Thursday, 31 March 2016

जीवन आणि कला

  जीवन अपरिमेय (अपरिमित) व्यापक, संकीर्ण आहे. थांगपत्ता लावणे कठीण आहे. शोध घेता घेता जन्मानुजन्म अपुरे पडावेत आणि शेवटी काहीच हाती लागले नाही अशी संदिग्धावस्था होऊन जावी इतके ते निःसंदिग्ध आहे; म्हणजे जीवनाची व्याख्या व्याख्येत बसू शकत नाही, जीवनाचे आकलन, आकलनापलीकडचे आहे. जीवनाची ओळख अनोळखी होऊन जावी इतके ते तुम्हाला स्वतःत गुंतवून ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा करायला शिकविणारे आहे.
    कितीही अजाणपणे किंवा मानभावीपणाने धुत्कारले तरी जीवनार्थाचे मंथनच कलाकृतीमधून होताना दिसते.
     "Eveyone is alone
   on the heart of the Earth
    pierced by a ray of sun
    and sudden by its evening."
    या तीनच ओळींमध्ये एक इटालियन कवी जीवनाच्या गाभ्यातील प्रकाश-काळोखाची झुंज मुद्रित करतो.
   "शिशिर ऋतुच्या पुनरागमे l एकेक पान गळावया l का लागता मज येतसे, कळे उगाच रडावया l पानात जी निजली इथे l इथली सुकोमल पाखरे l जातील सांग आता कुठे? निष्पर्ण झाडित कापरे" l
  वाङ्मयीन कलाकृतीचे अत्यंत आटोपशीर रुप या भावकवितांतून दिसून येते. मोठा जीवनानुभव अत्यंत मोजक्या शब्दात व्यक्त करण्याचे सामर्थ्य किती सहृदय रीतीने जीवन अभ्यास केला आहे हे दाखवून जातात असे समर्थ कवी!
    कलाकृती आणि मनुष्यजीवन यांना एकमेकांच्या संदर्भात जोखून पाहिल्याशिवाय एकमेकांना अर्थवत्ता येत नाही. अन्वयार्थ, तात्पर्यार्थ, व्यंग्यार्थ, आणि अभिप्रायार्थ यांच्यापलीकडे या सगळ्यांना सामावून घेऊन एक चेतनार्थ, Sense of Consciousness जागा करण्याचे सामर्थ्य रसिकांच्या ठिकाणी निर्माण करणे हे कलाकृतीचे थोरपण असते. अस्तित्वातील चैतन्य प्रत्ययाने समीक्षक - वाचकाला आनंद प्रत्यय देण्याचे सामर्थ्य खरी कलाकृती साधते. ग्रेस यांच्या कविता, दिलीप चित्रे यांच्या कथा, भालचंद्र नेमाडे यांची 'कोसला', पु.शि.रेगे यांची 'सावित्री', खानोलकरांचे 'एक शून्य बाजीराव', यासारख्या साहित्यकृती, जी..कुळकर्णी कमल देसाई यांच्या दीर्घ कथा, हे सर्व साहित्य या चेतनार्थाची संपादणी करतात. कालिदासाचा 'मेघ', उमर खय्यामची 'इरा', गोविंदाग्रजांची 'मुरली', बालकवींचे 'पाखरु', मर्ढेकरांचे पसायदान (भंगु दे काठिन्य माझे) यासारख्या कृती सरलार्थ देता देता चेतनार्थाच्या गाभ्यात आपल्याला नेऊन सोडतात; आणि मगच (त्यांची आकृती कोणतीही असो) त्या आकारसंपन्न असल्याचे आपल्याला जाणवते.
   'एक भव्य मृगावर्त - जग याचे रुढ नाव
   पळते मृग, क्षुब्ध वेड, झपाटणारी धुंद धाव'
 - कृ. . निकुंब.
       हे धुंदत्व सर्वसामान्य माणसांनाच नव्हे तर मोठमोठया बृहस्पतींना आणि पुरुषोत्तमांना भुरळ घालत असते. या क्षुब्ध वेडाच्या आहारी जाणारा ज्ञानदेवांसारखा सतरा कलांचा चंद्र एखादाच!
     "ये पाडसा l ये पाडसा l
स्मृति कालच्या, कृति आजच्या l
पूर्वाह्निके, अपराह्निके l स्वप्ने उद्याची राहू दे l क्षण आतला बघ आरसा l ये पाडसा l     ये पाडसा" l  - कृ. . निकुंब. यांचे 'मृगावर्त' हे खंडकाव्य - जीवनात माणूस आसक्तीत किती डुंबून गेला असतो; पण जीवनानुभव त्याला शेवटी विरक्तीकडे कसा खेचतो याचे वर्णन करणारे आहे.
    अनेक अनुभव, अनंत कलाकृती, अनंत आशा, अनंत अभिव्यक्ती यांना अंतच नाही; त्यामुळे जीवन कला यांनाही अनंतत्वच लाभणार! किती छान! अमर जीवन, अमर कलाकृती, अमर शब्द अमर प्रतिकृति. सर्वच अनंत आणि अमर! किती आनंददायी अनुभव!
जीवनाला कलाकृतींना सामोरे जा! आनंदाला उधाणच उधाण!

           संगीता पाटखेडकर.

           ३०//२०१६.

बीज अंकुरे - अंकुरे

     शेख चिल्लीची गोष्ट प्रसिध्द आहे. तुपाचे भांडे डोक्यावर घेऊन व्यवस्थित ठिकाणी पोचविले तर एक श्रीमंत माणूस त्याला खूप पैसे देणार होता. शेख चिल्ली अगदीच गरीब! त्याला आपण हे काम करु येणाऱ्या पैशात काय-काय करु शकू याचा विचार तो करु लागला. बकरी विकत घेऊ, दुधाचा धंदा करु, नंतर होणाऱ्या नफ्यात गाय घेऊ, येणाऱ्या नफ्यात पुष्कळ गायी घेऊ, डेअरीचा धंदा करता-करता वेळ अपुरा पडेल, खूप पैसा मिळवू, घर घेऊ, लग्न करु, मुले होतील, घरी आरामशीर राहू, मुलगा जेवायला बोलवायला येईल आणि मी त्याची गंमत करीन, त्याला नाही म्हणेन! असे म्हणून शेख चिल्लीने डोके हलविले तुपाचे भांडे खाली पडले. सगळी स्वप्ने धुळीला मिळाली! स्वप्नांचे इमले रचता रचता वर्तमानाचा विसर पडला. मर्ढेकरांचा 'गणपत वाणी' आठवतो. गणपत वाणी बिडी पिताना - चावायाचा नुसतीच काडी; कारण पैसे वाचवून 'माडी' बांधायची त्याची इच्छा!
     स्वप्नांच्या मनोराज्यात माणूस इतका गुंग होतो की परिस्थितीचे, वर्तमानाचे भान विसरतो जे मिळवायचे तेही मिळत नाही. आपल्याजवळ काय उपलब्ध आहे यावर आधी लक्ष केंद्रित करावयास हवे! हवेत तीर मारण्यात काय अर्थ? एकाग्रता जर असेल तर मध्येच ध्येय विस्कळीत होणार नाही. कोळी जाळे विणतो. तो किती एकाग्र असतो! त्याच्यापासून Concentration शिकायला हवे.
    गाणारा गायक किंवा खेळणारा खेळाडू  कितीही जमाव असला कितीही कल्लाहल्ला असला तरी त्याच्या गाण्यावरचे खेळावरचे लक्ष विचलीत होऊ देत नसेल तरच तो यशस्वी होणार!
Jack Dempsey हा अमेरिकन बॉक्सर! तो नेहमी म्हणायचा, "Nobody is going to stop me, nobody can really hurt me."  एका शर्यतीत त्याने त्याच्या विरोधकाला चार मिनिटांत लोळविले आणि $१००,००० मिळविले. जमावाचा आवाज त्याच्यावर काहीही परिणाम करत नाही असे त्याचे म्हणणे असायचे. द्रौपदी स्वयंवराचा पण किती कठीण होता; पण अर्जुनाने लक्ष्य केंद्रित करुन तो जिंकला.
   अभिमान, वासना, प्रसिद्धीची इच्छा, श्रीमंती, घाई या गोष्टी माणसाला मूळ ध्येयापासून विचलीत करणाऱ्या आहेत. माणूस शांत चित्ताने तेव्हाच विचार करु शकेल जेव्हा बाकीच्या या गोष्टींवर तो ताबा मिळवू शकेल!
   बुध्दीमत्ता, कार्यशैली, उत्तम आरोग्य उत्तम मन याद्वारे कार्यकुशलता वाढते. वर्तमानात जगणे, त्यासाठी परिश्रम करणे, निष्ठापूर्वक प्रत्येक अडथळा पार करण्याची हिंमत ठेवणे - या गोष्टी भविष्य  आपोआपच घडवितात. 'पेराल तेच उगवेल' तेव्हा 'पेर्ते व्हा' हे ब्रीदवाक्य महत्त्वाचे!
     इतिहास घडून गेलेला असतो. इतिहासातील व्यक्तींनी इतिहास सिध्द केलेला असतो; त्यातील प्रेरणादायी घटनांपासून निश्चितच खूप काही शिकायचे असते, पण त्यातच अडकून पडायचे नसते. आपल्याही हातून 'इतिहास' घडावा असे काहीतरी निष्ठेने करण्याला महत्त्व आहे.

    इतिहासाला पालांडत, वर्तमानाला ओलांडत जो भविष्यात शिरतो तोच माणूस चिरस्थायी होऊ शकतो. पायवा महत्त्वाचा, इमारत उभी होणेही महत्वाचे! 'कळस' लोकांचे लक्ष वेधून घेणारच! 'आधी कळस आणि मग पाया' असतो काय? पायवा आणि कळस यात जो वर्तमान आहे तो उजळून टाकण्याची हिम्मत प्रत्येकाने दाखविली तर एक सुखी समाज आपोआपच अंकुरेल; आणि या अंकुरण्याचा वटवृक्ष होईल! हा वटवृक्ष अनेकांना सावली देईल आणि दीर्घकाळ प्रेरणा देईल!

        संगीता पाटखेडकर.
         ३०//२०१६

Sunday, 27 March 2016

'निंदकाचे घर असावे शेजारी'



   Colgate - Palmolive - Peet Soap Company चा प्रेसिडेंट E. H. Little हा नेहमी स्वतःवरच्या व निर्मित मालावरच्या लोकांच्या प्रतिक्रियांसंबंधी उत्सुक असावयाचा. इतरांच्या प्रतिक्रिया जास्तीतजास्त चांगले काम करण्यासाठी त्याला प्रेरणा द्यायच्या. जगातील श्रीमंतांमध्ये त्याच्या या निष्ठेमुळे त्याची गणना व्हायला लागली. स्वतःचे स्वतःविषयीचे मत कधीच खरे नसते. तुम्ही काय आहा हे दुसराच जास्त चांगल्या पध्दतीने सांगू शकतो. मंबाजी आणि सालोमालोने तुकारामाला खूप त्रास दिला, पण त्यांच्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम खूपच प्रगत झाला. आयुष्यात ज्या अनावश्यक मूर्खपणाच्या गोष्टी घडल्या त्यांची समीक्षा प्रत्येकाने करायचे ठरविले तर व्यक्तित्वविकास होणार! परिपूर्ण कुणीच नसतो. परिपूर्णतेकडची वाटचाल खूप अवघड असते आणि त्यात अडथळ्यांची शर्यत असते. या अडथळ्यांना पार करताना लोकांनी केलेल्या समीक्षणाची हेटाळणी न करता जर बारकाईने त्यांचे म्हणणे ऐकून त्यावर विचार केला तर प्रगतीची वाट सुकर होते हे तेव्हाच लक्षात येते.
'Remember that no one ever kicks a dead dog.'
  लिंकनचा सेक्रेटरी 'स्टँटन', लिंकनला 'a damn fool' म्हणाला. लिंकन न चिडता त्याच्याकडे गेला, त्याचे म्हणणे समजून घेतले आणि आपण काढलेली order चुकीची आहे हे त्याला पटले, त्याने ती cancel केली. मोठा कोणताही निर्णय हा अनेकांच्या मतांचा विचार करुन घेतला गेल्यास योग्य असतो; पण कार्यपूर्तीसाठी कार्यकर्त्यांची जी साखळी असते ती खूप निष्ठावान व अचूक अंदाज वर्तवणारी असावी लागते. 'आग्र्याहून सुटकेचा' शिवाजीचा प्रयत्न ही किती धाडसी योजना होती. जीवन-मरणाची सीमारेषा खूपच अस्पष्ट, अंधुक व बेभरवशाची होती; पण जीवाला साथ देणारे लोक जे शिवाजीने जमविले होते ते प्राणाची बाजी लावणारे होते आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयात हिरीरीने शिवाजीला मदत करण्याच्या वृत्तीचे होते. इतके सगळे जमून येणे खूपच अटीतटीचे असते, पण शिवाजीला ते जमले कारण निष्ठा माणसाला खूप बळ देते. निष्ठेचा परिणाम अनेकांत संकरित होत असतो. निष्ठावंतांची मांदियाळी निर्माण होते आणि गड सर केला जातो. २५ मार्च २०१६ ला ३६७ वी 'तुकारामबीज' होती. इतक्या वर्षानंतर का बरे लोक इंद्रायणीतीरी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते? कारण त्यांची तुकारामाच्या व्यक्तित्वावरची, त्याच्या जीवनप्रेरणांनी त्यांना दिलेल्या चैतन्यपूर्ण अस्तित्वाविषयीची ती निष्ठा होती. व्यक्तित्वाची 'घडण' ही अशी अनेक अडथळ्यांना पार करणाऱ्या आधीच्या चैतन्यदायी व्यक्तिमत्चांनी घडविलेली असते. खूप उदाहरणे देता येतील.
    'i am far from perfect' ही सच्ची जाणीवच माणसाला पुढे-पुढे जाण्याची जिद्द देत असते.
  'Be frank, Don't pull your punches' असे आवाहन करण्याची क्षमता असणे आणि होणाऱ्या समीक्षणातून शिकणे ही प्रवृत्ती निश्चितच स्वीकारार्ह ठरेल.
'Do the very best you can and then put up your old umbrella and keep the rain of criticism from running down the back of your neck.'  म्हणतातच ना!

      संगीता पाटखेडकर.
      २७/२/२०१६.

Wednesday, 16 March 2016

चार्वाक तत्वज्ञानाची फलश्रुती

     "यावत् जीवेत् सुखं जीवेत्
       नास्ति मृत्योरगोचरः
   भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कृतः"
   (जोपर्यंत जगायचे तोपर्यंत सुखाने जगावे, मृत्यू कोणालाही सुटला नाही. देहाचे भस्म झाल्यावर जन्म कोठून मिळणार?)
   चार्वाकाच्या तत्वज्ञानाची स्थूलपणे सूत्रे    अशी -
  ) देव अस्तित्वात नाही
   ) स्वर्ग आणि नरक नाही.
   ) पूर्वजन्म आणि पुनर्जन्म नाही.
   ) माणसाने पैसा साधने धार्मिक कर्मकांडात किंवा प्रार्थनेत फुकट घालवता चांगले जीवन जगावे. उपभोग घ्यावा.
   ) आयुष्याचे ध्येय मोक्ष नसून सुखासाठी यत्न करणे आहे.
  ) पृथ्वी, वायू, पाणी आणि तेज या मूलतत्वांनी चैतन्यनिर्मिती होते.
     चार्वाकाच्या मते, डोळ्यांना दिसणारी सृष्टी खोटी कशी? जड हीच मुख्य वस्तू आहे. इंग्रजीमध्ये ज्याला 'Down to Earth' असे तत्वज्ञान म्हणता येईल, असा चार्वाकदर्शनाचा अर्थ निघतो. त्याच्या तत्वज्ञानात अर्थशास्त्रीय सामाजिक विचारांनाही स्थान आहे. चार्वाकाला समानार्थी म्हणून 'लोकायत' हा शब्दही वापरतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते पहिला इहवादी भारतीय विचार म्हणजे चार्वाकाचे लोकायत दर्शन! चार पुरुषार्थांपैकी अर्थ काम हे दोनच पुरुषार्थ हे दर्शन मानते. शेती, गोरक्षण, व्यापार, राजनीती . चांगल्या उपायांनीच पृथ्वीवरील सुखे भोगावीत. ईश्वर म्हणून राजाचीच सेवा करावी.
    भौतिक, ऐहिक जगात वावरण्यासाठी याच तत्वांनुसार वागणारा माणूस व्यवहारी, शहाणा ठरतो. आध्यात्मिकतेच्या पातळीपर्यंतचा विचार करण्याची क्षमता आणि कुवत ९९% लोकांत नसतेच समजा. तो जो % असतो तोही त्या पारमार्थिकतेच्या उच्चतम श्रेणीला पोचू शकतो की नाही हे शेवटी रामभरोसेच! अशा सर्व शक्यतांचा विचार करता चार्वाक दर्शनांची तत्वे अंगिकारणे सहजच सुलभ जाते.
   २१ व्या शतकात आज जी आपल्याला वैज्ञानिक प्रगती झालेली दिसत आहे ती पारमार्थिक विचारांचा माणूस करु शकेल का? राहायला जास्तीतजास्त चांगले घर हवे! मग त्यासाठी तितकी धनसंपदा हवी. मोटार, विमान, जहाजसुध्दा स्वतःच्या मालकीचे हवे. यादृष्टीने सगळ्या कंपन्यांचा जो विस्तार झाला तेथे जास्तीतजास्त भौतिक समृद्धी असल्याशिवाय पुढचे पाऊल टाकताच येत नाही. सुवेझ कालव्याचे आपण उदाहरण घेऊ.
   फर्डिनंड डि लेसेप्सने संपूर्ण जगाच्या राजकारणावर परिणाम करणारा सुवेझ कालवा निर्माण केला. पुढे त्यानेच केलेला पनामा कालव्याचा प्रयत्न मात्र फसला, नंतर अमेरिकेने पुढाकार घेऊन पनामा कालवा बांधला. पनामा देश स्वतःच त्या कालव्याचे नूतनीकरण करत आहे. या दोन्ही कालव्यांमुळे जलप्रवासातले हजारो मैलांचे अंतर कमी झाले; पण पैसा अलोट लागणार ना या सर्व निर्मितीत!
     भूमध्य आणि लाल समुद्रांना जोडण्याचे प्रयत्न पूर्वापार चालत आले. फर्डिनंड डि लेसेप्स या फ्रेंच माणसाने हे शिवधनुष्य पेलले. तो स्वतः अभियंता नव्हता. राजकीय मुत्सद्दी होता. ब्रिटिश सरकारला सागरी वाहतुकीसाठी सुवेझ कालवा फार फायद्याचा ठरणार होता, पण त्यांनी विरोध केला. शेवटी ब्रिटन इतर सर्व संबंधित देशांची मने वळविण्यात लेसेप्स यशस्वी झाला. वीस कोटी फ्रँक्सची गरज होती. लेसेप्सने सुवेझ cannal कंपनी स्थापन करुन तिचे समभाग विक्रीला काढले. फ्रेंचांनी ५० टक्क्यांहून अधिक समभाग विकत घेतले. इजिप्तच्या सैद पाशाने प्रचंड प्रमाणात समभाग खरेदी केले भांडवल उभे झाले.   लेसेप्सच्या दृष्टीने पूर्व-पश्चिम संस्कृतीला जोडणारा पूल म्हणजे सुवेझ कालवा! नामवंत अभियंते जमविले. त्यांच्यासाठी घरांची, पिण्याच्या पाण्याची सोय केली. वेठबिगारी मजूर नको होते. इस्माईल पाशाने वेठबिगारी रद्दच करुन टाकली. १८६४ च्या सुरुवातीपासून नवीन यंत्रसामुग्रीने आधुनिकीकरणाने बांधकाम झाले. जगभरातील मान्यवर सुवेझ कालव्याला भेट द्यायला येऊ लागले, त्यात फ्रान्सची महाराणीही होती. आता ब्रिटिशांचे डावपेच चालू झाले. व्यवस्थापनाचा प्रश्न उपस्थित झाला, त्यांनी सुवेझ कालवाच विकत घेतला.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला हा कालवा ब्रिटिश साम्राज्याचा केंद्रबिंदू ठरला. कालव्याच्या सुरक्षिततेचे निमित्त सांगून त्यांनी आपली सत्ता अफगाणिस्तान, पूर्व आफ्रिका, इराण आणि मध्यपूर्वेत पसरविली आणि पहिल्या महायुद्धानंतर इजिप्तवर प्रत्यक्ष कब्जा केला. लेसेप्सचा पनामा कालव्याचा प्रकल्प अयशस्वी ठरला. पनामा cannal कंपनी दिवाळखोरीत निघाली.
    इजिप्तमध्ये अब्दुल गमाल नासर याने सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. ब्रिटिश साम्राज्याची ती मृत्यूघंटा ठरली.
  सुवेझ कालव्यामुळे जहाजं भारताच्या पश्चिमेला येऊ लागली आणि मुंबईचं महत्त्व एकदम वाढलं. ब्रिटिशांच्या आर्थिक सत्तेचं केंद्र कलकत्त्याहून मुंबईकडे स्थलांतरीत झाले. इतिहासाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा, एकूणच ऐहिक, भौतिक जीवनसरणीचा विचार केल्यास आज कोणतीही घटना जागतिक होते. जग जवळ आले आहे ते या अर्थाने!
    'अर्थस्य पुरुषो दासः' म्हंटले जाते.
   आर्थिक मजबुतीशिवाय कोणतीही जीवनसरणी उभारताच येत नाही. हा सर्व दिलेल्या उदाहरणाचा निष्कर्ष!
     चार्वाकाचे तत्वज्ञान भौतिक, ऐहिक समृद्धीला चालना देणारे असले तरी अनाचार, भ्रष्टाचार, सुखोपभोगाची परिसीमा, अशांती, रोगोपद्रव यांना कारणीभूत ठरते; कारण सुखाला परिसीमा नाही. सुखाला व्याख्येत बसवता येत नाही. 'समाधान' हा शब्दच तिथे नाही. जिथे समाधान नाही तिथे अशांतीची बजबजपुरी असणारच! नरक म्हणतात तो हाचशेवटी आध्यात्मिक मार्गाचा पुरस्कार करणाऱ्यांना ही अशांतीची पायवाट नकोच असते; पण हे सर्व समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि एकदा उखळात डोके घातल्यानंतर वरुन मुसळाचे दणके बसणारच! गत्यंतर नाही.

     संगीता पाटखेडकर.

        १६//२०१६.