आजोबा नागपूर शहरातल्या महाल विभागात वाड्यात राहत असत. वाड्यामध्ये
फुलझाडांमध्येः 'तगर', 'जाई', 'जुई', 'चमेली', 'दूधमोगरा', 'कण्हेर', 'गुलाब', 'सहस्त्रदळ',
'पारिजात', 'तुळशीचे बन', गुलाबाच्या अनेक जाती होत्याः लाल गुलाब, पांढरा गुलाब, गुलाबी
गुलाब इ..... सोपेचे झाड होते.
फळझाडांमध्येः पेरु, डाळिंब, सीताफळ, लिंबू. या प्रत्येक झाडाला
भरपूर फुले व फळें लागायची. या सर्व झाडांची आजोबांसहित सर्वजण निगा राखायचे. या सर्व
झाडांचा उपयोग चांगल्या प्रकारे करुन घेतला जात होता. सीताफळाचे कालवण करणे म्हणजे
अत्यंत किचकट काम! पण आजी कालवण खूप छान करायची. आज 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश
द्यावा लागतो आहे. आजच्या काळात जर तसा 'वाडा' असता तर वाड्यातील अनेक गोष्टींना बक्षिस
मिळाले असते!
अकोल्याच्या 'पंजाबराव देशमुख' कृषी विद्यापीठात गुलांबाच्या
फुलांची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. अनेकजण या स्पर्धेत भाग घेतात. ज्यांचे
गुलाब व सजावट चांगली; त्यांना बक्षीस मिळते. हा सोहळा नयनरम्य असतो. आजोबा त्याकाळीही
'निसर्गमित्र' होते असे मला वाटते. त्यांना स्वतःला खूप सुंदर फुलांचे हार करता येत
होते. त्यावेळी त्यांचा चेहरा खूप खुलून दिसायचा! रांगोळ्याही ते खूप छान काढायचे.
असे आजोबा होणे नाही. असा 'वाडा' होणे नाही.
आजोबा महाराजबागेतून
झाडांसाठी लागणारी खतं आणायचे. लावलेल्या रोपांभोवती आळं करायचे. रोज सर्व झाडांकडे
जातीने लक्ष द्यायचे. स्वतःच्या अपत्यासारखी झाडांची निगा राखायचे. आजोबांना मागे हातात
हात घालून खूप वेळ झाडांकडे काळजीपूर्वक निरखून पाहतांना मी स्वतः पाहिले आहे. त्यांना
त्या काळी कुणी सांगितले? असे करा म्हणून! त्यांना पोटातून या सर्व गोष्टी करण्याची
आवड होती. एकदा आजोबा लवकर घरी आलेच नाहीत. आजीला काळजी वाटू लागली. घरी आल्यानंतर
आजीने त्यांना त्याबाबत विचारले. ते महाराजबागेतल्या बंगालेंकडे झाडांची, खतांची माहिती
घ्यायला गेले होते.इतकी त्यांची निष्ठा होती! मी आजोबांना 'निसर्गमित्र' म्हंटले याचा
आज मलाच आनंद होत आहे. महाराजबागेच्या माझ्या आठवणी;- माझ्या वडिलांसोबतच्या व आजोबांसोबतच्याही
मर्मस्पर्शी आहेत.
आज ५ जून २०१६, 'जागतिक
पर्यावरण दिन' आहे. यानिमित्ताने वाड्यातील झाडे,पानें, फुलें, फळें यांचा उल्लेख झाला
याचा मला आनंद आहे.
फुलझाडे, फळझाडे यांची
निगा आणि इतकी काळजीपूर्वक देखभाल आजोबांनी कशासाठी केली असेल? असा प्रश्न माझ्या मनात
आला. विचार करता वाटले, उत्तर तर अगदीच सोपे आहे. देवपूजा हे प्रधान कारण मला वाटते.
सर्व चित्त देवधर्मात, देवघराची स्वच्छता, नैवेद्य आणि साग्रसंगीत, व्यवस्थित व्हावे
यासाठीच असल्यामुळे हा सर्व अट्टाहास त्यांनी केला याची मला खात्रीच वाटते. फुलांचे
हार, तुरे आणि देवघराची शोभा यात त्यांना आनंद. फळांचे गर, कालवण यांचा नैवेद्य यासाठी
सारा खटाटोप. या सर्वांसाठी जी निष्ठा लागते ती तर त्यांच्याजवळ होतीच. दीर्घोद्योगाशिवाय
माणसाला काहीच गवसत नाही हा संदेश त्यांनी त्यांच्या जीवनातून सर्वांसमोर ठेवला असे
मला वाटते.
आज ६ जून. आजच्याच दिवशी १९७५ साली माझ्या आईबाबांचे लग्न झाले
होते. त्यानिमित्तानेही मला आजोळ व आनुषंगिक गोष्टी आठवल्या.
"ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा"
लेखनाची वाट एकदा गवसल्यानंतरचा आनंद अनुपमेयच! मी माझ्या लेखनाला
सुरुवात आजोबांवरच्या लेखानेच केली आहे. तो धागा आता सुटू नये असे वाटते. मनातल्या
भावना व्यक्त करता आल्या की लेखणी सहजच चालू लागते हा अनुभव मी घेत आहे. माझ्या आईला
मी लिहिती झालेली पाहून आनंद होत आहे.
नागपूरला जेव्हा आम्ही
गोंदियावरुन जात असू, तेव्हा अगोदर एक म्हशींचा गोठा वाड्याच्या आधी दिसत असे. त्याच्या
भिंतीवर एका ढेरपोट्या माणसाचे चित्र दिसे. त्याच्यासमोर मोठमोठया लाडवांनी भरलेले
भले मोठे ताट असे. त्याच्या हातात तोंडापर्यंतचा भला मोठा लाडू दाखविला होता. बाजूला
लिहिले होते, 'मला लाडू नको.'
मला हे चित्र कितीदातरी
पाहावेसे वाटे. मला तो लठ्ठ माणूस, ते लाडू आणि हुबेहूब काढलेले चित्र आवडे. मी तिथेच
उभी राही. माझे बाबा मला आग्रहाने वाड्यापर्यंत नेत. ते म्हणत, 'अगं गुल्लू, चल लवकर
घरी, आजोबा वाट पाहत असतील'!
अजून मी वाड्यातल्या
अंगणातच आहे. घरात शिरलेली नाही. वाड्यावर, त्यातील माणसांवर लिहिणे हे एक फार मोठे
लंबायमान प्रकरण आहे; पण हे मोठेमोठे लाडू मला खायचे आहेत. लाडू नको अशी अवस्था येऊ
नये. ढेरपोटे होऊ नये. वाड्याची वाटचाल सुलभ व्हावी अशी इच्छा!
"युगामागूनी चालली रे युगे ही कितीदा करु भास्करा प्रार्थना?
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी? कितीदा करु प्रीतीची याचना?"
कुसुमाग्रजांची 'पृथ्वीचे
प्रेमगीत' नावाची एक अतीव सुंदर कविता आहे. सूर्याभोवती रोज फिरणारी पृथ्वी त्याच्याजवळ
कधीच जाऊ शकत नाही. 'दोन धृवांवर दोघे आपण' असे म्हणण्याची पध्दत आहे; जेव्हा कुठेच
काही मेळ बसत नाही तेव्हा! तसेही उत्तर धृव, दक्षिण धृव थोडीच एक होणार! दोन समांतर
रेषा कधीच एकमेकांना मिळणार नसतात, पण विरुध्दाचे आकर्षण नेहमी कायमच राहते. पृथ्वीवर
राहणाऱ्या माणसाने अखंड आकाशाचा वेध घेतलाच आहे. आकाशाची निळाई, ढगांचे वेगवेगळे आकार,
सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्रें त्याला अखंड खुणावतच आलेली आहेत. पृथ्वीवरची झाडे, वेली,
पाने, फुले, झरे, ओहळ, नद्या, सरोवरें आणि सागर यावर आकाश अखंड सावली करतच आले आहे;
आणि आपल्या कृपेचा ओघ अखंड पृथ्वीला जीवन देण्यासाठी वाहवतोच आहे.
पृथ्वी आणि आकाश कविकल्पनेला
मिळालेले अखंड स्त्रोत आहेत. एकमेकांशिवाय दोन्हीही अपूर्ण आहेत. पृथ्वीवरील, आपली
नातलग मंडळी आणि आपल्याला सोडून गेलेली आपली प्रेमाची माणसं म्हणजे आकाशातील चमचमणारे
तारे; अशी एक मनाला दिलासा देणारी कल्पना मला चाटून जाते.
त्या चमचमणा-या ता-यांमध्ये जसे आजोबा आहेत तसेच माझे वडीलही
आहेत. प्रमोद मामा जसा आहे तसेच पाटखेडकरांकडील माझे काका, काकू, माझे चुलत भाऊ, माझी
मोठी आई या सर्वांचाच समावेश आहे. मावशीआजी जशी आहे तसेच पणजी-पणजोबा पण आहेत.
माणूस म्हणजे आठवणींचा
एक संग्रह आहे असे मला वाटते. मी २ जुलै २०१६ ला वयाची ४० वर्षे पूर्ण करीत आहे. कल्पनाशक्तीनेसुध्दा
मी आता ब-याच गोष्टींचा विचार करु शकते असे मला वाटते. यातूनच निर्मितीची प्रेरणा मिळणार
आहे आणि ती पुढेही मिळतच राहो ही इच्छा!
आई नेहमी म्हणत असते की, "आपल्याच परिचयाच्या व्यक्तींकडे
जरी डोळसपणे बघितले तरी इतरत्र धांडोळा घेण्याची गरज नसते. इतके स्वभावदर्शन, गुण,
दोष यांचा अभ्यास त्या-त्या व्यक्तिमत्त्वातून मिळतो की आयुष्यभर सोबत होते."
मी देव आनंदचे म्हणणे
पेपरमध्ये वाचले होते. तो त्याचे चित्रपट पेपरमधल्या बातम्या वाचून, चित्रपटातल्या
प्रसंगांचे रेखाटन करीत असे. जीवनाइतके शिकविणारे दुसरे काहीच नाही. जीवन अभ्यास करता
करता व्यक्तिमत्व मुखरित व्हायला लागते. चाळीस वर्षांच्या आयुष्यात मला जे अनुभव आलेत
त्यातून मीही घडले आहे. जीवन प्रवासाची शिदोरी पाठीशी बांधून जागतेपणाने आयुष्याला
सामोरे जाण्याचे बळ चांगल्या-वाईटाच्या सारासार विवेकानेच यायचे आहे. छोट्या छोट्या
गोष्टींनी आनंद मिळत असतो. ज्या क्षेत्रात आपण काम करतो तेथील रिझल्ट, तिथल्या विद्यार्थ्यांच्या
आपल्या शिकविण्याविषयीच्या चांगल्या प्रतिक्रिया शिक्षकाला बळ देऊन जातात. मलाही उत्तम
शिक्षक म्हणून प्रशंसा झाली की चेहरा फुलारतो. त्यावरुन मला नेहमी आजोबांची आठवण होते. त्यांनी हा अनुभव तर खूपच मोठ्या
प्रमाणात घेतला आहे. त्यांचे लिखाण वाचल्यानंतर वाचक सुजाण, उन्नत आणि विचारी होऊन
जातो.
ब-याच गोष्टींचा वेध
घेण्याची माझ्या नजरेला एक सवयच लागून गेली आहे. माझे बाबा अगदी बारकाव्यासहीत गोष्टींकडे
बघणारे होते.
आपण जिथे जात आहोत तिथेच फक्त जायचे नसते. वाटेतील ब-याच गोष्टींना
न्याहाळता न्याहाळता आस्वादक वृत्तीने अंतर्मनात त्या साठविता साठविता आपले मन एक संग्राहक
खजिना झाला असल्याचे जाणवते.
पहाटे पहाटे मला जाग आली
कल्पनाकल्लोळांनी नीज उडाली
लेखणी घेतली हाती; ती धावती झाली
मन आनंदित झाले, घेतली भरारी
डेरेदार वृक्ष नि लगटलेली नाजूक सुंदर वेल
पाहताच मन आनंदित
होणारच ना!
बहरणारी तुळस, त्यांना आलेल्या सुगंधी मंजिरी
आसमंतात दरवळणारा
सुवास...............
दोन सुवासांची कोणीच बरोबरी करु शकत नाही.....
कोणते म्हणाल तर पाऊस पडल्यानंतरचा
मातीचा सुगंध आणि तुळशी-मंजिरीचा
सुगंध
सुगंधाला फळाफुलांनी खूपच केले आहे समृध्द
सारा परिसर होऊन जातो धुंद आणि फुंद;
मंत्रमुग्ध! मला आठवतो मुकुंद, मी होते
गानलुब्ध आणि त्याच लुब्धतेत होते कटिबध्द!
गाय आणि तिचे वासरु पाहून आनंदणार नाही असे कोण आहे?
सूर्य, चंद्र पाहून, चमचमते तारांगण अवलोकून प्रसन्न न होणारा
विरळाच ना!
निसर्ग आणि माणसाचे नाते अतूट
फळाफुलांचा मनसोक्त लुटलेला आनंद
माणसाच्या आयुष्याला निरामय
करतो.
निसर्गसान्निध्यात माणूस दुःखाला मागे टाकतो;
म्हणून तर वनभोजनाचे
कार्यक्रम आखले जातात
जलप्रवाह पाहून त्या जलासारखेच मन
उचंबळते आणि मन भावनांनी प्रवाहित
होते
मनाच्या तुळशीच्या मंजिरी झाल्या
मन फुलांच्या आणि फळांच्या वेली झाल्या
मन गेले
आनंदाने ओसंडून आणि बहरुन
मन गेले आरपार आसमंतात आणि अंतराळात
मना, तुझे सामर्थ्य किती?
वेग किती? आणि वेध किती?
मन पाखरु पाखरु याला आता कसे आवरु?
पाखरा, तुला पंख, घे भरारी
अडसर नाही तुला, सारा आसमंत तुझी वाट बघतो आहे,
सा-यांची नजर
तुझ्याकडेच
डगमगू नको, भिऊ नकोस, वाटचाल अनंत
वाजव मोठ्याने तुतारी
आई-बाबांमुळे वाडा
माझ्याशी संबंधित
आजोबा-आजीमुळे आई आणि बाबा
आईमुळे जागला कल्पना आणि विवेक विचारांचा
वाडा
सांदीकोपरा धांडोळण्याची तिच्याचमुळे लागली सवय
ती आजोबा-आजीच्या पावलावर पाऊल
टाकणारी
म्हणूनच तर कल्पना, विवेक आणि विचार यांनी
आम्हा सर्वांचे आयुष्य झाले निरामय.
आज १२ जून. आजोबा-आजीचे
लग्न आजच्याच दिवशी झाले. त्या घटनेला आज ७५ वर्षे झाली. आजीचे नाव- प्रमिला सदाशिव
मोहरीर. पूर्वाश्रमीची सुशीला मुरलीधरपंत सास्तीकर. आजच्या काळात त्यांच्या लग्नप्रसंगाचा
विचार करता अनेक गोष्टींच्या कल्पना मन करु लागले. त्या त्या काळानुसार व्यक्तीच्या
मनावर तसे तसे संस्कार केले जातात किंवा सभोवतालच्या परिस्थितीकडे पाहून ते व्यक्तीच्या
मनावर आपोआप होत असावेत असे मला वाटते. त्या काळी वाडा संस्कृती होती. जवळपास प्रत्येक
घरी सोवळे-ओवळे पाळले जाई; त्यामुळे आजोबांशी लग्न झाल्यानंतर आजीलाही हे सर्व करावेच
लागले. अर्थात तिच्या माहेरीही तिच्यावर तेच संस्कार झाले असणार! आजी वाड्याचे आणि
आजोबांच्या आयुष्याचे शक्तिपीठ आहे असे मला वाटते. तिच्यामध्ये एक वेगळीच Positive
Energy मला जाणवते. आजीने खूप कष्ट केले आहेत. तिने सात अपत्यांना जन्म दिला. खरे तर
नऊ! बाकीची दोन अपत्ये त्यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी वारली. रोज सकाळी व संध्याकाळी
चुलीवर अठरा जणांचा स्वयंपाक! वाडा मोठा असल्यामुळे आजूबाजूचीही सर्व देखभाल; त्यात
भरीस भर म्हणून आजोबांचे सोवळे! अबब!! किती ही कामे?? आज या सर्व तिने केलेल्या कष्टांचा
विचार करता थक्क आणि आश्चर्यचकित व्हायला होते. आजीने हे सर्व नेटाने आणि प्रसन्नचित्त
राहून पार पाडले. ती आजोबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आजीच्या स्पर्शाने वाड्यातील
कोपरा न् कोपरा चमकून निघाला. वाड्याला नवचैतन्य आले. ती सुगरण आहे. तिच्या हातच्या
पदार्थाला एक अवीट गोडी आहे. मला तिने केलेले आप्पाल, भरडा-भात, तक्कू, तिळाच्या साटो-या,
तिळाच्या कोसल्या, मसालेभात खूप आवडायचा. आल्या-गेल्याचे स्वागतही आजी प्रेमाने करायची.
तिच्या जावयांची तर तिच्या राज्यात खूप चंगळ असायची. ताटात इतके स्वादिष्ट पदार्थ असावयाचे
की आधी हा खाऊ की तो खाऊ? असे व्हायचे; मला माझे बाबा सांगत. मी तिची सर्वात मोठी नात.
तिने माझ्यावर खूप माया केली. ती मला नेहमी गुल्लूताई म्हणत असते.फोन केल्यावरही ती
माझ्याशी बोलल्याशिवाय राहत नाही. माझा जन्म झाल्यानंतर मावशी आजी माझ्या आईला सांगत
होती की, ताईला इतका आनंद झाला की ती म्हणाली; 'तुझ्यामुळे मी झाले आजी, होऊ कशी उतराई?
होऊ कशी उतराई'? आजी सुगरण तर आहेच पण कलाकुसरही तिला येत असे. विणकाम, भरतकाम यात
ती निपुण आहे. तिने स्वतः विणलेले स्वेटर्स तिच्या मुलांना, सुनांना, लेकींना, जावयांना,
नातवांना दिले. ते स्वेटर्स आजही आमच्याजवळ आहेत. माझे बाबा आवडीने ते घालायचे. तिने
विणलेल्या स्वेटर्समुळे मायेचे चिलखतच परिधान केले असे मला वाटते. तिच्या मायेची ऊब
त्या स्वेटर्समध्ये आहे. आजी दिसायलाही खूप देखणी आणि सुंदर आहे. आज ती ९१ वर्षांची
आहे. तिची स्मृती खूप तल्लख आहे. तिचे वाचन दांडगे आहे. चालू घडामोडी ती सहज सांगून
जाते. राजकारणाची तिला आवड आहे; त्याविषयीच्या बातम्या, updates ती सतत टीव्हीवर पाहत
असते. तिच्या इतरांशी गप्पागोष्टी या चर्चेच्या व अभ्यासविषयकच असतात. इतक्या मुलांना जन्म देऊनही व आयुष्यभर इतके कष्ट
करुनही तिच्यामधील शारिरिक व मानसिक ताकद अजोड आहे. तिच्यापुढे नेहमीच नतमस्तक व्हावेसे
वाटते. तिला उदंड आयुष्य मिळो आणि ती शंभरी पार करो हीच मनापासूनची इच्छा!
प्रत्येक शहराची, गावाची, प्रांताची, देशाची काही ना काही खासियत
असते; जसे- बनारसची साडी, शालू, पैठणची पैठणी, सोलापूरच्या चादरी, काश्मीरचे गालिचे.
वस्त्रप्रावरणांप्रमाणेच वेगवेगळ्या शहरांच्या मिठाईसुध्दा खूप प्रसिध्द असतात. जसे-
आग्र्याचा पेठा, कोल्हापूरची जिलेबी.
नागपूरच्या महाल विभागातील
बडकस चौकात रामभांडारची पेढ्याची करंजी खूप छान मिळायची. आम्ही नागपूरला जायचो ते काही ना काही प्रसंगानिमित्तच!
घरी खास पाहुणे आले तर; आनंदाची काही खुशखबर असेल तर; सण-समारंभ असेल तर आजोबा ही करंजी
नक्कीच आणायचे. करंजी इतकी स्वादिष्ट असायची की खाणारा मिटक्या मारीत खाई. करंजीचा
आकारही खूप मोठा असायचा. पुढे काळानुसार ती छोट्या आकारात मिळायची. मी त्या करंजीला
ढेबरुट करंजी म्हणत असे. ढेबरुट म्हणजे ढेबरी. काय करणार? लहानपणापासून ऊकारात्मक बोलण्याची
सवय! जित्याची खोड...........
एकदा असेच नागपूरला
आम्ही सर्व मावशी आजीकडे गेलो असता तिने दक्षिणामूर्ति मंदीर परिसरातील कुणालातरी रामभांडारची
करंजी आणावयास सांगितले. काही वेळाने तो मुलगा गुमसुम परतला आणि त्याने सांगितले की
करंज्या संपल्या. मला आजही आठवतो तो प्रसंग. मन खूपच खट्टू झाले. आपली एखादी मौल्यवान
वस्तू किंवा दागिना हरवला की कशी रुखरुख लागते; अगदी तसेच झाले. आजोबा अगदी आनंदाने
ती करंजी सर्वांसाठी आणायचे. कित्ती जणांनी या करंजीचा आस्वाद घेतला असेल याची तर गणतीच
नाही.सुखाचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात. या करंजीने अनेकांचे पोट सुखी केले. ज्यांनी
ती खाल्ली त्यांनी तिला विसरणे कठीण आहे. वाड्यातील प्रसंगांना ती करंजी शोभा आणायची.
वाडा सुटला आणि करंजीही संपली. करंजीच्या नावाने आता उरले फक्त उसासे! उसासे! आत्ताच्या काळात तशी करंजी मिळेल की नाही; मला माहीत
नाही. परंतु 'या सम हा' हे वाक्य अलौकिक प्रसिध्दी मिळविणा-या व्यक्तीविषयी म्हंटले
जाते. मला मात्र त्या करंजीला म्हणावेसे वाटते; परंतु 'या सम ही'.
आजोबांच्या अनेक आठवणींमध्ये
या करंजीला खूप मानाचे स्थान आहे.
आजोबा आणि त्यांच्या
संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे वाढदिवस हाही एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय
आहे. ते स्वतःचा वाढदिवस तिथीने असो किंवा तारखेने असो; खूप मोठ्या प्रमाणात साजरा
करीत. वाढदिवसाला सर्व नातेवाईकांना आग्रहाचे निमंत्रण राही. आम्हीही त्यांच्या काही
वाढदिवसांना नागपूरला गेलो होतो. वाढदिवस थाटात करण्यामागे त्यांचा उद्देश एवढाच असे
की, सर्व मावसभाऊ, भाचे मंडळी, नातू, नाती, मुले, मुली, सुना, जावई या सर्वांच्या गाठीभेटी
होऊन सहभोजन करावे. विचारांची देवाणघेवाण व्हावी. सर्वांची ख्यालीखुशाली कळावी. त्यांचे
त्यांच्या मावसभावांशी, चुलतभावांशी खूप जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध होते जे आज
दुर्मिळ आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमांना, सण-समारंभांना ते आवर्जून या सर्वांना
जेवणाचे आमंत्रण देत. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली होती. आमच्या सर्वांच्या वाढदिवसानिमित्त
त्यांचे हमखास पत्रं येत असे. त्यांनी आम्हाला भरभरून आशिर्वाद पाठविलेली लिखित स्वरुपातील
ती पत्रें आजही आमच्याजवळ आहेत. वाढदिवसाला प्रथम आठवण येते ती जन्मदात्यांची!
मला मात्र माझ्या वाढदिवशी माझ्या बाबांची जशी तीव्रतेने आठवण
येते तशीच मला पत्रांतून प्रचंड शुभेच्छा आणि आशिर्वाद देणाऱ्या आजोबांचीही येते.
बापूराव पत्तरकिने
आजोबा यांची ७५ वी त्यांनी साजरी केली. मामा कमाविसदार पणजोबा यांची ७५ वी साजरी केली.
आत्या-आजीचे यजमान भाऊसाहेब देशपांडे यांची ७५ वी साजरी केली. त्या-त्या कुटुंबाच्या
सगळ्या परिवाराला जेवायला बोलावून ते त्या सगळ्यांचे स्वागत करीत असत. अर्थातच इतक्या
सगळ्यांचा स्वयंपाक आजी करीत असे. अन्नदान हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.
मोहरीरांच्या घरात किती लोक, कोणकोणत्या प्रसंगाने जेवून गेले याची गणती करणे अशक्य
आहे. बारसे असो, मौंज असो, लग्नसमारंभ असो, वाढदिवस असो की पंच्याहत्तरावी!!.........
असे अनेक प्रसंग!
आजोबा सांगायचे नेहमी
की त्यांचे वडीलसुध्दा(मोरेश्वर पणजोबा) लोकांना जेवू घालण्याच्या बाबतीत अगदी पटाईत
होते. त्याकाळी पायात चपला आहेत की नाही, वस्त्रप्रावरणे भारी आहेत की नाही, खूप आहेत
की नाही; याला काहीच महत्त्व नव्हते. सगळा जो गोतावळा आहे तो जमा करुन एकत्र खाण्याचा
आनंद लुटणे याला जास्त महत्त्व दिले जात होते. हा सगळा विचार करता माझ्या मनात एक विचार
डोकावतोच की, गरिबीचा काय अर्थ?
आजच्या कालदृष्ट्या
बुफे देणारा, मॉलमधील वस्त्रप्रावरणे वापरणारा, खूप चपला, बुटांचे जोड असणारा, किती
हजारांची, लाखांची खरेदी एका दिवसात केली यावर श्रीमंतीचे मोजमाप आहे. किती जणांना
आपण जेवू खाऊ घालू शकलो, याचे समाधान आणि आनंद मोठा होता; त्यासाठी प्रसंग शोधले जायचे.
'अन्न हेच पूर्णब्रह्म' हे आजोबांना पक्के समजले होते, असे मला वाटते. आजी अन्नपदार्थ
करण्यात अत्यंत कुशल होती. जे पदार्थ, आज खायला
मिळत नाहीत, असे अनेक पदार्थ आजोबांकडे होत असत. उदा.- पोपटीच्या दाण्याच्या कचो-या,
तुरीच्या दाण्याचा मसालेभात, हुरड्याचा शिरा, हुरड्याचे वडे, मकईच्या दाण्याचा ठेचा..........
वगैरे-वगैरे. यादी खूप मोठी आहे.
हे सर्व पदार्थ तोंडाच्या
वाफेवर होत नसत. पाटा-वरवंट्यावर वाटण केले जायचे! मिक्सर थोडीच होते? कुकर नव्हता!
फुड प्रोसेसर नव्हते! आज सगळे असूनही करायची वानवा आहे; त्यामुळे त्यांच्या करण्याचे
महत्त्व प्रकर्षाने जाणवते; आणि हे सगळे पदार्थ; आणि हे सगळे कार्यक्रम देवांची पूजा
झाल्याशिवाय आणि नैवेद्य झाल्याशिवाय होत नसत, हे सगळ्यात महत्वाचे! त्यामुळे तर त्या
घराच्या या सगळ्या करण्याला एक पावित्र्य वेटाळून बसले होते. आजोबा-आजीच्या या सगळ्या
करण्यात खूप काही आम्ही केलं अशी भावना कधीच नव्हती. 'मी' पणा नव्हता, अहंकार नव्हता,
गर्व नव्हता, दर्प नव्हता हे विशेष! जे आयुष्यात साधायला हवं असं म्हणतात ते दोघांनीही
लीलया साधलं.
काय काय सांगू? लिहायला
बसले तर एक प्रबंध होईल! मला तर हा सगळा अजूबाच वाटतो!
मी लहान असतांना माझे बाबा मला नेहमी नागपूरच्या महाराज बागेत
घेऊन जात असत; अकोल्याहून जेव्हा नागपूरला जात असू तेव्हा! एकदा आजोबाही आमच्याबरोबर
आले होते. महाराज बागेत सिंह, अस्वल, माकडे, हरणं असे प्राणी निवास करत होते. आत ठिकठिकाणी
अनेक भेळ, खारे दाणे इ. च्याऊ म्याऊ पदार्थांचे स्टॉल लागत असत. आजोबा आणि बाबा मला
कडेवर घेऊन पायीच निघाले. दोघेही पायी चालण्यात पटाईत होते. आजोबा खूपच वेगाने चालत
असत. त्यांच्यामधील इतर वैशिष्ट्यांपैकी हेही एक. धोतर, अंगात सदरा व खिसे असलेला कोट,
डोक्यावर काळी टोपी, असा त्यांचा वेष होता. ते भराभर पुढे निघून जात व बाबा मागे! माझ्या
बाबांचे चालणे हळू! त्यामुळे त्यांना एका विशिष्ट अंतरावर थांबून आमची वाट पाहावी लागे.
वाटेत आजोबा मला खांद्यावर घेत. ते म्हणत, "आता महाराज बागेत जाशील तर तिथल्या
माकडांना म्हणशील; माकडा, माकडा हुप्प; तुझ्या शेपटीला तुप्प; माकडा, माकडा हुप्प;
तुझ्या शेपटीला तुप्प," अशा ओळींची घोकंपट्टी त्यांनी वाटेत माझ्यासाठी लावली
होती. ह्या ओळी म्हणतांना त्यांचा चेहरा प्रसन्न दिसायचा. या ओळी म्हणतांना ते मारुतीसारखे
गाल फुगवायचे! मजल-दरमजल करत पोहोचलो एकदाचे महाराज बागेत! आधी आमची स्वारी माकडांजवळ
गेली. त्यांनी कितीही माकडा, माकडा असे म्हणायला सांगितले तरीही मी आपली ऊकारात्मकच
बोलत असे. माकडे दिसली की मी म्हणायची, 'माकडू, माकडू हुप्प; तुझ्या शेपटीला तुप्प,
माकडू, माकडू हुप्प; तुझ्या शेपटीला तुप्प.' आजोबा हीः हीः हीः करुन हंसत असत; आणि
मी हुः हुः हुः करुन हंसत असे. आम्ही दोघेही हंसमुखराय दिसत असू.
सर्व माकडांनी मला वाकुल्या दाखविल्या.
अचानक तेथील अनेक
माकडांपैकी दोन माकडांमध्ये भांडण जुंपले. बहुतेक नवरा-बायकोची जोडी असावी. दोघांनीही
एकमेकांची मानगुटी धरली. तिथे सर्व लोक जमा झाले. मी फारच व्याकुळ होऊन ढसाढसा रडायला
लागली. मी शांत व्हावी म्हणून बाबा आणि आजोबा मला 'ऊगी, ऊगी' करुन पाठ थोपटायला लागले.
माझा चेहरा लाल झाला होता. माझे रडणे थांबायला बराच वेळ लागला. आजोबा आणि बाबांचाही
चेहरा व्याकूळ झाला. दोघांनीही आपला मोर्चा सिंहांकडे वळविला. माझ्या बाबांना हुबेहूब सिंहाचा आणि वाघाचा
आवाज काढता येत असे. बाबांनी त्या आवाजाची घोकंपट्टी लावली. एकदाची मी शांत झाली. दोघांचाही
जीव भांड्यात पडला. दोघांचीही नजर चुकवून मी सिंहाच्या पिंजऱ्यात हात घातला. तो सिंह
शांत बसला होता. मी हात घालून त्याला 'ये, ये' असा आवाज देत राहिली. कुण्यातरी तिसऱ्या
माणसाचे माझ्याकडे लक्ष गेले आणि तो मोठ्यामोठ्याने ओरडायला लागला, 'अरे, ये किसकी
बच्ची है, शेर के पिंजडे में हात डाल रही?' त्याच माणसाने धावत येऊन मला धरले. अनोळखी
व्यक्तीने खांद्यावर घेतल्यामुळे मी परत रडायला लागली. मी लहानपणी फारच 'सोवळी' होते,
असे आई सांगते. काही छोटी मुलं पटकन ति-हाईतांजवळ जातात; रडत नाहीत. माझे तसे नव्हते.
मला कुणीही उचललेले चालत नसे. मला कुणी धरावे, कुणी धरु नये, अशी माझी काहीतरी मानसिकता
असेल कदाचित.
तर.... आजोबा आणि बाबा
मी शांत उभी आहे, असे पाहून अगदी थोडे बाजूलाच मुरमुरे आणि खारे दाणे घेण्यासाठी गेले
होते. तेवढ्या कमी वेळातला हा माझा प्रताप! तो माणूस ओरडताच बाबा धावले. त्यांनी मला
कडेवर घेतले आणि मला शांत केले. दोघांनीही त्या व्यक्तीचे आभार मानले. त्यानंतर हरणांना
खारे दाणे खाऊ घालून आम्ही घराकडे वळलो.
........ पुढे दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि वर्षांमागून
वर्षे जात राहिली. काळाचा महिमाच तो! त्याला कोण रोखू शकतो! 'बालपणीचा काळ सुखाचा'
सरला. आजोबांशी संपर्क पत्रांमधूनच व्हायला लागला. त्यांनी आईला लिहिलेली पत्रें यातून
जाणवले; ते लेखक आजोबा! 'या दोन्हीही मुली नागपूरातच असल्यामुळे सर्वांच्या गाठीभेटी
होतात; तुमच्याच होत नाहीत,' याची त्यांना
नेहमीच खंत वाटत असे. दर भेटण्याला ते तसे बोलूनही दाखवत! त्यांच्या बोलण्यातून सहज
काही छान वाक्यें निघत; जी मनावर सहज संस्कार करीत. त्यांच्या मुखातून निघालेली अशी
काही वाक्ये आज आठवत आहेत. ती अशीः-
१) 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे'
- आयुष्यभर ज्ञानदान त्यांनी केलं होतं; विद्यार्थ्यांसाठीही आणि त्यांच्या मुला-मुलींसाठीही
ते 'गुरु' होते. अखंड ज्ञानवेधाचा खजिना त्यांनी सर्वांसाठी खुला केला. समर्थ रामदासस्वामींचे
हे वाक्य ते जगले, असे मला वाटते.
२) "व्यक्तीने चारित्र्यसंपन्न असावे. पैसा तर काय वाईट
मार्गानेही काही लोक मिळवितात! पैसा हा नेहमी प्रामाणिकपणे कष्ट करुन आणि चांगल्या
मार्गानेच मिळविला पाहिजे."
३) 'सदासर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे'
- हे वाक्य त्यांच्या मुखी नेहमी असे. त्यांनी हे वाक्य उच्चारले की, का कुणास ठाऊक,
मला असे वाटे की आजोबा काही संकटात तर नाहीत? सर्व संकटांतून तारुन नेणारा तो 'कृपाळू'
नेहमीच माझ्याबरोबर राहील असा त्यांचा विश्वास होता. आजोबांइतकी आस्तिक, निःस्वार्थपणे
देवधर्म करणारी व्यक्ती मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात पाहिली नाही.
४) "कोणत्याही विषयाचे ज्ञान हे सखोल असले तरच माणूस परिपूर्णतेकडे
जातो. ज्ञान मिळविल्याने आनंद होतो; आणि वाटल्याने ते दुप्पट, तिप्पट, चौपट वाढते.
नवनवीन शिकण्यासाठी नेहमीच आपण सज्ज असले पाहिजे."
५) 'टवाळा आवडे विनोद' - "दिवसरात्र थट्टामस्करी, याच्या
त्याच्या निंदा करण्यातच काही लोक भूषण मानतात. असे लोक एक नंबरी रिकामटेकडे असतात.
फालतू गोष्टींवर विनोद करत राहतात." आजोबांना रिकामा वेळ घालविणारे आवडत नसत.
असे लोक हलके असतात, असे ते त्वेषाने म्हणत.
६) "मला, माझ्या माता-पित्याचे भरभरुन प्रेम लाभले नाही,
ते लवकर स्वर्गवासी झाले, तुम्ही तुमच्या सर्व मुलांना छान घडवा, चांगले शिक्षण द्या,
देशाचा चांगला नागरिक बनवा, तुमच्यासारख्या आई-वडीलांचा सहवास त्यांना जास्तीतजास्त
काळपर्यन्त मिळो" - असा भरभरुन आशिर्वाद ते माझ्या आईबाबांना देत असत.
याठिकाणी मला काही
वर्षांपूर्वीचे सोनू निगमच्या सुंदर आवाजातील 'कल हो ना हो' या चित्रपटातील गाणे आठवते.
"चाहें जो तुम्हें पुरे दिलसे, मिलता है वो मुश्किलसे,
ऐसा जो कोई कहीं हैं, बस् वही सबसे हँसीं है, उस हाथ को तुम थाम लो, वो मेहेरबान! कल
हो ना हो"..................
७) मनाने, विचाराने, ज्ञानाने माणूस श्रीमंत असला पाहिजे. गर्व
नको. गर्वाचे घर नेहमी खाली होत असते. "तुम्ही मुलांनी चांगले विद्यासंपन्न होऊन
तुमच्या आई-वडिलांचे नाव 'रोशन' करा" - असा आशिर्वाद ते आम्हा नातवांना देत.
माझ्याशी बोलतांना
कां ग़ ए? पासून ते सुरुवात करीत. गोकुळपेठेतल्या घरात त्यांच्या सर्व नातवांना एकत्र
पत्ते खेळतांना पाहून ते म्हणाले होते, "व्वा! व्वा! सर्व 'बाळगोपाळ' किती छान
दिसत आहेत." त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. 'सत्ती
लावणी'चा आमचा खेळ संपत आला, हे त्यांना कसे कळे कुणास ठाऊक! बरोब्बर खेळ संपला की
ते विचारत, 'कां गं ए?' कोण झालं बिग फुल??'
मी स्वतःच 'बिग फुल' झाली हे कळल्यावर ते लगेच काही म्हणत नसत; पण ब-याच वेळानंतर
ते खेळाची मला आठवण करुन देत म्हणायचे, 'गुल्लू! बनू नकोस तू ऊल्लू!' माझीच ऊकारात्मकता
मलाच भेट मिळाल्यासारखी वाटे. मला घरी 'गुल्लू' म्हणतात, यावरुनही ते मला विचारीत असत,
'का गं ए? तू बदामचा गुल्लू की इस्पिकचा गुल्लू?'
Actually 'गुल्लू' हे पंजाबी नाव आहे.
आजी-आजोबांच्या वास्तव्याने
त्यांचा 'वाडा' समृध्द झाला असे मला वाटते. अखंड चांगल्या विचारांची, संस्कारांची,
ज्ञानाची भरभरुन पखरण करणारी व्यक्ती 'गरीब' असूच शकत नाही. त्यांचा हा समृध्द ठेवा
आजही आपल्याजवळ आहे; त्यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांच्या रुपात! १) 'मज्जीवनमणिमाला'
- आत्मचरित्र, २) 'अमृत कलश' - काव्यसंग्रह, ३) 'अध्यक्ष महाराज' - निबंधमाला.
आजोबांच्या अशा या
काही हिरव्यागार आठवणी, त्यांच्या 'जन्मशताब्दी'
वर्षाच्या निमित्ताने मला जमतील तशा तोडक्या मोडक्या भाषेत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न
केला! इतके वर्ष होऊनही त्यांच्या आठवणी माझ्या मनांत श्रावणातल्या हिरवळीसारख्याच
ताज्यातवान्या आणि टवटवीत आहेत आणि त्या तशाच पुढेही राहतील.
आज 'पुत्रदा एकादशी'!
त्यांचा तिथीने वाढदिवस! त्यांच्या स्मृतींना नमन करुन त्यांच्याविषयीचा माझ्या मनात
असलेला आदर मला पुढील शब्दांत व्यक्त करावासा वाटतोः- "आजोबा आणि नातीचं वेगळंच
नातं माझ्या मनाच्या बँकेत तुमच्या आपुलकीच्या आठवणींचं खातं."
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१४/८/२०१६.