासून ५५ कि.मी. अंतरावर असलेले वारी हनुमान मंदीर खूप सुंदर आहे. हनुमानाची मूर्ती; इतर मूर्तींपेक्षा वेगळीच आहे. मूर्ती इतकी देखणी आहे की तीवरुन नजर हटत नाही. मूर्तीची उंची फूट आहे. अकोला ते वारी हनुमान; प्रवासी मार्गसुध्दा खूपच विलोभनीय आहे.     रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठमोठी हिरवीकच्चं झाडे, हिरवीगार शेतं, केळीच्या बागा, डाळिंबाच्या बागा मन प्रसन्न करतात.
    गांधीग्राम, चोहट्टा, वेताळी बाबा, हिंगणी बुद्र्क, आकोट, वडाळी सटवाई, चितलवाडी, पळसोद, हिवरखेड अशी गावं वारीला जातांना लागली. चितलवाडी या गावात दुतर्फा केळीच्या बागा आहेत. मार्गात गाई, शेळ्या, मेंढरे, खेचर, म्हशी, माकडे, तसेच निरनिराळे पक्षीही दिसले. एक मोठ्ठा पक्षी अमोलच्या कारसमोर उंचच उंच उड्या मारत होता. लाल चोचीचा तो पक्षी कोणता असावा हे नीट बघूनही कळले नाही. ज्या अंतरापर्यंत कार चालविली त्या अंतराच्या बरोब्बर पुढे तो उडत होता. आमच्या समोर-समोर करत होता. जणू काय अमोलला मंदीराचा मार्गच दाखवित होता असे वाटले. पक्षी मात्र खूप सुंदर आणि मनस्वी वाटला!
    भैरवगडावर हे मंदीर आहे. मंदीराला खूप सा-या पाय-या आहेत. आई मात्र तरुणाईला लाजवेल अशा पध्दतीने पाय-या चढली आणि उतरली! तिच्यामधील स्फूर्ती आणि ऊर्जेला सलाम ठोकावासा वाटला! ती अशीच राहो कायम!
   कोणतेही देवस्थान बघा; खूप उंचावर असते. मग ते ज्योतिर्लिंग असो, देवीची मंदीरं असोत, की दत्तात्रयांची असोत! माहूरला तर सती अनुसूयेचं शिखर चढणे आणि दर्शन घेणे खूपच कठीण कार्य!
  देवस्थानं इतक्या उंचावर का असतील? असा प्रश्न मला नेहमीच पडतो! कुणाला हा प्रश्न विचारता मीच स्वतः या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. एकेक पायरी सर केल्याशिवाय, पाय-यांतील चढ-उतारांचे कढ सोसल्याशिवाय, उंचावर आल्याशिवाय माझे दर्शन होत नाही; असा यामागे त्या सर्वशक्तिमानाचा मानवाला संदेश असावा असे मला वाटते. मानवी जीवनाचेही अगदी असेच आहे. यशाचे उंच शिखर गाठायचे तर आयुष्यातील एकेका टप्प्याचे, चढ-उतारांचे कढ सोसावेच लागणार! याठिकाणी चढ-उतार म्हणजे आयुष्यातील सुखदुःखे सहन करुन यशासाठी एकेक पायरी चढत मार्गस्थ होत राहणे!
   कधी यश मिळेल तर कधी मिळणारही नाही. कधी एखाद्याला देवदर्शन होईल; नाहीतर एखाद्याला तिथपर्यंत जाऊनही, दम लागला, तब्येत बिघडली तर एका पायरीवर बसूनच दर्शन घेतल्याचे समाधान मानावे लागेल!
  जसजसे वारी गाव जवळ येऊ लागले तशा सातपुड्याच्या लांबच लांब पर्वतरांगा मार्गाला खुणावू लागल्या. मंदीरात शुक्रवार असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती. रिमझिम पाऊस सुरु होता त्यामुळेही गर्दी नसेल! दर्शन अगदी मनाजोगे झाले.
   यामंदीरात, यापूर्वी १९९६ साली आम्ही बाबांसोबत गेलो होतो. ही दुसरी वेळ! अर्थातच बाबांची तीव्र आठवण आली!
या मंदीराची स्थापना जरी रामदासांनी केली असली तरी मंदीर परिसर सुंदर करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा 'भैरवगड' हा किल्ला होता. त्या काळातील लोक इतक्या उंचावर जाणे-येणे करुन, कसा काय निर्वाह करत होते याचा अचंबा वाटला.
   या देवळात रामदासस्वामींची तेजस्वी मूर्ती दोन ठिकाणी आहे. मूर्तीसमोर 'दासबोध' हा ग्रंथ आहे. आईने पुजा-याला विचारले की, 'कसे काय रामदासांनी त्या काळी एवढी फूटी मूर्ती उभारली?' पुजा-याने उत्तर दिले, 'सिध्दपुरुषाला कोणतेही महान कार्य कठीण जात नाही. आम्हाला रामरक्षेच्या पुस्तिका अर्थासहित मिळाल्या. दर शनिवारी, रामनवरात्र, हनुमानजयंतीच्या काळात येथे मोठा उत्सव असतो. तिथे भक्तांच्या निवासाची सोय आहे. मंदीर परिसर खूप भव्य-दिव्य आहे. साधारण दहा लोक त्या मंदीर परिसरात राहतात. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था तिथेच करण्यात येते, त्या लोकांना खाली उतरण्याची गरज नाही. हे सर्व पाहून खूपच आश्चर्य वाटले! वान नदी दिसली. वान! वा! वा! अमोलने भरघोस देणगी दिली. कारमधून सगळा परिसर पाहतांना डोळ्यांचे पारणे फिटत होते
     आता नदीवर पूल बांधण्यात आला आहे. पूर्वी नदी पार करुन जावे लागत होते. गोमुख होते, त्यातून पाण्याचा अखंड स्त्रोत वाहत होता. अर्थातच स्वच्छ आणि निर्मळ पाणी! झरा होता! गोमुख आणि झरा यावेळेस दिसले नाही. पाणी मात्र पूर्वीसारखेच शुध्द आणि निर्मळ वाटले. आई इतक्या वर चढून गेली याचे तेथील लोकांना आश्चर्यच वाटत होते. ते म्हणत होते, 'मावशीला इतक्या वर कशाला आणले?'
   हनुमानाची आरती आणि मारुतिस्तोत्र समोरच दिसते. आता तिथे ट्रस्टी मंडळ स्थापन झाले आहे. मंदीर परिसर अत्यंत स्वच्छ होता. आम्ही जुलै २०१६ रोजी सकाळी :१५ ला निघालो आणि दुपारी ला अकोल्याला येऊन पोहोचलो. रिमझिम पाऊस होता. संकटमोचन हनुमान म्हणतात याचा आम्हाला प्रत्यय आला. कुणालाही काहीही त्रास झाला नाही. इतक्या उंचावर इतकी दाट वृक्षराजी! सगळा अचंबाच अचंबा!
  समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली; त्यापैकी पहिला मारुती अकोला जिल्ह्यात आहे याचा आम्हाला अभिमान वाटला.
 एकूणच वारीची वारी छान झाली. हे सगळे आता पंढरपूरच्या वारीचे दिवस आहेत. आमची ही वारी घडली.
 'वारी वारी जन्म-मरणाते वारी' असे म्हणावेसे वाटले.

      मृदुला पाटखेडकर.

      १०//२०१६.