निष्काम कर्मयोगाचा कृष्णाने नुसता उपदेश केलेला नाही; त्याच्या
एकूण जीवनाचे सार यातच आढळते. त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यन्तच्या घटना या सूत्रानुसारच
घडलेल्या जाणवतात. देवकीचा आठवा पुत्र तुला यमसदनी पाठवणार हे कंस विसरुच शकत नव्हता.
त्याने सर्वच पुत्रांना मारण्याचा सपाटा लावला, पण वसुदेवाने कृष्णाला गोकुळात नेले.
तुरुंगाच्या कड्या उघडल्या, यमुनेच्या पुरातूनही वसुदेव गोकुळात पोहोचला. नंद-यशोदेच्या
स्वाधीन कृष्णाला केले. जन्मकथा विलक्षण. रात्री १२ वाजताचा जन्म; आणि एका पारध्याच्या
हातून मृत्यू!
या जन्ममरणाच्या
कालावधीतील एकूण एक घटना स्तिमित करणारी! अचाट आणि अतर्क्य! लहानपणीच केलेले अनेक राक्षस
आणि राक्षसी वृत्तीचे उच्चाटन, कालिया मर्दन, वृंदावनातील गोप, गोपींबरोबरचे सख्य,
कृष्ण-राधा हे अतूट समीकरण, मथुरेला केलेला कंसवध, अशासारख्या अनेकानेक विस्मयकारक
घटनांनी त्याचे बालपण आकर्षून घेणारे आहे.
जितक्या कथा आणि काव्य त्याच्याबाबतीत निर्माण झाले आहे तितके दुसऱ्या कुणाविषयी
क्वचितच असेल. गोकुळ सुटले. मथुरा, कंसवधानंतर कोणत्याही आमिषात न गुंतता सुटली. जरासंधवध,
रुक्मिणीशी लग्न, पांडवांशी आपुलकीचे संबंध, द्रौपदीशी बहिणीचे नाते. सर्व नात्यांना
दिलेला न्याय! कौरव-पांडवांच्या युध्दात पांडवांच्या बाजूने अर्जुनाचे केलेले सारथ्य
आणि मुख्य म्हणजे अर्जुनाच्या मनःस्थितीवरचा उपदेश म्हणजे 'गीता.'
'गीता' फक्त अर्जुनालाच
नाही तर अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. गीतेचा अभ्यास केला नाही असा महाभाग
भारतात सापडणे कठीण आहे. नुसता अभ्यासच नाही तर लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधींपर्यन्त
अनेकांनी 'गीता' आचरली आहे. भगतसिंग 'गीता' हातात घेऊन फासावर गेला. कोर्टात 'गीते'वर
हात ठेवून मी खरं सांगेन, खोटं बोलणार नाही अशी शपथ घ्यावी लागते.
'कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने
प्रणतः क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नमः' - राधेकृष्ण-गोपालकृष्ण - असा जप धार्मिक लोक करतात. कृष्णजन्म देवळांतून,
घरोघरी साजरे होतात. गीतापठनाचे कार्यक्रम होतात, कृष्ण चरित्र लहानपणापासून मुलांच्या
मनावर बिंबविले जाते. नराचा नारायण होऊ शकतो पण त्यासाठी कसे वागायला पाहिजे याची आयुष्यभर
संथा घेतली तरी ते किती कठीण आहे याची जाणीव देणारे हे चरित्र!
कृष्णाला ईश्वरी अवतार
मानावयाचे की नाही हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी कृष्ण जीवन जगणे किती कठीण आहे एवढे
जरी बिंबले तरी कृष्णमय व्हायला होते. त्याच्या आयुष्यातील घटना आणि गीतेद्वारे त्याने
केलेला उपदेश हे सर्व सविस्तर सांगायचे म्हंटले तर 'महाकठीणकर्म.' अनेकांनी त्यादृष्टीने
प्रयत्न केले आहेत. प्रत्येकाला हा विषय खुणावतच आला आहे. त्याला ईश्वरी अवतार मानणारे
अधिकाधिक आहेत. त्याची भक्ती करुन, जीवनात आसक्त न होण्याची शिकवण गिरविणारे तरुनच
जातात, 'शांती' मिळविण्याचे एक प्रमुख औषध म्हणजे 'हरिनाम' असे मानणारे भारतात तर आहेतच
पण हरे रामा! हरे कृष्णा! संप्रदाय इतरत्रही आहेतच! मनातल्या निष्ठेला कोणीच रोखू शकत
नाही. हेच तर कृष्णाने साधले.
कृष्णा, तुझे आहेत सहस्त्र नाम
पण तरीही म्हणवतोस
अनाम
भेटशील का रे मला
मुकुंदा
देशील का मला जीवन्मुक्तीची संपदा
नारायणा, नारायणा, पावना, मनभावना
निर्दाळशील का माझ्या
सा-या वासना
विठ्ठला, पांडुरंगा,
योगेश्वरा
दे तुझी अखंड भक्ती
सर्वेश्वरा
तू भावाचा भुकेला l
मीरेसाठी विष प्याला
तुझ्या, प्रेमाचा दे सर्वांना गोपालकाला
सज्जनांचे संरक्षण आणि दुष्टांचा परिहार
हेच ब्रीद तुझे, हाच
सर्वांसाठी उपहार
श्रीमंत आणि विलासी
तू, पण कशातच नाही गुंतला
एका तुळशीच्या पानाने होते तुझी तुला
नटेश्वरा, तुझे सर्व आविष्कार खूप सुंदर
सारे जग नाचत, गात करते तुझा जयजयकार
कितीही शब्दशिल्पे घडविली तरी ती राहतात अपूर्ण
कारण तू जगत् व्यापी तत्व, साकार, सुंदर आणि संपूर्ण
आकळता आकळत नाहीस, दशांगुळे उरतोस
पण काय आश्चर्य, भक्तांच्या मनांत दडतोस
रे बाळकृष्णा, करुन हातांचा झुला, गाते तुला पाळणा
हार, तुरे, सुंठोडा, पेढे आणि फळफळावळ, तुळशी, गोड मानून घे ना!
एका तुळशीच्या पानाने होते तुझी तुला
नटेश्वरा, तुझे सर्व आविष्कार खूप सुंदर
सारे जग नाचत, गात करते तुझा जयजयकार
कितीही शब्दशिल्पे घडविली तरी ती राहतात अपूर्ण
कारण तू जगत् व्यापी तत्व, साकार, सुंदर आणि संपूर्ण
आकळता आकळत नाहीस, दशांगुळे उरतोस
पण काय आश्चर्य, भक्तांच्या मनांत दडतोस
रे बाळकृष्णा, करुन हातांचा झुला, गाते तुला पाळणा
हार, तुरे, सुंठोडा, पेढे आणि फळफळावळ, तुळशी, गोड मानून घे ना!
आरत्या आणि धुपारत्या, रात्रीचे वाजले बारा
सर्वकाही तुझेच जीवनदीप उजळ सारा
सर्वकाही तुझेच जीवनदीप उजळ सारा
संगीता पाटखेडकर.
२४/८/२०१६.
(श्रीकृष्ण जन्माष्टमी).
आई, छोट्याशा लेखातून संपूर्ण आठवा सामावलास !!
ReplyDeleteशेवटच्या कवितेतून आणि लेखातून समग्र कृष्णाचे केलेले वर्णन; तेही मोजक्याच शब्दात खुबीने वर्णिले आहे. आठव्याची खूप छान पद्धतीने आठवण करुन दिलीस. या जन्माष्टमीला मला तर कृष्णच दिसला, तुझ्या लेखातून आणि कवितेतून.....