Thursday, 29 September 2016

जय हिंद की सेना

अब की बार करारा प्रहार
  देख ले अब ऐ दुश्मन तू
  .... कौन करता तुम्हारा उध्दार???
  
     १२५ करोड शेर हमारे
      कर देँगे तुझको ढेर
    एक ही है, एक ही रहेंगे
       हमेशा हम सारे
   तू, गिन ले अब ऐ दुश्मन दिन में तारे
       जय भारत!! जय भारती!!
   जय हिंद!! जय हिंद!! ये नारा हमारा
   गुँज उठेगा वीरसेना से आसमान सारा
      ये धरती हमारी, ये अंबर हमारा
       ना रख हमारी जमीन पर तू
        नापाक नजरों का इशारा
      तिरंगा हमेशा जिंदाबाद है और
       जिंदाबाद रहेगा प्यारा
    सारे जहाँ से अच्छा है हिन्दुस्थान हमारा
  
 मृदुला मुकुंद पाटखेडकर.

  २९ सप्टेंबर २०१६.

'जी' ले 'जी भर के'

   अजीब सी भागदौड है ये जिंदगी
     फिर भी तू जी ले जी भर के
       हँस ले जी भर के
    रोते रहना तेरी फितरत नहीं
    सोये रहना तेरी आदत नहीं
  दुःखों को पार कर चलते चलते
    मंजिल तो मिल ही जायेगी कहीं ना कहीं
   सुख का सागर ढुँढने से नहीं मिलता
    अंतर्मन में खोज ले तू उसे यहीं
    तेरा स्वर्ग भी यहीं
    तेरा चैन भी यहीं
    धुप भी यहीं
    छाँव भी यहीं
  धुप छाँव की आँख मिचौली से बचके कोई जा सकता नहीं
      धुप में रहकर ही ढुँढनी है तुझे तेरी छाँव यहीं  यहीं....यहीं.... यहीं.....यहीं
   तेरा सबकुछ ही है यहीं
   तेरा कमाया हुआ अच्छा नाम रहेगा यहीं
  जिंदगी से फिर भी तू जायेगा कहीं
   तेरे अच्छे काज ही तेरे साथ आयेँगे
   यही बात पते की
   यही है बात सही......!!!

    मृदुला मुकुंद पाटखेडकर.

     २९ सप्टेंबर २०१६.

Wednesday, 28 September 2016

सूरसम्राज्ञी

    "अजीब दास्ताँ है ये.... कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी??.... ना वो समझ सके ना हम"..... या दोनच ओळी, प्रत्येकाच्याच आयुष्याची कहाणी सांगून जातात. माझे आवडते गाणे; लताजींनी गायलेले. २८ सप्टेंबर १९२९ रोजी संपूर्ण जगावर आपल्या आवाजाची जादुई मोहिनी घालणारी सुरसम्राज्ञी, गानकोकिळा लता मंगेशकर जन्माला आली. तिचे वडील दीनानाथ  मंगेशकर यांनाच आयुष्यातील आणि संगीतातील गुरु मानणारी, अत्यंत हलाखीच्या आणि गरीब परिस्थितीतून आपल्या सुरमयी आवाज आणि गायकीच्या माध्यमातून जगाशी निरागस सूर जोडणारी, वडिलांचा उजवा हात असणारी, लहान बहीण भावंडांनाही प्रेम आणि वात्सल्य देणारी, त्यांनाही संगीताचे ज्ञान देणारी, संगीतालाच आपला जीवनसाथी आणि सर्वस्व  मानणारी, मराठी गाणी, भावगीत, शात्रीय संगीत, हिंदी सिनेमाची अनेकानेक गाणी, विविध भाषांमध्ये लीलया सूरसाज लावणारी, 'आनंदघन' या नावाने कवितांना चाली आणि संगीत देणारी, 'सा, रे, ग, म, प, ध, नि, सां,' या सप्तसुरांशी घट्ट मैत्री असणारी, संगीत ही फार मोठी साधना आहे आणि या साधनेशी आयुष्यभर एकरुप असणारी अशी ही अद्वितीय, अतुलनीय व्यक्ती म्हणजेच 'लता मंगेशकर.
   "ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुएँ है उनकी जरा याद करो कुर्बानी" - ही कवी प्रदीप यांची रचना तिने अजरामर करुन ठेवली. करुण रसाचा सागर असणाऱ्या ह्या ओळी आणि त्याच धाटणीचे संगीत आणि लताचा करुण आणि स्फूर्तिदायी सूर या गाण्याला प्रत्येक भारतीयाच्या मनांत शहीदांविषयीची कायम जाण आणि ओळख देऊन गेला. पंडित नेहरुंच्या डोळ्यांत अश्रू तरळले!! हे गाणे ऐकल्यावर!! प्रत्येक भारतीयाचीही त्यांच्यासारखीच स्थिती होते. शब्दांमध्ये, सुरांमध्ये, संगीतामध्ये, आणि गायकीमध्ये जेंव्हा जीव ओतला जातो तेंव्हाच या अमर गाण्यांची निर्मिती होत असते. हे गाणे ऐकून प्रत्येक भारतीय भावविवश होतो.
 
 नम्रता आणि विनयशीलतेच्या बाबतीतही लताजी अग्रेसर असतात. आजवर गायिलेल्या अनेक गाण्यांबद्दल त्यांना जे अनेक पुरस्कार मिळाले; ते स्वीकारतांना त्यांना कधीच अहंकाराचा वारा स्पर्शला नाही. आपल्या यशाचे श्रेय नेहमीच त्यांनी त्यांचे कुटुंब, त्यांना लाभलेले संगीतकार, गीतकार यांना दिले. 'चांगलं संगीत देणारे संगीतकार नसते तर आज मीही तुमच्यासमोर नसते,' असे त्या नेहमी म्हणत असतात!!
   
'ॐ नमोजी आद्या l वेद प्रतिपाद्या l जय जय स्वसंवेद्या l आत्मरुपा' ll - या ज्ञानेश्वरांच्या ओळी. लताजींच्या गोड गळ्यातून हा ॐ ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष आपण त्या ओमकारालाच भेटतो आहे असे वाटते. 'मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरु कळियांसी आला'...... हे सूर त्यांच्या मुखातून ऐकल्यावर आपला सर्वांचाच चेहराही त्या मोग-यासारखाच फुलतो!! इतकी अवीट गोडी आणि मऊ, मुलायम, तरल लय त्यांच्या गायकीमध्ये आहे. 'संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या मला गायला मिळाल्या; हे मी माझे परमभाग्य समजते'; असे त्या एका मुलाखतीत बोलल्या होत्या.

   परमेश्वरावर त्यांचा अतूट विश्वास!! 'प्रतिभा' ही दैवी देणगी असते; त्यामुळे काही व्यक्तिमत्त्वे जागतिक (Universal) ठरतात, त्यापैकीच एक म्हणजेच लता मंगेशकर. सप्त सुरांप्रमाणेच त्यांच्या नावातही सात अक्षरे!! 'लता' या नावाला उलटे केले तर 'ताल' हा शब्द येतो. दैवी देणगी आणि सुरावटींचा साज चढविणा-या लता मंगेशकर या महाराष्ट्रात, मराठी मातीत जन्माला आल्या याचा सार्थ अभिमान वाटतो. थकलेल्या, शिणलेल्या, रोजच्या दैनंदिनीशी झगडणा-या, एकूणच जगातील सर्वांनाच या गायिकेने आपल्या गायनांतून; 'आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग, आनंदाचे'- या ओळींप्रमाणेच आपल्या मनातील आनंदाचा डोह तुडुंब भरविला आणि आपल्या सर्वांनाच उपकृत केले.

    अशा या गानकोकिळेचा आज जन्मदिवस. आज त्यांचे ८८ व्या वर्षात पदार्पण झाले. ज्या सर्व रसिकांना त्यांनी भरभरून आनंद दिला त्या लताजींना माझ्यातर्फे या लेखणीच्या माध्यमातून मानवंदना!!
  आपणांस, आरोग्यसंपन्न आणि उदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा!!!

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

       २८ सप्टेंबर २०१६.

Sunday, 25 September 2016

कळेल कधीतरी....... !!

कळेल कधीतरी शत्रुनांही
  घाव घातला आपण भारतीयांच्या उरी
  पुरे झाल्या चर्चा आणिक वाटाघाटी आजवरी
नकोच त्यांचे हस्तांदोलन, नकोच ते गोड बोलणे  दुटप्पी आणि दुहेरी
  ...... कळेल कधीतरी आम्हालाही.... !!
 ....... कळेल कधीतरी...... !!

  जवानांचे बलिदान व्यर्थ न जाईल खरोखरी
इथेच टाकून तंबू आम्ही उत्तर देऊ वरचेवरी
'साप म्हणू नये धाकला, शत्रू म्हणू नये आपुला'
याचीच प्रचिती येई 'त्यांना' पाहिल्यावरी
.....कळेल कधीतरी आम्हालाही...... !!
..... कळेल कधीतरी......... !!
 
 सामोपचार नाही उपयोगाचा
  दंडुक्याला दंडुका, ठोश्यास ठोसा,   जशास तसा, 
   हीच खरी जबाबदारी
 तह नाही कामाचा, वर्चस्वाची रणनीति अंगिकारी
...... कळेल कधीतरी आम्हालाही...... !!
....... कळेल कधीतरी....... !!

  'जशास तसे' हाच मूलमंत्र स्वीकारी
   घाबरण्याची नाही जरुरी
 मानू नका कुणाचीच मक्तेदारी
आम्हीच आहोत राजे अमुच्या ह्या दरबारी
हानी होणार नाही याची बाळगा सावधगिरी
..... कळेल कधीतरी आम्हालाही....... !!
....... कळेल कधीतरी........ !!

 विजयाची उंच उंच पताका फडकवू या गगनावरी
एकत्र सारे भारतीय येऊ, भेटू उराउरी 
मनोबल खचवू शत्रूंचे आणिक धैर्यही 
सामर्थ्य आपुले सारे दाखवू लय भारी
........ कळेल कधीतरी आम्हालाही..... !!
........ कळेल कधीतरी....... !!

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        २५/९/२०१६.

Saturday, 24 September 2016

कळेल कधीतरी

कळेल कधीतरी ही आस तर नेहमीच मनमंदिरी
श्रद्धा फळेलच हृदयाच्या गाभारी
कळेल, कळेल, कळावे असे नेहमीच जिव्हाग्री
पण आयुष्याचा पट विस्तृत, मन स्थिरावत नाही नासाग्री
आयुष्याचे सारकण वेचता वेचता दृष्टी राहील निरंतरी
थोर महाभागांचे आयुष्य शिकविणारच काही ना काहीतरी
ध्यास घेतला की गोष्टी आकळतातच, ठसतात अभ्यंतरी

जे जे आकळले ते केव्हा ना केव्हा येणारच बाहेरी
यांना जीवन कळले हो असे ठाम म्हणेल का कुणीतरी?
कळले, कळले, कळले असे ओरडावेसे वाटते दिगंतरी
पण नुसतेच शब्द जुळू नयेत ट ला ट री ला री
अभिव्यक्तीला अनुभूति असावी हीच आस अंतरी
शब्दांनी अर्थामागे धावावे हीच मनीषा खरोखरी
प्रत्यक्षाचाच प्रत्यय येतो हेच सांगतात साक्षात्कारी

धुरंधरांचाच विजय होतो आयुष्याच्या रणकंदरी
प्रयत्नांना पर्याय नाही हीच इतिहासाची ललकारी
सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा या, प्रसन्न परमेश्वरी
त्यांनाच घालतात विजयाची माळ, प्रयत्न आणा 'साकारी.'

प्रयत्नांचे महत्त्व आकळले की सुकर होतो घाट
रस्त्याला रस्ता मिळत जातो सुकर होते जीवन वाट
हे मला कळले, आता कधीतरी म्हणायचा प्रश्न नाही.
समस्या सगळ्याच सुटतात अडायचे कारण नाही.
प्रयत्नांती परमेश्वर, यत्न तो देव जाणावा रामदासांनी लिहीले
त्यांना ते तेव्हाच कळले होते, मला आज कळले
कळता कळता वळत जाते, मन मार्गी लागते
आयुष्याचा सोपान चढता चढता दिगंतरी जाते.

'पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा'
पाण्यासारखे प्रवाही आणि निर्मळ व्हावे 'जीवन सरोवरी'
नाम, रुप, गुण सब परमेश्वर की देन, कोई नहीं ऐसा वैसा
कुठेही ठेचकाळू नको, अडखळू नको या 'जीवन - कांतारी'
जीवन सिखाता है बहुत कुछ, सिर्फ श्रेष्ठ नहीं है पैसा
'पद्मपत्रमिवाम्भसा' हा न्याय ठेव नित्य अभ्यंतरी

वारी करतो तो वारकरी, येतो; विठ्ठला, तुझ्या दारी
एकवार विठ्ठला ये रे, माझ्याही घरी
एकवार येऊन बघ, जाऊ देणार नाही माघारी
खूप दाटी झाली भक्तगणांची पंढरपुरी
तू तर सर्वांच्या हृदयात निवासी, चमत्कारी
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी
तुला कधीच विसंबू नये माझी वैखरी
नाद माईना अंबरात मन माझे झाले ईश्वरी

षड्रिपूंचा दूर दूर घालवून द्या अरी
नारदाला दिसला कृष्ण प्रत्येक स्त्रीच्या अंतःपुरी
सर्वात्मक ईश्वराच्या कथा सांगा, केव्हातरी, कुठेतरी,
कथा सुचवून जातात खूप मोठा आशय,
उमगतेच मग काहीतरी; कधीतरी

कैवारी, पुढारी, दुहेरी, कातकरी, शेतकरी, गावकरी, वंजारी.......
कितीतरी शब्द, मराठी भाषा आहे समृध्द
बनवा एकेक कथा आणि होऊ दे अक्षरबध्द
आजकाल निरक्षर नाही साधारणपणे कोणीच
निरक्षर असतीलही तरी, अनुभव तर प्रत्येकाचेच प्रत्ययकारी
एखादी अनुभवांना वाचा फोडणारी असतेच 'बहिणाबाई चौधरी.'

     संगीता पाटखेडकर.

       २५/९/२०१६.

Wednesday, 21 September 2016

शांतीदूत

आज २१ सप्टेंबर २०१६. जागतिक शांतता दिन. International Peace Day.
       संपूर्ण जगात शांतीपूर्ण वातावरणनिर्मितीला किती महत्त्व आहे, याचाच विचार आज सकाळपासून मनांत येत आहे. आज माझे मन 'शांती' या शब्दाचा वेध घेत आहे. नुकत्याच 'ऊरी' येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आपला भारत देश शोकाकुल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या-ज्या जवानांनी संपूर्ण ताकदीनिशी आणि भरघोस शस्त्रसाठ्यांसह घुसलेल्या अतिरेकी दहशतवाद्यांशी निकराने आणि जिद्दीने झुंज दिली आणि अमर झाले, त्यांना कोटी कोटी नमन!! पण, असे किती दिवस चालणार?  किती दिवस असेच हल्ले होत राहणार? आपले जवान शहीद होत राहणार? आपण त्यांना श्रद्धांजली वाहत राहणार? असे कितीतरी प्रश्न या निमित्ताने सर्वच भारतीयांच्या मनात उपस्थित झाले.

   राष्ट्राराष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करावयाची असेल तर जे-जे, त्या-त्या राष्ट्राचे नागरिक आहेत, त्यांच्यावर लहानपणापासून  चांगले संस्कार झाले पाहिजेत. चांगल्या, उदार विचारसरणीच्या व्यक्तिमत्चांची त्यांना ओळख असली पाहिजे आणि जाणही असली पाहिजे. काही राष्ट्रे नेहमीच अतिरेकी आणि दहशत फैलविणारे प्रशिक्षण बालपणापासूनच त्यांच्या देशातील मुलांना देत असतात म्हणूनच पुढे त्यांचे मन आणि शरीरही अतिरेकीच बनते. विवेकी वागणूक आणि विचार यांना त्यांच्या ठिकाणी थारा नसतो. ही अतिरेकी विचारसरणीच शांततामय वातावरणनिर्मितीला बाधक आहे. या ठिकाणी मला माझ्या बाबांचे वाक्य आठवले; "कुंभार मातीचे मडके बनवितात. ते कच्चे असले तरच त्याला चांगला आणि हवा तसा आकार देता येतो,  ते भाजल्यावर नाही,- असेच संस्कारांचेही आहे." जगाला लागलेला कायमस्वरुपी व्हायरस म्हणजेच 'दहशतवाद' आणि या दहशतवादी मनोवृत्तींवर मात करणारे अँटी व्हायरस म्हणजेच 'शांतीदूत' असतात, असे मला वाटते.
    
    आजपर्यंतच्या इतिहासात जगात अनेक 'शांतीदूत' निर्माण झाले. सिद्धार्थ गौतम बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला. या सर्वांनी संपूर्ण मानवजातीला शांतीचा महान संदेश दिला.
    
    सिद्धार्थ गौतम बुद्धाचे महान विचार खालीलप्रमाणे;
  'What is the difference between    I like you, I love you?'
Beautifully answered by Buddha:-
"When you like a flower, you just pluck it. But When you love a flower, you Water it daily."........!!
  One who understand this, understands life.
 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे.'
 'हे विश्वची माझे घर' म्हणणा-या ज्ञानेश्वरांनी तर संपूर्ण मानवजातींवर प्रेम केले. सर्वांविषयीच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असेल तर संस्कारी मन अतिरेकी होत नाही. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊनच विचार करणे केंव्हाही योग्यच!!
   आपल्या हिंदु धर्माची शिकवण आणि संस्कार महान आहेत. कोणत्याही आरतीनंतर आणि मंत्रपुष्पांजलीनंतर आपण सर्वजण ॐ शांतीः शांतीः शांतीः म्हणतो!! जगातील सर्वच धर्मांची शिकवण ही मानवतावादी दृष्टीकोन, प्रेम आणि शांतीचा संदेश देणारी आहे.
 'कलिंग' च्या युद्धात झालेला अमानुष मानवी संहार पाहून 'सम्राट अशोक' चे मन हळहळले, व्याकुळ झाले आणि त्यानंतरच त्याने शांतीचे, सलोख्याचे आणि प्रेमाचे महत्त्व जाणून बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि प्रसारही केला. महात्मा गांधी हे तर अहिंसा आणि शांतीचे पुजारी होते. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे नेते! जगात शांती नांदावी यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रमांद्वारे अथक प्रयत्न केले. प्रत्येक धर्माने आपापल्या देशातील महनीय व्यक्तींचे आदर्श आणि त्यांचे महान विचार यांचा संदेश जगाला दिला पाहिजे. आपल्या हिंदू धर्मात तर संत आणि महंतांची काहीच कमी नाही. त्यांचे विचार संपूर्ण जगाला माहित करुन देण्याची आवश्यकता आहे. विविध देशांतील, धर्मातील आणि जातीतील सद्सद्विवेकाच्या विचारांचे आदान आणि प्रदान राष्ट्राराष्ट्रांमध्ये झाले पाहिजे; विशेषतः शाळकरी आणि तरुण मुलांवर!!
    विवेकशील, विचारी, संस्कारी, ज्ञानी विचारांचे आणि मनाचे लोकच जगात शांततेचे आणि प्रेमाचे मनोरे बांधू शकतात.          दहशतीला आणि अतिरेकी विचारांना नेस्तनाबूत आणि पराभूत करु शकतात.
चला.... तर मग, आजच्या शांतीदिनी आपणही सर्वांनी 'शांतीदूत' होण्याचा संकल्प करु या..... !!

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

         २१/९/२०१६.

Wednesday, 14 September 2016

निरोप

आपली मराठी भाषा अनेक वेगवेगळ्या शब्दांनी, एकाच शब्दाच्या अनेक अर्थांनी, वेगवेगळ्या वाक्प्रचार व म्हणींनी सुंदर, समृद्ध आणि संपन्न आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'निरोप' या शब्दाचा मन वेध घेत आहे. मराठीतील इतर अनेक शब्दांप्रमाणेच हाही वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. शेजारी कुणाला, काही प्रसंग, कार्यक्रमानिमित्त आमंत्रणं द्यावयाची असल्यास, निरोप धाडायला आपण घरच्या सदस्याला पाठवितो; आणि नंतर तो किंवा तिला खात्री करुन विचारतोही, 'दिला ना निरोप सगळ्यांना, कार्यक्रमाचा?' मग तो 'निरोप' सुखाच्या कार्यक्रमानिमित्त असेल किंवा दुःखाच्या!!
    प्रेक्षकांची रजा घेणे म्हणजेही निरोपच!
एखाद्या एका तासाच्या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात celebrity guest बोलावले जातात; परंतु इतर ठिकाणी शुटींगमध्ये busy असल्यामुळे ते पूर्णवेळ कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नाही; तेंव्हा ते जाण्यापूर्वी सर्व प्रेक्षकांचा आदरपूर्वक 'निरोप' घेतात; त्यामुळे हा 'निरोप' शब्द देण्यातही असतो आणि घेण्यातही असतो. काही 'निरोप' सुखद असतात, मनाला आनंद देणारे असतात; तर काही 'निरोप' मनाला कायम चटका लावणारे असतात. अशा निरोपांची आठवण मनांत कायमच असते.
  मुलीला सासरी पाठवितांना देण्यात येणारा 'निरोप' हा आई वडिलांचा कंठ दाटून आणणारा असतो. घरातील वडिलधा-या मंडळींना देण्यात येणारा कायमस्वरुपी 'निरोप' मनाला दुःखद यातना देणारा असतो. ते पुन्हा कधीच आपल्याला दिसणार नसतात.
  भाद्रपद महिन्यात, गणेशोत्सव असतो. पृथ्वीवर दहा दिवस येणारा पाहुणा असतो गणपती!! त्याच्या आगमनापासूनच सर्वांमध्ये उत्साहाची लहर येते. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणीही गणपतींची प्रतिष्ठापना होते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आरास केली जाते. यावर्षीही अनेक मंडळांनी वृक्षसंवर्धन, एड्स जनजागृती, कुपोषित मुलांची समस्या, विविध रोग आणि त्यावरील उपचारांसंबंधीची माहिती, विविध स्तोत्रांचे पठन, असे अनेक देखावे सादर करुन सर्वांचे लक्ष वेधले. बीड जिल्ह्यातील 'अंबाजोगाई' येथे यावर्षी फक्त मुलींनीच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. तसा ठराव आधीपासूनच मंजूर केला होता. वर उल्लेखित सर्व देखाव्यांसहित!! बदल घडतोय आणि समाजात चांगले-चांगले उपक्रम या उत्सवाच्या निमित्ताने राबविले जात आहेत, याबदृल आनंदच आहे.
   दहा दिवस अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने आपण ज्या गणेशाचे पूजन, स्तवन आणि मनन करतो, प्रसादासाठी मोदक आणि खिरापत करतो, त्या आपल्या लाडाच्या, कौतुकाच्या बाप्पाला 'निरोप' देणे प्रत्येकालाच जड जाते. दहा दिवस कसे भुर्र्... उडाले असतात. विसर्जनाची, निरोपाची वेळ जवळ येत असते. मनाची घालमेल आणि कालवाकालव सुरु होते. मी स्वतः यादिवशी खूप नाराज असते. आम्ही भावंडे लहान असतांना बाबा आम्हाला अकोल्यातील सर्वच ठिकाणचे गणपती बघायला घेऊन जात. आम्ही शहर पालथे घालत होतो. पायीच जात होतो. काही ठिकाणचे देखावे आणि आरास पाहून नजर हटत नसे. आमच्या विभागात 'युवा' गणेशोत्सव मंडळ होते. ते मोठ्या पडद्यावर सिनेमा दाखवित. त्यावेळेस मनोरंजनाचे तेच एक साधन होते. टेलिव्हिजन घराघरात पोहोचला नव्हता.
   "जगात येणा-याला एक ना एक दिवस या जगाचा 'निरोप' घ्यावयाचा असतो. देवांनाही हा 'निरोप' सुटला नाही, हेच बाप्पालाही या उत्सवातून भक्तांना सुचवावयाचे असते. बाप्पाचे आगमन होतांना जो तामझाम असतो, नाचून, गाऊन, ढोल आणि ताशांच्या गजरात जो आनंदाचा डोह असतो, तो प्रत्येकाजवळ ओतप्रोत भरलेला असतो. अगदी तसाच तामझाम बाप्पाला 'निरोप' देतांनाही असतो. मनाला हुरहूर लागली असली तरी एक आशा प्रत्येकाला दिलासा देणारी असते की, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार आहेत."-  अशा शब्दात विसर्जनाच्या दिवशी मी नाराज असली की बाबा मला समजावून सांगत.
   उद्या १५ सप्टेंबर २०१६. श्री गणेशाला 'निरोप' द्यायचा दहावा दिवस!! कठीण समय!! वरील सर्व घटना आठवणे स्वाभाविक!! ज्या वडीलांनी मला हे तत्वज्ञान सांगितले त्यांनी ४ वर्षांपूर्वीच आमचा आणि जगाचा 'निरोप' घेतला. आमच्या मनातल्या आठवणींना मात्र या जीवात जीव असेपर्यन्त 'निरोप' नाही. दरवर्षी या उत्सवाच्या दहाव्या दिवशी हे आठवल्याशिवाय राहत नाही.
   ...... चला तर मग, पुन्हा पुढच्या वर्षीसाठीचा उत्साह, आनंद, यश, ज्ञान, हे सर्व बाप्पाला भरभरून मागून त्याला आनंदाने 'निरोप' देऊ या. पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी!!
  'गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या'...... असे म्हणून आज या लेखापुरता मी तुम्हा वाचकांचा तात्पुरता 'निरोप' घेते. धन्यवाद.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        १४/९/२०१६.

Sunday, 11 September 2016

गौरी

  "सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके
  शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोsस्तुते."
   "जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
 वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी"

   सर्व जगात जिची अधिसत्ता चालते ती म्हणजे 'लक्ष्मी.' ज्यांना ही प्रसन्न असेल त्यांच्या जीवनात आनंदीआनंदच असतो. सर्व सुखे पायाशी लोळण घेतात ते हिच्यामुळेच!! ती सूक्ष्मरुपात सगळीकडे असते. सर्व अलक्ष्मीचा नाश व्हावा आणि सगळीकडेच मंगलमय वातावरणनिर्मिती व्हावी यासाठी सर्वजण हिची आराधना करतात. अशा या महालक्ष्मींचे आगमन, पूजन आणि विसर्जन गणेशोत्सवात होते. याच दिवसांत का? असा प्रश्न मनाला पडतो. घरोघरी गणपतींची प्रतिष्ठापना झाली असते. असे म्हणतात की, गौरी म्हणजेच पार्वती, घराघरात जाते आपल्या मुलाला भेटायला!  मग त्याच्यासहित त्यांचेही कोडकौतुक केले जाते.
  
"गौरी" म्हणजेच माहेरी आलेल्या मुली. फक्त तीन दिवसांचे त्यांचे माहेरपण असते. 'फक्त' हा शब्द मी जरा दबकूनच वापरला; कारण हे फक्त तीन दिवस नसतात, तर अत्यंत कठीण आणि कडक सोवळे पाळून करावयाचे हे व्रत असते. मग तीन दिवसच का या येतात? असा प्रश्न मनात आला. केवळ आपल्या हिंदुधर्मातच नाही तर इतर धर्मातही तीन या आकड्याला महत्व आहे. त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश. 'ब्रह्मरुपिणी' असे आणखीन् हिचे एक नाव. पृथ्वी, आकाश, पाताळ तीनच! तीन पानांचाच 'बेल' असतो. गणपतीला ज्या 'दुर्वा' आपण अर्पण करतो; त्याही त्रिदल असतात. पळसालाही पानें तीनच असतात. ख्रिस्ती धर्मात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, हे तीन महत्वाचे मानतात. मुस्लिम धर्मात ७८६ हा बिस्मिल्लाचा नंबर आहे. या तीन अंकांची बेरीज केली तर ती २१ होते; आणि या दोन अंकांची बेरीज केली तर ती तीन होते. असा आहे 'तीन' चा महिमा. हे सर्व तीन शुभ!! अशुभातही तीन महत्वाचे. 'तीन तिघाडा, काम बिघाडा' अशी म्हण. कोणत्याही शुभ कार्याला तिघांनी एकत्र जाऊ नये, असा पूर्वी समज होता. तीन संकटे एकाचवेळी आली असतील तर 'तीन त्रांगडं' झालं! असं मराठीत आपण म्हणतो. त्रिशंकू अवस्था!!
    'गौरी' आगमनाची खूप आधीपासून पूर्वतयारी असते. अलक्ष्मी म्हणजेच अस्वच्छता घालविली तरच लक्ष्मी येणार!!
या 'गौरीं'च्या स्वागतासाठी डोळ्यात तेल घालून घरातील प्रत्येक सदस्याला सज्ज राहावे लागते. हे व्रत म्हणजे तोंडाच्या बाता नव्हेत. संपूर्ण घर स्वच्छ करणे, देवांचे साहित्य एकत्र ठेवणे, जास्तीची भांडी तयार ठेवणे, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी polish करणे, भारी साड्यांची तयारी असणे, विविध धान्यांच्या राशी ठेवणे, त्यात प्रामुख्याने तांदूळ आणि गहू. पैसा म्हणजे लक्ष्मी तसेच धान्य आणि पाणी म्हणजेही लक्ष्मीच!! मोदक, करंज्या, साटो-या, पात्या, शंकरपाळे, अनरसे, लाडू, चकल्या, असा सोवळ्यात फुलोरा तयार करणे!! या काळात सोळा ला खूप महत्व! षोडशगुणी विडा,म्हणून 'तांबूल' बनविला जातो. षोडश 'मातृका' असतात, म्हणून सोळाचे महत्व!!  विविध फुलांचे हार आणि पत्री तयार ठेवणे, सजावटीचे सर्व साहित्य घेणे, एक ना अनेक व्याप. 'सोळा' प्रकारचे गौरीचे शृंगार असतात, म्हणूनही सोळाला महत्व!! भारी साड्या नेसवून, वेगवेगळे दागिने घालून, गजरे घालून, फुलांचे सुंदर झुबकेदार, चमकी असलेले, हार घालून, सुंदर ठुशी आणि नथ घालून या माहेरी आलेल्या गौरींना सजविले जाते. आजच्या काळात तर विविधरंगी दिव्यांची रोषणाईही मखरात केली जाते. मखर स्वहस्ते तयार करणे हा अजून एक ज्याच्या त्याच्या हौसेचा भाग.
 दुसऱ्या दिवशी विविध पदार्थांचा नैवेद्य त्यांना दाखविला जातो. पुरणपोळी, सोळा भाज्यांची भाजी, पातळभाजी, त्यासोबत आणखी दुसरी भाजी, पंचामृत, हिरव्या मिरच्यांची चटणी, विविध कोशिंबिरी, कढी, वरण, भात, साधी पोळी, घा-या, आंबिल, भजे, वडे, असा पदार्थांचा थाटमाट असतो. 'आंबिल' प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बनविली जाते.नागपूरकडे ती हळद, तिखट, कढीपत्ता घालून फोडणीची बनविली जाते. अकोल्यात ती बिनफोडणीची आणि पांढरीशुभ्र असते. या आंबिलीवर पिठीसाखर आणि दूध टाकले जाते. काही घरी पिठीसाखरेऐवजी गूळ घातला जातो.  गौरीपूजनाच्यावेळी लक्ष्मीची सोळा किंवा सहस्त्र आवर्तने यजमानांनी घेणे विशेष महत्वाचे असते.
ॐ हिरण्यवर्णाम् हरिणीम्, सुवर्णरजतस्त्रजाम्, चन्द्राम् हिरण्मयी लक्ष्मीम् जातवेदो म आवह, ताम् आवह जातवेदो, लक्ष्मी मनप गामिनीम्, यस्यां हिरण्यम् विन्देयम् गामश्वम् पुरुषानहम्...... पासून ते 'न क्रोधो नच मात्सर्यम् न लोभो नाशुभाम् मतिम्, भवन्ति कृतपुण्यानाम् भक्तानाम् श्रीसूक्तम् जपेत्'...... ते 'अश्वदायी, गोदायी, धनदायी, महाधने, धनम् मे जुषतां देवीं सर्वकामांश्च देहि मे' अशी शेवटी फलश्रुती म्हंटली जाते. 'श्रीसूक्त' मला तोंडपाठ आहे. आई रोज म्हणायची. तिचे ऐकता ऐकताच माझे पाठ झाले; त्याच्या अर्थासहित. अशीच गत वेगवेगळ्या आरत्यांचीही झाली. आईचे ऐकता ऐकताच माझ्या मनात अनेक आरतींचा संग्रह तयार झाला. आजच्या काळात याच आरत्या आणि श्रीसूक्त, पुरुषसूक्त, मनाचे श्लोक, मारुतिस्तोत्र, रामरक्षा....,,, मुलांना पाठ असाव्यात, अस्खलित संस्कृत यावे, यासाठी पालक त्यांना संस्कारवर्गात पाठवितात. Convent मध्ये शिकत असलेल्या मुलांना मी संस्कारवर्गात शिकतांना पाहिले आहे. सहजसंस्काराचा सुंदर अनुभव आईने आम्हाला दिला. 'आई' हे आपल्या घरातील अखंड लक्ष्मीचे रुप असते.
   'अन्नदान' हे आपल्या संस्कृतीतील पुण्यदान!! गौरीपूजनाच्या निमित्ताने अनेक आप्तस्वकीय, नातेवाईक, हितचिंतक, शेजारी, या सर्वांना प्रसादाचे राजीखुशीने आमंत्रण दिले जाते. सुवासिनी स्त्रियांची ओटी भरुन, हळदी, कुंकू लावून, त्यांनाच गौरीरुप समजून,  त्यांचा यथोचित पाहुणचार केला जातो. मुलगी आणि जावई या दिवशी जेवायला असणे, शुभ समजले जाते. स्त्रीशक्तीचा मान, सन्मान, प्रेम, आदर राखणारा हा सण. प्रसाद ग्रहण करण्यासाठी आलेल्या सुवासिनी स्त्रियाही तिची खण आणि नारळाने, हळकंड, सुपारी, हळदी-कुंकू, पैसे, काजू, बदाम, मनुके, तांदूळ घालून यथाशक्ती ओटी भरुन पदरात कुटुंबाच्या समृद्धी, शांती, स्वास्थ्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी तिच्याजवळ दान आणि आशिर्वाद मागतात. सुखकर्ता, दुःखहर्ता ही आरती झाल्यानंतर अनेक आरत्या या दिनी म्हंटल्या जातात. 'जय जय नदीपति प्रियतनये, भवानी महालक्ष्मी माये, आदि क्षीरसागर रहिवासी, जय जय कोल्हापुरवासी,'...... 'आरती त्रिपुरसुंदरीची, अंबिका माय रेणुकेची.'
   'त्रिपुरसुंदरी' हे अजून एक तिचे नाव!!
ह्या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त भरुन पावल्यासारखी स्थिती त्या घरातील माय, माऊलीची होते. मुले-सुना, लेक-जावई, नातवंडे, जावा, नणंदा, माहेरची, सासरची माणसे यांना एकत्र आनंदाने नांदतांना पाहून ती तृप्त होते. सण एक आणि उद्देश अनेक साधले जातात.
   लक्ष्मी त्यांनाच प्रसन्न होते, जे अथक ज्ञान मिळवून परिश्रम करतात, सन्मार्गाने तिला मिळवितात, सहृदयी अंतःकरणातून समाजसेवा करतात, अशांजवळ ती चिरकाल टिकते. लक्ष्मी चंचल असते म्हणतात. ती एकाच ठिकाणी खूप काळ थांबत नाही.  जिथे दुराचार, अनीती, भांडणे, वाद, फसवणूक आहे, अशा लोकांना ती तात्पुरता आनंद देते, पण नंतर तिच्याद्वारे होणाऱ्या सूडालाही सामोरे जावे लागते.
  
  तिसऱ्या दिवशी या गौरी महात्म्याची कथा वाचली जाते. कथावाचन संपायच्या आत गाठी पाडाव्या लागतात. आरती होते, मंत्रपुष्पांजली होते. यजमान तिच्यासमोर नतमस्तक होऊन नाक घासतात. संध्याकाळी शेजारच्या स्त्रियांना हळदी, कुंकू लावले जाते, आणि 'पुनरागमनायच' म्हंटले जाते. त्या त्यांच्या गावी निघून जातात. सर्वांना हुरहूर लागली असते. 'पुनरागमनायच' यात अनेक अर्थ, माझ्या मते दडले आहेत. तुझ्या येण्याने सतत सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे अखंड पुनरागमन होत राहो, नातेवाईकांच्या भेटीचे पुनरागमन होत राहो, प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांचे चीज होऊन तुझ्या स्थिर आणि चिरंतन रुपाचे पुनरागमन होत राहो, तू, शक्तीरुप आहेस, आमच्यातल्या शक्तींचे, सामर्थ्याचे, जिद्दीचे, यशाचे महत्व जगाला दाखविण्यासाठी पुनरागमन होत राहो, स्त्री ही अबला नसून सबला आहे, हे, तू परोपरीने पटवून दिले आहेस; त्याची जाणीव जगामध्ये अखंड जागृत राहो, कोणत्याही स्त्रीवर अन्याय न होवो, यासाठी, हे गौरी, तुझे अखंड पुनरागमन होवो...... असा 'पुनरागमनायच' या शब्दाचा व्यापक आणि उदात्त अर्थ आहे.
   आजही अनेक घरांतून कुळाचाराप्रमाणे हा सण साजरा केला जातो. आमच्या पाटखेडकरांकडे सध्या गौरींचे आगमन अमरावतीला होते. मोठ्या काकांचा नातू केयूर पाटखेडकर याच्याकडे!! त्याची पत्नी श्रुती ही M.E. असून सध्या स्थानिक Engineering कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, आणि आता P.H.D. करीत आहे. आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम म्हणजे 'श्रुती.' लुगडे, दागिने, नथ घालून प्रसन्न चेहऱ्याने ती सासवांना यादिवशी सोवळ्यात मदत करीत असते. सर्व नैवेद्य घरीच बनविला जातो. अनेक मंडळी जेवायला असतात. पाटखेडकरांच्या कर्तबगार सुनांपैकी हीही एक. 'श्रुती', तुला या लेखाद्वारे माझ्यातर्फे सलाम!! Keep it up!!!

  आमच्या सोसायटीत 'शास्त्री' यांच्या घरी माझ्या आईला गौरीपूजनाचे आमंत्रण होते. आई आरतीच्या वेळी गेली आणि तिने महालक्ष्मी समोर स्वहस्ते बनविलेले अनरसे ठेवले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल तिला पुन्हा त्यांनी दर्शनाला आमंत्रित केले. अनरश्यांची काय तारीफ केली हो सगळ्यांनी!! त्यांच्या घरच्या स्त्री वर्गाने आईकडूनच अनरसे करण्याचा आणि शिकण्याचा निश्चय केला; तिच्या देखरेखीखाली!! 'तुम्ही इतक्या सुशिक्षित असूनही ही पक्वान्नें बनविण्यात पारंगत आहात आणि सुगरण आहात; जे की आज दुर्मिळ आहे' - अशा शब्दांत त्यांच्याकडील पुरुषवर्गाने तिचे खूप कौतुक केले. सोसायटीत आईला खूप मानाची आणि आदराची वागणूक मिळते. तिने बनविलेल्या अनरश्यांचा आस्वाद आत्तापर्यंत अनेकांनी घेतला आहे. 'अनरसा' तिनेच करावा; इतका मऊ आणि देखणा अनरसा खायला मिळणे हे भाग्याचेच! हा पदार्थ बाहेरुन मागविण्यात मजा नाही. तो खूपच कडक आणि बेचव असतो. दरवर्षी या सणाला आमच्याकडे अनरसा केला जातो.
   ....... एकूणच काय तर सगळीकडे निसर्गसौंदर्याचा फुलोरा असतो. बालगोपाळांची तर खूपच मजा असते. सगळीकडे आनंदीआनंद आणि उत्साहाला पारावार नसतो.
  हे गौरी, तू, तुझ्या आगमनाने आम्हा सगळ्यांना पूर्णानंद देतेस!! माझ्या अल्पमतीने मी तुझे तीन दिवसांचे महात्म्य वर्णन करुन, तुला शब्दरुपी फुलोरा अर्पण करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. हे सरस्वती, हे अंबिके, हे गौरी, हा फुलोरा गोड मानून घे. सेवा मानून घे आई.
   "ॐ श्री महालक्ष्मी च विद्महे, विष्णूपत्नीच धीमही, तन्नौ लक्ष्मी प्रचोदयात." -  गौरीर्पणमस्तु.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        ११/९/२०१६.

Monday, 5 September 2016

श्रीगणेशा

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जयाजी स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥ म्हणे निवृत्‍ति दासु । अवधारिजो जी ॥२॥ अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥ मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥ हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ॥ ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥ - संत ज्ञानेश्वर. 
'गजानना, श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया.' 'प्रथम तुला वंदितो, कृपाळा..... गजानना, गणराया.' - अशा अनेक ओव्या, गाणी आणि कवितांनी हे भाद्रपद महिन्यातील दहा दिवस मंतरलेले राहणार! कोणताही यज्ञयाग असो, सण, समारंभ असो, उत्सव असो, श्रीगणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. गणेश.... गणाधिप, गणनायक, गणराज, गणांचा म्हणजेच लोकांचा राजा; गणपती. 'गणपती' हा 'गुणपती' सुद्धा आहे. वडील शंकर आणि माता पार्वतीने त्याचे नाव सुरुवातीला 'गुणेश' ठेवले होते म्हणतात. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या या गणेशाला संगीत, नृत्य, गायन, वादन, बुद्धीचातुर्य, ज्ञान, तंत्रज्ञान युद्धकौशल्य...... इ. इ. सर्व गुणवैशिष्ट्ये आहेत. त्याच्या या सर्वगुणवैशिष्ट्यांशी निगडित अनेक कथाही प्रसिद्ध आहेत. 
 'ॐ कार प्रधान रुप गणेशाचे l हे तिन्ही देवांचे जन्मस्थान l अ कार तो ब्रह्मा, ऊ कार तो विष्णू, म कार महेश जाणियेला'l 
गणपतीला सहस्त्र नामें आहेत. प्रत्येक नावाचीही वेगळी कथा आहे. 'वक्रतुंड', 'विघ्नविनाशक,' 'एकदंत'.... या त्यापैकी प्रसिद्ध कथा. अष्टविनायकांची महती तर काय वर्णावी? तेथील प्रत्येक स्थानाची आख्यायिका निराळीच! 
  लोकमान्य टिळकांनी एकूणच भारतीय समाजात एकजूट राहावी, सगळीकडेच सामाजिक व राजकीय समता नांदावी या उद्देशाने आपला देश पारतंत्र्यात असतांना महाराष्ट्रात प्रथमच गणपतींना सार्वजनिक स्वरुप प्राप्त करुन देण्याचा श्रीगणेशा केला. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्याला वंदन तर केले जातेच; पण आपण सर्वजण एक वाक्य नक्कीच उच्चारतो, 'चला, तर मग श्रीगणेशा करु या'. मला आईने काळ्या पाटीवर प्रथम 'श्रीगणेशा' गिरवायला लावले. लाल कमळ, जास्वंदाचे फूल, २१ दुर्वांची जुडी, २१ मोदक त्याला महत्प्रिय! यासोबतच बेल, तुळशी, अर्जुन(वनस्पतीचे नाव), शमी, आघाडा, केना, अशा २१ वनस्पती त्याला याकाळात अर्पण करावयाच्या असतात. आहे की नाही, तो स्वतःच 'इको फ्रेन्डली??.' त्यानेच दिलेले आपण त्याला अर्पण करीत असतो. त्यात आपला अभिमान तो कसला? 
'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' असा नामघोष आपण करतो; या ओळींनाही गणेशाचे परमभक्त असलेल्या 'मोरया गोसावी' यांच्या भावभक्तीचा स्पर्श आहे. इथे हा देव भक्ताच्या नावाने ओळखला जातो. हा नामघोष केल्याशिवाय या उत्सवाला परिपूर्णता येत नाही. या उत्सवातील दहा दिवसांनाही आगळेवेगळे महत्व आहे. ऋषिपंचमी, गौरींचे आगमन हे त्यापैकी महत्वाचे! 'ऋषिपंचमी'- शेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. 'ऐसा सोहळा न देखियेला डोळा' असे वातावरण असते. यादिवशीच्या  शेगाव नगरीला दिव्य स्वरुप प्राप्त होते. वातावरणात सगळीकडे मंगल लहरी पसरतात. 'गण गण गणांत बोते' या महाराजांच्या मंत्राचा अखंड नामघोष सुरु असतो. 'गण' म्हणजे लोकांचा समूह! समाजातल्या सर्व लोकांमध्ये ईश्वरी तत्व आहे, असा संदेश देणारा हा मंत्र. महाराजांचे नावही 'गजानन!' त्यांना गणेशाचाच अवतार मानले जाते. एकूणच 'बाप्पा' येण्याच्या आधीपासूनच सगळ्यांनी मनाने त्याच्या स्वागतासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीचा उत्साहाने श्रीगणेशा आधीच केला असतो. तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. अखिल महाराष्ट्राचे लाडके दैवत. बाप्पाची अनेक हिंदी आणि मराठी गाणी प्रसिद्ध आहेत. 'अष्टविनायक' या मराठी सिनेमातील गाणी तर खूपच सुंदर आहेत. 'अष्टविनायका, तुझा महिमा कसा', या गाण्यांतून आठ ठिकाणच्या विनायकांची कथा अतिशय सुरेल आणि सुंदर शब्दात वर्णिली आहेत. लहान, थोर, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, वेगवेगळ्या जाती धर्मांचेसुद्धा, या गणाधिपाचे भक्त आहेत. मूर्ती छोटी असो की मोठी, सर्वांचेच चित्त वेधून घेणारी आणि आकर्षक; म्हणूनच त्याला 'मंगलमूर्ती' म्हणतात. या दिवसांत मन आपोआपच विविध गणेशमय गाण्यांवर तरंगायला लागते. आवाज कितीही भसाडा आणि बेसूर असला तरी ही गाणी गुणगुणावीशी वाटतात. सगळीकडे उत्साहाचे, चैतन्याचे, भक्तिमय, संगीतमय आणि positive vibrations पसरविणारे वातावरण तयार होते. 
   या उत्सवात अनेकजण वेगवेगळ्या संकल्पांचा श्रीगणेशा करतील. मग ते सार्वजनिक मंडळांद्वारे राबविलेले सामाजिक उपक्रम असोत की वैयक्तिक असोत! टिळकांना शुद्ध अंतःकरणातून आणि देशप्रेमाच्या भावनेतून, सामाजिक जाणिवेच्या जागृतीतून या उत्सवाची सफलता अपेक्षित होती. आपण याबाबतीत खरंच स्वातंत्र्योत्तर काळात यशस्वी आहोत का?? असा सवाल आज मनात आला. मध्यंतरीच्या काळात या उत्सवाला बीभत्स रुप आले होते. अनेक मंडळे त्यासाठी कारणीभूत होती. आज सरकारला कायदे करावे लागले. ध्वनिप्रदुषणाचा मारा त्यात प्रामुख्याने होता. 'इको फ्रेन्डली' या संकल्पनेचा श्रीगणेशा करावा लागला. टिळकांच्या काळात गणेशोत्सवात 'व्याख्यानमाला' आणि 'संगीत मेळावे' आयोजित केले जात, त्यामुळे समाज प्रबोधन होई. आजही बरीच मंडळे सामाजिक भान ठेवून वेगवेगळे उपक्रम राबवू शकतात. उत्साहाला जसे मोल नसते तसेच सेवेलाही मोल नसते. या सर्वात महत्वाची असते ती सर्वांच्या मनाची शुद्धता. शुद्ध आणि सदाचारी मनाची माणसेच आज दुर्मिळ झाली आहेत. भेदाभेद, एकमेकांमध्ये चढाओढ, यश मिळविणा-याला पुढे जातांना खाली खेचण्यासाठी काय वाट्टेल ते प्रयोग करणे, मनात द्वेष आणि मत्सराची भावना, सूडाची भावना, खून, चोरी, लांडीलबाडी, हे दुर्गुण असलेले काही लोक समाजाला कलुषित करीत आहेत. देशात, किंबहुना सर्वच जगात संस्कारी, शुद्ध आणि पवित्र मन असलेल्या अनेक लोकांची साखळी निर्माण होईल तरच सगळीकडे 'सुराज्य' नांदेल. कौरव आणि पांडव जर एकत्र असते तर ते १०५ होते. पण....दुराचार, अनिष्ट नीती यांमुळे त्यांचाच नाही तर संपूर्ण हस्तिनापूरचा विनाश झाला. 'न भूतो न भविष्यती' असा!!  एकोप्याला किती महत्व आहे, याचे हे सबळ उदाहरण! 
 या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व युवावर्गाने चांगले संकल्प करु या आणि शुद्ध अंतःकरणाने ते तडीस नेण्याचा प्रयत्न करु या. संकल्पसिद्धीचा दाता आपल्यासोबत आहेच. नवनवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकू या. आपण ज्या कुठल्याही क्षेत्रात काम करतो, ते मन लावून करु या; अर्थात सर्वांना सोबत घेऊन!! एकजुटीने!! सार्वजनिक गणेश मंडळातही अनेक तरुण कार्यकर्ते असतात. वर्गणीतला काही भाग शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांसाठी, अशिक्षित लोकांना शिक्षण देण्यासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी वापरु या. युद्धात गणपती देवांचा सेनापती होता. त्यानेच त्याकाळी प्रथम महिलांना फौजेत सामील केले, अशा कथा आहेत. 'प्रथमेश' हे त्याचे आणखी एक नाव. आपण बाप्पाजवळ वेगवेगळ्या मागण्या करण्यापेक्षा यानिमित्ताने त्याला आपण काय भेट देऊ शकतो? याचा विचार करु या. वेगवेगळ्या सामाजिक कार्यांचे सारणरुपी अमृतमयी दिव्य मोदक त्याला अर्पण करु या. तर आणि तरच हा उत्सव ख-या अर्थाने सफल होईल. 
चला तर मग, लावू या निरागस सूर??
करु या श्रीगणेशा........

 मृदुला मुकुंद पाटखेडकर.
         ५/९/२०१६.