Friday, 24 January 2020

ज्ञानयोगी

  महामहोपाध्याय साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास एवढे मोठे नाव उच्चारतानाच दम लागायची वेळ येते. आपल्या सखोल पांडित्याने, असाधारण वक्तृत्वाने अन् धारदार लेखनशैलीने अखिल भारताला सुपरिचित व ललामभूत झालेले बाळशास्त्री ३० अॉगस्ट १९१८ ला नागपूर येथे दक्षिणामूर्ती मंदिरात पुढील आयुष्याची वाटचाल करण्यासाठी स्थानापन्न झाले.

    त्यांच्या जीवनाचा पट उलगडतांना आश्चर्यचकित व्हायला होते. शालेय शिक्षणात रस न वाटल्यामुळे त्यांनी संस्कृत साहित्याच्या व्यासंगाला सुरुवात करुन साहित्याचार्य व महामहोपाध्याय या पदव्या स्वकर्तृत्वावर मिळवून बड्याबड्यांना थक्कीत केले. त्यांची ग्रंथसंपदा बघितली तर केवळ ५० वर्षांच्या आयुष्यात एक व्यक्ती इतके कार्य कसे काय करु शकतो याचे नवलच वाटत राहते.

    बाळशास्त्रींशी आम्हा 'मोहरीर' कुटुंबियांचा संबंध आमच्या 'शांता' मावशीमुळे आला. श्री मुरलीधरपंत सास्तीकर व सत्यभामाबाई सास्तीकर या दाम्पत्याच्या सुशीला व शांता या दोन मुली! 'सुशीला' नागपूरच्या महाल विभागातील पाताळेश्वर रोड येथील मोहरीर वाड्यातील श्री सदाशिव मोरेश्वर मोहरीर यांची पत्नी झाली, तर 'शांता' दक्षिणामूर्ती रोड महाल, नागपूर येथील दक्षिणामूर्ती मंदिरातील बाळशास्त्री हरदासांची पत्नी झाली. दोघी सख्ख्या बहिणी पाच मिनिटांच्या अंतरावर राहणाऱ्या होत्या, आणि परस्पर प्रेमभाव खूप असल्यामुळे दोन्ही कुटुंबातील घनिष्टता वाढली. आमचे सर्वांचे भाग्य थोर म्हणूनच एक जागतिक कीर्तीचा विद्वान आमच्या सहवासात आला आणि त्यांचे आयुष्य आम्हाला जवळून पाहायला मिळाले. शांता मावशीचे नाव त्यांनी 'वीणा' ठेवले. वीणा या नावाचा जप खूपदा होण्याचे कारण मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा खूप राबता असे. कुणीही आले की 'वीणा' म्हणून हाक जायची व त्या येणाऱ्यांच्या आदरातिथ्याची जबाबदारी अर्थातच मावशीवर पडत असे. मावशीही हसतमुखाने, कार्यकुशलतेने सर्वांचे मन जिंकणारी होती. संसार त्यांचा खूप सुखाचा होता. अपत्य नव्हते तरी ते दोघे एकमेकांशी नेहमीच अत्यंत जिव्हाळ्याने राहिले. मावशी बाळशास्त्रींच्या सर्व कार्याला पूरक ठरली.

   सगळ्या पुस्तकांचे लिखाण मावशीच्या हातचे आहे.

  १) वाल्मिकी रामायण
  २) महाभारतावरील व्याख्याने
  ३) भगवान श्रीकृष्ण
  ४) वेदातील राष्ट्रदर्शन (भाग पहिला)
  ५) वेदातील राष्ट्रदर्शन (भाग दुसरा)
  ६) भारतीय स्वातंत्र्यसमर १८५७ ते सुभाष
  ७) पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी(भाग पहिला)
  ८) पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी(भाग दुसरा)
 ९) पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी(भाग तिसरा)
 १०) पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी(भाग चौथा)
 ११) धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांचे चरित्र(भाग पहिला)
 १२) आर्य चाणक्य, विभूतिमत्व, कार्य व राजकीय तत्त्वज्ञान(भाग पहिला)
   या पुस्तकांचे नुसते मथळे जरी वाचले तरी बाळशास्त्रींच्या वैविध्यपूर्ण अभ्यासाची व्यापकता लक्षात येते.

    पुण्याच्या 'वसंत' व्याख्यानमालेत नाव गाजविणारा एकमेव वैदर्भीय साहित्यिक म्हणून बाळशास्त्रींचे नाव घ्यावे लागेल. दरवर्षी महिनाभर या व्याख्यानमालेसाठी ते सपत्नीक पुण्यांला जात. मामासाहेब दाते(त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशक) यांच्याकडे ते उतरत. पुण्यातील त्या काळच्या प्रतिष्ठित साहित्यिक वर्तुळातून त्यांना भोजनाची आमंत्रणे असत. मावशीला सर्व खुलासेवार सांगण्याची इच्छा असे त्यामुळे आम्हाला अनायासेच बरेच काही माहिती व्हावयाचे. काळ प्रकाशनाचे शंकरराव दाते यांनी मावशीला आपली मुलगीच मानले होते.

    बाळशास्त्री संघकार्यकर्तेही होते. गोळवलकर गुरुजी (त्यावेळचे सरसंघचालक) यांच्याकडे त्यांचे नेहमी जाणेयेणे असे. 'श्री गोळवलकर' महाल विभागातच राहत असत.

   बाळशास्त्रींमुळे आम्हाला अनेक थोर व्यक्तिमत्त्वे जवळून पाहायला मिळाली. नावांची यादी खूप मोठी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, सोनोपंत दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर, पंडित सातवळेकर, भाऊसाहेब शेवाळकर(अचलपूरचे प्रसिध्द कीर्तनकार), राम शेवाळकर(भाऊसाहेबांचे पुत्र), ग.त्र्यं माडखोलकर, वा. रा. ढवळे, शं. दा. पेंडसे, कांची कामकोटीपीठाचे शंकराचार्य अशी बरीच वेगवेगळ्या क्षेत्रातील नावे घेता येतील. दक्षिणामूर्ती मंदिरात येणाऱ्या या व्यक्तींचा सत्कार होत असे. जेवणावळी उठत असत.

    दक्षिणामूर्ती मंदिर व त्याचा परिसर खूप मोठा होता. दोन मजली इमारत होती. मोठेमोठे व्हरांडे व पडव्या होत्या. देवळाचे सभागृह सुबक होते. दक्षिणामूर्ती व त्रिपुरसुंदरीची मूर्ती खूपच प्रसन्न व मनोवेधक होती. कीर्तन, प्रवचन, आख्याने, यज्ञ, सत्कार समारंभ, जेवणावळी यांनी हा परिसर नेहमीच दुमदुमून जात असे. 'रात्र' तिथे कधी जाणवतच नसे.

   बाळशास्त्री जेव्हा नागपूरात असायचे तेव्हा मोठ्या मुश्कीलीने चार तासांची झोप घेत असत. अत्यंत व्यस्त असा त्यांचा कार्यक्रम असे. चातुर्मास्यात ते नागपूरातच असत. त्यांची कीर्तनेही अत्यंत गाजली. पूर्ण परिसर, आणि अगदी बाहेर रस्त्यापर्यंत लोक दाटीवाटीने कीर्तन ऐकायला गर्दी करत. आधी निरुपण आणि मग कथा! निरुपण इतके विद्वत्तापूर्ण असे की अनेकजण नोटबुक्स घेऊन टिपणे घेत असत. 'हरदासाची कथा मूळ पदावर' असे म्हंटले जाते. ते मूळ पदच इतके विस्तारपूर्वक दाखविले जायचे की त्यामुळे कथेची खुमारी खूपच वाढायची. अनेकांवर त्यांच्या अस्खलित, ओघवती व संस्कृतप्रचुर भाषेचे संस्कार झालेले आहेत. त्यात आम्ही सर्वजण होतो.

   मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इतका अभ्यास, इतकी व्याख्याने, इतकी कीर्तने, इतकी पुस्तके, हे व्याप कमी होते म्हणून की काय ते चातुर्मास्यात दर आठवड्याला एक याप्रमाणे भागवत सप्ताहही करत असत. शिवाय आषाढी आणि कार्तिकी एकादशीला 'एकाह' करीत. 'एकाह' म्हणजे एका दिवसात संपूर्ण भागवताचा पाठ. सुरुवातीला त्यांना तेवीस तास लागत. द्वारकेला त्यांनी एकवीस तासातच 'एकाह' केला असे मावशी सांगते. दरवर्षीच्या श्रावण मासात मासिक पारायण, श्रीकृष्ण जन्माष्टमीला संपूर्ण दशमस्कंधाचा पाठ करीत.

    त्यांची वाणी इतकी जलदगती होती की तिची बरोबरी नजरही करु शकत नसे. एका श्वासात पाच श्लोक वाचीत. ते सामर्थ्य काही वेगळेच होते. कार्यावर अविचल निष्ठा, दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याशिवाय माणूस इतके सर्व कार्य करु शकणे असंभव, हे बाळशास्त्रींनी सिध्द करुन दाखविले.

   एकेका पुस्तकाच्या अभ्यासासाठी त्यांनी जो वेळ दिला असेल तो तर आपण बाजूलाच सारु, पण आल्यागेल्यांशी वार्तालाप, संघकार्यासाठी देण्यात येणारा वेळ, सणसमारंभांसाठी आवर्जून केलेली लक्षणीय तयारी, प्रत्येक कुटुंबियांकडे जातीने लक्ष देण्याची वृत्ती, स्वभावातील आत्मीयता हे सर्वच गुण दुर्लभ म्हणावे लागतील. जेवणावळी उठत. मागून जेवणाऱ्यांना ते स्वतः आग्रहाने वाढत असत. तुमच्याइतका मी शिकलेला नाही म्हणण्याची विनयशीलता त्यांच्याजवळ होती. ते स्थूल बांध्याचे, गौर वर्णाचे होते. धोतर आणि कुर्ता हा त्यांचा पेहराव असे. कीर्तनातील पदेही ते स्वतः रचत असत. अनेक विषयांवर त्यांनी काव्यही केले. मावशीने त्यांच्या मरणोत्तर 'गीतभारत व स्फुट काव्य' या पुस्तकाचे प्रकाशन केले. 'कथाभागवत' नावाचा ग्रंथ मावशीने लिहिला. बाळशास्त्रींचे चरित्र तिने लिहिले. मुंजे चरित्राचा दुसरा खंड तिने तयार केला. त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य तिने पूर्णत्त्वाला नेले. सहधर्मचारिणी हे शब्द अक्षरशः खरे केले. सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तीला तयार करण्याची हातोटी बाळशास्त्रींजवळ होती. अनेकांवर त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाची, ओघवती खणखणीत भाषाशैलीची, पांडित्यपूर्ण, आस्वादक, रसाळ विवेचनाची अमिट छाप पडत असे, आणि बाळशास्त्री हरदास हे नाव म्हणूनच विसरणे अशक्य झाले आहे.

    २४ वे विदर्भ साहित्य संमेलन वाशिम(वत्सगुल्म)इथे ३०, ३१ डिसेंबर १९६१ ला झाले. बाळशास्त्री या संमेलनाचे अध्यक्ष होते. जानेवारी १९६२ च्या युगवाणीच्या अंकात त्यांचे अध्यक्षीय भाषण आलेले आहे. त्यावेळी युगवाणीचे संपादक प्रा. श्री. मा. कुळकर्णी होते. श्री. गो. मा. कुळकर्णी व श्री श्री. मा. कुळकर्णी या बंधुद्वयांशी बाळशास्त्रींचे घनिष्ठ संबंध होते. अनेक संस्थांशी व अनेक मंदिरांशी(नागपूरच्या) बाळशास्त्रींचा नेहमीचा वावर होता. उदा. भोसला वेदशाळा, गीता मंदीर, राम मंदीर, अयाचित मंदीर, समर्थ संस्कृत महाविद्यालय, याठिकाणी त्यांची व्याख्यानेही आयोजित होत असत.

  'तरुण भारत' व 'महाराष्ट्र' या वृत्तपत्रांच्या वाचनालयांतून त्यांच्याकडे पुस्तके परीक्षणासाठी यायची. विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे त्यांची व्याख्याने आयोजित केली जात. संघ कार्यालयाशी तर रोजचाच संबंध होता.

   अपुरी झोप, व्यस्त कार्यक्रम यामुळे तब्येतही खराब व्हायची. त्यांना पाठं झालं होतं. महाल विभागातील डॉ. परांजपे यांच्याकडे पाठ्याचे अॉपरेशन झाले. डॉक्टरांनी बाळशास्त्रींच्या सहनशीलतेचे खूप कौतुक केले होते.

   विदर्भ साहित्य संघाचे वाशीम येथील अध्यक्षीय भाषण खूप प्रभावी आहे. एक व्यवच्छेदक, लक्षवेधी उतारा मला येथे उद्धृत करावासा वाटतो; जेणेकरुन त्यांची भाषाशैली तर लक्षात येईलच, पण मुद्देसूद व परखड विचारसरणीही जाणवेल.

   १) अभिजात साहित्याचे निकष सांगताना ते म्हणतात, साहित्य हे पुरुषार्थ निष्ठच असले पाहिजे. पुरुषार्थनिष्ठा म्हंटली की साहित्य जीवनसापेक्ष व जीवनावर उचित संस्कार घडविणारे असले पाहिजे हे उघड आहे. पुरुषार्थनिष्ठा व औचित्य यांच्या संगमातून साहित्याच्या आविष्काराला रमणीयत्व येते.

  २) साहित्यसृष्टी रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारी असली पाहिजे.

  ३) तिच्यापासून होणारा आनंदानुभव आसुरी, इंद्रियसुखरुप व वासनात्मक नसावा तर तो विशुध्द व आत्मबुध्दिप्रसादज असला पाहिजे. तसा तो नसला तर सीमित भावाचा विलय होऊच शकत नाही; व जर तो झाला नाही तर साहित्यानंदाची अथवा काव्यानंदाची मूळ भूमिकाच सुटते.

  ४) सौंदर्य, मांगल्य व शाश्वत सत्य यांच्या त्रिवेणीसंगमाचे साहित्य हे तीर्थराज असले पाहिजे.

  ५) साहित्यापासून होणारे संस्कार जीवनातील पशुभाव सीमित व हळूहळू नष्ट करुन दिव्यतेने जीवन प्रकाशमय बनविण्यात पर्यवसित झाले पाहिजेत.

  ६) साहित्यानंदाच्या अनुभूतिच्या वेळी व्यक्तिभाव गळून व्यापकतेचे, अपरिमिततेचे अथवा अस्मितेच्या असीमतेचे अधिष्ठान सहृदयाच्या अंतःकरणाला लाभले पाहिजे.

  ७) साहित्यापासून जीवनाला कर्तव्याची, व्यापकतेची व दिव्यतेची प्रेरणा मिळाली पाहिजे.

    त्यांचे सर्व साहित्य 'अभिजात' आहे असे आपण खात्रीने म्हणू शकतो कारण अभिजात साहित्याचे इतके सुंदर विवेचन कुठे वाचण्यात आले नव्हते.

 'वक्ता दशसहस्त्रेषु, 'चालते बोलते विद्यापीठ' असे त्यांचे वर्णन करण्यात येत असे. त्यांचे हासणे गडगडाटी असे. सात मजली हासणे ज्याला म्हणतात, तो अनुभव आम्ही खूपदा घेतला आहे. निर्मळ माणूसच असे हसू शकतो. प्रवासात ते 'बाबूराव अर्नाळकर' यांच्या रहस्यकथा वाचत असत.

   एकेका त्यांच्या ग्रंथावर लिहितो म्हंटले तर एक मोठा ग्रंथच तयार होतो. ५० वर्षांच्या उण्यापुऱ्या आयुष्यात ही व्यक्ती इतके अविस्मरणीय कार्य करुन गेली. मग त्यापासून आपण काय प्रेरणा घ्यायची? काही तरी तर केले पाहिजे ना!

    आयुष्य लाभले असते तर अशा कार्यप्रवण व्यक्ती कितीतरी अजून जगाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा खजिना ठेवून गेल्या असत्या असे वाटत राहते व मन विषण्ण होते. १९६८ सालचा श्रावण महिना त्यांच्यासाठी मृत्यूचे आमंत्रण ठरला व हा महाभाग अनंतात विलीन झाला. पण.....कार्य इतके अनंत की आजही आपण त्यांना आठवतोच ना!
 काळावर मात यालाच म्हणतात.
 खूप खूप लिहिण्याजोगते आहे; पण मर्यादा आहेच ना!

    पाताळेश्वर रोड व दक्षिणामूर्ती रोड यांनी आयुष्याच्या वाटा समृध्द केल्या. ते रस्ते खूप भाग्यवान ठरले. अनेक उल्लेखनीय व्यक्तींचे दर्शन झाले व या रस्त्यांवरून  चालणाऱ्यांनी पुढील आयुष्यात भरारी घेतली.

   नवयुग विद्यालय, महाल नागपूर २ येथे बाळशास्त्रींच्या नावाने हॉल बांधण्यात आला. दरवर्षी ११ अॉगस्टला त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येतो.

  मनाचा दिंडी दरवाजा कधीचाच आहे   सताड उघडा
   उघडा - वाघडा आणि बोडखा

 कितीतरी अनुभवांचे त्यात आहे संक्रमण

 आठवणींचे कधीच परतवून लावले नाही आक्रमण

 म्हणून आयुष्य झाले वाटते का समृध्द आणि आकाश विशाल!
 अजून बरेच काही मिळवायचे आहे.

 प्रत्येकाचे आभाळ त्याच्यापुरतेच असते
 पण त्यापलीकडेही असते महाकाय आभाळ - अति विशाल त्या सर्वांचे आभाळ

 आपण त्यांच्यापर्यंत पोहचू शकू का कधी?
घेऊ शकू का त्यांच्या त्यांच्या अनुभवांना कवेत? 
         कां नाही?

 परकाया प्रवेश करण्याची सिध्दी केलीच ना प्राप्त अनेकांनी आणि बसविली कलाकाराच्या व्याख्येत

 कलाकाराची ही सिध्दी प्राप्त होणे यासारखे नाही भाग्य
  मग काय अप्राप्य?

 साऱ्यांचेच आभाळ होईल तुझे ध्येय
ध्येय फार मोठे....फार फार मोठे....!

    असे काही विलक्षण विचार बाळशास्त्रींचे जीवन पाहिल्यानंतर मनात येतात. कितीतरी लोक भुरळ पडल्यासारखे त्यांच्यामागे धावले.
त्यांच्या मृत्यूनंतर सारे नागपूर सुन्न झाले. त्या व्यक्तीची महती इतकी मोठी की बाकी जण खुजे ठरावेत.
 त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

संगीता मुकुंद पाटखेडकर.
  पूर्वाश्रमीची गीता सदाशिव मोहरीर.