Sunday, 22 September 2019

स्वयंप्रकाशी अढळ तारा तो


स्वयंप्रकाशी अढळ तारा तो
   तमा बाळगता मात देणारा तो
   संगीत सप्तस्वरांचा मैत्र तो
   पाव्यातला अंतर्नाद मुकुंद तो
   सुचित्र रेखाटणारा चित्रकार तो
   हरहुन्नरीतला हर हुनर तो
   प्रातःसमयीची आशा तो
  माध्यान्ह काहिलीतला शीतल तो
  मन काहूर संध्येतला किरण तो
  स्त्रीमनाचा सहृदयी पुरुष तो
  विद्युल्ल तारतंत्री शिक्षक तो
   साधा सरळ निर्मोही तो
  साथसंगतीतला निःसंग स्वामी तो
   अविश्वासी दुनियेतला विश्वास तो
   डोळ्यांतील अश्रूंची मोकळी वाट तो
   आयुष्यरणांतला मजबूत खांब तो
  माया मोठी छाया मोठी वृक्षवल्ली तो
  कुळी कन्या पुत्रांसाठी कल्पवृक्ष तो
   सुखदुःखाचे चढण चढत जिंकणारा
    प्रिय माझा पिता तो
   सुखदुःखाचे चढण चढत जिंकणारा
    प्रिय माझा पिता तो

  मृदुला मुकुंद पाटखेडकर
      २२ सप्टेंबर २०१९.

Saturday, 14 September 2019

निरोप


देहावर ओढून पाणी गणपती गेला गावा
पाण्यावर तरंगतो आता आसव अबोध पावा
भास की आभास तू अंतर्मनीचा देव देवा
काळावर खुणाविसी चिरंतनाचा ठेवा
चरणतम रागदारीला असतोच भैरवीचा सूर हळवा
 निरोप उदास तरीही चेहरा हसराच हवा
 कारण पुन्हा नव्याने नवनवोन्मेषाचा ध्यास जीवा

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

फिरुनी नव...


आठवणीँची रेखून नक्षी
     झाड सोडून गेला पक्षी
    पोरकी झाली इवली झाडे
     उदासवाणी लव्हाळ
    मनात भरले रिक्त आभाळ
    पण मन कवाडी चाहूल हिरवी
     पुन्हा पुन्हा हिरवळेल
     विरेल सारे जुने जीर्ण
     नवांकुराची पालवी फुटेल
     विलीन चैतन्य चैतन्यातच
      पुन्हा पुन्हा नव्याने प्रकटेल
      असणे, नसणे अस्तित्त्वाचे
       वर्तुळ फिरत राहील

.....मृदुला.