"मी अविवेकाची
काजळी
फेडुनि विवेकदीप उजळी
तै योगिया
पाहे दिवाळी निरंतर".......
.... संत ज्ञानेश्वर.
हौस, मौज,
आनंद, दिवाळी ही
चार दिवसांची मजा
असते असा आपल्या
सर्वांचा समज असतो;
त्यादृष्टीने सर्वजण स्वच्छता, रांगोळ्यांची
सजावट, विविध स्वरुपाची आरास,
पारंपरिक आणि आधुनिक
पद्धतीची सरमिसळ करुन, रंगीबेरंगी
पणत्या लावून, आकाशदीप सजवून,
दिव्यांची रोषणाई, तोरणफुले लावून,
अत्यंत उत्साहात दिवाळीचे स्वागत
करतात. ज्ञानेश्वरांनी मात्र वरील ओळींमधून
उदात्त विचारांची, विवेकदीप लावणारी
दिवाळी साजरी करण्यावर प्रकाश टाकला
आहे. ही विवेकाची
दिवाळी कशी साजरी
करावी?
अविवेकाची काजळी सर्वदूर
साचलेली आहे; मग
तो पुरातन काळ
असो की आजचा
काळ असो. अविवेक
म्हणजेच नरकासुर. दुराचारी, व्यभिचारी,
भ्रष्ट आचरण व
कृती, फसवणूक, निष्पाप,
निरागस लोकांचा सूड घेण्याची
वृत्ती, कोणत्याही स्वरुपाचा अहंकार,
माज, असमान वागणूक,
अत्याचार, अनागोंदी, अस्वच्छता शरीराची
व मनाचीही; म्हणजेच
अविवेक. जिथे सारासार
विचार नाही तो
अविवेक.
काळ आणि
युग कोणतेही असो
हा अविवेक
जोपर्यन्त मनात आहे
तोपर्यन्त विवेकाचा प्रवेश मनात
होणे कठीणच. एखादे
कळकट, मळाची काजळी
चढलेले तांबा वा पितळेचे
भांडे आपण जसे
घासून पुसून स्वच्छ
करतो, तसेच या
मनातील अविवेकाच्या काजळीला स्वच्छ
करावे लागते.
आज कार्तिक
कृष्ण चतुर्दशी. नरकचतुर्दशी.
कथा नरकचतुर्दशीची; लहानपणीपासून
रेडिओवर दरवर्षी वेगवेगळ्या किर्तनकारांच्या
रसाळ वाणीतून ऐकण्याचे
भाग्य मला प्राप्त
झाले. आईबाबांनीही ही
कथा अगदी रंगवून
सांगितल्याचे आठवते. आजच्या दिवशी
भल्या पहाटे उठून,
उटणे आणि सुगंधी
तेल लावून मंगल
स्नान करतात. नवीन
कपडे घालतात. घरातील
थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेतात. माझे
बाबा भल्या पहाटे
उठून आधी रेडिओवरची
मंगल धून लावायचे.
मोठ्या आवाजात आणि बासरीच्या
सुमधुर सूरात दिवाळीची संगीतमय
पहाट उजाडायची. रेडिओवर
कथा ऐकता ऐकता
तयारी करायची. नवीन
कपडे घालून आकाशातील
चन्द्र आणि रोहिणीचे
दर्शन घ्यायचे आणि
नंतर सुट्टी लागली
म्हणून आणि सकाळी
सकाळी अभ्यास चांगला
लक्षात राहतो म्हणून नंतर
काही पाठांतर व्हायचे.
प्रागजोतिषपूर नगरीचा राक्षस राजा
होता नरकासुर. त्याने
सगळीकडे अन्याय अत्याचाराची दहशत
पसरविली होती. १६००० स्त्रियांना
बंदी बनविले होते.
त्या सर्वजणी मुक्ती
देणाऱ्या मुकुंदाची वाट पाहत
होत्या. श्रीकृष्णाने आजच्याच दिवशी द्वापारयुगात
भल्या पहाटे पत्नी
सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराचा
वध केला. म्हणून
आजही आपण हा
दिवस आनंदाने साजरा
करतो. पण.. तरीही
एक प्रश्न सोडवायचा
शिल्लक राहिला; तो हा
की, सर्व स्त्रिया
इतके दिवस नरकासुराच्या
नजरकैदेत असल्यामुळे त्यांना समाजाने
स्वीकारणे अशक्य होते. कृष्णाला
त्यांनी विनवणी केली की
आता तूच आम्हाला
मुक्ती दे. तूच
आमचा उध्दार कर.
द्वापारयुगातील स्त्रिया त्या!! आजच्या
काळातील मुली व
स्त्रियांप्रमाणे सुशिक्षित व प्रगत
कशा असणार?? त्यांना
तारणहाराची गरज होती.
कृष्णाने त्यांच्याशी विवाह करुन
त्यांना आजन्म संरक्षण दिले.
हा झाला
आजच्या दिवसाचे महत्त्व सांगणारा
कथाभाग!! काही क्षण
आपण कृष्णाला परमेश्वर
न मानता व्यक्ती
म्हणून त्याच्याकडे पाहिले तर
त्याने त्याकाळी स्त्रियांना किती
मान आणि सन्मान
प्राप्त करुन देऊन
समाजात इज्जत आणि स्थान
मिळवून दिले. दिवाळी हा
सण आपण प्रतीकात्मक
साजरा करतो. प्रत्येक
दिवसाचे केवळ
वरवर अर्थ लावले
जातात. आपल्या प्रत्येक सण
आणि उत्सवात असेच
उदात्त अर्थ निघतात;
ज्यातून आनंद तर
मिळतोच पण बोधही!!! हीच
तर भारतीय संस्कृतीची
महानता आहे.
अनेक नरकासुर
आजही समाजात राजरोसपणे
वावरत आहेत. स्त्रियांवर
आजही अत्याचार, अन्याय
होत आहेत. अविवेकाचा
नरकासुर ठायी ठायी
माजला आहे. शुध्द
विवेकी मनाचे निर्मळ तेल
घालून, शांतता आणि पवित्र
आचरणाच्या वाती घालून,
दिवाळीच्या अनेक ज्योती
मनामनात पेटवून, अविवेकाच्या काजळीला
पराभूत करुन, अक्षय्य आणि
रोजच अशी दिवाळी
साजरी करु या.
ज्ञानेश्वरांच्या वरील ओळीतील
दिवाळीप्रमाणेच!!!
शेवटी काय तर.....
"मन शुध्द
तुझं गोष्ट आहे
पृथ्वीमोलाची
तू चाल
पुढं..... तू चाल
पुढं....
तुला रं
गड्या भीती कशाची
अन्
पर्वा बी कशाची"......
!!!!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
२९ अॉक्टोबर
२०१६.