तूच माझा सोबती, अनादी अनंत माझा
कंठ तुझ्या येण्याने, आकंठ हा भरला
ऐसे नाही, मी नाही कधीच अनुभवले तुला
वेळ आली वाटले जरी, काळ आला नव्हता
तू पालनकर्ता आज्ञेचा, मी स्वच्छंदी जीवनवेडा
यायचे तेंव्हा येशीलच, प्रकार नाही न्यारा
तू येणार निश्चित, पूर्वकल्पना होती मजला
तरी कानी कपाळी ओरडून, कोलाहल नाही केला
जेंव्हा जेंव्हा आलास तू, होतो मी सज्ज समर्पित तुला
परिपाक माझ्या फलश्रुतीचा, तुझ्यातच अंतर्धान पावला
आभार मानू तुझे किती रे, आपणहूनच तू आला
माझ्या गंतव्याच्या प्रार्थना, आधी आप्तांनी करावयाच्या
धन्यवाद अनेकानेक तुजला, मी क्षीण होण्यापूर्वीच आला
आवभगत करण्याचा, वेळ पुरता दिला
माहित आहे निश्चित मजला, नाशिवंत प्रेत माझे तुजला
शाश्वत कैवल्याचा, तूच एक पुरस्कर्ता
सुसज्य मार्ग तुझ्या येण्याने, नवीन जीवनचक्राचा
एक संपला, नवीन अंकुर उभा दुसरा राहिला
आसक्ती ने माझ्या वळून मागे पाहिले, जवळीक काही आप्त पाणावलेले डोळे होते
वाटले सांगावे त्यांना मी तर इथेच आहे, यमदूताने पण मला ओढतच नेले
राख माझ्या अशाश्वताची, गात्रांनीच पाहिली
माझे अस्तित्व तुझ्यासवे, सुरक्षित प्रवास करी
घाबरलो नाही किंचितही मी तुला, नेतेवेळी तू जिंकला
परंतु दरवेळी हरवून तुला, पुनर्जन मी घेतला
अमोल पाटखेडकर
१७-नोव्हेंबर- २०२२
मराठी साहित्यामध्ये मृत्यूवरील उत्कृष्ट काव्य भा. रा. तांबे ह्यांचं मानलं जातं.
संदर्भ - ' जन पळभर म्हणतील हाय हाय '
भाऊसाहेब पाटणकर ह्यांनी मराठी शायरी प्रकारात मृत्यूवर विनोदी अंदाजाने लिहिले आहे.
संदर्भ - ' कफन माझे दूर करुनि पाहिले मी बाजूला, एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला '
गीतेमध्ये तर कृष्णाने मृत्यूला नगण्य मानले आहे. आत्म्याला मरण नाही ह्यावरच भर आहे आणि त्याहीवर जे काही होते ते मीच करतो म्हणून जन्म मृत्यचा भार दोष फक्त आणि फक्त माझ्यावरच आहे असे म्हंटले आहे. निमित्त मात्राला मात्र आपणच दोषी आहो असे उगाच वाटत राहते, अशी अर्जुनाची समजूतही काढली आहे.
असे जरी असले तरी, माझ्या मृत्यूनंतर काहीच कसे बदलत नाही ह्यावरच जास्त भर आहे. प्रत्यक्ष्य मृत्युवरती काहीच नाही.
Due to cyclical nature of the universe, we go through birth, death, and re-birth cycles again and again. Creation, preservation, and destruction is the constant phenomena in the universe. The universe we are part of is the smallest in the entire multiverse. The expanse of multiverse is beyond our imagination and is very complex.
असे जर आहे तर आपण मृत्याला आधी कित्येकदा अनुभवलेले आहे. मागच्या जन्मी, त्याच्या मागच्या जन्मी, त्याच्याही मागच्या जन्मी वगैरे वगैरे. मग ह्याच वेळी त्याचे इतके नवल काय? तो आला कि मी पूर्णत्वाला जातो, म्हणून तो माझा सखा सोबती आहे - आजचा नाही अनंत काळापासूनचा. त्याचे येणे म्हणजे निसर्ग नियम कायम आहे ह्याचा प्रत्यय येतो. उगवणी नंतर कापणी होणे साहजिकच आहे. ती झाली नाही तर नासाडी होते. ह्या जन्मात जे केले, त्याचे परिमार्जन मृत्यूतच होते आणि परत नवनिर्मितीची सुरवात होते.
* कृष्णाचा एक छान उल्लेख आहे, ज्यातून हे विश्व किती मोठे आहे हे कळते.*
एकदा ब्रह्मा कृष्णाला भेटायला द्वारकेला येतो आणि द्वारपालाच्या सांगतो, जा कृष्णाला सांग ब्रह्मा आला आहे. द्वारपाल कृष्णाला सांगतो. कृष्ण द्वारपालाच्या सांगतो, जा विचार त्याला, कोणता ब्रह्मा आला आहे ते. ब्रह्मा म्हणतो, जा सांग कृष्णाला तो चार तोंडाचा, चार पुत्रांचा पिता ब्रह्मा आला आहे. ब्रह्मा आतमध्ये जातो. कृष्णाला विचारतो, तू असे का विचारलेस, माझ्याशिवाय अजून कोणी ब्रह्मा आहे का? तेंव्हा कृष्ण आपल्या योगसिध्धीने, इतर ब्रह्मांना बोलावतो - शंभर तोंडी, दहा हजार तोंडी, १० लाख तोंडी, १ करोड तोंडी आणि चार तोंडी ब्रह्माला सांगतो कि तू बनवलेले विश्व सर्वात लहान आहे. ह्या बाकीच्यांनी बनवलेली विश्वे कितीतरी मोठी आहेत आणि त्या प्रत्येकाचा एक ब्रह्मा, एक विष्णू, एक महेश आहे. तुला मी तू जितके पाहू शकतो तितकेच ब्रह्मा दाखवले. असे अगणित ब्रह्मा आहेत.
अमोल पाटखेडकर
१८-नोव्हेंबर- २०२२
अमोल
तुझी 'मृत्यू' ही कविता वाचल्यानंतर 'आयुष्याचा' पूर्ण विचार करणारा आणि अनंत अनुभवांना सामोरा जाणारा आणि निरंतर जीवनाचाच पुरस्कार करणारा एक भावुक व्यक्ती म्हणून तू माझ्यासमोर उभा राहिलास!!
तू किती हळवा आहेस हे मला माहित आहे. आप्तस्वकीयांचे 'मृत्यू' तू बघितलेस आणि खूप हवालदिल झालास. प्रमोद, तुझे वडील, अरुण, आजोबा, मावशीआजी व तुझ्या मित्रपरिवारातील जवळच्यांच्या मृत्यूने तू हेलकावून गेलास.
आजारपणाच्या बातम्या तुला त्या त्या आजाराचे सखोल संशोधन करण्यास प्रवृत्त करतात व तू पूर्ण सजग होऊन त्याचा अभ्यास करतोस आणि 'शरीर व त्याचा मृत्यू' या गोष्टी तुझ्या अंतर्मनाला व्यापून टाकतात. तू अभ्यासू , विचारी आणि तरीही जीवनाला सामोरा जाणारा आहेस. प्रत्येक व्यक्तीची ही अटळता आहे.
'नचिकेता' हा मृत्यूचा शोध घेण्यासाठी यमद्वारी गेला होता. कठोपनिषदातील ती कथा तुला माहित आहे. पण मृत्यूची भीती बाळगून काहीच निष्पन्न होत नाही. ती अपर्यायी व्यवस्था आहे. जीवनाचे ते अटळ रहस्य सामान्य माणसाच्या आवाक्यापलीकडचे आहे.
'आपुले मरण पाहिले म्यां डोळा
तो सुखसोहळा अनुपम्य' - असे तुकाराम महाराजच म्हणू शकतात.
'रोजचे मरण रोज,' माणूस तरीही जगतच असतो. ही शाश्वतता महत्वाची आणि ती तुझ्या कवितेत उत्तमरीतीने अधोरेखित केली आहे. 'गीतेचे तत्वज्ञान' छान शब्दात सांगितले. तुझ्या विचारप्रवणतेचे, अभ्यासांचे व आशयाच्या मांडणीचे कौतुक वाटले.
'मृत्यू' या संकल्पनेने ग्रासलेला नाही असा विचारी माणूस नाहीच आहे; तरी त्या विचाराला शब्दबध्द करणे हे अवघड काम तू केले आहेस, - हे तुझे यश!!
या संदर्भात मला मृदुलाची 'सदासर्वकाळ' ही तिनेही १५ नोव्हेंबर २०२२ ला लिहिलेली कविता समर्पक वाटली. 'काळ' म्हणजे मृत्यू म्हणजे 'यम' असे आपण समजतो, पण हा काळ त्याच्या गतीने चालत राहतो व कुणासाठीही थांबत नाही. गतवर्तभविष्याचा 'उंबरठा' नेहमीच ओलांडणारा तो, 'काळ' तो!! जन्ममृत्यूच्या 'पल्याड तो' - या ओळी मला खूप समर्पक व सुंदर वाटल्या.
तुम्हा दोघांच्याही कविता वाचल्यानंतर इतकी विचारप्रवणता तुम्ही अभिव्यक्त करु शकता याचे खूपच कौतुक वाटले. विचारांची काव्यात्म अभिव्यक्ती ही खूप कठीण गोष्ट तुम्ही दोघांनीही साध्य केली आहे. हे मेंदूच्या सशक्ततेचे लक्षण आहे. मेंदूला नेहमीच असे सशक्त, सजग ठेवा म्हणजे तो मेंदूही खूप कार्यप्रवृत्त होतो आणि विस्मरणाच्या विळख्यात सापडत नाही. मेंदूला नेहमीच चालना दिली तर इतरांच्या मेंदूलाही चालना देण्याचे काम होते; हे तुमच्या कवितांवर लिहिण्याची मला बुध्दी झाली, यावरुन समजून येईलच!!
संगीता पाटखेडकर
१८/११/२०२२