Thursday, 19 January 2017

कविता कशी असते?

 बदललेल्या जाणिवांची संवेदना असते
अंतरीच्या भावभावनांची उत्तेजना असते
प्रतिमांचा आडोसा घेऊन गोष्टी ती लपवत असते विशिष्ट एका चौकटीत ती बसत नसते

जेंव्हा जिथे वाटेल तिथे ती जात असते
जिथे असाल, जसे असाल, आंतरिक उमाळ्यांना साद ती घालत असते लिहिणा-या अंतर्मनांनाच ठाऊक, कविता कशी त्या क्षणाची असते

अनुभवतो आपण जे-जे; शब्दांची तीव्रता ती त्यात ओतते कोसळत असतो पाऊस बाहेर; मनात मात्र तीव्र उन्हाची झळा ती देते कवितेचा लागता तुकडा हाती, एकेका विषयात ती रमविते पत्र लिहावे जसे कुणालातरी तसे काहीसे दृश्य-अदृश्य डोळ्यांसमोर ती आणत असते

जे दृश्य-अदृश्य डोळ्यांसमोर येतं तुझ्या, ते इतरांनाही सांग!! असं ती कवींना सांगत असते अनुभवांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भुरळ ती घालत असते जे जगताय तुम्ही!! ते लिहिण्याचं बळ ती देत असते

प्रामाणिक कवींशी कविताही प्रामाणिक असते
वैचारिक उंचीच्या ठेवीवर तिचा पाया ती भक्कम करते मित्रहो! अशा कवींनाच केवळ कविता ही प्रसन्न करते थिल्लर, हिणकस, उथळ कवींची कविता ही खोटारडी असते

नुसत्या भावनाच नाही तर अस्सल प्रश्नांचं  भान राखणं तिला हवं असतं जे चांगलं आहे, अस्सल आहे तेच लोकांपर्यन्त पोहोचवावं लागतं कवितेच्या गावात ह्या म्हणूनच सच्चेपणानं जगावं लागतं शब्दनिष्ठ कवींना पुढे ठेवून हसत हसत कविता मागे उभी असते विचारांचे मोती बरसता वरदान ती तेंव्हाच देत असते

कविता अशी असते...कविता अशी असते

शब्दफुलांनी बहरुन येता भावविभोर ती करुन टाकते अंतरीच्या या भावना त्या अंतरी नेत असते अंतरीची अंतरे दूर करुनी शब्दकळांनी जोडत असते शब्द तरल, भावस्पर्शांच्या अजब दुनियेत नेत असते

शब्दाशब्दांच्या, अगणित भावनांच्या अव्यक्त जाणिवांतून कविता व्यक्त होत असते शब्दप्रभूंच्या निर्मल भाव जलाशयात कविता तरंगत असते एकाग्रचित्त कवी मनांवर अलगद आक्रमण करीत असते संदर्भ, गोष्टींना खुलं असण्याची जागा म्हणजेच कविता असते

अंतरीच्या भावबंधांवर मुक्तपणे ती जगत असते मृदुल, मधुर भावशब्दांनी कवीमनांना सुकोमल घडवित असते

कविता अशी असते...कविता अशी असते.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        १९//२०१७.

Saturday, 14 January 2017

संक्रांतीचा सण

   मिळून सा-याजणी सख्यांनो!!!
   साजरा करु संक्रांतीचा सण

   तिळगूळ घ्या गोड गोड बोला
   भेटताच म्हणू सारेजण

    वर्षभराची धावपळ दगदग
   तीच तीच कामं, फिरविती वणवण
 विसरुनी सारे विसावू आता काही क्षण
प्रेम, माया, आपुलकीनं लुटू सौख्याचं वाण

      हळदी कुंकवाचं दान देऊनी
      करु स्त्री शक्तीचा सन्मान
     नवविचार, नवप्रगतीची करु
       आज देवाणघेवाण
  
       नभी उठती पतंग तरंग
     मधुर शब्दांनी दाटती अंतरंग
     सुगीच्या दिवसांत ह्या;
  सौभाग्य, सुखसंपत्ती, सुसंवादाचं भरु....
    भरभरुन सुगडं, भरु भरभरुन सुगडं
   नटून थटून, सजून धजून येई आपुल्या
     उत्साहाला उधाणच उधाण
    सुंदर, शालीन दिसती सा-याजणी
      जणू सौंदर्याची खाण

    दाट धुके, दवबिंदूंची बरसात
  धुक्याची शुभ्र चादर पसरे शेतमळ्यांत
  बोच-या थंडीचे काहूर माजले तनामनांत
  संक्रातीचा सण असा येई पौषात
  विविध रांगोळ्यांची दारी खैरात
  तेजाने उजळो धरा, तेजाने उजळो जीवन
  याजसाठी सर्व पूजिती सूर्यनारायण
   
  हरभरा, तूर, मटार, वाल, बोरं, गाजरे.....
 तिळगुळासंगे दिसती सारे न्यारे, साजरे
  सृष्टीसौंदर्याने केली मुक्तहस्ते उधळण
  साजरं करु तिचंही सौभाग्यपण आपण
   राहो कशाचीच कधीही वाण
  हेच मागू या दिनांत खरंखुरं वाण
 कर्तव्य आपुलं, सौभाग्य लेणं तिचं जपणं

  संक्रांतीदेवी, शुभ असावे तुझे संक्रमण
  कटुता, दुराव्याचे राहो नामोनिशाण
   कुविचार, कुनीतीचा होवो अंत
     प्रसन्न राहुनी तू सदैव.....
    कुणावरही येवो संक्रांत
   कळवळीची विनंती तुला करिते
   करुनी जीवाचा आकांत....
   नवनवीन क्षितिज पार कराया
   नवनवीन आव्हाने पेलावया
   आम्हा मिळो सदा शक्तीचे परिमाण

   मिळून सा-याजणी सख्यांनो!!!
   साजरा करु संक्रांतीचा सण.

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.
         १४//२०१७.

         मकर संक्रांत.

Thursday, 12 January 2017

युवांचा ऑक्सिजनः- विवेकानंद.

  विवेकानंदांची आणि माझी पहिली भेट झाली ती शाळेतच!! त्यांच्यावरचा एक सुंदर धडा इतिहासाच्या पुस्तकात दिला होता. माझ्या शाळेतही ठिकठिकाणी त्यांचे छायाचित्र होते. इतिहासाच्या पुस्तकात सुंदर सुंदर फोटो आणि चित्रं दिलेली असत. मी त्या सगळ्यांकडे आधी एकटक टकामका बघत राही; बराचवेळ!! आणि नंतर हळूवार...यथावकाश धडा वाचायला घेई. शालेय वयातच विवेकानंदांच्या देखण्या, रुबाबदार आणि सुंदर चेहऱ्याने सर्वप्रथम माझे मन आकर्षून घेतले. कितीतरी वेळ मी त्यांच्या छायाचित्राकडे बघत राही. धडा वाचता वाचता कळे की किती गुणांची मालिका या व्यक्तीजवळ होती जी संपणारी!!!

    एका व्यक्तीमध्ये इतके असामान्य वैशिष्ट्यांचे अजब रसायन असू शकते हे वाचून तेंव्हाच डोळे स्तिमित झाले आणि मन अचंबित झाले. त्यांची आध्यात्मिक उन्नती आणि शक्ती पाहून त्यांना संत म्हणावेसे वाटते. मनन चिंतन, एकाग्रता याचे त्यांनी सांगितलेले महत्त्व, गुरु रामकृष्ण परमहंसांवरची निष्ठा, आई वडीलांविषयीचा आदर, स्नेही, मित्रांसाठीचं त्यांचं अकृत्रिम प्रेम, मित्रांचं मनोरंजन व्हावं म्हणून त्यांनी त्यांच्या गोड गळ्यातून गायिलेली गाणी, मित्रांसाठी कधी कधी केलेले चटपटीत रुचकर पदार्थ, "मार्गाधारे वर्तावे l विश्व मोहरे लावावे l अलौकिक नोहावे l लोकांप्रति" ll या ज्ञानेश्वरांच्या उक्तीनुसार कधीही मोठेपणाची शिकार होणारे, गरीब असो की श्रीमंत, सर्वांशी समान आपुलकी आणि प्रेमाने वागणारे विवेकानंद सहजावस्थेत वागणारे होते. हृदयात पराकोटीची देशभक्ती असणारे, देशातील जनतेला सन्मार्ग, स्वयंसिध्दता, सुविचारी बनविण्याच्या दिशेने घेऊन जाणारे प्रामाणिक यात्री होते. त्यांच्या वागण्या, बोलण्यातून ओढ लावणारे, आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीच्या आधारे विदेशातही अनेक व्याख्यानांची सत्रे चालवून मोठमोठ्या विचारवंतांनाही अवाक् करणारे आणि त्यांना विचार करायला भाग पाडणारे एक महान विचारवंत होते. अनेक स्त्रियांना (विशेषतः विदेशीसुध्दा), त्यांच्या व्यक्तिमत्वाने भुरळ घातली, तरीही विचलित होता, प्रत्येकीला माता, भगिनी, आत्या, मावशी असेच संबोधून संयमाची परिसीमा गाठणारे धीरोदात्त चारित्र्यसंपन्न होते.
    विवेकानंद साहसी होते. नदीत पोहणे, कुस्तीत भाग घेणे, यांसारख्या खेळांमध्ये ते माहिर होते. नेतृत्वगुण ठासून भरलेले प्रभावी नेता होते. आपल्या नेतृत्वाच्या ओझ्याखाली कुणीही गुदमरून जाऊ नये यासाठी सर्वांशी सहज वागणारे आणि निगर्वी होते.

 ......या सगळ्यात महत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन त्यांनी युवकांना केले आहे. स्वतः त्यांचे जीवन युवावस्थेचा समग्र आविष्कार होते. ते 'युवाचेतना' आहेत. प्रत्येक युवकाच्या अंतर्यामी चैतन्यरुपाने वसत आहेत. आयुष्य परिपूर्ण पूर्णत्वाला पोहोचण्यासाठी, प्रामाणिक कष्ट करुन, परमसिध्दतेला नेण्यासाठी या सिध्दहस्त, तेजाळ, स्वामीने जीवाचे रान करुन दुर्दम्य आशावादाची ज्योत युवकांच्या हृदयात प्रज्वलित केली. "तुझ्यातच आहे पुरुषार्थ, बलदंड शरीर, साहस, ताकद, स्वप्नांची ओढ आणि असामान्य धैर्य"!!! याचा विश्वास आणि प्रेरणा त्यांनी युवावर्गात जागृत केला. त्यांच्या स्वप्नातला युवक हा हनुमंतासारखा असायला हवा. सर्व प्रकारच्या दौर्बल्यापासून, कार्पण्यापासून दूर राहणारा, ध्येयावरची अतूट निष्ठा असणारा, सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून, खोट्या प्रतिष्ठा आणि आमिषांपासून स्वतःचे रक्षण करणारा, मर्मभेदी बुध्दिमत्ता आणि स्फटिकासारखे स्वच्छ चारित्र्य असणारा हवा. विकसित व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण आविष्कार हनुमंताप्रमाणेच देशातील तमाम युवकांमध्ये असायला हवा, हे स्वप्न त्यांनी पाहिले होते.

...पण!!! विवेकानंदांचे स्वप्न हे स्वप्नच राहील का?? आजचा युवक ते सत्यात आणण्याच्या पात्रतेचा आहे का?? उत्तर खेदाने 'नाही' असे लिहावे लागत आहे. कसा आहे आजचा बराचसा युवावर्ग??

  आजच 'लोकमत' वर्तमानपत्रातील पुरवणी वाचली. मन खिन्न झाले. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरु आहे. शाळकरी मुलांनाही 'गर्लफ्रेण्ड' असते. शहरातल्या निर्मनुष्य जागी या प्रेमी युगुलांची गर्दी दिसते. तासन्तास वेळ ते फुकट घालवून घरच्या लोकांना फसवित असतात. इंटरनेटचा वापर हा बुध्दीजीवी होण्यासाठी केला पाहिजे. हे युवक, युवती मात्र social media चा बीभत्स वापर करीत आहेत. भटके, लफांटु, पोकळ, प्रेमीजीव म्हणून मिरवित आहेत. अविवेकाची द्वारे खुलेआम उघडली जात आहेत. विवेक आणि त्यातून मिळणारा आनंद यांची द्वारे त्यांच्या मनाने कडी आणि कुलूप घालून  बंद केली  आहेत. ज्या विवेकानंदांनी 'तुझ्यातच आहे सामर्थ्य आणि शक्ती'!! - असा ठासून आत्मविश्वास आणि अॉक्सिजन युवकांना दिला होता, त्या 'नरेन्द्र विश्वनाथ दत्त' चे विचार 'दत्त'!! म्हणून प्रत्येक युवकाच्या डोळ्यासमोर उभे ठाकण्याची आजही नितांत गरज आहे.

   मकर संक्रांतीच्या महिन्यात जन्माला येऊन विचार आणि आदर्शांचा भलामोठा प्रकाश आणि ऊर्जा; संपूर्ण मानवजातीला अंधारातून बाहेर काढण्यासाठी अविरत तळपत राहणाऱ्या या तेजोगोलाने दिला. संक्रांतीला नवे परिमाण देणारा हा प्रज्ञासूर्य अवतरला. त्यांनी मांडलेल्या मौलिक विचारांचा ठेवा व्यर्थ जाता, पिढ्यान्पिढया सर्वांमध्ये संक्रमित होवो हीच मकर संक्रमणाच्या पर्वाची आणि त्यांच्या जयंतीची फलश्रुती ठरेल......

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.
        १२//२०१७.

       विवेकानंद जयंती.

Wednesday, 11 January 2017

तो प्राजक्त

  आज अचानक आठवला मज तो प्राजक्त
  तळ्याच्या काठी उभा राही तो एकलाच मुक्त

     बहर त्याला जेंव्हा जेंव्हा येई
   कोटी कोटी फुलांचा सडा सांडला जाई
   उच्च कोटीचा आनंद तनमनांतून जाई
 
   तळ्यात बघता त्याचे मोहक प्रतिबिंब  केशरी कडा, नाजूक कुसुमांनी आसमंतात धुंदी आणून जाई
    विखुरता पानें, फुले त्याची
  वा-यासरशी पसरता इकडे तिकडे
जणू वाटे मज त्यावेळी तो भटका विमुक्त
 आज अचानक आठवला मज तो प्राजक्त

  इवलेसे इटुकलेसे असे प्राजक्ताचे फूल
 का कळे!! कुणास ठाऊक मला सदोदित पडे त्याची मोहक भूल  तासन्तास बघत राही त्याला एकटक कोण आलं, कोण गेलं याची कदा कळे चाहूल
  बहरता बहरता बहरुन बहरता.....
  अचानक तो ओसरला जाई
कोमेजून जाता फुले त्याची मनही खिन्न करुन जाई बहर त्याचा आठवून मन उचंबळून येतं आज अचानक आठवला मज तो प्राजक्त

 प्राजक्त मज तो वाटे जणू प्रिय सखा माझा
 ओसरता ओसरता बहरलो होतो मी कधी
कोसळता कोसळता सावरलो होतो मी कधी
  ओसरण्याच्या वाटेवरुनी जाता.....
 हे आठव तू सखे गं, बहरलो होतोच ना मी कधी
    बहर आठव, बहर आठव...
    ओसर नाही, ओसर नाही...
  आनंदाचे क्षण आठव, आनंदाचे क्षण आठव......
  दुःखाचे क्षण नाही, दुःखाचे क्षण नाही
    ओसरलो आता मी जरी
   बहर ओसंडून फुलेन मी कधीतरी
      बहरेन मी कधीतरी
      फुलेन मी कधीतरी
   फुली फुलून येईल मी कधीतरी
  गं सखे, दुःखवाट चालता चालता
 सुखवाट तुज गवसेल नक्की कधीतरी
  जणू वाटे, सांगू लागला मज तो प्राजक्त
  आयुष्याशी गोड नातं ठेव तू मनसोक्त
     आनंदी राहा मनसोक्त....
  स्वानंदी होऊनी जग मनसोक्त....
 आज अचानक आठवला मज तो प्राजक्त
 आज अचानक आठवला मज तो प्राजक्त

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        ११//२०१६.