Sunday, 7 August 2016

लेखनाची खुबी

हेनरी या टोपणनावाने गोष्टी लिहिणारा लेखक William Sidney Porter हा इंग्रजी वाङमयात लघुकथा लिहिणा-यांचा सम्राट समजला जातो. त्याने चमत्कृतीचे हत्त्यार विलक्षण पाजळले होते. अवघ्या ४३ वर्षांचे त्याचे  आयुष्य, आणि लेखनाचा आरंभही त्याने उशीराच केला; पण त्याने २७० गोष्टी लिहिल्या त्या सा-या इंग्रजी वाङमयात फार प्रिय आहेत. 'The gift of the Magi' ही त्याची एक प्रसिध्द गोष्ट. 'नाताळातील भेट' असे आपण मराठी नाव या गोष्टीस देऊ या! गोष्ट बघाः-
    एक डॉलर आणि सत्त्यांशी सेंटस्सच! अन् उद्या नाताळ! अशा वेळी मळकट खाटल्यावर अंग टाकून रडण्याखेरीज डेलाला काही सुचत नव्हते. हा संसार म्हणजे हुंदके, उसासे अन् हास्य यांचे विचित्र मिश्रण आहेसे वाटू लागते! - अन् त्यांतही उसाशांचे प्रमाणच जरा अधिक!
   आठवड्याला आठ डॉलर भाड्याचे सामानांसुमानासकटचे घर तिचे! घराला खालच्या बोळात पत्राची पेटीसुध्दा होती, त्यात पत्रंच शिरत नसे ही गोष्ट निराळी! येणाऱ्या-जाणा-याने वर्दी द्यावी म्हणून विजेचे बटनसुध्दा होते पण घंटा वाजेल तर शपथ! त्या बटनाच्या वर एक पाटी होती. त्याच्यावर नाव होते "मि. जेम्स डिलिंगहॅम यंग." या गृहस्थांना आठवड्याला तीस डॉलर मिळत होते. त्या पाटीवरील अक्षरातील फक्त 'डि' शिल्लक उरणार असे वाटत होते. मिसेस जेम्स त्याला 'जिम' म्हणून हाक मारी.
   डेलाने आपले रडणे थांबविले, पावडरच्या बोळ्याने गाल पुसले. खिडकीशी उभी राहिली. पलीकडच्या आवारात एका भिंतीवर एक मांजर चालताना तिला दिसले. ती भिंत, ते आवार, सगळेच कसे गलिच्छ आणि ओसाड आहेसे तिला वाटले. 'जिम' साठी भेट विकत घ्यायला हाती सारा एक डॉलर  अन् ८७ सेंटस्! अगदी उंची, दुर्मिळ, शंभर नंबरी देणगी द्यायची तिच्या मनात पण.......... !
  खिडक्यांच्या मधोमध भिंतीला एक आरसा होता! त्याच्या टिचभर काचेपुढे अंग झटकून फिरवून दरवेळी दिसणाऱ्या टीचभर अंगाच्या प्रतिबिंबाची बेरीज केली तरच माणसाला आपल्या सबंध चेहऱ्याची कल्पना यायची अन् तीही माणूस सडपातळ असेल तर! डेला सडपातळ होती आणि तिने ही कला साध्य केली होती.
   एकदम तिच्या डोळ्यांत विलक्षण तेज चमकू लागले. तिने भराभरा आपल्या केसांचा आंबाडा सोडला आणि ते सारे लांबसडक केस पुरते सुटून रुळू दिले. 'यंग' चे कुटुंब कितीही गरीब असले तरी दोन वस्तू त्यांच्या घरात अशा होत्या की त्यांच्या ऐश्वर्याचा नवरा-बायको ला विलक्षण अभिमान वाटे. ) जिमच्या आजोबांच्या वेळेपासूनचे सोन्याचे घड्याळ! ) डेलाचे केस. डेलाने घाईघाईने आपले जुने पिंगट रंगाचे जाकीट घातले. घाईघाईने जुनी पिंगट रंगाची टोपी चढविली. झग्याचा फलकारा मारीत ती जी एखाद्या पाखरासारखी निघाली ती खोलीतून जिन्यावर अन् जिन्यावरुन थेट रस्त्यात!
   ती एका दुकानापाशी थांबली. त्या दुकानावर पाटी होती - "माडाम सॉफ्रॉनीः सर्व जातीच्या गंगावनांचे दुकान." जिन्यावरुन डेला धावतच वर गेली. दुकानातली ती अगडबंब, पांढरी फटक, कडू चेहऱ्याची बाई पाहून डेलाला वाटले, "काय पण सॉफ्रॉनी! नाव सोनूबाई........."
"माझे केस तुम्ही विकत घ्याल का?" डेलाने विचारले. "तोच माझा धंदा आहे, तुझी टोपी काढ, पाहू दे आम्हाला तुझे केस कसे आहेत ते!" ते केस हातात घेत ती बाई म्हणाली, "वीस डॉलर." "द्या लवकर द्या," डेला म्हणाली.
  जिमला भेट देण्यासाठी डेला आता दुकानें धुंडत होती. शेवटी एक वस्तू तिला पसंत पडली. जणू जिमसाठीच ती निर्माण झाली होती. Platinum धातूची घड्याळाची साखळी होती ती! तिला एकवीस डॉलर पडले. उरलेल्या ८७ सेंटस् निशी ती घरी परतली. सध्या जिमचे घड्याळ फक्कड होते, पण एका जुनाट कातडी पट्टीला अडकवले असल्यामुळे ते काढून पाहायची जिमला कित्येकदा शरम वाटे! आता तसे होणार नव्हते.
  दोन घटकांत डेलाच्या मस्तकावर लांड्या, कुरळ्या बटांचा झुपकाच्या झुपका दिसू लागला; आणि एखाद्या अवखळ, उनाड छोकरीसारखी ती दिसू लागली. आरशात तिने तिचे रुप पाहिले. ती मनाशी म्हणाली, "माझे हे ध्यान पाहताच जिम मला ठारच करील." जिमच्या यायच्या वेळी डेलाने ती साखळी मुठीत धरली. जिन्यावर जिमच्या पावलांचा आवाज आला. ती पांढरी फटक पडली. दार उघडले. डेलाला त्याची चर्या अगदी सुकल्यासारखी आणि गंभीर दिसली. अरेरे! वय सारे बावीस वर्षांचे आणि संसाराचा भार अंगावर! एक नवा वरकोट त्याला अगदी घ्यायलाच हवा होता आणि त्याला हातात घालायला हातमोजेही नव्हते!
    जिम दाराच्या आतल्या बाजूस उभा राहिला. तो अगदी निश्चल! तो भाव रागाचा नव्हता, विस्मयाचा नव्हता, कोणत्याच भावनेचा नव्हता. तो नुसता तिच्याकडे डोळे वटारुन पाहत होता.
   डेला त्याला म्हणाली, "हा नाताळचा सण तुला काहीतरी भेट दिल्यावाचून मला सुखाचा गेला नसता; म्हणून मी केस कापले, विकले. पुन्हा वाढतील ते"! 'Merry Christmas' म्हण ना! जणू ती बातमी त्याच्या कानापर्यन्त पोचली नव्हती. त्याने विचारले, "तू केस विकलेस?" काही वेळाने तो शुध्दीवर आल्यासारखा झाला. आपल्या वरकोटाच्या खिशातून एक पुडा काढून जिमने टेबलावर टाकला म्हंटले, "तुझ्या चार बटा कमी झाल्या म्हणून तुझ्यावरील प्रेम कमी होईल असे नाही, पण माझी स्थिती भ्रमिष्टासारखी का झाली हे तुला तो पुडा उघडून बघ म्हणजे कळेल!"
   त्या पुड्यातून फण्यांचा जोड निघाला. पूर्वी त्याच्यावर डेलाचे मन जडले होते. भारी सुंदर होत्या त्या फण्या. रंग तर असा की डेलाच्या त्या नाहीशा झालेल्या केसांना अगदी साजेसा! कासवाच्या कवचीच्या कंगो-यावर चकाकत खडे असलेल्या त्या फण्यांची किंमत फार आहे हे डेलाला माहीत होते. आपल्याला त्या घेणे कधी शक्य नाही हे तिला माहीत होते. आज त्या फण्या तिच्या पायाशी पडल्या होत्या पण केस राहिले नव्हते.
  "अगंबाई!" असे उद्गारत एखाद्या पाय पोळलेल्या मांजरासारखी तिने उडी मारली. जिमची भेट त्याला दाखवायचीच राहिली होती. "आज, कुठे घड्याळ तुझं? कशी दिसते ही साखळी हे पाहायचं आहे मला!" डेला म्हणाली. जिम एकदम अंग टाकून खाटल्यावर बसला. तळहातांची खोबणी करुन तिचा मानेला आधार देत आणि लटकें हंसत तो म्हणाला, "डेल, आपल्या एकमेकांच्या या नाताळातल्या भेटी काही दिवस वापरता तशाच ठेवून देऊ. त्या इतक्यात वापरायला काढलेल्याच -या! मी आपलं घड्याळ विकलं! चल ऊठ, खायला दे काहीतरी!"
    गव्हाणीतल्या बालकाला 'मेजी' नावाच्या चतुर पुरुषांनी भेट आणून दिली अशी पुराणात कथा आहे. नाताळात भेटी द्यावयाचा उपक्रम त्यांच्यापासूनच सुरु झाला. मेजी चतुर होते; तेव्हा त्यांच्या भेटीही चतुराईच्या असावयाच्या.
   ज्या दोन प्रेमवेड्या अल्लड पोरांची साधीसुधी गोष्ट मोडक्या तोडक्या भाषेत सांगितली त्यांच्या अंगी शहाणपणाही नव्हता आणि चतुराईही नव्हती. घरातल्या दोनच दोन बहुमोल वस्तूंचा त्यांनी एकमेकांसाठी त्याग केला. जगात कुठेही गेलात तरी असली माणसेच सर्वात शहाणी म्हंटली पाहिजेत! यांनाच म्हणावे 'मेजी'!
  येथे . हेनरीने गोष्ट संपविली आहे.
    वाचकांशी गंमतीने बोलल्यासारखा लेखक लिहीत गेला. वाचक लेखक एका बैठकीत चांदण्यात बसले आहेत लेखक त्यांना मजेमजेने गोष्ट सांगतो आहे असा भास उत्पन्न करणारी ही भाषाशैली लघुकथेस फार शोभते एवढे खचित! कोणत्या शैलीने आपण लिहावयाचे हा ज्या त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीचा अंतःस्वभावधर्माचा प्रश्न आहे. ललित वाङ्मय लिहू इच्छिणाऱ्याने भाषाशैलीच्या प्रश्नाचाही खोल दृष्टीने विचार करावयास पाहिजे.
  हरी नारायण आपटे यांची सर्वात लहान पण ललित लेखनाचा नमुना यादृष्टीने सर्वात उत्कृष्ट कादंबरी 'गड आला, पण सिंह गेला!'
  तानाजी शेलार मामा मोठ्या हौसेने शिवाजी राजांना लग्नाचे आमंत्रण द्यावयास गेले असतांना तेथे एकदम कोंडाणा किल्ला ताबडतोबीने सर करण्याची मसलत निघावी मुलाच्या लग्नाला राजांना घेऊन जायच्या प्रतिज्ञेने आलेल्या तानाजीने, 'आता आधी कोंडाण्याचे लग्न लावीन' अशी शपथ घ्यावी हा 'गड आला पण सिंह गेला' या कादंबरीतील पहिला पेचदार प्रसंग होय; पण हा पेचदार प्रसंग का निर्माण झाला त्या प्रसंगाचा छेद तानाजीने वीरश्रीची प्रतिज्ञा करण्यातच का झाला? याचे उत्तर हेच की 'व्यक्तिविशेष' स्वभावधर्म! त्या व्यक्तींच्या परस्परांविषयीच्या भावना त्यांची मायदेशाच्या स्वातंत्र्यासाठीची तळमळ!
  कमलकुमारीसारखी सौंदर्यसंपन्न, तरुण, साध्वी सती जावयास सिध्द झाली असता उदयभानासारख्या मदांधाने तिचे हरण केलेले दाखवून हरिभाऊंनी प्रारंभी तडाक्यालाच समर प्रसंग निर्माण केला आहे. तो प्रारंभ वाचताच वाचकाची जिज्ञासा विलक्षण जागृत होते. ही जिज्ञासा सारखी अतृप्त वाढती राहावी अशा धोरणानेच हरिभाऊंनी पुढचे एकेक प्रसंग योजले आहेत. कमलकुमारीची सती जाण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा परिपूर्ण व्हावी शिवाजी महाराजांस कोंडाणा किल्ला मिळावा असा कादंबरीचा दुहेरी विषय आहे. त्यांस अनुकूल प्रतिकूल वातावरण उत्पन्न करणारे जे प्रसंग त्यांनी निर्माण केले आहेत; त्यामुळे कथानकात सारखी छाया प्रकाशाची गंमत खेळत राहते ती पाहून वाचक अपरिमित आनंदित होतो.
    'गड आला पण सिंह गेला' ही कादंबरी लिहिताना माघ वद्य नवमीच्या मध्यरात्री कोंडाण्यावर जे विलक्षण रोमांचकारी प्रसंग एकामागोमाग एक घडावयाचे त्या 'अखेरी'(Climax) ची पक्की खुणगांठ हरिभाऊंनी आपल्या मनाशी सतत ठेवली असली पाहिजे.
   कमलकुमारीच्या सती समारंभातील अडथळा, उदयभानूची कोंडाण्यावर नेमणूक, तानाजीची प्रतिज्ञा, तानाजीची जगत्सिंगाची भेट, किल्ल्याच्या पायथ्यावरील अपूर्व गोंधळाचा प्रसंग! - या सा-या घटना अखेरच्या धूमधडाक्याची तयारी करत असतात. जगत्सिंग एकाएकी तानाजीच्या तीराने जखमी होताच वाचक चकित होतो; पण नंतर त्याला पटते, एरवी तानाजीची जगत्सिंगाची दोस्ती कोठून झाली असती? कोंडाणा सर करण्याप्रमाणेच एका सतीची अब्रू राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे वाटून तानाजीला त्याच्या साहाय्यकर्त्यांना दुप्पट वीरश्री कोठून चढली असती? आणि माघ वद्य नवमीच्या मध्यरात्रीच्या कोंडाण्यावरील त्या निकराच्या प्रसंगाला एवढे हातघाईचे स्वरुप कोठून आले असते?
   'अॅना कॅरेनिना' ही कादंबरी लिहिताना  अॅना अखेर आगगाडीखालीच सापडलेली दाखवायची इतके कदाचित टॉलस्टॉयच्या मनाशी ठरलेले नसेल; पण अखेर तिचा कोणत्यातरी प्रकारचा हृदयद्रावक अंत दाखवायचा एवढे मात्र त्याने पहिल्यापासून ठरविले असले पाहिजे. 'डॉल्स हाऊस' हे नाटक लिहिताना अखेरीस नो-हा आपल्या पतिगृहाचा त्याग करुन चालती झालेली दाखवायची एवढा इब्सेनच्या मनाचा पहिल्यापासून निश्चय झालेला असला पाहिजे. कीचकवधाची अखेरी अमुक पध्दतीने करावयाची हे खाडिलकरांनी प्रथमपासून नक्की ठरविले असले पाहिजे.
    ही सगळी उदाहरणे सांगण्याचे तात्पर्य हेच की आपण जे लिहीत आहोत ते जास्तीतजास्त परिपूर्ण कसे होईल यादृष्टीने लेखकाचा अभ्यास असला तरच त्याची साहित्यकृती अजर अमरत्वाच्या दृष्टीने वाटचाल करणार!
खूप सुंदर सुंदर कलाकृतींचा आस्वाद घेणे हे पहिले पाऊल, त्यातील सौंदर्यस्थळे मनांत बिंबविली की आपोआपच एक पार्श्वभूमी आस्वाद्यमानतेची तयार होते पूर्वपीठिका तयार झाली की स्वतःच्या लेखनकामाठीत ती रसास्वादकता आणण्यास मदत होते.
   खूप वाचन, खूप लेखन यामुळे एक सहज प्रतिबिंबित होणारी शैली बनत जाते ती वाचकांना आकृष्ट करते. हा आनंद काही आगळा आणि वेगळाच. तो मनमुराद लुटणे हे काम प्रत्येकाला सहज शक्य आहे.

      संगीता पाटखेडकर.
          //२०१६.


1 comment: