Thursday, 25 July 2019

आला हो आला


   झाडे, वेली बोलके
    पान अन् पान हले
   कळीकळीची कळकळ संपली
   फुल कळींतून उमले

    दूर रानीं एकटे पक्षी
    सूर कानीं पडे
   पाऊस आला पाऊस आला
    भीती अवकाळी सरे
   
     गंध ओल्या मातीचा
     श्वासात भरे
    सरींवर सरींचा
    वर्षाव करे

   मनचिंब पावसात भिजे
   वावटळ मनातली अघोरी
    पावसाला दिसे
   
   ये रे पावसा ये रे येरे
   म्हणता म्हणता आला हो
   तुझ्यासाठी आला
   माझ्यासाठी आला

  सर्वांसाठी आला
  तापलेल्या मातीसाठी आला
  सरीसरींनी कोसळत
  नाचत नाचत आला

  मृदुला मुकुंद पाटखेडकर
       २५ जुलै २०१९.

Saturday, 20 July 2019

ये ना...


झाडे, वेली निःशब्द
    पान एकही हलेना
   कळीकळीला कळकळ ही
   फुल कळींतून उमलेना

    दूर रानीं एकटे पक्षी
    सूर कानीं पडेना
   पाऊस नाही, पाणी नाही
    भीती अवकाळी जाईना
   
     गंध ओल्या मातीचा
     श्वासात भरेना
    सरींवर सरींचा
    वर्षाव होईना

   मनचिंब पावसात भिजेना
   वावटळ मनातली अघोरी
    पावसाला दिसेना
   
   ये रे पावसा ये रे येरे
   म्हणता म्हणता येईना
   तुझ्यासाठी ये ना
   माझ्यासाठी ये ना

  सर्वांसाठी ये ना
  तापलेल्या मातीसाठी ये ना
  सरीसरींनी कोसळत
  नाचत नाचत ये ना

  मृदुला मुकुंद पाटखेडकर
       २० जुलै २०१९.

Sunday, 14 July 2019

माझी आजी


  मायपित्याचे दिर्घायु छत्र तुज लाभले
  बहिणीच्या मायेचे सुख तू अनुभवले
  बालपणीचे सौंदर्य यौवनी खुलले
  सुशीलेचे नामांतर प्रमिलेत झाले
  
  तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
  सुंदर टाळ्या वाजवू लागले

   सनई आल्या, चौघडे आले
   वाजंत्री वाजल्या, उखाणे झाले
   सदाशिवाच्या वाडा सदनी
   पाऊल गृहलक्ष्मी तुझे पडले

   तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
   सुंदर टाळ्या वाजवू लागले

   सोवळे झाले, ओवळे झाले
   पदर खोचून डोंगर काम
    कसे तू लीलया पेलले?
    कित्येकांच्या उदरांनी
     तृप्तीचे ढेकर दिले
   सुगरण तुझ्या हातांनी
   अन्नास पूर्णत्व दिले

  तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
  सुंदर टाळ्या वाजवू लागले

   मुले झाली, मुली झाल्या
    सुखदुःखाच्या कळा 
    आता तुझ्या वाढल्या
    रांगणे झाले, रडणे झाले
    एकेकाच्या बाल क्रीडेत
    बालपण तुझे तुला दिसले

   तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
  सुंदर टाळ्या वाजवू लागले

     शाळा संपली, कॉलेज सुटले
     उदंड लेकुरे तुझी आता
    उच्च विद्याविभूषित झाली
     विद्यालंकारांनी आता 
     द्वार तुझे सदा सजविले
    

    तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
    सुंदर टाळ्या वाजवू लागले

   यात्रा झाली, परदेश वा-या झाल्या
    उन्हाळे झाले, हिवाळे झाले
   आयुष्यात तुझ्या कित्येक
    पावसाळे आले
   क्षणाक्षणांनी कसोटीवर तुला
    कितीदा पकडले
   डोळे, पापण्या नि कडा
   कितीदा तरी पाणावले

   तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
   सुंदर टाळ्या वाजवू लागले

    सुना आल्या, जावई आले
    लेकरांचीही लेकुरे आली
     आजवरची आई तू
     आता आजी झाली
    नातवांच्याही प्रगतीने
    धन्य धन्य तुला केले
    देश विदेशी तेही सारे गेले
   
    तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
   सुंदर टाळ्या वाजवू लागले

   वाडा तुझा समृध्द झाला
   घर तुझे गोकुळ बनले
   पणतू पणतींनी आता
    तुला पणजी केले
    वयाच्या एकेका वर्षाने
    कसब तुझे बघितले
    डगमगता, धीराने
    आयुष्य तू उभे केले
    
   तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
  सुंदर टाळ्या वाजवू लागले

    स्मरणशक्ती नाही गेली
    ९४ व्या वर्षीही मनशक्ती
    क्षीण नाही झाली
   सा-यांस प्रेरणा, स्फूर्ती 
   अस्तित्व तुझे देत राहिले

   तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
   सुंदर टाळ्या वाजवू लागले
  
     वर्षे गेली, पर्व संपले
    नातू आले, पणतू आले
   पण.. तुझे सौंदर्य गं आजी
   म्हातारे अजून नाही झाले

   तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
   सुंदर टाळ्या वाजवू लागले

   तुझेच आयुष्य तुझ्यासाठी
   सुंदर टाळ्या वाजवू लागले


   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

Friday, 12 July 2019

हरी भक्तीमाला


   पंढरीची वारी
   आनंद अनुभूती
   दुःखाची हो निवृत्ती
   सुखाची हो प्राप्ती
  
  पांडुरंग हरी
  वासुदेव हरी
  मुखी बोल ते
  अमृत भासती

   ज्ञानेश्वरी, गाथा,
   अभंग संतांचे
   निर्मळ चित्ते
   हरी भक्त गाती

   विश्वाची माऊली
   विठाई सावळी
   मायेची सावली
   रुपवान मूर्ती

  विठ्ठल दर्शनी
  दंग सारे होती
  जणू जीवशिवाच्या
  गाठी पडती

  विठ्ठल माऊली
   हाचि वर देई
  संचरुनी राही
  भक्ती हृदयांत

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.
     १२ जुलै २०१९.
    आषाढी एकादशी.

Wednesday, 10 July 2019

मनातलं....


यश दोन पावलांवर उभा होता
  पण यशने अचानक एक पाऊल मागे घेतलं आणि सगळे अंदाज चुकले. सगळे निर्णय बदलले. हुलकावणी देण्यात तर त्याचा हातखंडाच असतो. दोन दिवसांपूर्वीच आई म्हणाली, सेमी फायनल आणि फायनल,...यश दोन पावलांवर आहे. तिचंही बरोबरच होतं ना! टीम इंडियाच्या आत्तापर्यन्तच्या विजयी वाटचालीवरुन वाटलं तिला,..यश दोन पावलांवर!! पण मला वाटतं यश हसला असेल फिदीफिदी! मला मिळवणं सोपं नाही, माझी दोन पावलं म्हणजे मोठा पहाड! इथेच तर आहे क्षितिज!,...म्हणून जाणारा तिथपर्यन्त जाईल आणि पुन्हा त्याला मृगजळाचा भास होईल. आलं दृष्टीपथात यश असं वाटत असतानाच अपेक्षा येईल भंग करायला, विश्वामित्राच्या तपश्चर्येत! बघितलेलं यशाचं स्वप्नं हरवून जाईल स्वप्नांच्याच दुनियेत! इतकी अवघड असतात ही दोन पावलं!! यश दोन पावलांवर आहे, वाक्य उच्चारायला किती सोप्पं ना!! पण प्रत्यक्षात किती किती पण आहेत, जे जिंकावेच लागतात, यश मिळवायचे असेल तर!! कारण संधी एकदाच दार ठोठावते

  मृदुला मुकुंद पाटखेडकर.
    १० जुलै २०१९.