२०१६ च्या श्रावण महिन्याने मनाभोवती अनेक आठवणींचे जाळे विणले. श्रावणातील नटलेले सृष्टिसौंदर्य आणि सुगंधी फुलांचे सजलेले ताटवे पाहून मनही हिरवे झाले. अनेक सणांची रेलचेल या एकाच महिन्यात असते. श्रावणातल्या दर सोमवारी आधी आणि वयाची सत्तरी पार केल्यावरही अकोल्यातील जागृत देवस्थान म्हणून नावारुपास आलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात बाबांचे नित्यनेमाने जाणे होत असे; तेही सायकलने. दर श्रावण सोमवारी महादेवाला 'शेज' केली जाते. विविधरंगी फुलांनी आणि पत्रींनी.....!! हे दर्शन फारच विलोभनीय वाटते. शिवभक्त असल्यामुळे बाबांनी संपूर्ण आयुष्यभर या श्रावण महिन्याचा मनसोक्त आनंद लुटला. उपास असल्यामुळे एकाच वेळचे जेवण. कोहळ्याचे गुळशेलं, टमाटे आणि काकडीची कोशिंबीर, वरण, भात, कोहळ्याची भाजी असा आईने केलेला चविष्ट स्वयंपाक. शेवटच्या सोमवारी होणारा कावड उत्सव म्हणजे तर भक्तांच्या उत्साहाचा कळसच असतो. श्रावण महिन्यातील माझे शहर अकोला अगदी नववधूसारखे नटते. निसर्गही प्रसन्न आणि सर्वांचेच मनही प्रसन्न.
'राखी' ने तर या महिन्याला चार चाँद लावले आहेत. बहिण-भावंडांच्या नात्याला राखणारी 'राखी.'
याच श्रावण महिन्यात येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला (दहीहंडी) सगळ्या भारतभर मोठ्या उत्साहाने साजरी होते. आमच्या घरीही सर्वजण बारा वाजेपर्यंत जागे असतात. बाबांची नेहमीच बदलीची नोकरी. ते कुठेही असले तरी जन्माष्टमी साजरी करायला अकोल्यात यायचेच! कृष्णजन्म तर घरी साजरा व्हायचाच पण या दिवसांमध्ये आई कृष्णाचे चरित्र आम्हाला रंगवून सांगत असे. बराचसा कथाभाग हा तिने फार पूर्वीचे प्रसिद्ध कीर्तनकार बाळशास्त्री हरदास ( आईच्या मावशीचे यजमान) यांच्याकडून त्यांच्या रसाळ वाणीतून ऐकलेला होता. शक्यतोवर त्यांच्याच शब्दात ती आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करी. कृष्ण-सुदामा मैत्री, गोष्ट काल्याची हे विषय प्रामुख्याने डंक्यावर असत. कोणत्याही विषयावर कीर्तन करतांना ऐकणा-यांच्या डोळ्यांसमोर हुबेहूब चित्र निर्माण करण्याची ताकद त्यांच्या कथाकथनात होती; असे आई त्यांचे खूप कौतुक करत सांगायची. 'माझी मराठी भाषा प्रगल्भ होण्यामागे बाळशास्त्रींच्या श्रवणीय कीर्तनाचा आणि त्यांच्या भाषाशैलीचाही सिंहाचा वाटा आहे' असे ती मानते. जन्माष्टमी आली की आजही आवर्जून हे सगळे आठवते. बाळशास्त्रींना आपण पाहिले नाही याचीही खंत वाटते. आईने सांगितलेल्या गोष्टींमधून तर ते आहेतच! बाळशास्त्री हरदास आणि त्यांचे कीर्तन यावरही मला special लेख लिहिण्याची इच्छा आहे. सरस्वतीच्या कृपेने होईल तीही पूर्ण!!..
आपल्या हिंदू धर्मातील सण आणि उत्सव म्हणजेच सर्व मानव-प्राण्यांविषयी आपल्या मनांत असलेली कृतज्ञताच जणू!
'पोळा' हा श्रावण महिन्यात येणारा असाच एक मोठा सण. दिवसभर शेतात राबणा-या बैलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असलेला सण. वर्षातल्या या एकाच दिवशी त्यांना कष्टातून आराम देऊन, पुरणपोळीसारख्या पक्वान्नाचा नैवेद्य त्यांना आपुलकीने खाऊ घातला जातो. लहानपणीचा पाहिलेला बैलपोळा तर मनासमोर या दिवशी जरुर येतो. आम्ही आधी जिथे राहत होतो, त्या घरासमोरच्या रस्त्यांवरुन सजवलेल्या बैलांची भव्य-दिव्य मिरवणूक निघत असे. हा नयनरम्य सोहळा पाहून डोळ्यांचे पारणे फिटे. हा लेख लिहितांना आजही ते सुंदर आणि सजलेले गुटगुटीत वृषभदेव डोळ्यांसमोर येत आहेत.
भारतीय स्वातंत्र्यदिन याच श्रावण महिन्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. सगळीकडेच देशप्रेमाचे वारे वाहू लागतात. आजही स्वातंत्र्यदिन साजरा करतांना शाळेतला १५ अॉगस्ट आठवतोच! देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली अनेक हिन्दी आणि मराठी गाणी आणि कविता मनामनांवर राज्य करतात. हिंदु महिन्यानुसार श्रावण म्हणजेच इंग्रजी महिन्यानुसार अॉगस्ट.
ज्ञानेश्वर जयंती याच महिन्यात येते. माझा भाऊ 'अमोल' याचा वाढदिवस तारखेनुसार अॉगस्ट क्रांतीदिनाचा म्हणजेच ९ अॉगस्टचा व तिथीने ज्ञानेश्वरी पारायणारंभाचा. आप्तेष्टमित्रांचे श्रावणातील वाढदिवस आणि त्यासंबंधी आठवणीही अनेक आहेत. माझ्या आजोबांचाही (सदाशिव मोहरीर) तारखेने जन्मदिवस २१ अॉगस्ट व तिथीने 'पुत्रदा' एकादशीचा होता. २०१५-२०१६ हे संपूर्ण वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले. त्यांच्यासंबंधित अनेक आठवणींनी मागचा श्रावण ते यावर्षीपर्यन्त मनावर रुंजी घातली. 'Amazing
people are born in August' असे मी कुठेतरी वाचलेले आठवले. अनेक सुरेल श्रावणगाणी आणि कवितांनी या महिन्यात मनावर अधिराज्य गाजविले. 'श्रावणात घननीळा बरसला,' 'श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,' 'सुंदर साजिरा श्रावण आला,' इ. इ. श्रावणबाळाची कथाही आठवली.
एकूणच काय तर या श्रावणाने संपूर्ण महिनाभर आठवणींचा Video मला दाखविला ज्याने pause घेतलाच नाही आणि पुढेही या आठवणी delete होणे शक्य नाही.
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
३१/८/२०१६.
No comments:
Post a Comment