Thursday, 23 August 2018

आधुनिक स्त्री चे शपथपत्र



मी 'मी'आहे... 'मी' राहणार

मी *राधा* नाही होणार
माझ्या प्रेमकहाणीत
दुसऱ्या स्त्रीचा पती नसणार
रुक्मिणीच्या डोळ्यांत
काटा बनून मी नाही सलणार
मी राधा नाही होणार

मी *सीता* नाही होणार
माझ्या पावित्र्याचं
प्रमाणपत्र नाही देणार
अग्निपरीक्षा नाही देणार
तो काय मला त्यागणार
मीच त्याला सोडणार
मी सीता नाही होणार

मी *मीरा* ही नाही होणार
कुठल्याही मूर्तीच्या मोहाने
घर संसार नाही सोडणार
साधुंबरोबर नाही फिरणार
हातात एकतारी घेऊन
जबाबदाऱ्या नाही टाळणार
मी मीरा नाही होणार

मी *यशोधरा* नाही होणार
जो सोडून निघून गेला
सारी कर्तव्ये सोडून 
स्वतः देव बनला
कितीही ज्ञान मिळवू दे
पण अशा पतीसाठी
मी पतिव्रता नाही होणार
मी यशोधरा नाही होणार

मी *उर्मिला* ही नाही होणार
पत्नीच्या सहवासाची
ज्याला कदर नाही
तिच्या त्रासाची ज्याला 
जरासुद्धा जाणीव नाही
तिला एकाकी करून
जो भावासह राहणार
अशा पुरुषाला मी नाही वरणार
मी उर्मिला नाही होणार

मी *गांधारी* नाही होणार
आपले डोळे मिटून
अंधार स्वीकारून
अर्थहीन त्याग मी नाही करणार
अंध पतीचे डोळे होईन
माझ्या डोळ्यांनी तो बघेल
असे प्रयत्न करणार
मी गांधारी नाही होणार

मी त्याच्यासह जगेन
ज्याला मनाने वरेन
पण म्हणून त्याचा अन्याय 
मी नाही सहन करणार
कर्तव्याला नाही चुकणार 
सारी निभावणार पण 
बलिदानाच्या नावाखाली
यातना नाही सोसणार

*मी 'मी' आहे आणि 'मी' राहणार*

Friday, 10 August 2018

समृध्द मी

  सांजवेळी एकटीच 
  बसले होते सागर किनारी
  कातरवेळी अनंत विचारांनी
  गहिवर दाटला भारी
  किनारी वाळूत दिसल्या
  खुणा खुणा पाऊलखुणा 
  खुणावू लागल्या त्या जणू
  प्रश्न विचारु लागल्या मला
  सांग सखे, वीरविद्या संपन्न
  वारसा असा मिळाला असेल का कुणा?
  मायभू तुझी पवित्र
  इतिहास तिने रचिला 
  विद्या वाचस्पती विचारवंत
  समाज धुरीण संत महंत
  वीर, वीरांगनांच्या कहाण्या
  जणू दाखवी ती आज सचित्र

  क्रांतीसूर्य तो मावळणारा
 उषःकाल भरवितो मनोमनीं
 गर्जा जयजयकार क्रांतीचा
 घुमतो आजही कानोकानी
 स्फुरण चढले देशभक्तीचे
 देशप्रेमालंकार लेवूनी असे
 आज उभी मी सांजवेळी
 
माय मराठी शब्द 'उभी'
नसे की हो सामान्य
उभी असते पाठीशी
महान वारसाची साथ 
भक्कम आधारभूत पाया असा असामान्य 
घर-घराणं, मायभू, जिवलग
विद्याप्रेमी, देशप्रेमींच्या
समृध्द मातीत नतमस्तक होऊनी
आजही मी उभी...आजही मी उभी

                                                          मृदुला मुकुंद पाटखेडकर.
                                                          १० ऑगस्ट २०१८.