Thursday, 2 March 2017

प्रतिभा


कधी? कशी? कुठून कुठे ती येईल?

सांगता येत नाही

कुणाजवळ ती सदैव राहील

अंदाज लावता येत नाही

 

कुणाच्या हातात हात घालून ती

मूर्तिमंत शिल्प घडविते

कुणाकुणाकडून आखीव रेखीव सुरेख

चित्रांची मालिका चितारते

 

कुणाच्या गोड गळ्यांतून गाणं गात फिरते

कुणाला नट, नटी बनवून नटविते

नृत्याविष्कारातून कुणाला ती नाचविते

 

नवनवीन शोधांना विज्ञान दृष्टी ती देते

कथा, काव्य, लेखकांवर साहित्याचा

सोपान चढविते

 

आयुष्य असो की खेळाचं मैदान

क्षणोक्षणी कसोटीत उतरुन

तावून सुलाखून बाहेर निघते

 

आयुष्य आनंदाने जगण्याची कला

ही प्रतिभाच तर देते

प्रतिभेसंगे, छंदासंगे रमता ह्या

आयुष्य कसे निघून जाते!!

 

 

बुध्दीला जोड देता प्रतिभेची

प्रतिभावान ती बनविते

मनगर्भा असते ही प्रतिभा!!

गोरा असो की काळा,

गरीब असो वा श्रीमंत

खेड्यातला असो वा शहरातला

कुणाजवळही ती येऊ शकते

कुणातही अलगद ती शिरु शकते

प्रतिभेच्या रुपातच तर प्रभा

आयुष्याची फाकत असते

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

//२०१७.

No comments:

Post a Comment