Friday, 9 June 2017

आजच्या सावित्रीला वडाची विनंती


तू कालची असो की आजची स्त्री

माझ्यासाठी कोणत्याही युगातली

तूच आहेस सावित्री

 

अगणित वृक्षतोड चालली

पक्ष्यांची किलबिल संपली

जंगलतोडीने घरटी तोडली

चिमण्या, कावळे, राघू, मैना

जंगलात नाही; तर चित्रांत दिसू लागली

निसर्ग नियमांना मानवा!!!....

तूच लावलीस कात्री

 

तू कालची असो की आजची स्त्री

माझ्यासाठी कोणत्याही युगातली

तूच आहेस सावित्री

 

परंपरा, प्रतिष्ठा जपतांना....

मीच नाही राहिलो तर....

याचा केलास का तू विचार??

आयटीत ऐटीत मिरवितांना

एक तरी झाड लावीन

या विचाराचा आता कर निर्धार

 

लहानपणी शाळेत; माझ्या

पारंब्यांना लोंबकळणारी तू

माझ्या दाट, भव्य छायेत

मधल्या सुट्टीत बागडणारी तू

युगानुयुगे लोटली तरी मीच

सर्व सृष्टीचा आधारवड; पण....

मलाच आता गरज तुझ्या आधारवडाची

 

पतीचं दीर्घायुष्य मागतांना....

सात जन्मांचा सोबती ठरवितांना...

वडाचं एक तरी झाड लावून....

माझ्यासोबत निसर्गाच्या

दीर्घायुष्याची गाठ बांध तू

जगाचा उध्दार करणारी तू

म्हणूनच तुला करितो आज विनंती

प्राणवायू मी सृष्टीचा

वाचव मला, वाढव मला

सखे गं सावित्री.....

वाचव तूच आता ही धरित्री

तू कालची असो की आजची स्त्री

माझ्यासाठी कोणत्याही युगातली

तूच आहेस सावित्री.

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

जून २०१७.

No comments:

Post a Comment