Friday, 29 April 2016

ज्ञानवेध

   "समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा?
   कोठुनि फुलांपरी वा मकरंद मिळावा
  जात्याच रुक्ष या एकच त्या आकांक्षा 
 तव आंतरअग्नि क्षणभरी तरी फुलवावा"
    - कुसुमाग्रज.  खूप व्यंग्यार्थ प्रकटविणारी भावना. 
  "मधु मागसि माझ्या सख्या परी 
  मधुघटचि रिकामे पडति घरी" - असे भा.रा.तांबे खूप विनयाने म्हणतात. सारे आयुष्य ज्याने ज्ञानपिपासेत आणि काव्याचा आकंठ आस्वाद घेण्यात आणि देण्यात घालविले अशा व्यक्तींचे आयुष्य जीवनानुभवाचा पुरेपूर प्याला पिऊन झाल्यानंतर राहिलेल्या जीवनतळाच्या 'समिधा' बनलेल्या असतात. झिजून झिजून शुष्क झालेल्या 'समिधा'(यज्ञात अग्नी तयार करण्यासाठी, विशिष्ट वनस्पतींच्या समिधा आवश्यक असतात. त्या,त्या क्षेत्रातील पुरोहितांनाच माहीत असतात.) जीवनानुभवाला कोळून पिणारा व्यक्ती वयोवृध्दच असला पाहिजे असे जरुरी नाही. जीवनानुभवाचा कस घेण्याजोगते त्याचे वय नसले तरी परिस्थितीने तो इतका तयार झालेला असतो की ज्ञानवृध्द त्यालाच म्हणता येईल. 
   नाना पाटेकरांनी 'भूक आणि अपमान' याविषयी लिहिलेल्या अनुभवात हा पडताळा घेण्यात येतो. 'भाकरीचा चंद्र' ही नारायण सुर्वे यांची प्रसिध्द कविता आहे. ते गिरणी कामगार होते. कामगारांसाठी त्यांनी बरेच कार्य केले. मुंबईसारखे क्षेत्र, कामगार चळवळीत सहभाग, कामगारांविषयी जिव्हाळा आणि स्वतःही दलित समाजाच्या परिस्थितीला तोंड देण्यामुळे, शिवाय कवी असल्यामुळे साहित्यिक क्षेत्रातही त्यांच्या उद्गारांना मान्यता प्राप्त झाली. पाठ्यपुस्तकांतून त्यांच्या कवितांचा समावेश झाला. श्रीकृष्णाने दिलेल्या, द्रौपदीच्या थाळीला चिकटलेले पान खाऊन, तृप्तीचा ढेकर देऊन, द्रौपदीवरील, दुर्वास व त्यांच्या हजार शिष्यांची भूक भागविण्याचा, प्रसंग कृष्णाने निभावला. ही कथाही बरेच सुचवून जाते. 'भूक' ही सर्व आसक्तीची जननी आहे. भुकेला पर्याय नाही. 
   विश्वामित्राने सृष्टी तर तयार केली; पण त्याची ती सृष्टी शुष्क करुन टाकण्याचे काम इंद्राने केले. एक पानही जिथे शिल्लक नाही तिथे विश्वामित्राचीच भूक कशी भागणार? कोणत्यातरी घाण जागी आढळलेले शुष्क पान खाण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. अशी असते भूक - माणूस काय वाटेल ते करतो. 
 चपातीच्या सुवासाची सर कोणत्याही फुलाच्या सुवासाला नाही असे पाटेकर म्हणतातच, तसेच भाकरीमध्ये सुर्व्यांना चंद्राची शितलता दिसू लागते. जीवनाच्या ज्या मुलभूत गरजा आहेत, त्या तरी पुरविण्यासाठी ज्यांना हाडाची काडे करावी लागतात, असे बरेचजण आपल्या समाजात आहेत. प्रत्येकाच्याच प्रतिक्रियेला उजाळा मिळतो असे नाही. १ मे हा कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनही आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नेते प्रयत्न करीत आहेत. श्रीहरी अणे आणि मा.गो.वैद्य पुढाकाराने बोलत आहेत. प्रतिवाद होत आहेत. ही सर्व चर्चा प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे हे तर दाखवून देतेच; पण प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुणीतरी अटीतटीने पुढे येऊन 'आयुष्याच्या समिधा' केल्याशिवाय होणार नाही हेही दाखवून देते. 
  "अमुचा प्याला दुःखाचा l डोळे मिटुनि प्यायाचा l पिता बुडाशी गाळ दिसे l त्या अनुभव हे नाव असे" l - केशवसुत. 
 प्रत्येकाची प्रतिक्रिया भिन्न असते; पण आयुष्यातल्या अनंत दुःखाशी असलेली ओळख दाखवून देण्याचे कार्य करीत असते. 
  "आकाश अंत न कळोनिहि अंतरिक्षी
   आकाश आक्रमिति शक्त्यनुसार पक्षी"
  - वामन पंडीत. 
   काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, षड् विकारांच्या आधीन असलेल्या माणसाला अनुभवांची काय कमतरता? जीवनाची शाळा आपोआपच व्यक्तीला तरबेज करते. चांगल्या गोष्टींची प्रेरणा व्यक्तीला खूप पुढचा रस्ता सुकर करुन देत असते. एकदा वाट सापडली की - त्या वाटेने चालत राहिल्यास इतर वाटा येऊन मिळून रस्ता प्रदीर्घ होतो. रस्ता कधीच संपत नाही आणि चालणेही थांबत नाही. 
   "थांबला तो संपला l चालत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे" l - हे तर निश्चितच. वाटा चोखाळण्याची इच्छा वाढत जाते आणि ज्ञानाच्या कक्षा खूपच रुंदावतात. 'मळवाटा' तयार होतात. असे हे व्यासंगाचे रुप असते. 
   चरित्रे-आत्मचरित्रे हा विभाग जरी घेतला तरी पूर्वीपासून माणसाला, एक-दुस-याला कथन करण्याची जी हातोटी आहे, त्यातून कथा, आख्यायिका, दंतकथा विस्तारत गेल्या. जात्यांवर दळतांना काव्य स्फुरत गेले. वेदसुध्दा मुखोद्गत पध्दतीने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचले. 'लक्षात ठेवणे' ही जी बुध्दीची 'स्मृती' नावाची देणगी आहे त्याद्वारे तर माणूस कितीतरी गोष्टी इतरांपर्यंत पोहचवू शकतो. मेंदू हा इतका संग्राहक आहे की त्याच्या कार्यक्षमतेची बरोबरीच नाही. पाहिजे तितका उपयोग आपण करुन घेत नाही. क्षमता खूप पण उपयोग कमी अशी परिस्थिती आहे. तेव्हा उपयोग असलेल्या इतक्या कार्यशक्तीची हेळसांड करणे म्हणजे स्वतःच्याच पायावर दगड मारुन घेणे होय. 
  ज्ञान कोणीही चोरुन नेऊ शकत नाही. मनुष्य संपेल पण त्याचे ज्ञान जर त्याच्यानंतरही कोणी उपलब्ध करुन दिले तर त्याला मरण नाही. गोपाळ गणेश आगरकरांची जन्मशताब्दी त्यांचा लेखसंग्रह प्रसिध्द करुन करण्यात आली. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ७८ व्या पुण्यतिथीला त्यांचे निबंधमालेतील चांगले चांगले लेख (चुणून चुणून) संपादित करुन पुण्यस्मरण करण्यात आले. 
 'जीवनगौरव' ग्रंथ म्हणून अनेकांचे लेखही त्या विशिष्ट व्यक्तीच्या सन्मानार्थ प्रकाशित केले जातात. एकूण काय, आज काळ असा आहे की प्रत्येकाचे ओळखपत्र त्याच्याजवळ असतेच. व्यक्त होण्याची कलाही खूप उन्नत आहे, त्यामुळे इतिहासाला खाद्य भरपूर आहे. प्रत्येकाने हे खाद्य जास्तीतजास्त चविष्ट बनविण्याचा प्रयत्न केल्यास इतिहास खूपच समृध्द आणि सरस होईल.   
  एलिझाबेथ राणीचे खजिनदार Lord Baley ला राणीने स्पेन्सरच्या सर्व प्रसिध्द काव्याबद्दल काही इनाम दिले या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटले. यःकश्चित गाणे केल्याबद्दल एवढे इनाम! काय वेड आहे हे! असे आश्चर्योद्गार त्याने काढले म्हणतात. कोणा काव्याची कोणी फार प्रशंसा केली असता एका तत्वज्ञाचा उद्गार निघाला, 'अः यात काय आहे? या काव्याच्या योगाने बाजारात दाणे स्वस्त झाले की काय?' मला सांगा; अशा लोकांना उपयुक्तता या मूल्यापलीकडे दुसऱ्या कशाचेच गम्य नसते. 
      "इतर पापफलानि यथेच्छया
      वितरितानि सहे चतुरानन
     अरसिकेषु कवित्वनिवेदनं
शिरसि मा लिख मा लिख मा लिख"
    "हे चतुरानना, माझ्या पातकाबद्दल मला आणखी काय पाहिजे तितकी शासनें कर; पण बाबा, अरसिकाला कवित्व सांगत बसण्याची कटकट मात्र माझ्या कपाळी नको, नको, नकोच लिहू!" - या प्रार्थनेवाचून आणखी काय म्हणावे? 
   ज्ञानाला कोणत्याही बक्षिसाच्या मर्यादेत बसविता येत नाही. अधिकाधिक ज्ञानाचा हव्यास वाटणे हेच त्याचे बक्षिस आहे आणि हीच इतिकर्तव्यता! ज्ञानाची भूक माणसाला खूप उच्च पातळीवर नेते. या भुकेला खाद्य कधीच कमी पडणार नाही. जीवनयज्ञात जळून ज्या आयुष्यांच्या समिधा झालेल्या असतात व त्या समिधांचीही जी 'विभूति'(भस्म) तयार होते त्यामुळे ते 'विभूतिमत्व' खूपच सामर्थ्यशाली आणि प्रेरणादायी होते. एरवी कोणत्याही लाकडाच्या झालेल्या राखेला तशी काहीच किंम्मत नसते, पण 'भस्म' हे वैराग्याचे प्रतीक आहे. सर्व आयुष्याचा 'प्रसाद' जो वाटू शकतो तीच व्यक्ती खरी भजनमार्गी असते. खरे भजन म्हणजे तुमचा आहार, परिवेश, संस्कार, सर्वच आचार-विचार हे निर्मळ असावे लागतात. आयुष्याचा होम करणाऱ्या व्यक्तींचे विभूतिमत्व कालातीत, अजय, अमर असते. हा मार्ग अवलंबिणे अत्यंत कठीण, शुक्लकाष्ठ पाठीमागे लावणारे असते. मोठ्यामोठ्यांची तें तें फें फें होते. 
 'तेथे पाहिजे जातीचे l येरागबाळ्याचे काम नोहे' l 
   ज्ञानवेधाला कोणतीही मर्यादा अर्थातच नाही. नोबेल पारितोषिक मिळविणारे रविंद्रनाथ टागोर जसे आपल्याला आपले वाटतात, त्याचप्रमाणे विल्यम शेक्सपिअरही आपण विसरुच शकत नाही. ४०० वर्षे झाली त्याला जाऊन! जगभर आता त्याच्यावर निरनिराळे कार्यक्रम होणार आहेत. मृदुला, माझी मुलगी इंग्रजीची M.A. आहे. तिच्या निमित्ताने मीही तिच्या त्या M.A. च्या काळात इंग्रजी साहित्याचा आस्वाद घेतला. तिला शेक्सपिअरची स्वगतें पाठ असायची. शेक्सपिअर मनोवैज्ञानिक आहे की तत्वज्ञ, की शेतकरी कुटुंबातील ३ रे अपत्य असलेला एक भावनिक जिव्हाळा जपणारा सामान्य माणूस, की जागतिक कीर्तीचा प्रतिभावंत असे अनेक प्रश्न निर्माण करणारे त्याचे साहित्य हा जागतिक साहित्याचा मानदंड ठरला आहे. 'अमर साहित्यिक' आणि त्यांचा अभ्यास करायला जन्मानुजन्म अपुरे पडतील, कारण हा स्त्रोत कधी न संपणारा आहे. 
 प्रत्येक विषय, प्रत्येक भावना, प्रत्येक कलाकृती ही अविरत आपल्या 'ज्ञानवेध' चा विषय केल्यास तुम्हीच सांगा, वेळ कुठून पुरणार?

     संगीता पाटखेडकर.
        २९/४/२०१६.

Tuesday, 26 April 2016

स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती?

मोरोपंत पराडकर यांनी आपल्या प्रचंड ग्रंथसंभारापैकी बहुतेक सर्व महत्त्वाचे काव्यग्रंथ बारामतीस लिहिले. बारामतीकर जहागिरदार जोशी यांना पुराण सांगणे आणि रसिकजन संतोषाकरिता व परमेश्वर प्रसादाकरिता काव्यरचना करणे हेच दोन उद्योग त्यांनी नाईकांच्या आश्रयास आल्यानंतरच्या आयुष्यात केले. 
 केकावली रचल्यानंतर श्रीभगवान पंतांपुढे प्रत्यक्ष प्रकट झाले अशी आख्यायिका आहे. पूर्वी कवितांच्या भेंड्यांचा कार्यक्रम, शाळा, कॉलेजातून कवितांचे वाचन व पठन-पाठन व्हावे या उद्देशाने होत असे. स्पर्धा खूप गाजत असत. भेंड्यांच्या वह्या तयार केल्या जात. जुन्या मराठी घरांतून त्या त्या अक्षरांवरील कविता साठवून संग्रह घरोघरी साधारणपणे सापडतील. 
  'सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो, कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंघ्रि कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो' - ही केका अनेकांना पाठ असते. 
  'मुक्तमयुरांची भारतें' हा डॉ. ना. गो. नांदापूरकर यांचा डॉक्टरेट मिळविलेला प्रसिध्द ग्रंथ आहे. मुक्तेश्वर, मोरोपंत हे प्रसिध्द पंडित कवी. पंडिती काव्याचे प्रमुख आधारस्तंभ. पंडिती वळणाची भाषा म्हणजे लवकर समजणार नाहीत असे शब्द त्यांच्या काव्यात असणारच! तळटीपांशिवाय अर्थ कळण्याला भाषेचे ज्ञान त्याच तोडीचे असावे लागते. तळटीपा शोधाव्या लागल्या की समजावे त्या लोकांची भाषा आणि ज्ञान पराकोटीचे आहे. 
   कित्येक केका मला स्वतःला पाठ आहेत कारण भेंड्यांच्या स्पर्धांमध्ये आम्ही आवर्जून भाग घेत असू. पाठांतराची एक किमया असते. स्मरणशक्ती वाढविण्याचे सामर्थ्य पाठांतरात आहे; आणि योग्य त्या ठिकाणी योग्य ते उल्लेख तुम्ही उद्धृत करु शकत असाल तर त्याचा आनंद काही वेगळाच आहे. आजच्या माझ्या लेखाचा उद्देश एवढाच आहे की, या केकांमधून नारदासंबंधीचे उल्लेख जाणवून देणे. 
 मी एकेक केकाही देते व त्याचा अर्थही सांगते. 
 केकाः- १) 'प्रभो तुज न मोहिनी भुलवि, मोहिला तोहि ती, त्यजी जन; नव्हे तशी, तुज तुझी कथा मोहिनी; निजानुभव तू पहा; जशी महौषधी पारदा, तुला स्थिर बळें करी, कळविले तुला नारदा'
  अर्थः-  हे ईश्वरा, मोहिनी इतरांना भुलविते खरी पण ती तुला भुलवू शकत नाही. ज्या इतरांना तिने भुलविले त्यांना (दैत्यांना) तिने टाकून दिले. तुझी कथा तशी नाही, ती तुला स्वतःला मोह पाडते.(नादावून सोडते.) हे पटवून द्यायला लांब कोठे जायची जरुरी नाही. आपल्या चरित्रातील प्रसंग तू आठवून पहा; म्हणजे तुझ्या लक्षात येईल की, ज्याप्रमाणे काही अमूल्य वनस्पतींच्या योगाने पारा स्थिर होतो, त्याप्रमाणे कथा तुला स्वसामर्थ्याने आपल्या ठिकाणी खिळवून टाकते, असे तू स्वतः नारदाला सांगितले आहेस. 
   केकाः- २) 'सुरर्षि जवळी स्वयें वदसि 'तत्र तिष्ठामि'; या तुझ्याचि वचनें म्हणे तुज कथावश स्वामिया! 
  जसा स्थिर कथेत तू, स्थिर करी तसे या मना, स्वभक्त सुर पादपा! सफळ हे असो कामना' 
 अर्थः-  देवांचा ऋषि जो नारद, त्याच्यापाशी तू 'माझे भक्त गाती जेथे l नारदा मी उभा तेथे' l - असे म्हणालास; या तुझ्याच वचनास अनुसरून मी तुला 'कथावश' (कथेच्या अधीन) असे म्हणतो. तुझ्या कथेमध्ये जसे तुझे अढळ वास्तव्य असते, तसे हे (माझे) मन कथेमधून हलणार नाही; असे कर. आपल्या भक्तांच्या कल्पवृक्षा! हा माझा मनोरथ सफल होवो!
 केकाः- ३) सुरर्षि म्हणतो, 'तुझे यशचि धन्य यो गायना मला; कवि म्हणोत, ते सुखद अन्य योगायना, विमुक्ति बहु साधनें तदितरे गणीनाच तो; सजूनि वरवल्लकी तव सभांगणी नाचतो'.
  अर्थः-  देवांना ऋषि नारद म्हणतो, "तुझे यशच सर्वोत्तम आहे; त्याचे गायन माझ्याकडून घडो. योग वगैरे अन्य मार्ग सुख देणारे आहेत, असे ज्ञाते लोक म्हणत असतील तर म्हणोत. मला ते मान्य नाही."
 मोक्ष मिळविण्याची जी इतर पुष्कळशी साधने आहेत, त्यांना तो मोजीत नाही; आणि आपली छानदार वीणा ('महती' नावाची) सज्ज करुन तुझ्या कथाकीर्तनाच्या मेळाव्याच्या जागेत भक्तिभराने नृत्य करतो. 
  केकाः- ४) 'तुझे चरित सन्मुखे श्रवण जाहलें यास्तव, प्रजापति सुतत्व ये, करिति साधु ज्याचा स्तव; स्वनीचपण मागिले बहु दया अशी नारदा 
स्मरे घडिघडी, प्रभो! भवपयोधिच्या पारदा' 
  अर्थः-  भगवत् भक्तांच्या तोंडून तुझ्या लीला ऐकण्यात आल्यामुळे तो नारद पुढील जन्मी ब्रह्मदेवाचा पुत्र झाला. तो असा की, सगळे सज्जन त्याची कीर्ती गात असतात. संसार समुद्रातून तारुन नेणा-या परमेश्वरा! नारदाला आपली पूर्वजन्मीची निकृष्ट स्थिती (दलित अवस्था) आणि तू त्याच्यावर याप्रमाणे केलेली महान कृपा घटकोघटकी आठवते. 
   अजून एक केका देते. त्यात नारदाचा उल्लेख नाही, पण मोरोपंतांचे शब्दसामर्थ्य दाखविणारी ही केका मला आवडते म्हणून उल्लेखिते.
  'अतर्क्य महिमा तुझा, गुणहि फार बा! 
  हे; विधी श्रुतिज्ञहि म्हणे सदा, स्तविल आमुची कें वि धी? 
 तरी जन यथामति स्तवुनि जाहले सन्मति; स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती?' 
    सारे आयुष्य काव्याच्या भक्तिनंदात घालविणारे मोरोपंत - त्यांचे काव्य वाचल्यानंतर आपली शब्दसंपदा वाढली, भाषेचे माधुर्य आणि गोडवा आवडला आणि काव्यातील लय कशी असावी याचे लयदार वळण मनाला कधी चटका लावून गेले हे कळत नाही. ठसा म्हणतो ना, तो असतो असा वसा! काव्यामृताचे काही थेंब आस्वादिल्यानंतर पूर्ण अमृतकुंभच शोधणे, हेच घडते नाही का? 

        संगीता पाटखेडकर.
           २६/४/२०१६.

Monday, 25 April 2016

विजिगीषु निर्णय

निर्णय इतिहास घडवितो, इतिहास बदलतो. निर्णायक निर्णय तडीस नेताना वाटेत येणाऱ्या ब-या-वाईट अडथळ्यांना पार करणारे महाभागच शेवटी इतिहासाचे साक्षीदार होऊन इतिहासाचा मैलाचा दगड बनून जातात. काही निर्णय वैयक्तिक असले तरी त्या व्यक्तीशी संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावरही वैयक्तिक निर्णयाचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक विधानाचा सखोल अभ्यास केल्याशिवाय, स्वतःच्या संदर्भात ती विधाने कशी लागू पडतात याचे प्रत्यंतर घेतल्याशिवाय, उदाहरणांनी विधानांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करुन पाहिल्याशिवाय त्या विधानांचे खरेखुरे महत्व समजणे कठीणच जाईल! 
  आयुष्य, मग ते व्यक्तीचे असो की समाजाचे की राष्ट्राचे की जागतिक की पारमार्थिक, ऐहिक की आध्यात्मिक, निर्णयांची अखंड मालिका असते. निर्णय घेतला तो बरोबर ठरला तर अर्थातच आनंद नाहीतर निर्णयक्षमता नसण्याचा शिक्का बसलाच म्हणून समजा! कोर्टाला, निर्णय देताना सबळ पुराव्यांचा आधार घ्यावा  लागतो. ते पुरावेही कितपत योग्य असतात हा प्रश्न पुन्हा अलाहिदाच! रामदासांनी 'सावधान' होण्याचा जो निर्णय घेतला तो त्यांच्याबरोबर अनेकांचे आयुष्य घडवून गेला. निर्णय घेणे एकवेळ तत्काल बरेचदा असते. तिरीमिरीतल्या निर्णयापेक्षा विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाची खात्री जास्त असते. तत्कालच्या निर्णयाला, भविष्य अंधारात जाण्याची शक्यता असते. शिवाजीने आग्र्याहून सुटकेसाठी पेटा-यांचा जो वापर करुन घेऊन शक्कल लढविली ती यशस्वी झाली म्हणून शिवाजी पुढचे कार्य करु शकला. नाहीतर काय झाले असते? उदाहरणांची मुळीच कमतरता नाही. कारण पावलागणिक निर्णय घेऊनच पुढे सरकावे लागते. 
 शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांमुळे, पाण्याच्या कमतरतेमुळे जे निर्णय घेतले जात आहेत त्यामुळे समस्या तर कमी होतीलच पण
 भविष्यकाळासाठी श्रमदानाचा पायंडा पडेल. अनेकांसाठी सोदाहरण देण्याजोगी ती घटना ठरेल. 
 राम-रावणाचे युध्द आणि कौरव-पांडवांचे युध्द ह्या आपल्या पूर्वेतिहासातील दोन महत्वपूर्ण घटना. अशी युध्दे झाली नाहीत असे म्हंटले जाते. पहिले महायुध्द व दुसरे महायुध्दही काही कमी नाही. सा-या जगाला हादरा देणारी ही युध्दे समाजजीवन विस्कळीत करुन गेलीत. हे निर्णय सा-या मानवजातीचा पाया ढिसूळ करण्यास कारणीभूत ठरले. 'मूल्य' या शब्दाला फक्त आर्थिक एवढाच अर्थ उरला. 'माणुसकी' हा शब्द तर दूरदूरपर्यंत दृष्टीपथात येईनासा झाला. 
मनाशी युध्द तर अखंडच चालू असते. काय योग्य, काय अयोग्य याचा नीरक्षीरविवेक माणसाला घडवत असतो. प्रत्येकाच्या योग्य, अयोग्यतेच्या व्याख्याही भिन्नच असतात. समूहात असताना माणूस कसा वागेल याचा नेम सांगता येत नाही म्हणतात. खरा माणूस ओळखणे खूपच कठीण आहे. मुखवटे घातलेले चेहरेच जास्तीकरुन दिसतात. 
'आला क्षण, गेला क्षण' असे जीवनाचे स्वरुप आहे. प्रत्येक क्षणाचा नितांतसुंदर उपयोग करुन घेण्याचा निर्णय माणसाला खचितच आनंद देणार! 
 एका नाण्याच्या दोन बाजू असतात. 'चित भी मेरी पट भी मेरी' म्हणणारे असतातच. सुवर्णमध्य साधणारेही असतात. 'वादे वादे जायते गुद्दागुद्दी' वालेही असतात. 'अनेकांचे हित' जेणेकरुन होईल असा निर्णय योग्य ठरेल. पण आजवरच्या राज्यक्रांत्या व एकूणच इतिहासाचा पडताळा घेतला तर मनुष्यहानी, वित्तहानी एकूणच पडझड खूप झाली आहे. तरीही माणूस तोंड देतोच आहे. ढासळून जावे अशी परिस्थिती असतानाही माणूस हिम्मतीने उभा राहिला आहे, असे अनेकवार घडले आहे, इतिहास घटनांची साक्ष हमेशा देतोच आहे; म्हणून सांगोपांग अभ्यास ज्या व्यक्तींचा असेल, अशा, अभ्यासू, विद्वान, व्यासंगी, कार्यतत्पर, जागृत आणि स्पृहणीय निर्माणकौशल्य असणाऱ्या व्यक्ती ज्या समाजात असतील तो समाज आदर्श म्हणावा लागेल. आपण म्हणतो जग जवळ आले आहे कारण या कानाची खबर त्या कानाला तेव्हाच कळेल अशी साधने उपलब्ध आहेत. माणूस जास्तीतजास्त चिकित्सक, जिज्ञासू आणि एकमेकांचे पाहून का होईना काही ना काही लोकोपयोगी कार्य करण्याच्या वृत्तीचा बनतो आहे. नैसर्गिक आपदांवरही विजय मिळविण्याचा प्रयत्न चालू आहे. ही विजिगीषु वृत्ती खचितच अभिनंदनीय आहे. 
  शिवाजीला मुसलमानी सत्तेपासून महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या निर्णयात यश आले म्हणून इतिहास घडला व आधीचा इतिहास बदलला. 
'निर्णय इतिहास घडवितो व इतिहास बदलतो' हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे. निर्णय घेतल्यानंतर त्याची जबाबदारी ज्याची त्याची असते. जी वाट निवडली त्याच्यावर हिरवळ आहे की वणवा हे अज्ञातच असते; पण निवडलेल्या वाटेने चालणे याला बरेचदा पर्याय नसतो. 
'समुद्रमंथनाचा निर्णय' झाल्यानंतर त्याच्यातून अमृत, लक्ष्मी, कामधेनू वगैरे उत्तम गोष्टी निघाल्या पण विषही निघाले ते शंकराला प्राशन करावेच लागले. 'नीळकंठ' म्हणून, म्हणूनच तर तो प्रसिध्द झाला. सीतेचा त्याग करण्याचा निर्णय कठोर होता पण तो रामाने घेतला. पित्याच्या इच्छेसाठी वनवासात जाण्याचा निर्णय रामाशिवाय दुसऱ्या कुण्या मुलाने घेतला असता, असे अशक्यच आहे. रामाबरोबर लक्ष्मणाचा वनात जाण्याचा निर्णय, सीतेचे पतीबरोबर वनात जाणे हे निर्णय सर्वांसमोर एक आदर्श ठेवणारे निर्णय ठरले. इतिहास, इतिहास म्हणजे काय हो? जे अशक्यप्राय वाटते त्या वाटेने जाण्याची विजिगीषु वृत्ती ठेवणारेच इतिहास घडविणारे ठरतात. अर्थातच आधीच्या इतिहासाची सीमारेषा केव्हाच मागे टाकतात. असे अनेकानेक आहेत. शोधा आणि त्यांच्या निर्णयांचा आनंद लुटा.

     संगीता पाटखेडकर.
         २४/४/२०१६.

Friday, 22 April 2016

अतूट ऋणानुबंध

गेले ते सुखी झाले, या जन्मीचे त्यांचे भोग सरले. काहींच्या मते पुढचा जन्म वगैरे नाहीच; त्यामुळे पुढे काही भोगायचा प्रश्नच नाही. किती छान!.........
  जीवनपट हा सुखदुःखाचा विणलेला ताणा - बाणाच! 
'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे 
जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे' - असे कवी म्हणतोच ना! 
कुणाच्या आयुष्यात किती सुखं आणि किती दुःख हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. कारण सुख कोणते आणि दुःख कोणते? याच्या निश्चित व्याख्या ज्याच्या त्यानेच ठरवाव्यात, हेच खरे की नाही! 
पुंडलिकाला मायबापांची सेवा करण्यात परमानंद, तर कुणाला त्यांचे ओझे मानण्यातच आनंद, कुणाला शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांनी होणार दुःख, तर कुणाला उद्योगात पुरेसे खाता आले नाही हे दुःख, कुणाला महारोग्यांच्या सेवेत सापडले जीवनाचे सार्थक, तर कुणाला लोकांच्या उपयोगी पडण्यात गवसतो जीवनाचा अर्थ! म्हणजेच काय? प्रत्येकाची सुखदुःखाची कल्पना असते निराळी. पण इतरांसाठी जगणारी माणसे निश्चितच असतात ना आगळी वेगळी.
पण शेवटी मृत्यू असतोच अटळ - अशा लोकांचा मृत्यू हादरवून टाकतो. 
 पुढे जर काहीच नसेल तर अशा व्यक्ती पुनःपुन्हा जन्माला याव्या आणि त्यांनी समाज उन्नत करण्यासाठी खूप प्रयत्न नेहमीच करत राहावा असे वाटणारच ना! 
न करणाऱ्यांचे काहीच वाटत नाही. 
 'आला आला प्राणी जन्मासि आला, गेला गेला बापुडा व्यर्थ मेला' - असेच उद्गार निघणार! 
खूप चांगले काम करणाऱ्यांची आठवण समाजाने ठेवणे, हीच त्यांच्या अमरत्वाची प्रचीती!
गेलेल्या लोकांची आठवण का येते? याचे उत्तर त्यांचे सत्कर्म हेच ना! मग सत्कर्मी जीवनाला 'ऐल नाही, पैल तैसा, मध्य ना'
पटते ना! पण तरीही सारखे किती कष्ट करायचे त्यांनी? त्यांचीच निवड नियती का करते? याचा विचार करायला हवा! 
नियती म्हणा, चैतन्य म्हणा, शक्ती म्हणा, देव म्हणा, ईश्वर की परमेश्वर म्हणा. तो प्रकट होतोच आहे, कोणत्या ना कोणत्या माणुसकीच्या रुपात. तेव्हा नन्नाचा पाढा लावणाऱ्यांना राहू द्या आकंठ सुखात नास्तिकतेच्या.
आम्ही तर आहोत जाहीर आस्तिक - POSITIVE.
सर्व ठिकाणी चैतन्य अमर आहे यांचा जयनाद देणारे.
'उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे
त्यांनाच पुससी तू, आहे, की तो नाही?' - म्हणतातच ना कुसुमाग्रजांसारखे साहित्यिक आणि आस्तिकही. 
माझे वडील अत्यंत आस्तिक, याचा मला अभिमान आहे. त्यांनी अनेकांची आयुष्ये घडविली; यामुळे आमची मान ताठ आहे. बाबा, तुमच्या स्मृतीस सादर समर्पण.(चैत्र कृष्णपक्ष द्वितीया-श्राध्ददिन)
 जीवनाच्या रामरगाड्याला तुम्ही आस्तिकतेच्या निष्ठेनेच तोंड दिले. 
 'सदासर्वदा देव सन्निध आहे
कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे' - हे रामदासांचे वचन सतत तुमच्या तोंडात असावयाचे. आजचा काळ पाहता वाटते; सुटले तुम्ही पुढच्या सर्व दुःखातून. शेवटी मरण हीच सुटका.
'आपुले मरण पाहिले म्या डोळा l तो सुखसोहळा अनुपम' - तुकाराम. मरणात खरोखर जग जगते. 
'आधी मरण, अमरपण ये मग ते' - भा.रा.तांबे. वगैरे वचने आठवतात. 
 विवेकानंदांनी आश्वासन देऊन ठेवले आहे की, एक ना एक दिवस माणूस परमोच्च पदाला पोहोचणारच! अशी Positive आश्वासने माणसांचे बळ वाढवितात. 
नकारघंटेत माणूस गर्तेत जाणार! 
तुमच्या स्मृतीप्रित्यर्थ हे सर्व मला लिहावेसे वाटले. असे म्हणतात की, मनापासून जर उद्गार निघाले तर ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.

    संगीता पाटखेडकर.
     २३/४/२०१६.

Wednesday, 20 April 2016

आयुष्याची इतिकर्तव्यता

आयुष्य हे एक माणसाला नेहमी कोड्यात टाकणारी विलक्षण चीज आहे. वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी, वाल्या जिथे चोरीमारी, लुटालूट करुन स्वतःच्या कुटुंबाचा निर्वाह करीत असे. तिथे नारद त्या जंगलातून जात असताना, त्यांनाही लुटण्याचा वाल्याने प्रयत्न केला. ते म्हणाले, आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे आणि मग माझ्याजवळ काय जे आहे ते लूट - मनसोक्त! नारद म्हणाले, तुझ्या कुटुंबियांना विचारुन ये की ज्यांच्यासाठी तू इतके पाप करतो आहेस, त्यात ते सहभागी होणार का? तो गेला, त्याला नाही हे उत्त्तर मिळाले. नारद म्हणाले, मग आता एक कर, 'मरा', 'मरा' म्हणण्याऐवजी 'राम', 'राम' म्हण. तुझा उध्दार होईल. वाल्या पश्चात्तापाने पोळून निघाला. नारदाच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याने रामनाम घ्यायला सुरुवात केली. वारुळे अंगाभोवती तयार झाली. भूक, तहान, झोप सगळ्यांवर विजय मिळविला आणि वाल्मिकी ऋषी झाला. हे सर्व आपणा सर्वांना माहीत आहे. 'वाल्मिकी रामायण' लिहिले. त्यांनी लिहिले त्याप्रमाणे 'रामायण' घडले. सीतेला त्यांच्या आश्रमात त्यांनी मुलीप्रमाणे सांभाळून लव-कुशला सर्व क्षत्रियधर्माचे शिक्षण दिले. 'बाप से बेटा सवाई' बनविले. त्यांच्याकडूनच अयोध्येत जाऊन 'रामकथा' गाऊन घेतली. रामाला माहीतही नव्हते ही आपलीच मुले आहेत म्हणून! 
    कोणता प्रसंग आयुष्याचे रुप बदलून टाकेल सांगता येत नाही. लहान मुलांना प्रेरणादायी गोष्टी का बरे सांगण्यात येतात? जिजाबाईने शिवाजी प्रेरणादायी गोष्टींच्या भरवशावरच घडविला. मुलांना इतकी उत्सुकता असते की जीवनाची ओळख त्यांना पालक कोणत्या पध्दतीने करुन देतात यावर त्यांचे पुढचे पाऊल ठरणार असते. चांगल्या-वाईटाचा विधिनिषेध करता येणे आणि सर्व जबाबदाऱ्यांना अटीतटीने सामोरे जाऊन अनेकांचे जीवन सुकर करणे यातच तर 'राम' आहे, 'हनुमान' आहे, 'शिव' आहे. 
'सत्यं, शिवं, सुंदरम्' हेच तर आहे. 
     रामदासांनी हनुमान स्तोत्र किती ओजस्वी, तेजस्वी आणि भारदस्त, योग्य विशेषणे वापरुन केले आहे. 'भीमरुपी महारुद्रा वज्र - हनुमान मारुती 
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना
महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुःखहर्ता धूर्त वैष्णव गायका'
  पूर्ण स्तोत्र देण्याचे प्रयोजन नाही. बहुतेकांना पाठ असते. शाळांमधून पूर्वी शनिवारी हे मारुतिस्तोत्र म्हणवून घेण्याची पध्दत होती. 
    'संस्कार' या शब्दाचा अर्थ संकुचित नाही. जे जे चांगले - अनेकांसाठी हिताचे; मग ते जुने असो की नवीन, त्याचा अंगिकार हाच संस्कार. तो लहान व्यक्तीही मोठ्या माणसावर करु शकतो. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई यांच्यावर संस्कार करणारे कोण होते? आईवडिलांना तर जीवन संपवावे लागले होते; पण सा-या जगावर संस्कार करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. जीवनाच्या शाळेने त्यांना इतके शिकविले की आयुष्याची आसक्ती त्यांना राहिलीच नाही. छोट्याशा आयुष्यात अनेकांना पुरुन उरेल असे साहित्य त्यांनी निर्माण केले. मुक्ताबाईचे 'ताटीचे अभंग' काय सुचवितात! ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर या सर्व भावंडांनीही त्यांचे जीवन संपविले. आयुष्य किती मोठे आहे याला महत्त्व नाही. तुम्ही ते कोणत्या पध्दतीने जगता हे सर्वात महत्वाचे. 
 का बरे रामदासांना 'सावधान' होऊन लग्नमंडपातून पळून जावेसे वाटले? कारण त्यांना 'जीवनाचा राम' खुणावीत होता. जगाचा संसार केला. कुठेही आसक्ती नाही, उलट १३ कोटी जप रामनामाचा, 'श्रीराम जयराम जयजयराम' या त्रयोदशाक्षरी मंत्राचा केला तर राम प्रत्यक्ष दिसतो असे स्वतःच्या अनुभवावरून सांगितले. त्यांचे 'आधी केले मग सांगितले' असे होते. पण आपण नाहीच ना करु शकत! 'आपले मडके कच्चे आहे'. 
  हनुमान व्यायाम शाळा काढल्या जातात. का बरे हनुमानाचे नाव? कारण नावानेच, जे करायचे आहे त्याची कल्पना येऊन जाते म्हणून! 
   रामदासांनी मारुति मंदिरे तयार केली. आजही ती आहेत! मारुतीची उपासना म्हणजे बलाची, शक्तीची उपासना. 'आरोग्य' हा सर्वात मोठा अलंकार आहे. पण ऐकतो कोण? 'हनुमान' चालीसा हाती घेऊन प्रवासातही लोक वाचतात. कारण संकट आले तरी ते निवारण होईल या विश्वासाने!
   'संकटमोचन' असे हनुमानाला म्हंटले जाते. श्रेय आणि प्रेय याचा विचार जो करेल त्याचे जीवन इतरांसाठीही श्रेयस्कर होईल. अर्जुनाच्या रथावर हनुमानाची स्थापना होती. युध्द संपल्यावर हनुमान गुप्त झाला आणि रथ धडधड पेटला अशी कथा आहे. 
   जिथे रामकथा आहे तिथे हनुमान उपस्थित असतोच असतो असा विश्वास आहे. दास्यभक्तीचे त्याच्याशिवाय दुसरे उदाहरण नाही. हनुमान अंगी बाणविणारे आपोआपच विनम्र होतात. कारण जिथे भक्ती आहे तिथे अहंकाराला थारा नाही. 
    विजयाला हनुमानावरच्या लेखाची पुरवणी हवी होती. हनुमानाचे आयुष्य पुरता पुरत नाही व सरता सरत नाही असे आहे. तरी, तिच्या इच्छेसाठी हा लेखनप्रपंच! 

        संगीता पाटखेडकर.
           २०/४/२०१६.

Tuesday, 19 April 2016

'रामविजय' ग्रंथातील हनुमान. ३१ वा आणि ३२ वा अध्याय.

रावणाने सीतेला पळविले. जटायू - रावण युध्द झाले. जटायूचे मरण कशात आहे हे रावणाने त्याला विचारले. तुझे मृत्यंग जर तू मला सांगशील तर मीही माझे मृत्यंग सांगतो असे रावण म्हणाला. माझे पक्ष उपटले तर मला मृत्यू येईल असे जटायू म्हणाला. माझे चरणांगुष्ठ फोडल्यानंतर माझा मृत्यू असे रावण म्हणाला. दोघांचे तुंबळ युध्द झाले. त्यात रावणाची सरशी झाली. सीतेला खूप दुःख झाले. रावण तिला घेऊन निघाला. मातंग पर्वतावर सुग्रीव, नळ, नीळ, जांबुवंत आणि पाचवा हनुमंत असे उभे होते. सीतेने स्वतःचा पदर फाडून त्यात तिचे अलंकार बांधले ती पुरचुंडी यांच्या दिशेने अंतरिक्षातून फेकली. ती पुरचुंडी हनुमंताने उचलली अंतरिक्षाकडे पाहिले. सीता मोठमोठयाने रामाचा धावा करुन आक्रंदत होती. असा पहिला हनुमानाचा उल्लेख 'रामविजय' या श्रीधर कवीच्या ग्रंथात आठवतो. 'रामविजय' - अध्याय १५(कवी श्रीधरस्वामी)
  'कोणे सभाग्याची वस्त l राक्षस नेतो चोरुनी' l - म्हणून अत्यंत आवेशाने त्याने उड्डाण' केले. धृवमंडळापर्यंत. रावण भयभीत झाला. रावण वेगाने लंकेत शिरला.
'पुढे यांचा सूड घेईन l बहु गांजीन राक्षसा'
ती पुरचुंडी त्याने पृथ्वीच्या पोटात लपवून ठेवली.
'रामविजय' च्या अध्याय १७ मध्ये हनुमंताचा उल्लेख जो आहे तो रामविजयच्या शेवटच्या अध्यायापर्यंत राहणारच आहे; कारण राम पंपा सरोवराजवळ सीतेचा शोध घेत येऊन पोहोचला तो ऋष्यमूकपर्वतावर वर उल्लेखिलेले पाच वानर उभेच होते. सुग्रीव घाबरला. सुग्रीवाला वाटले, वालीने आपल्याशी युध्द करण्यासाठी राम- लक्ष्मणाला पाठविले आहे. त्याने त्याची शंका हनुमंताजवळ बोलून दाखविली. मी आत्ताच त्यांचा समाचार घेऊन येतो असे हनुमान म्हणाला. पंपातीरावरील वटवृक्षाच्या तळाशी श्रीराम पहुडले होते. त्या वटवृक्षावर हनुमान येऊन बसला.
'हर्षे दावित वाकुल्या' असे वर्णन.
'माझे चित्त स्नेहे करुन l यासि देखोनि पूर्ण असे' - राम म्हणतो.
'जो वोळखे कौपीन गुप्त l तोचि स्वामी तुझा असे' l - मातेचे वचन हनुमंताला आठवते. लक्ष्मण ताबडतोब धनुष्यावर बाण चढवायला तयार झाला, पण रामाने त्याला आवरले. हे सर्वच श्रीधर कवीँचे काव्यमय वर्णन खूप रसाळ आहे. ग्रंथ इतका मोठा आहे आणि वर्णन अगदी कोणतीही घाई कवीला नाही हे जाणवून देणारे, स्तुती रामाची, हनुमंताची अनेक विशेषणांनी युक्त अशी की वाचणारा थक्क होतो. भरपूर वेळ ज्या वाचकांजवळ आहे आणि कथेतील रसाळपणाचा आस्वाद घेण्याची श्रध्दा ज्यांच्याजवळ आहे त्यांनीच या ग्रंथाला हात लावावा. नुसते वाचन - कंटाळ्याने केलेले काही आनंद देऊ शकत नाही. आस्वाद घेण्याजोगती मनाची तयारी ठेवा मगच ग्रंथ उघडा, नेटाने, रसज्ञतेने कवीची निवेदनशैली बघा. इतका मोठा ग्रंथ लिहिणे मुळीच सोपी गोष्ट नाही, शिवाय कथेनुसार वाचकाची उत्सुकता शिगेला पोचविण्याची हातोटी कवीजवळ आहेच. त्यामुळे काढा वेळ आणि आयुष्यात एकदातरी वाचा ग्रंथ. 'कवी' म्हणजे ज्ञानी, बहुश्रुत आणि व्यासंगी. कवी स्वतःबरोबर वाचकालाही कवेत घेऊ बघतो.
   दोघांनी(राम आणि हनुमंत) यांनी एकमेकांची पारख केली आणि हनुमान रामाचा अनन्य सेवक बनला. हे सर्वच वर्णन द्यायचे म्हंटले तर एक ग्रंथच तयार होतो. मला तसे काहीच करायचे नाही. मला फक्त रामविजयातील हनुमानाच्या दास्यभक्तीचे जे दोन सुंदर अध्याय आहेत, की जे वाचून अक्षरशः डोळे पाणावतात, त्याविषयी वर्णन करावयाचे आहे.
    अध्याय:- ३१
अहिरावण - महिरावण कपटविद्येने रामलक्ष्मणाला नेतील आणि काळिकेपुढे त्यांचा बळी देतील यात हनुमानाची काय भूमिका आहे बघा. बिभीषणाच्या प्रधानांनी हा कट ऐकला आणि हनुमंताला येऊन सांगितला. शेपट्यांचे मोठे दुर्ग त्यांनी सेनेभोवती उभारले. ते वरुन उडून येऊन त्यांनी रामलक्ष्मणाला उचलले. सात सहस्त्र योजने लांब असे विवर कोरले आणि सात घटिकात त्या दोघांना घेऊन गेले. तेथून १३ सहस्त्रयोजने लांब दधिसमुद्र ओलांडून महिकावती नगरी होती. नगराच्या मध्यभागी १० योजने उंच असे भद्रकालीचे मंदिर, दधिसमुद्रीतीरी ९० कोटी राक्षस आणि 'मकरध्वज' यांना रक्षणासाठी ठेवले. निद्रिस्त, मौन अशा रामलक्ष्मणाला नागपाशांनी बांधले. इकडे सगळे वानरगण घाबरले कारण मोठे विवर दिसले आणि रामलक्ष्मण दिसेनात. आक्रोश माजला. बिभीषण म्हणाला, ही गोष्ट जर रावणापर्यंत गेली तर रावण युध्द करेल.
 'मग मारुतीपुढे वानर l घालिती साष्टांग नमस्कार l म्हणती तुजवीण रघुवीर l ठायीं पडे सर्वथा l रामप्राप्तीसी कारण l तू सद्गुरु आम्हांसी पूर्ण l कामक्रोध अहिमही निवटोन l आत्माराम दाखवी' l
  पूर्वी तू सीता शुध्दी केलीस, आता रामाला शोध. नळ, नीळ, अंगद, जांबुवंत यांना घेऊन हनुमान विवरात शिरला. खूप अंधार, कासावीस होऊन चौघे जण मूर्च्छित पडले. मग त्यांना बांधून मारुतीने बाहेर आणले. शुध्द वारा मिळताच ते सावध झाले. रक्षणाला बसलेले राक्षस आणि मकरध्वज दिसले. मग यांनीही वेष पालटले. महिकावती तीर्थ पाहायला आलो असे यांनी सांगितले. यांच्यावर ते राक्षस भिडले. सगळ्या राक्षसांचा या पाच जणांनी मिळून नाश केला. मकरध्वजालाही पाडले. तेव्हा तो म्हणाला, माझा जर पिता जवळ असता तर अशी वेळ येत नव्हती. मग तो म्हणाला, माझा पिता म्हणजे मारुती! कसे काय? लंकादहनानंतर जो स्वेद निघाला तो मगरीने गिळला. मी तिच्या उदरी जन्मलो. मग ती मकरीही आली. विशाल स्वरुप दाखवा म्हणाली. भीमरुप धारण केले. अयोध्यानाथ सुखी आहे असे तिने सांगितले. उद्या त्यांचा बळी देणार वगैरे वर्तमान कथन केले. देवळात जाऊन गुप्त रुप धरुन बसा, असे सांगितले. तुम्ही पाचही जण माझ्या वदन नौकेत बसा, मी तात्काळ तुम्हाला पोचविते असे म्हणाली, चार वानर भयभीत झाले. आम्ही येथील रक्षण करतो. सिंधूलंघन तुमच्यावाचून कोणी करु शकणार नाही. मग एकटा मारुतीच पुन्हा समुद्रपार करता होऊन महिकावतीत आला.
  अणुरेणुपेक्षा लहान रुप धारण केले. राक्षस अनेक कपटी अनुष्ठानें देवळात करीत होते. मद्य, मांस, विप्र प्रेत पूजनासाठी होते. देवळातील देवी या महारुद्राने उचलली आणि न्हाणीत टाकून दार लावले. देवीच्या जागी स्वतः बसला. सेंदुर सर्वांगाला लावून भवानी झाला. षड्र्स अन्नाचे पर्वत पूजासामग्री घेऊन राक्षस आले. दार उघडल्या जाईना. देवी क्षोभली असे त्यांना वाटले. रुद्ररुपिणी बोलली, धन्य तुम्ही भक्त! बळीसी रघुनाथ आणिता. माझे स्वरुप खूप तीव्र आहे. तुमचे डोळे जातील, तेव्हा खिडकीतून पूजासामग्री समर्पा. मग देवळाच्या वर एक गवाक्ष तयार केले.
 'पंचामृताचे घट सकळ l स्नानालागी ओतले l तो मुख पसरोनि हनुमंत l घटघटां प्राशी पंचामृत l नैवेद्य झडकरी येऊ द्या!
अन्न ओतिती एकसरे l सव्य अपसव्य हस्ते करुनी l स्वाहा करी रुद्ररुपिणी l जैसा दावाग्नी चेतवुनी l तो नाना काष्ठें भक्षित l दधिधृतनवनीत l त्याचे पाट सोडिले बहुत l जैशा वर्षाकाळी सरिता धावत l सागरासी भेटावया' l
   प्रसाद बाहेर यावा म्हणून लोहदंडाने पुजारी न्हाणी ढोसत होते. तो लोहदंड देवीला लागत होता. प्रसाद काहीच बाहेर येईना. रामलक्ष्मणाला आणले म्हणून अनर्थ ओढवला असे त्यांना वाटले. बरेच जण निघून गेले. अन्नाचे पर्वत ओतून देवी तृप्त होत नाही. पण आतून रुद्ररुपिणी बोलली, मी संतुष्ट आहे. शहाणे लोक परत फिरले. राम-सौमित्र झडकरी आणा. देवळात त्यांना घाला. त्यांना मी गिळून टाकते. ३० कोटी असुर घेऊन रामलक्ष्मणाला आणायला अहिरावणमहिरावण निघाले. नागपाश सोडून रामलक्ष्मणाला रथाला दृढ बांधले. रामलक्ष्मणाला मोहनास्त्र काढून घेऊन सावध केले.
 'संकटी पावेल उमारमण l तरी हे क्षण मात्रें विघ्न निरसोनिया जाईल l आमचा हनुमंत साचार l येथे जरी पावता सत्वर l तरी असुर संहारिता' l - असे रामाला वाटले.
 'ऐकता रघुपतीचे वचन l कपीचे नेत्री लोटले जीवन l स्फुंद-स्फुंदोनी वायुनंदन l धरी चरण श्रीरामाचे l मग तो सीताशोकहरण l रुप आपुले प्रकट करी l दृष्टी देखता वायुनंदन l प्रेमे दाटला रघुकुलभूषण l हृदयीं धरिला आलिंगूनकाय दृष्टान्त देऊ येथे l पाठीराखा कैवारी भक्त l मारुती ऐसा नव्हेची' l
    मी अनंत अवतार घेतले. पण तुझे उपकार मी कल्पांतीही विसरणार नाही. गुप्तरुपाने जाऊन दोघांचे धनुष्यबाण मारुतीने आणले. दोघांना पाठीशी लपवून पुन्हा देवीरुप घेऊन अहिरावणाला म्हंटले की, तू आधी माझे दर्शन घे. तो आनंदाने देवळात आला. पायाने त्याला रगडून चूर्ण केले. मग पुजारी देवळात उतरला. त्यांना कळले की हा हनुमंत आहे. बाहेर वार्ता फुटली की सगळेजण मारुती रगडून टाकतो आहे. महिरावणाने युध्द पुकारले.
   वायुपुत्राने रामलक्ष्मण खांद्यावर घेतले. पायाच्या प्रहाराने दारे तोडली. पुच्छाने देऊळ उडविले. रामाने खाली उतरुन कोदंड चढविले. महिरावणाचे बाण रामाने उच्छेदून टाकले. त्याचे रक्तबिंदु खाली पडताच कित्येक महिरावण तयार होत होते. हनुमंत मगरीपाशी आला आणि महिरावणाचे रहस्य काय विचारले. तिने सांगितले, चंद्रसेनेला जाऊन विचारा.(महिरावणाची पत्नी)
    अहिरावणाने तप करुन शिवाला प्राप्त करुन घेऊन वर मागितला की, युध्दसमयी वर्षावे अमृत. अमृत आणि रक्त एकत्र होताच महिरावण तयार होतील. पाताळात जाऊन तो अमृतकुंड शोधून सगळे भ्रमर (पर्वतासारखे शरीर असलेले) मारले. (मारुतीने)
  'भ्रमरमाळा शिवकंठी l ते मिलिंद पाताळा जाती l अमृतचंचु भरुनि वृष्टी l रक्तावरी करिती त्या' l - असे वर्णन आहे. चंद्रसेनेची रामावर भक्ती असते. कृष्णजन्मात तू सत्यभामा होशील असे राम तिला म्हणतात.
   महिकावतीला मकरध्वजाची स्थापना करुन राम, लक्ष्मण, हनुमान निघाले. नळ, नीळ, अंगद, जांबुवंत हेही पुढे भेटले.
'हनुमंताचा प्रताप समग्र l राजीव नेत्र स्वये वर्णी' l
   चंद्रसेनेचे कथानकही खूप रंगविले आहे. श्रीधरस्वामींनी!
  रामाशी गाठ घालून द्या म्हणून ती हनुमंताच्या पाठीमागे लागते. हनुमंत म्हणतो, रामाची गाठ घालून देतो पण मंचक तयार ठेव. मंचक जर मोडला तर राम थांबणार नाहीत. मग जो भ्रमर वाचविला होता त्याला मंचक कोरायचे काम करायला हनुमान सांगतो अर्थातच मंचक मोडतो. हे कथानक यासाठी की हनुमंताला रामलक्ष्मणाला वाचविण्यासाठी काय काय करावे लागले. इतक्या अडचणींवर मात करुन हनुमंताने वेळोवेळी अप्रतिम कामगिरी बजावली.
   अध्याय३२:-
मयशक्ती लक्ष्मणावर घालून रावणाने लक्ष्मणाला मूर्च्छित केले. लक्ष्मण पडला म्हंटल्यानंतर रामाचा आवेश आणि त्याने रावणसेनेचा केलेला विध्वंस पाहून रावण घाबरला. सगळीकडे राम-राम आणि रामच आहे असे त्याला दिसू लागले. अनुष्ठान करायचे रावणाने ठरविले. भूमीत गुप्त गुहा निर्माण केली. 'द्रोणागिरी' हनुमान आणण्याची शक्यता आहे; तेव्हा त्याच्या वाटेत संकटे उत्पन्न करण्याची आज्ञा कालनेमी निशाचराला केली. हनुमान द्रोणागिरी आणू शकला नाही तर पहाटेपर्यंत लक्ष्मणाचा प्राण जाईल, तेव्हा असे घडू द्या अशी आज्ञा रावणाने केली.
राम लक्ष्मणाचे शिर मांडीवर घेऊन व्याकूळ होऊन बसला होता.
  'समय देखोनिया कठिण l निर्वाणीचा सखा पूर्ण l भूगर्भ रत्न शोकहरण l उभा ठाकला ते काळी l नमस्कारुनि जनकजामाता l म्हणे काही करावी चिंता तृतीयप्रहर भरता l द्रोणाचळ आणितो'
  'श्रीराम म्हणे हनुमंतालागोन, सौमित्र तुझा याचक जाण l यासि देऊन प्राणदान झडकरी उठवी वेल्हाळा l घेत उड्डाणावरी उड्डाण l जयजय रघुराज म्हणोन वारंवार गर्जतसे' l
  द्रोणाचलाच्या आधी मंदराचल पर्वत. तेथे राक्षसांना शिष्य करुन कालनेमी ब्राह्मणाच्या वेषात बसला होता. (आश्रम तयार केला)
   हनुमंत दिसताच खूप मायेने तो पुढे येऊन; खूप थकलेले दिसता, आराम करा म्हणाला. हनुमंताने फक्त पाणी मागितले. तो शिष्यांना म्हणाला याला सरोवर दाखवा - जेथे विवसी(कृत्या) राहत असे. तिने पाणी पिण्याला येणाऱ्या अनेकांचे प्राण घेतले असतात. हनुमंताने तिला मारले. ती म्हणते, मी देवांगना पूर्वीची, आता तुमच्या हातून उध्दार झाला. हा ब्राह्मण कोण ही गोष्ट ती हनुमंताला सांगते. कालनेमीचाही हनुमंताने नाश केला.
   द्रोणागिरी औषधवेली द्यायला तयार होईना, तेव्हाच पर्वतच उपटला आणि तळहातावर धरुन हनुमान उडाला.
  'अंतरिक्ष जाता हनुमंत l चंद्र पाहता होय चकित l म्हणे काय हे अद्भुत l आकाशमार्गे जातसे' l
   नंदिग्रामी भरताला असे स्वप्न की त्याचा उजवा हात कुणीतरी पिळीत आहे. त्याने वसिष्ठाला सांगितले. वसिष्ठाने शांतीसाठी त्याला होम करायला सांगितले. होमाच्या ज्वाळा वरपर्यंत जात असताना त्याला पर्वत घेऊन कुणी जातो आहे आणि तो होमात पडेल असे वाटले. रामनामबिजांकित बाण हनुमंताला खाली पाडता झाला. त्याच्या तोंडी नाम होते रामाचे! हनुमंताने सर्व वर्तमान सांगितले. मी रावाणापेक्षासुध्दा तुला जास्त त्रास दिला. रामनामांकित बाणाला मी मान दिला. एरवी माझे सामर्थ्य रामप्रभु जाणतात. हनुमंत आला. सुशेषाने मंत्रौषधीने द्रोण भरले आणि त्यामुळे लक्ष्मण पुन्हा चेतन झाला. हनुमंताने भरताचा सर्व समाचार रामाला सांगितला.
  'स्वामी निःस्सीम भरताचे भजन l
    सप्रेम अद्भुत वैराग्यज्ञान l
चकोर इच्छी रोहिणीरमण l तैसा वाट पाहतसे' - अशी भरताची स्तुती हनुमंताने केली. एका रामभक्ताने दुसऱ्या रामभक्ताला नावाजले. हा सर्व कथाभाग वाचताना डोळे पाणावतात.
   इंद्रजित(मेघनाद) रावणाचा मुलगा. खूप शूर. कोणतेही रुप घेण्याची त्याला कला प्राप्त. त्यामुळे त्याच्याशी युध्द करणे कठीण. पण त्याचा मृत्यू लक्ष्मणाकडून झाला. त्याला अमरत्वाचा वर होता. पण मृत्यू अशा व्यक्तीकडूनच येणार होता जो १४ वर्षे निराहारी आहे झोपला नाही. असा एकटाएक लक्ष्मणच होता. त्याची पत्नी सुलोचना, ती पतिव्रता. हे एक सुंदर कथानक रामविजयमध्ये अवश्य खूपच वाचनीय आहे.
 'निर्जीव हस्तें लिहिले पत्र l तरीच आम्ही मानू साचार l जरी हे हांसविल शिर l प्राणपतीचे ये काळी' l
   सुलोचना इंद्रजिताचे शिर मागायला रामाजवळ आली तेव्हा बाकी सर्वजण म्हणाले की प्रेताच्या हाती 'येथे शिर आहे' हे हिला त्याने लिहून कळविले, हे आम्हाला मान्य नाही. ही जर त्या शिराला हासवून दाखवेल तरच आम्ही मानू. त्यावर ती पुष्कळ प्रयत्न करते. पण शिर हासत नाही. शेवटी म्हणते, 'जरी पिता साह्य आणित्यें येथ l तरी तुमचे  शत्रु समस्त l पराभविता क्षणार्धें l ऐसी ऐकताच मात l गदगदां तेंव्हा शिर हांसत' l
   सगळे वानर रामाला विचारतात, काय कारणाने शिर हासलेराम म्हणाला, हिचा पिता सहस्त्रवदन, तोच लक्ष्मण बनला या जन्मीचा. सास-याने जावयाला मारले. तो साह्य कसे करणार होता? म्हणून शिर हासले.
   असे रसाळ कथाभाग सांगत बसता येत नाहीत, कारण असे अनेकानेक आहेत. ग्रंथ थोडीच लिहायचा आहे! तो तर श्रीधर कवींनी लिहिलेलाच आहे. तो वाचण्यास प्रवृत्त करण्यासाठीची ही एक युक्ती आहे.
   हनुमान हा शिवाचा अवतार आणि राम हा विष्णूचा. या धर्मप्रामाण्यानुसार दोघांनी राम-रावण युध्दात परस्परांना साह्य केले यात काहीच नवल नाही. हनुमान रामभक्त राम शिवभक्त. एवढे मोठे युध्द; त्यात अनेकांची मदत! वानरसेना - हे सर्व देवगण. रामविजयात सीतेला शोधून काढणे, समुद्र उल्लंघिणे, अशोकवनात मुद्रिका सीतेसमोर टाकणे, लंकादहन वगैरे. जे प्रसंग आहेत त्यात हनुमानाची भूमिका खूपच महत्वपूर्ण आहे. पण या दोन अध्यायात जे वर्णन आहे ते फक्त हनुमानामुळेच राम-लक्ष्मणाचे प्राण वाचले याविषयीचे असल्यामुळे हे दोन अध्याय मी लेखनासाठी निवडले.
  हनुमानजयंतीच्या या वर्षीच्या (शुक्रवार २२ एप्रिल २०१६) निमित्ताने मला हा लेख लिहावासा वाटला.
  'जय श्रीराम', 'जय हनुमान'.

        संगीता पाटखेडकर.

          १८//२०१६.