Monday, 12 February 2018

कल्पवृक्ष विद्वत्तेचा

It is not too late to seek a newer world. म्हणतातच ना!

एक छोटेसे वाटणारे निमित्त घडते आणि आयुष्याच्या अगदी वेगळ्या वाटेच्या रस्त्याने माणूस पाऊल उचलतो हे उचललेले पाऊल त्याला इतक्या यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते की- क्या बात हैं! म्हणावेसे वाटावे.

मी हे बाळशास्त्री हरदासांविषयी म्हणते आहे. गणिताच्या शिक्षकाने रागावल्याचे निमित्त काय घडले आणि ही व्यक्ती शाळा सोडून निघून आली आणि जीवनाच्या शाळेचे साहित्याचार्य आणि महामहोपाध्याय असे उच्च दर्जाचे सिंहासन मिळविती झाली.

बाळशास्त्री हरदास हे नाव फक्त नागपूरातच गाजले नाही तर 'वसंत व्याख्यानमाला' जी पुण्याला व्हायची त्यात व्याख्यानांसाठी गाजलेली नागपूरातील ही एकमेव व्यक्ती होती.

माझ्या सख्ख्या मावशीचे यजमान असल्यामुळे त्यांच्याशी आमचा जवळून संबंध आला. शांता मुरलीधर सास्तीकर ही सौ. वीणा बाळशास्त्री हरदास झाली आणि बाळशास्त्रींच्या व्यक्तित्वामुळे इतकी भारावली गेली की त्यांच्या जीवनकार्यात मुरून गेली.

साह्चर्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपली अमीट छाप सोडण्यात बाळशास्त्रींचा हातखंडा होता. बाळशास्त्री अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते या म्हणण्याने त्यांची आपण खूप तारीफ केली असे कोणी म्हणू नये. कारण या हिऱ्याला अनेकानेक पैलू होते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. गोळवलकर गुरुजी आणि ते यांचे परस्परांकडे नित्य जाणे येणे असे. त्यामुळे संघाचे सर्वच लहान मोठे स्वयंसेवक नित्य त्यांच्याकडे येत असत. तरुण भारत महाराष्ट्र या पेपर्स मधून त्यांचे लिखाण नित्य येत असे अनेकांच्या पुस्तकांचे ते परीक्षण करीत असत. . त्र्यं. माडखोलकर, वा. रा. ढवळे हे संपादकही नित्यच त्यांच्या बैठकीत असत.  

बाळशास्त्रीचें हे जन्मशताब्दी वर्ष आहे.

माझा त्यांच्याशी जवळून संबंध आल्यामुळे त्यांच्यावर थोडेफार लिहिण्याचे धाडस मी करत आहे. दक्षिणामूर्ती मंदिरात चातुर्मास्यात कीर्तन करणे हा त्यांच्या आवडीचा भाग होता. शिव-पार्वतीच्या मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य होते. शिवपिंड तर होतीच आणि देऊळच असल्यामुळे सगळे सणवार; उत्सव; समारंभ; यज्ञयाग मोठ्या थाटामाटात पार पडत असत. उणे पुरे पन्नास वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले पण ते जे निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करून गेले आहेत ते पाहता विस्मयचकित व्हायला होते.

संस्कृतचे प्रकांड पंडित तर होतेच पण मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. जितके त्यांचे लिखाण प्रभावी तितकेच वक्तृत्व अत्त्यंत स्फुर्तीदायी होते. त्यांच्या जिभेवर सरस्वती अवतीर्ण झाली की काय असे वाटायचे.

त्यांची 'कीर्तने' हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. 'गीतभारत' हे जे पुस्तक आहे जे मावशीने नंतर प्रसिद्ध केले त्यावरून कीर्तनातील पदांची रचना ते स्वतःच करीत असत पण विविधांगी काव्यप्रतिभेची जाणीव ते करून देतात. कीर्तनात निरूपण आणि कथा असे जे दोन भाग असतात त्यात निरूपणासाठी आधाराला जे 'पद' घेतले जाते त्याच पदाच्या अनुषंगाने कथा करावयाची असते; म्हणून 'हरदासाची कथा मूळ पदावर' म्हंटले जाते. त्यांची कीर्तने मी ज्या वयात ऐकली; मी असेन त्यावेळी तेरा-चौदा वर्षाची; मला ती फार आवडत असत. इतकी आकलनशक्ती जरी माझी नव्हती तरी निश्चितच आकलनशक्तीला भरघोस 'पाया' देण्याचे कार्य त्यांच्या कीर्तनांनी केले आहे असे मी निश्चितच म्हणेन! दक्षिणामूर्ती मंदिराचा सारा परिसर श्रोत्यांनी भरून जात असे. त्यांचा आवाज खडा होता. पण सर्वांना दूरपर्यंत ऐकू जावे म्हणून 'माईक' लावला जायचा. पेटी तबला वादक असत. धोतर; उपरणे शर्ट असा कीर्तनकाराचा पेहराव असे.

हाती टाळ असत. नामस्मरणाच्या वेळी दोन्ही हात वर करून टाळ वाजविण्याची त्यांची पद्धत असे. कीर्तनाची शैली अत्यंत रसाळ असायची. येणारे श्रोते तल्लीन होत. काहीजण 'नोट्स' काढत असत. माझ्यामते त्या काळच्या श्रोत्यांवर संस्कार करण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले आहे. कान अगदी आकंठ तृप्त होत असत.

मंडळी; एका गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते. त्यावेळी जर व्याख्यानांच्या cassettes काढून ठेवता आल्या असत्या तर आजच्या पिढीला एक भाषाशैलीचा; विचारांचा आणि आपल्या संस्कृतीचा एक खजिना उपलब्ध झाला असता. पण हरकत नाही. त्यांचे 'गीतभारत' उपलब्ध आहे. उत्सुक वाचकांनी ते अवश्य वाचावे दुधाची तहान ताकावर भागवावी.

संघाचे प्रवर्तक 'मुंजे' यांचे चरित्र त्यांनी लिहिले पण ते अपूर्ण राहिले. ते काम मावशीने पूर्ण केले. 'भागवत कथा' मावशीने पुस्तक रूपाने आपल्याला भेट दिल्या आहेत. 'कथा भागवत' अवश्य वाचा.

) वेदातील राष्ट्र-दर्शन

) भगवान श्री कृष्ण

) १८५७ ते सुभाष

) पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी

) महारथी कर्ण

अशा अनेकानेक विषयांवरची ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण करून मराठी सारस्वतात अत्यंत मोलाची भर घातली आहे.

स्वातंत्रवीर सावरकर; पंडित सातवळेकर अशी त्या काळातील महनीय व्यक्तिमत्वे आम्हाला दक्षिणामूर्ती मंदिरात प्रत्यक्षात बघायला मिळायची. त्यांच्याकडे अखंड येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असावयाचा.

चातुर्मास्यात मंदिरात जेवणावळी घडायच्या. पक्वान्नांना वाण नसायची. मंदिरात रात्र कधी जाणवायचीच नाही. मावशीचे हस्ताक्षर चांगले असल्यामुळे पुस्तकांचे लेखन मावशीच्या अक्षरात असावयाचे. तीन-चार तास मोठ्या मुष्कीलीने झोप ते घेत असत. चातुर्मास्य वगळता त्यांचे अखंड दौरे चालू असावयाचे. लिखाण; वाचन; प्रवचन; व्याख्यान यात त्यांना वेळ अपुरा पडावयाचा. 

काव्यशक्तीचे वरदान असल्यामुळे संस्कृतातही त्यांनी आरत्या लिहिल्या आहेत.

सतत कामाचे व्याप अपुरी झोप याचा तब्येतीवर परिणाम व्हायचा. त्यांच्या पाठीत पाणी झाले होते. डॉक्टर परांजपे यांच्याकडे ऑपरेशन झाले. ते डॉक्टर त्यांच्या सहनशक्तीचे खूप कौतुक करायचे. मावशीने बाळशास्त्रीचें चरित्र लिहिले आहे. मंडळी - अवश्य वाचा! एक पतिव्रता स्त्री नवऱ्यासाठी काय काय करू शकते हेही त्यातून कळते. आमची मावशी सहधर्मचारिणी होती. तिने त्यांना ते असतांना तर साथ दिलीच पण त्यानंतरही त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्यात तिने तिचे पुढील आयुष्य व्यतीत केले.

माझे वडील सदाशिवराव मोरेश्वर मोहरीर यांचा जन्म १९१५ सालातील तर बाळशास्त्रींचा १९१८ मधील. साडभावांमध्ये तीन वर्षांचे अंतर होते. दोघेही साडभाऊ व्युत्पन्न आणि स्वतःच्या क्षेत्रामध्ये नाणावलेले होते. नुकतीच तीन वर्षांपूर्वी बाबांची जन्मशताब्दी आम्ही सर्व बहीण भावंडांनी - विशेषतः अरुणने धूमधडाक्यात साजरी केली. १९१५ - १९१८ हा जो काळ आहे त्याच्याकडे आपण थोडे अभ्यासपूर्ण रीतीने पहिले तर आगचा-मागचा काळ जागतिक सर्वच क्षेत्रांमध्ये अत्यंत घडामोडींचा काळ आहे. एका राष्ट्रापुरते पाहून चालणार नाही याची जाणीव करून देणारा हा काळ. जागतिक महायुध्दाने सर्वच जगावर विस्मयकारक परिणाम झाल्याचा हा काळ!

आपल्या देशावर इंग्रजांचे साम्राज्य; त्याआधीही भारत अखंड परकीय आक्रमणांना सत्तेला तोंड देतच होता. अखंड परस्वाधीनता हे जणू आपले वैशिष्ट्यच! त्या द्वारे होणार जुलूम - जबरदस्ती हुकूमशाही यांचा पगडा जसा समाजमनावर होता तसेच त्या राज्यांमुळे ज्या सुधारणा भारतात आल्या त्याचाही पगडा होता. जीवनाची सर्वच क्षेत्रे ढवळून निघत होती. साहित्य; संस्कृती; परंपरा; जीवनमूल्ये; विचारधारा; लोकजीवन; अगदी तळागाळातील माणसाचे माणूसपणही कुठेतरी तडकले जात होते. आमूलाग्र बदलाची लक्षणे हे ह्या काळाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पण स्वाभिमानी व्यक्ती आपले साहित्य; संस्कार; परंपरा; संस्कृती एकूणच जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्नशील होते. त्यात माझे बाबा बाळशास्त्री यांचे नाव मी अवश्यच घेणार!

खूप मोठमोठी व्यक्तिमत्वे समाजाला या काळाने बहाल केलेली आहेत. न्यायमूर्ती रानडे, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर नावे खूप आहेत. पूर्ण पट च्या पट विलक्षण व्यक्तिमत्वांनी व्यापून टाकला आहे.

साहित्याला उधाण याच काळात खूप प्रकर्षाने आलेले जाणवते. काळाने घडविलेली ही व्यक्तित्वे आपल्या पूर्ण परिपोषासाहित पेटून उठली काळावर अमिट छाप सोडून गेली.

बाळशास्त्रींची साहित्यसंपदा बघा! अगदी ठामपणे त्यांनी भारताच्या संस्कृतीचा पुरस्कार केलेला आहे. अभ्यास बघा - अगदी वेद, पुराणे, भागवतापासून तो १८५७ चे समर ते सुभाष, शिवाजी महाराज या सर्वांपासुनच एक प्रेरणादायी आलेख त्यांनी आपल्यासमोर उभा केला आहे. संघाचा एकही व्यक्ती असा नसेल जो त्यांच्याशी परिचित नाही. अनुषंगाने इतर पक्षांचे लोकही त्यांना पुरेपूर ओळखणारे होते.

मंडळी, त्यांचे साहित्य जो मनःपूर्वक अभ्यासेल तो खचितच 'विद्वान' या पदवीला पोहोचणार! साहित्याचार्य, महामहोपाध्याय या पदव्या सामान्य नव्हेत. त्यासाठी जी पराकाष्ठेची परिश्रमशीलता लागते ती बाळशास्त्रींमध्ये ठासून भरलेली होती. ध्येयप्रेरित माणसाचे सर्वगुण त्यांच्यामध्ये होते.

ते माणूसप्रिय होते. गडगडाटी हसणे हे त्यांचे खास वैशिट्य होते. एकटे कधीच जेवले नाहीत. पंगतीला आठ-दहा मंडळी असतच. चहा प्रिय होता. गोळा-भात त्यावर फोडणीचे जवसाचे तेल त्यांचे संध्याकाळचे आवडते जेवण होते. मंदिराचा व्याप मोठा होता. सगळे तडीला नेण्याची जवाबदारी होती. हाताखालचे लोक शब्द झेलायला तयार असत. बाबुराव चिमोटे, बाबुराव जोशी हे त्यांचे खास मित्र होते. बैठक कधीच सुनी नसे. अनंत आठवणी दाटून येत आहेत. सर्व दृश्ये डोळ्यांसमोरून प्रत्यक्ष दिसत आहेत. डोळे भरून येत आहेत. कारण आमची मावशी काका (बाळशास्त्री) यांच्यावर आमचे नितांत प्रेम होते. आज त्या वास्तू राहिलेल्याही नाहीत. सर्वच काळाच्या उदरात गडप झाले आहे. पण मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या आठवणी स्मृतिचित्रे कोण नाहीशी करणार! जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत त्याला मरण नाही. हे डोळ्यांचे वैशिट्य आहे. म्हणून मंडळी, डोळ्यांनी खूप-खूप बघा, खूप वाचा, सगळे साठवून ठेवा इतरांनाही त्या आठवणींचा मनमुराद अनुभव द्या! बघा, किती प्रसन्न वाटते ते! खूप बोला, खूप लिहा. त्याद्वारे त्या त्या व्यक्ती तुम्हाला भेटणार आहेत. अमरत्वाचा हाच संदेश एक अखंड कार्य करणारा माणूस देत असतो. कलाकार नेहमीच अमर होतो. कलाकृतींचा आस्वाद घेणारे रसिक तर आपण होऊच शकतो. अनेक शब्दशिल्पे बाळशास्त्रींनीं निर्माण केली. 'विभूतिमत्व' हा त्यांचा आवडता शब्द होता. व्याख्यानांच्या, कीर्तनाच्या प्रभावळीत तो सहजच चमकून जायचा. संस्कृत पंडिताजवळ शब्दांची काय वाण! संस्कृत साहित्याचा व्यासंगी साऱ्या रसिकांवर राज्य करणारा ठरला तर नवल ते काय?  'चालते बोलते विद्यापीठ' अशी पदवी लोकनायक बापूजी अणेंनी त्यांना दिली होती. अस्खलित वाणी, शब्दांचा धबधब्यासारखा कोसळणारा ओघ, कुठेही धाप लागणे नाही, सुरु झाले की शेवट गाठल्याशिवाय कुठेच ठेचकाळणे नाही. सर्व वाणी जश्या हात जोडून समोर उभ्या आहेत असे वक्तृत्व हे सर्वच खरोखर अनुभवण्याजोगते होते. असा 'वक्ता दशसहस्त्रेषू' खरोखरच दुर्मिळ देणगी! 

अखंड प्रवासात बराच काळ व्यतीत होत असला तरी प्रवासात ते बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्य कथा वाचीत असत. अर्नाळकरांचा धनंजय आणि छोटू या अविस्मरणीय व्यक्तिरेखा वाचण्याचे भाग्य मला माझ्या आईला (प्रमिला सदाशिव मोहरीर माहेरची सुशीला मुरलीधर सास्तीकर) बाळशास्त्रींमुळेच लाभले. आज ही पुस्तके मिळत नाहीत. रहस्यकथांचे आकर्षण असणारा व्यक्ती जीवन जास्त चांगले समजू शकतो असे माझे मत आहे. 

त्यांच्या घरी पुस्तकांची काय वाण? कपाटेच्या कपाटे पुस्तकांनी भरलेली असायची. त्याचाही लाभ आम्ही घेतला.

बाबुराव हरदास हे त्यांचे मोठे भाऊ होते. त्यांना दोन मुले तीन मुली. नाना हरदास सदाशिवराव भाऊ, इंदू, विमल मालू या मुली, यांच्याशीही त्यांचे खूप चांगले संबंध होते. त्यांच्या मरणोत्तर मात्र सगळी वाताहत झाली. बाबुराव हरदास ज्यांना आम्ही सर्व भाऊजी म्हणत असू ते 'अग्निहोत्री' होते. 'होमशाळा' मंदिरात होती. भाऊजींच्या निधनानंतर या होमशाळेचे रूपांतर बाळशास्त्रींच्या बैठकीच्या खोलीत झाले. जुनी वास्तू, काहीनाकाही बदल नेहमी करावेच लागत. मंदिरात शिरताक्षणीच मोठे वडाचे झाड होते. वडसावित्रीला बायका नटून सजून पूजेला येत. मंदिरात नेहमीच उत्साही वातावरणाचा माहोल असे.

श्रावण सोमवारी 'महादेवाला' शेज असे. दर्शनासाठी अपरंपार गर्दी व्हायची. येणारी प्रत्येक स्त्री मावशीला भेटल्याशिवाय जायची नाही. मावशी प्रत्येक सवाष्णीची ओटी भरावयाची. बाळशास्त्री मावशी यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. त्याकाळात बायकोला नावाने हाक मारणारा नवरा एक आश्चर्यच होते. तुळशीचे लग्न त्यांनी एकदा खऱ्या लग्नाप्रमाणे साजरे केले होते.

तुझे लग्न मी लावून देणार असे त्यावेळी ते मला म्हणाले होते. पण विधिलिखित वेगळे होते. मोठमोठे फुलांचे हार याची तर देवळात वाणच नसे. एकदा त्यांनी एक मोठा हार मला दिला म्हणाले तुझ्या वेणीला घाल. माझे केस लांब होते. त्यांनी दुसराही हार दिला. मी दोन वेण्यावाली होते. ते हार मी लावले. हारांपेक्षा केस लांब ठरले. ते कौतुकाने पाहत होते.

त्यांनी एकदा आम्हाला स्वतः आमरस वाढला होता. माझे नाव गीता आहे, हे एका बक्षीस समारंभाचे अध्यक्ष असताना त्यांना कळले. ते तिथेच त्यांनी बोलूनही दाखविले.

डॉ. शं. दा. पेंडसे एकदा मंदिरात कीर्तनासाठी आले. मी त्यावेळी एम. . मराठी करत होते. पेंडसे माझे गुरुवर्य होते. पेंडश्यांनी माझी तारीफ बाळशास्त्रींजवळ केली. काका म्हणाले मला माहित आहे ती विदुषी आहे. मी एम. . करत आहे असे कळल्यानंतर ते मला म्हणाले होते डिग्री मिळणार तुला! माझ्याजवळ कोणतीच डिग्री नाही. त्यांच्या ज्ञानासमोर त्या पुस्तकी डिग्रीचे काय भुस्कुट! डिग्रीमुळे माणूस मोठा होत नाही याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. अशा काही जपून ठेवलेल्या आठवणी माझ्याजवळ आहेत. . त्र्यं. माडखोलकर काका एकदा बाबांकडे जेवायला होते. मोठ्या लोकांचे घरी येणे हा एक आनंदाचा उत्सव असतो. आईने छानसा स्वयंपाक बनविला होता. पुडाची वडी त्यांना फार आवडत असे. पक्वान्नांचा खास थाट होता. रांगोळ्या, उदबत्त्यांचा घमघमाटाने वातावरण पवित्र, सुगंधी झाले होते. त्यांनी सर्वच गोष्टींचे खूप कौतुक केले. अगदी रसिक माणूस होता!

दसऱ्याला सोने द्यायला ते आमच्या घरी यायचे. आमच्या आईला ते 'ताई' म्हणायचे. त्यांना आईविषयी खूप आदर होता. मावशीला ते दर दसऱ्याला ओवाळणीच्या तबकात सोन्याचे नाणे टाकावयाचे. अण्णाजी, मोठी आई (मुरलीधर सास्तीकर सत्यभामाबाई सास्तीकर) आमचे आजी आजोबा, चातुर्मास्यात वणीवरून मंदिरात व्रतवैकल्यांचा लाभ घेण्यासाठी येत असत. ही सगळीच व्यक्तिमत्वे आज जेव्हा विचार करतो तेव्हा खूपच उंच वाटायला लागतात. त्या त्या काळाचे आकलन किती तोकडे होते, याची जाणीव व्हायला लागते. या लोकांचा जीवनपट जगायला किती कठीण होता! पण निष्ठेचे पाणी त्यांना संकटांना सामोरे जायला बळ देत असे.

प्रसिद्ध कथालेखिका आशा बगे यांनी त्यांच्या लिखाणात उल्लेख केला आहे; बाळशास्त्रींच्या कीर्तनांचा त्यांच्यावर प्रभाव पडल्याचा! असे अनेकानेक आहेत.

१९६८ साल, मला ब्रह्मपुरीला लेक्चररशिप मिळाली होती. जाण्याआधी मी मावशीकडे भेटीला गेली. काकांची तब्येत ठीक नव्हती. डोळे खोल गेले होते. डोळ्यातील तेज गेल्याचे मला एकदम जाणवले. मी खिन्न मनाने वापस आली. ऑगस्ट १९६८ ला मी ब्रह्मपुरीच्या कॉलेजमध्ये जॉईन झाली. पुढे चारच दिवसात बाळशास्त्री गेल्याची बातमी कळली. मी कशीबशी सुट्टी घेऊन नागपूरला आली पण मला पुन्हा काका दिसले नाहीत. कितीही वर्षे उलटली तरी जी व्यक्ती विसरली जात नाही याचे कारण अगदीच उघड आहे. त्या व्यक्तीचे गुण आपल्याला आवडलेले असतात.

रावणभात, वांग्याचे लोणचे, उडदाची चटणी, घीवर हे पदार्थ मावशीकडे नेहमीच होत असत. त्याची चव न्यारीच असे. काकांमुळे आम्हाला अनेक गोष्टी जशा वारश्यात मिळाल्या त्यापैकीच खायची आवड हीही मिळाली. अहो! काय पदार्थ असावयाचे! नारळांची रास असायची मंदिरात. मग आई खोबऱ्याच्या वड्या बनवून द्यायची. काय तो गोपालकाला व्हायचा!

बाळशास्त्रींचा दौरा म्हणजे, मावशीच्या सोबतीला जाणे असे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे एकेक इतिहासच असतो. सांगत बसले तर चऱ्हाट लांबतच जाणार आहे. मावशींकडून आम्ही लवकर घरी येत नसू. मग आई म्हणायची, काय चिकटपट्टी आहे की काय तिथे?  

सगळ्या मोठ्या लोकांना आयुष्य लहान असते की काय कोण जाणे? पन्नास वर्ष्यांच्या आयुष्यात एवढे यश मिळविले, हे लोक जास्त जगले असते तर, देवा, तुला यांच्याकडून किती कार्य करवून घेता आले असते, हे तुला कसे समजत नाही रे! सोनोपंत दांडेकर, कामकोटी पिठाचे शंकराचार्य, राम शेवाळकर वगैरे गाजलेल्या व्यक्ती बाळशास्त्रींच्या बैठकीत असत. विदर्भ साहित्य संघाचे बाळशास्त्री नेहमीचे व्याख्याते होते. सर्व साहित्यिक घडामोडींशी त्यांचा जवळून संबंध होता. इतिहास आणि राजकारण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. भोसलावेदशाळा, गीतामंदिर, राममंदिर, नागपुरातील सर्व प्रतिष्ठित साहित्यिक, राजकीय, सामाजिक संस्थांचे ते पदाधिकारी असावयाचे. एकूण नागपुरातील जनजीवनाचा त्यांचा अभ्यास होता आणि त्या त्या संस्थातील कार्यक्रमातील उपस्थिती हाही त्यांच्या कार्याचा भाग होता.

मतदान त्यांनी कधीच केले नाही. अशावेळी ते तटस्थ असावयाचे! स्वातंत्र चळवळीत त्यांना तुरुंग वासही झाला होता.

मूळचे त्यांचे घराणे तेलंगणातील होते. लहानपणी 'देवी' आल्यामुळे देवीचे व्रण त्यांच्या चेहऱ्यावर कायम राहिले होते. गोरे, धष्टपुष्ट शरीर, उंच शरीरयष्टी, चालणे वेगाचे होते.

संस्कृतचे पी. एच. डी. चे विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनासाठी येत असत.

कोणताही यज्ञ म्हटला की त्याची तयारी मामुली नसते. सगळं ब्राह्मणवर्ग-यज्ञयाग करणारा एकत्रित आल्यानंतर त्यांचे ते सर्व मंत्र मोठमोठ्याने म्हणण्याचे कसब पाहून त्या सर्वांच्या पाठांतराची कमाल वाटते. ही दृश्ये आम्हाला दक्षिणामूर्ती मंदिरातच बघावयास मिळाली. तो त्या सर्व कार्याचा आवाका पेलण्याची सहनशक्ती भाऊजी बाळशास्त्रींमध्ये होती. जेवणावळी झडत. कितीतरी लोक जेऊन जात. मावशीला सर्व व्यवस्था करावयाची असे. काम करणारे लोक खूप असले तरी सर्व कार्य सुरळीत पार पाडण्यासाठीची क्षमता मावशीमध्ये होती. आज ही दृश्ये दुर्मिळ आहेत. काळ खूप बदलला आहे.

तेंव्हाचा आजचा काळ पाहून असल्यामुळे त्यावेळच्या लोकांचे कर्तृत्व निश्चितच वाखाणण्याजोगते होते असे म्हणावेसे वाटते. दोन काळांची तुलना करायची तर गुण आधीच्या काळाला जास्त मिळतील!

नास्तिकतेचे 'पांघरूण' पांघरून, ' कर्त्याचा वार शनिवार' असे झाले आहे. 'शब्द बापुडे केवळ वारा' म्हणून अंतःकरणाच्या उमाळ्यातून बाहेर पडणारे शब्द - मंत्र शक्तीचे सामर्थ्य असणारे शब्द उच्चारणारा दुर्मिळ झाला आहे. सत्ययुगातील ब्रह्मा-नारद, त्रेतायुगातील राम, द्वापारयुगातील कृष्ण या सर्व आता अद्भुतरम्य कहाण्या बनल्या आहेत. अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी झाल्या आहेत. 'अविश्वसनीय' असा शिक्का त्यावर बसला आहे. अशावेळी एखादा बाळशास्त्री वेद, उपनिषदे, पुराणे, भागवत यांच्याबरोबरच प्रेरणादायी स्फुल्लिंगे गर्जून सांगणारा हवाच आहे.

आज काका असते तर? शंभर वर्षे आयुष्याची पूर्ण झालेली बघायची इच्छा पंडित सातवळेकरांचीही होती, पण नाहीना फलित झाली? जे आपल्या हातचेच नाही, त्याला करणार तरी काय?

नवयुग विद्यालय येथे बाळशास्त्रींच्या नावाने हॉल बांधण्यात आला. आता पुन्हा त्या शाळेचे पुनरुज्जीवन होत आहे असे ऐकिवात आहे. दरवर्षी 'बाळशास्त्रीचें स्मरण' केले जावे म्हणून निधीही मावशीने ठेवला आहे. त्यानुसार होत असते म्हणतात.

जन्मशताब्दीच्या निमित्ताने गौरवग्रंथ काढला जातो किंवा समाजोपयोगी कोणते कार्य स्थापित केले जाते. आपण निदान आदरपूर्वक स्मरण करून श्रद्धांजली तर अर्पण करूच शकतो!

माझ्या आईची इच्छा होती मी बाळशास्त्रींवर लिहावे म्हणून. तिची इच्छा मी पूर्ण करत आहे. खरे तर त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यासक बनून त्यावर विश्लेषक भाष्य करणारा अजून जन्मावयाचा आहे. त्यांच्या जिवंतपणीच सगळी स्तुतीसुमने त्यांनी झेललेली आहेत. प्रसिद्धी वारेमाप त्यांना उघड्या डोळ्यांनीच बघायला मिळालेली आहे कारण अलौकिक वाटावे असेच त्यांचे सर्व कार्य होते.

त्यांची पुस्तके हीच त्यांची अपत्ये आहेत. दैवदुर्विलास हा की त्यांना अपत्य नव्हते. इतक्या श्रेष्ठ दर्जाची ऊर्जा देणारा मेंदू जर जन्माला आला असता तर! पण सर्व जरतरच्याच गोष्टी घडविण्यात विश्वनियंत्याचा हातखंडाच आहे ना?

असो. असो. असो.

पुण्याच्या 'दाते' प्रकाशनाने त्यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. याच मामा दात्यांकडे वसंत व्याख्यानमालेच्या वेळी बाळशास्त्री मावशी महिनाभर दरवर्षी राहत असत. पुणेकरांना हा महिना बाळशास्त्रीचें आदरातिथ्य करण्यासाठी मिळत असे. याच मामा दात्यांनी बाळशास्त्री नंतर मावशीला लेखनाला प्रवृत्त केले. मावशी एकदम बाळशास्त्रींच्या मरणाच्या धक्क्याने झटकून गेली होती. ते आहेतच, दौऱ्यावर गेले आहेत असे तिला वाटत असे पण अनेकांनी तिला सावरले मराठी सारस्वताला अजून एक मानदंड मिळाला. मावशीला तिच्या लिखाणाबद्दल पुरस्कारही मिळाले. हा सर्व इतिहास खूप मोठा आहे. बाळशास्त्री-मावशीचे साहित्य आज आपल्याजवळ आहे या दिलाश्याने मनाचे समाधान करून घ्यावयाचे आहे.

नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना भरती करण्यात आले होते. रात्री तेथील टॉयलेट मध्ये ते पडले. दार आतून बंद होते. बाबुराव चिमोटे यांनी वरून हात घालून बोल्ट उघडला. त्यांना रक्ताची गरज होती. पण म्हणतात, मेडिकल कॉलेजमध्ये रक्त त्यावेळी उपलब्ध नव्हते. सगळी धावपळ उडाली. बाळशास्त्री अखेर दिवंगत झाले. त्यांच्या हातातील हिऱ्याची अंगठी कुणीतरी काढून घेतली म्हणतात. सगळ्या नागपुरात शोककळा पसरली. आई त्याच दिवशी सकाळी ब्रह्मपुरीहून नागपूरसाठी निघाली. ती नागपूरला पोहोचताच तिला सगळीकडे सुनसान पाहून नवल वाटले. घरी वाड्यात पोहोचली तर बाबांनी ही बातमी आईला अंगणातच सांगितली. हातातील सामान तसेच टाकून ती दक्षिणामूर्ती मंदिराकडे धावली. मला ब्रह्मपुरीला स्टाफ रूममध्ये बातमी कळली. रेडिओवर शोक वार्ता होती. प्रेतयात्रेला सारे नागपूर लोटले. ट्रक मधून शव नेण्यात आले. मावशीही बरोबर होती. मीही नागपूरला पोहोचली. पण मला काहीही बघायला मिळाले नाही. नंतर मी मंदिरात गेली असतांना आम्ही खूप रडलो. मावशी तर, मी आता जगतच नाही म्हणत होती पण मोठी आई त्याही अवस्थेत म्हणाली होती - 'असे कुणी मरत नसते'. मला त्याही परिस्थितीत मोठी आईच्या खंबीर पणाचे नवल वाटले होते. मावशीला माझ्या नागपूरला येण्याचे त्याही स्थितीत नवल वाटले.

कुटुंबातील एका व्यक्तीच्या जाण्याने सारे कसे विस्कळीत होऊन जाते याचा विदीर्ण प्रत्यय मृत्यू देत असतो. 'मृत्यूची अटळ शाश्वती' ज्याने हरघडी ध्यानात ठेवली आहे, तीच व्यक्ती कशातच गुंतत नाही. जीवन आणि मृत्यू यातील काळ कसा जगावयाचा हे प्रत्येकाने ठरवावयाचे असते. हा काळ जो सार्थकी लावतो तोच अमर होतो.

त्यांची पुस्तके ठिकठिकाणच्या लायब्रऱ्यांमधून उपलब्ध आहेत. ब्रह्मपुरी तुमसर येथील माझ्या नोकरीच्या काळात तेथील महाविद्यालय, शाळा यांना मीच ती पुरविली आहेत. व्याख्याने, कीर्तने आणि पुस्तकांच्या भरवश्यावर संसार पेलणारा व्यक्ती साधारणतः दुर्मिळच!

मावशीला त्यांच्या निधनानंतर काही काळ खूप कठीण गेला पण काहीनाकाही पर्याय निघत गेले. मोठी आई- अण्णाजींची जबरदस्त साथ असल्यामुळे मावशी सावरली. हे सगळे जसेच्या तसे आजही आठवत आहे.
'स्मृती' हे ईश्वराचे फार मोठे वरदान आहे हेच खरे!


--२०१८ ( फेब्रुवारी २०१८)
संगीता मुकुंदराव पाटखेडकर
पूर्वाश्रमीची - गीता सदाशिवराव मोहरीर.

 

 

No comments:

Post a Comment