Saturday, 10 September 2022

आठवणीं

 पल्याडच्या आठवणीं 

  अल्याड उभ्या राहतात

  क्षण वेग वावर

  आवेग भरुन घेतात


  स्नेह आठवितो भूतकाळीचा

  निसटतो नजरेतून वर्तमान

  भूत आवर्त वर्तमानातले

   दूर दूर धुसर भविष्यमान


   सारे सारे मर्मबंधी

  नजरेसमोर दृश्य ठेविती

  गत क्षणांचे नरम तरल

  भावस्पर्श उमटविती


  रमता रमता रमवितो

  रम्य अलगद भूतकाळ

  अनावर आतुर ओढीस त्या

  कातर भेटतो संधिकाळ


  गुपित सारे गुजगोष्टींचे 

  बोलक्या करतो भावना

  सहज खाणाखुणा मन करते

  भूतकाळी दिशांना


  गेला गेला तरीही

  भूतकाळ असतोच आपल्यासोबत

  कडूगोड भल्याबु-यांना

  रम्यतेचे बिरुद लावत


  क्षण गेला म्हणजे जणू तो रम्य झाला

  भविष्य वर्तमानाच्या अहंकाराचा बिमोड झाला

  काळच काळाला काळाचे रुप दाखवी

 अस्तित्वाची लढाई जणू न हारता जिंकून घेई


     मृदुला मुकुंद पाटखेडकर 

       ११ सप्टेंबर २०२२

No comments:

Post a Comment