Monday, 7 August 2017

आठवणी राखीच्या


आई-बाबांच्या सहवासात सण साजरे करण्याची मजा काही औरच असते. आपल्या भारत देशात संपूर्ण वर्षभर सणांची रेलचेल असते. श्रावणात येणाऱ्या राखीच्या सणाला तर बहिणींच्या आनंदाला पारावार राहत नाही. श्रावणात निसर्गरुपाला जशी शोभा येते, तशीच बहार विविधरंगी राख्यांनी फुललेल्या मार्केटलाही येते. अजूनही आठवतात ते राखीतले सुंदर आणि सुनहरे दिवस! लहानपणी राख्या घेण्यासाठी बाबा मला सायकलने घेऊन जात. जिथे-जिथे ते मला नेत असत; त्याआधी ते सायकलची सजावट करीत. सायकलच्या समोरच्या Carrier ला मऊ गादी तयार करत. त्यावर रंगीबेरंगी, छान डिझाईन असलेले मऊ आणि मोठे कापड लावत. राखीनिमित्त आमच्यासाठी छान नविन कपडे घेतलेले असत. मी नविन फ्रॉक घालत असे. आई माझी छान तयारी करुन देत असे. नविन फ्रॉक सोबतच नविन कानातले, गळ्यातले, रिबन्सही आणलेल्या असत. त्यांची सायकल सजली की आम्ही दोघे राखीच्या दोन-तीन दिवस आधी खरेदीला जात असू. निघण्यापूर्वी सायकलची घंटी बाबा खूपदा वाजवित. तयार केलेल्या मऊशार आसनावर बाबांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या लोभस हावभावांकडे पाहून मी विराजमान होत असे. सगळेच नविन नविन! माझ्या पायांत मखमली चपला घातलेल्या असत. माझे लक्ष रस्त्याच्या दोन्ही बाजूला सजलेल्या मार्केटकडेच असे. मी बाबांना दुकानाकडे बोट दाखवी आणि 'इथे थांब' म्हणत असे. लहानपणी मी बाबांना 'बापडू' म्हणत असे आणि अरे-कारे च्या भाषेत बोलत असे.

मी जास्त राख्या घेत असे. भावांच्या राख्यांसोबतच 'देवराखी' घेतली जाई. माझा चुलतभाऊ 'मोहनदादा पाटखेडकर' दरवर्षी राखी आणि भाऊबीजेला येत असे. त्यादिवशी मी त्याचीही आतुरतेने वाट पाहत असे. मोहनदादा माझ्यापेक्षा खूप मोठा. यानिमित्ताने तोही माझे लाड करी. देवांची पूजा आणि 'देवराखी' घालून, आधी देवांना औक्षण केले जाई. दोन पाट मांडायचे, त्याभोवती रांगोळीचे Border Design काढायचे. पाटाखाली स्वस्तिक काढायचे. रांगोळीत विविध रंग भरायचे. एका मोठ्या ताटात मोठे सुतविलेले नारळ, हळदी कुंकवाची बोटे लावून! नारळाखाली रेशीम वस्त्र, रेशीम वस्त्रावर दोन विड्याची पाने, त्याच्यावर विलायची, लवंग, सोन्याची अंगठी, तुपाचे, फुलवात घालून तयार केलेले निरांजन, नैवेद्याच्या खोब-याच्या वड्या . सर्व जिन्नस असलेले ताट भावाला बहिणीने द्यायची पध्दत असते आणि ते 'शुभ' समजले जाते. नविन कपडे घातलेले, डोक्यावर 'टोपी' घातलेले, दोन्ही 'बंधुराज' गुटुर्ले (गोजिरवाणे) दिसत असत. त्यांना त्यावेळी आपण कोणी 'विशेष' आहोत असे वाटून ते पाटावर ताठमानेने बसत असत. दोघांनाही 'राखी' बांधतांना मी एक मंत्र म्हणत असे; बाबांनी शिकविलेला! तो असा- "येन बध्दौ बलिराजा दानवेन्द्रो महाबलः, तेन त्वां प्रतिबध्दामि रक्षमाचल, रक्षमाचल, रक्षमाचल." औक्षणाच्या ताटासारखेच, आईने केलेल्या दोन भाज्या, चटण्या, वरण-भात, पापड, घरी केलेल्या खोब-याच्या वड्या, पुडाच्या, चौपदरी, तेल लावून केलेल्या पोळ्या . विविध पदार्थांनी ताट सजलेले राही. आमच्या घराच्या काही घरं पुढे एक कुटुंब राहत होतं. त्यांचा 'संतोष' नावाचा मुलगा सकाळीच बहिणींकडून राख्या बांधून घेई आणि नंतर लगेचच सायकलने सगळ्या colony राख्या दाखवित फिरत असे. त्याच्या मनगटावर राख्याच राख्या असत. सायकल हे तेव्हाचे मुख्य वाहन. अनेक मुले रस्त्यांवरुन सायकलने राखीची अशा प्रकारे मिरवणूक काढीत. शाळेतल्या मैत्रिणींमध्येही राखीचीच चर्चा होई. एकमेकींच्या हातावर काढलेल्या मेहेंदीचेही कौतुक होई. दुसऱ्या दिवशी मुलींच्या चेहऱ्यावरचा ऊत्साह बघण्यासारखा असे. पूर्वीप्रमाणेच आजही या सणाची परंपरा कायम आहे. भावाला आयुष्यभर बहिणीची रक्षा करण्याचे बंधन असले तरी या सणाला काळाचे कधीच बंधन राहणार नाही. आजही कितीतरी बहीण-भावंडे यानिमित्ताने एकत्र असतील!

नागपूरला सगळे मावस, मामेभाऊ एकत्र जमले असतांना 'राखी' साजरी केल्याचे आठवते. एकच शंभरची नोट सगळ्या भावांनी फिरविली होती.

आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने हे सर्व लिहावेसे वाटले. आजच्या घडीला बाबा आमच्यासोबत नाहीत. ते 'राखी' आणि 'भाऊबीज' या दोन्हीही सणांच्या दिवशी उदास वाटायचे. त्यांच्या बहिणीच्या आठवणीने ते व्याकूळ होत. आमची 'कुसुम' आत्या पहिल्या अपत्त्याच्यावेळी दुःखद मरण पावली होती. त्या घटनेची छाया या दोन सणांना बाबांवर पडलेली दिसत असे; परंतु केवळ आम्हा मुलांच्या आनंदासाठी ते जाणवू देत नसत. बाबांच्या स्मृतींशिवाय कोणत्याही सणाचा उल्लेख होऊच शकत नाही. तो येणारच!!

आज या सणाच्या निमित्ताने राखीलाच म्हणावेसे वाटते; -

 

श्रावणाची शान तू 'राखी'

मार्केटची शान तू 'राखी'

बहिणीची माया तू 'राखी'

भावाची ओढ तू 'राखी'

बहिण-भावांच्या अक्षय्य स्नेह आणि पावित्र्याची खूण तू 'राखी'

भावांना बांधलेल्या राखीला नसलेल्या बाबांच्या आठवणींची झालर तू 'राखी'

तू 'राखी,' सर्वकाही तूच 'राखी.'

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment