Sunday, 19 June 2016

वड आणि वडील

कोणतेही बहरलेले, फळलेले, फुललेले झाड मनाला प्रसन्न करुन टाकते. वड, पिंपळ हे वृक्ष दीर्घायुषी असतात. अशा वृक्षांच्या छायेखाली रोजच वावरायला मिळाले तर? किती छान!! हा आनंद आम्ही सर्वांनीच घेतला आहे. माझ्या बाबांनी अकोल्यातील नगर परिषदेच्या शाळा क्र. मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. शाळेच्या भव्य पटांगणात(मैदानात) मध्यभागी खूप भले मोठे वडाचे झाड आहे. मधल्या सुट्टीत या झाडाच्या पारावर, पारंब्यांवर मुले मस्ती आणि मजा करीत. मुलांची डबा खाण्याची वेळही हीच असल्यामुळे झाडाच्या पारावर, वटवृक्षाच्या छायेखाली जेवणाचा आनंद ते सर्वच लुटत. बाबांची आत्या डबा घेऊन येत असे याच झाडाच्या पारावर त्यांची वाट पाहत असे; बाबा सांगायचे.
  मी, अमोल विशाल याच प्राथमिक शाळेत शिकलो. माझी आई मधली सुट्टी लागायच्या बराच वेळ आधी वडाच्या पारावर बसत असे.
आईचे खूप दाट, जाड, मोठ्ठे, लांब केस वडाच्या दाट, जाड, मोठ्या, लांब पारंब्या! दोघेही एकमेकांचे सोबती वाटत. हे दृश्य रोजही मला पाहायला मिळायचे आनंद व्हायचा आई दिसली की!
इतके तास आईविना शाळेत जाणे म्हणजे लहान मुलांना सुरुवातीला खूप त्रासदायक वाटते. 'होम सिकनेस' जाणवतो.
  आम्ही सर्व मैत्रिणी जेवण झाल्यावर पारंब्यांना मनसोक्त लटकायचो. धम्माल करायचो. कोण या पारंबीवरुन त्या पारंबीवर पटकन जाईल; अशी स्पर्धाही लावायचो. लुपाछुपीच्या खेळातही वडच सोबती असायचा. वडाच्या पारंब्या जमिनीपर्यंत लोंबायच्या. आजही तो वड आहे. बहुतेक सर्वच मुलींच्या आई, मावशी, काकू यांच्यापैकी कुणी ना कुणी मधल्या सुट्टीत डबा घेऊन येत याच पारावर बसत.अनेक जणींनी कितीतरी वेळा आणि कितीतरी सुखदुःखाच्या आठवणी, गंमती-जंमती, या पारावर केल्या असतील याला तर आजपर्यंत गणतीच नसेल! या सर्व घटनांचा तो वड साक्षी आहे. त्या वयात फारसे समजत नाही. ते झाड म्हणजे मस्तीचे, खेळण्याचे ठिकाण एवढेच आम्हांला ठाऊक होते. माझ्यासारखेच अमोल आणि विशालनेही त्या झाडाच्या छायेखाली शाळा केली.
  हिवाळ्यात थंडीमुळे वर्गात बसणे कठीण होई. मग 'बाई'(तेंव्हा टीचरला 'बाई'
म्हणतः-) झाडाखालीच वर्ग भरवित. कोकिळेचे मधुर स्वर कानावर पडत. बाबा तर त्या वडाच्या, शाळेच्या अनेक आठवणी आम्हांला सांगत.
  इतक्या अनेक वर्षांपूर्वीचा तो वटवृक्ष आज मला स्थितप्रज्ञ, धीरगंभीर पण तितकाच शांत, अविचल ऋषी-मुनींसारखा वाटतो. केंव्हाही, कधीही त्या रस्त्याने गेले की त्या वडाजवळ जावेसे वाटते, त्याला बिलगावेसे वाटते. तो वड जणू काय मला माझ्या वडीलांसारखाच वाटतो. वड आणि वडील!!!!!........ दोघेही निर्हेतुक, निःस्वार्थ आणि अखंड माया करणारे, मायेची शीतल, थंडगार पखरण करणारे आणि सावली देणारे वाटतात.
  शेगावचे संतशिरोमणी 'गजानन महाराज' प्रथम प्रगटले ते वडाच्याच झाडाखाली! सर्व लोकांनी त्यांना दुपारी अडीच वाजता तिथेच पाहिले. आजही ते वडाचे मोठ्ठे झाड शेगावात आहे आणि अनेक लोक दर्शनासाठी त्या वडाला जातात. संस्थानने आता भक्तांना बसण्यासाठी त्या वडाच्या झाडाजवळ मोठे सभामंडप बांधले आहे. हा शेगावीचा वड मीही पाहिला आहे. वडाच्या झाडावर शिवशंकराचा निवास असतो असे म्हणतात. असा हा वड अनेक पिढ्यांना अॉक्सिजन आणि पॉझिटिव्ह एनर्जी निःस्वार्थपणे देतच आहे आणि राहील.
 आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने दाटून आलेल्या अनेक भावनांच्या कल्लोळांनी आणि आठवणींच्या खजिन्याने माझे मन सैराट आणि झिंगाट झाले आहे.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

     १९ जून २०१६.

आयुष्याचा समृध्द आधारवड

  आयुष्याचे भांडार समृध्द करणाऱ्या अनेक व्यक्ती आयुष्यात येणे हे केवढे अहोभाग्य! आम्हांला ते लाभले आहे याचा आनंद तर अवर्णनीय आहेच पण हे सर्व ऋणानुबंध पुढील जन्मांच्या साखळीतही चालूच राहणार असा मला विश्वासही आहे. इतके प्रेमाचे धागे कच्चे कसे असणार? वडाला धागा गुंडाळतात आणि सात जन्म हाच पती मिळो अशी प्रार्थना स्त्रिया करतात यामागे हाच विश्वास आहे. सत्यवान आणि सावित्री ही कथा अजरामर याचसाठी आहे. पिढ्या-पिढ्यांचा प्रेमावरील, पातिव्रत्यावरील, अमरत्वावरील विश्वास वाढविणारी ही चिरकालीन संवेदना अंतरंगात भावनांचा उमाळा निर्माण केल्याशिवाय राहत नाही. माझी आई, माझे वडील हयात नसतानाही तीन दिवसांचे वटपौर्णिमेचे व्रत करते. ९१ व्या वर्षीही ती त्यापासून हटत नाही. आता यात काय अर्थ आहे? म्हणणारे म्हणोत पण निष्ठा ही लादण्याची गोष्ट नाही. मुळातून जे आहे तेच बहरणार. आडातच नाही तर पोहो-यात कुठून येणार? असो.
   वड ही प्रतिमा लहानपणापासून स्त्रीच्या मनात रुजलेले एक प्रभावी बीज आहे.
सा-या जन्माला व्यापून उरणारी ही वटसंकल्पना स्त्रीला खूप उच्चतम पातळीवर नेते. शांता मावशीकडचे वडाचे झाड - नटून- सजून स्त्रिया पूजेला यायच्या. मावशीच्या भेटीने त्या पूजेची सांगता करायच्या. शांता मावशी बाळशास्त्री हरदास हे फक्त देऊळ राखायचे नाहीत तर मूर्तीमंत देऊळच होऊन जायचे. गाई-म्हशींचा गोठा; आमच्या पाताळेश्वर मार्गावर असणाऱ्या ठिकाणीही मोठे वडाचे झाड होते. तिथे आम्ही सर्व बहिणी आई पूजेला जात असू. अगदी पावित्र्याचा माहोल असे. आंबा हे या काळातील अमृतफळ. त्या रसाचा गोडवा जीवनात उतरल्याशिवाय कसा राहील? 'नंदनगिरी' ब्राह्मण पूजा सांगायला असत. अगदी सांगोपांग पध्दतीने व्रत आई करायची. सप्तधान्याच्या वाट्या ब्राह्मणाकडे पोहोचविल्या जात. आज काळ खूप म्हणजे खूपच बदलला असला तरी हे सर्व करणाऱ्या स्त्रियांसमोर नतमस्तक व्हायलाच होते. मृदुलाला शांता मावशीने सत्यवान-सावित्री ची कथा सांगितली होती. मावशीचे सांगणे अत्यंत ओघवती भाषेत पूर्ण कथेला जिवंत करणारे असेजिथे जिथे आमचा मुक्काम झाला तिथला तिथला वड मी पूजला आहे. माझ्या ठिकाणी श्रद्धा नाही असे मी कधीच म्हणणार नाही. नास्तिक होण्यात मला काहीच रस नाही.
    मृदुलाच्या जन्मानंतर आम्ही एक वर्ष हैद्राबादला होतो. तेथे 'कोटी' म्हणून एक भाग आहे. तिथल्या वडाला मला मृदुलाचे वडील पूजेसाठी घेऊन गेले होते हे मला आज प्रकर्षाने आठवत आहे. बबन मंगदे असो की त्यांची आई 'बहिणा,' द्वारका नानी असो की भय्या सास्तीकरांचे कुटुंब;- या सर्वांची आणि संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींची वटवृक्षाची साऊली मला नेहमीच मिळाली आहे. वटवृक्षाच्या मायेचा स्पर्श अनेकानेक व्यक्तींच्या रुपाने लाभणे यापेक्षा सौभाग्य ते कोणते? मी सर्वचजणांची अपरंपार ऋणी आहे. यादी खूप मोठी आहे. मनाचे भांडार खूप समृध्द आहे. माझ्या भावना सर्वांपर्यंत पोहोचणारच याची मला नितांत खात्री आहे.
   हा आयुष्याचा वड आता खूपच बहारदार झाला आहे. मनाच्या वारुवर स्वार होऊन त्रिखंड धुंडाळण्याची आस त्याला आहे. तिथे सदाशिव आहे, मुकुंद आहे, प्रमोद आहे, विश्राम आहे, अरुण आहे, सुधीर आहे. वृंदा विजया नित्य साद देत आहेत. सत्यभामा, मुरलीधर बळ देत आहेत. वडीलांचे आई-वडील आम्ही बघूही शकलो नाहीत याचा आजही खेद आहे. "अनंत हस्ते कमलावराने l देता किती घेशील दो कराने?" - असा भरघोस आशिर्वाद देणारी माझी सासूबाई आहे. अत्यंत प्रेमाने मला सावरुन घेणाऱ्या मोठ्या जावा आहेत. सुभद्राबाई पाटखेडकर आणि ताराबाई पाटखेडकर. प्रेमाचा अखंड वर्षाव करणारे सासरचे लोक आहेत. माहेरची प्रेमाची बहती गंगा तर अविरत वाहतेच आहे. पार आकाशाची  उंची या वडाने गाठली आहे. प्रेमाचा अर्थ या सर्वांनी मला जाणवून दिला आहे. मी खूप आनंदी आहे. 'वडा, मला पाव' असे म्हणण्याची माझ्यावर वेळ आलेली नाही यातच मी कृतार्थ आहे.
   आयुष्याच्या समृध्दतेने मी खूपच भरुन पावलेली आहे. हेच मला आवर्जून आज सांगावेसे वाटत आहे. माझ्या आयुष्याच्या वडाने असेच नेहमी बळकट राहून पारंब्यांचा दूर दूर पर्यंत सर्वांना बहारदार, रमणीय असा संसर्ग मिळावा ही मी माझ्यातर्फेच सदिच्छा व्यक्त करीत आहे.
   ज्यांचे उल्लेख आलेले नाहीत त्यांनी हिरमुसून जाऊ नये. मनाच्या कानाकोप-यात, अगदी अंतर्मनात नेहमीच त्यांचा निवास आहे; हा विश्वास ठेवा. अजूनपर्यंत विसरण्याची मला खोड नाही, त्यामुळे सगळ्यांचा दरवळ आहेच आहे
वड म्हणतो, फार झाली वडवड    
आता थांबव तुझी बडबड स्वतःच्या गुणगानाची किती तुला  आवड?
 चूप बस आता, दुसरा मार्ग निवड!

     संगीता पाटखेडकर.

         १९ जून २०१६.

खजिन्याची समज

 वाड्यातल्या खजिन्यावर जेव्हा विश्रामने लिहिलेले वाचले तेव्हा अनंत विचारांनी मन भारुन गेले. फक्त तेव्हढाच खजिना नव्हता. दोन अपत्यें आई-बाबांची गेली याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. जोशी काका जिथे राहत होते तिथे आधी आई-बाबा राहत होते. मी लहान होती; पण बारशाच्या आधी जे मूल गेले तो प्रसंग मला आठवतो आहे. जोशी काकांचे ते भाड्याचे घर मोठ्या तीन खोल्यांचे होते. शेवटच्या खोलीत एक पडदा लावून बाळंतिणीची व्यवस्था केली होती. त्या मर्त्य मुलाला घेऊन आई बसली होती. पडदा सोडून जी खोली होती तेथे कमाविसदार मामा बाबा बसले होते. बाबा मोठ्याने रडत होते. कमाविसदार मामा समजावित होते. शांता मावशी स्वयंपाक घरात काहीतरी काम करीत होती. दुसरे अपत्य १० महिन्यांचे होऊन गेले. त्याला रिकेटस् झाल्या होत्या असे आई सांगायची. त्याचे फुगलेले पोट मला आठवत आहे. त्या दोघांची कमतरता आज कां कोण जाणे मला प्रकर्षाने जाणवत आहे.
  पुस्तकांचा इतका मोठा साठा घरी होता; पण इतक्या लहान वयात काहीच त्यादृष्टीने उपयोग करुन घेण्याची कुवत नव्हती. आधीच्या पिढ्यांची माहिती करुन घ्यावी ही समजही नव्हती. पुस्तकांची नीट काळजी घेतली नाही तर त्यांना उधई लागते.
ती -याच पुस्तकांना लागली होती असे आठवते. त्या पुस्तकांची एक यादी तरी करुन ठेवावी लागत होती इतर व्यापातही त्यांची अपत्यवत काळजी घ्यावी लागत होती असे आज वाटून काहीच उपयोग नाही. हाही खजिना आपण गमावला आहे.
बाबांजवळून बरीच माहिती मिळू शकत होती, पण ती समजच नव्हती; त्यामुळे आपला मोलाचा खजिनाही आपण गमावला आहे.
  इतिहास संशोधक मंडळे मोठमोठया लोकांची माहिती खूप संशोधन करुन मिळवितात, त्यांची माहिती अमर राहावी म्हणून माहितीचे संकलन, संवर्धन करतात. खूप व्यक्ती, जे त्यांचे मित्र वगैरे साहित्यिक होते त्यांचे साहित्य प्रकाशित करतात.
उदा. बालकवी वयाच्या २८ व्या वर्षी गेले. त्यांचे साहित्य विद्यापीठातून अभ्यासाला आहे. भा.रा. तांबे यांच्या कविता मायदेव, माधवराव पटवर्धन यांनी प्रसिध्द केल्या. ज्ञानेश्वरीचे संस्करण एकनाथांनी केले. बरीच उदाहरणे देता येतील. ही समाजातील वृत्ती वाढावयास हवी आणि अप्रकाशित चांगल्या कृती व्यक्ती समाजाला माहीत करुन द्यायला हव्यात. हा खजिना वारसा खूपच अनमोल असतो पण लोकांच्या चुप्पीमुळे आपल्या नासमजीने आपण तो गमावतो हे केव्हा कळणार?
  प्रमोद, मोठीआई-अण्णाजी, मावशी-बाळशास्त्री, आपली सर्व आप्तस्वकीय मंडळी, आत्या-भाऊसाहेब, पत्तरकिने मंडळी, कमाविसदार मंडळी, पुराणिक मंडळी, देशपांडे मंडळी, आपले शिक्षक, मित्र हा सर्वच आपला खजिना! तो सांभाळायला पाहिजे;-  आठवणींच्या रुपाने का होईना त्यांच्या स्मृतींना जागवायला पाहिजे असे मला वाटते.
 विश्राम, तू चांगले लिहितो आहेस. खूप काही आहे लिहिण्याजोगे ते सर्वच लिही.
तुझे शब्द अभिव्यक्तीला समर्थ वाटतात.
"नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्यांची जगतास जाण नाही" - हे 'नटसम्राट' मधील गाणेही आज आठवले.
काय अर्थ घ्यावयाचा तो प्रत्येकाने घ्यावा.

      संगीता पाटखेडकर.

      १६ जून २०१६.