Thursday, 31 January 2019

याचि देही याचि डोळा


 फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका दूरवरच्या कुठल्याशा गावातल्या जंगलात 'बनाजी' नावाचा एक लाकूडतोड्या राहत होता. दिवसभर जंगलात राहायचं, झाडांची लाकडं तोडायची, त्या मोळ्यांचा भार डोक्यावर घेऊन मालकाकडे गावात जायचं, रोजंदारीचे पैसे मिळवायचे, स्वतःच्या पोटाची खळगी भरायची, असा त्याचा रोजचा दिनक्रम असे. लाकडं तोडून कंटाळा आला की, एका मोठ्या वृक्षाखाली सुंदर पार होता, तिथे दुपारी जेवण झाल्यावर थोडा वेळ वामकुक्षी करायचा.

  असं एकटंच त्या जंगलात राहून आता त्याला खूप दिवस झाले होते. गावातली माणसे त्याला झोपायला आंथरुण पांघरुण देत. कधी प्रेमाने खायलाही घालत. बनाजी खूपच कमी बोलत असे. गावातल्या बाया-माणसांना तो भला माणूस आहे, कुणाच्या अध्यात ना मध्यात याची आता खात्रीच पटली होती. सावळा रंग, उंच बांधा, त्याच्या कपाळाला लपेटून टाकणारं सुती पण जाड कापड बांधलेलं असायचं! अंगात सदरा नि धोतर! गावातच कुणीतरी दिलेला भाकरी नि मिरचीचा ठेचा, कांदा बांधलेलं एक कापड! फक्त डोळे दिसतील असा एक मोठा रुमाल तो चेहऱ्याभोवती लावायचा! कुणी विचारलं तर सांगायचा, लाकडाची झिलपी डोळ्यांत जाऊ नये, तोंडाला लागू नये म्हणून बांधावं लागतं असं कारण द्यायचा जे प्रत्येक गावक-याला पटायचं! पण तरीही गावातल्या बाया-माणसांना त्याच्याविषयी एक कुतूहल मनांत होतंच आणि ते म्हणजे हा अचानक आपल्या गावात कसा आला? कुठून आला? याची आधीची कौटुंबिक पार्श्वभूमी काय असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कुठून मिळतील याचा ते अधूनमधून विचार करत आणि बनाजीचा आपल्याला, गावाला काही त्रास नाही याचं समाधान मानून, मनांत आलेल्या प्रश्नांकडे कधी दुर्लक्षही करत.

  एक दिवस बनाजी लाकूडतोड्या नेहमीप्रमाणे जंगलात जावयास निघाला असता एका झाडाखाली तो थकून-भागून निवांत बसला. काही वेळाने त्याला झोप लागली. आज तब्येत बरी नाही असं त्याला सकाळपासूनच वाटंत होतं; पण तरीही काम तर करावंच लागणार या हेतूने तो जंगलात आला होता, पण थकवा काही जाईना. अचानक झाडावरून कुणीतरी विव्हळत असल्याचा आवाज त्याला आला आणि त्याला झोपेतून खडबडून जाग आली. बघतो तर काय! एका मोठ्या वानराची शेपटी फांदीत अडकली होती आणि ते जोराने ओरडत होतं. बनाजी लगेच झाडावर चढला आणि त्याने त्या वानराला आधी नमस्कार केला नि मग त्याची अडकलेली शेपटी सोडवली. वानराने लगेच त्याला मिठी मारुन सुटल्याची भावना दर्शविली आणि त्याच्या हातात हात मिळवला, जणू तो बनाजीला धन्यवादच देत होता.

  काही दिवसांतच बनाजी आणि त्या वानराची छान मैत्री झाली. बनाजी जिथे-जिथे कामाला जाई तिथे-तिथे ते मोठं वानर आणि त्याची बायको वानरीण जात असत; पण मध्येच अचानक त्या वानराला काय हुक्की येत होती कुणांस ठाऊक असं बनाजीला वाटे आणि ते दृश्य पाहून बनाजी अस्वस्थ होई आणि त्याच्या भयानक भूतकाळात जाई. दृश्य असं असायचं की, ते मोठं वानर त्या वानरीला नखाने ओरबाडायचं, तिच्या अंगावर धावायचं, तिला आपटायचं! विचित्र वाकुल्या दाखवून तिला घाबरंवायचं! आणि मग मोठ्ठे डोळे करुन ते वानर बराच वेळ बनाजीकडे पाहायचं! जसं ते वानर मोठ्ठे डोळे करत असे तसा बनाजी घामाघूम व्हायचा, त्याला अचानक ताप चढायचा आणि तिथेच भीती भरुन त्याची शुध्द जायची.

  गरीब परिस्थिती, रागीट स्वभाव, आणि बायकोसोबतची होणारी सततची भांडणं,...बनाजी कंटाळला होता एक दिवस गळा दाबून त्याने तिचा खून केला. त्याच्या कपाळाला गुंडाळलेल्या जाड कापडानेच त्याने बायकोचा खून केला होता, तो पुरावा कुणाला तिथे मिळू नये म्हणून ते कापड त्याने कपाळीच लावले होते. बनाजी गावक-यांना शुध्दीत आल्यावर ही गोष्ट सांगू लागला. त्या दैवी वानराला नमन करुन त्याचा प्राणान्त झाला. 'याचि देही याचि डोळा' बनाजीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळालेली पाहून गावकरी स्तब्ध झाले.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment