आजीच्या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवून असलेली
ऋचा आता मात्र मनाशी
पक्का निश्चय करुन चुकली की,
काहीही करुन आजीची डायरी
वाचायचीच! लहानपणापासून तिला; आजीने डायरीत काय लिहलंय याबद्दल
प्रचंड औत्सुक्य होतं; पण खूपदा प्रयत्न
करुनही तिच्या हाती ती डायरी
लागतच नव्हती, कारण बरेचदा आजी
घरीच असायची आणि ती डायरी
नेहमीच तिच्या उशाखाली! कधी बाहेर जायची
वेळ आलीच तर कां
कुणास ठाऊक; पण घरातच कुठल्यातरी
खोलीत ती डायरी आजी
लपवून ठेवायची असा ऋचाने अंदाज
केला होता. तिला; तिच्या आई-बाबांनी अनेकदा
समजावलंही, 'अगं, डायरी प्रत्येकाची
वैयक्तिक बाब आहे! सोडून
दे नाद आजीच्या डायरीचा!'
काही दिवस गेले.
ऋचाला आज कळलं की,
आजी तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे, दिवसभरासाठी!
ऋचाचे
बाबा अॉफिसला जातांना तिला सोडून देणार
होते. हीच नामी संधी
आहे असं मनाशी म्हणून,
पदविका अभ्यासक्रमाला शिकणा-या ऋचाने आज
चक्क कॉलेजला बंक मारायचं ठरवलं
आणि बाहेर जाण्यापूर्वी आजी तिची डायरी
कोणत्या खोलीत लपवते यांवर डोळ्यांत तेल घालून ती
लक्ष देऊ लागली. आजीने
डायरी समोरच्या हॉलमधल्या लाकडी शो केसमध्ये एका
कप्प्यात पुस्तकांखाली ठेवली. दाराच्या मागे लपून ऋचाने
बघितलं आणि तिने आवाज
न करता हातावर आनंदाची
टाळी दिली.
बाराच्या आत सगळी सामसूम
झाल्यावर, आईचं लक्ष नाही
बघून, ऋचाने ती डायरी काढली;
तिच्या खोलीचे दार लावून घेतले
आणि वाचू लागली. डायरी
भलीमोठी होती. आजीच्या माहेरच्या, बालपणाच्या, त्यांच्या शेतावरच्या, घरगड्यांच्या, आजोबांच्या अंगणातील फुलझाडांच्या, तिने आजवर केलेल्या
संकल्पांच्या, देव धर्माच्या, तिने
पाहिलेल्या तीर्थ-स्थळांच्या, तिच्या मैत्रिणींच्या, तिच्या लुगड्यांच्या, तिच्या मुलांच्या-मुलींच्या, शेजा-यांच्या, नातेवाईकांच्या,.....अशा कितीतरी गोष्टी
आजीने सुवाच्य अक्षरात, सुंदर लेखणीत व्यक्त केल्या होत्या. डायरीची पानं वाचतांना ऋचा
दंग झाली होती; मधेच
पानांमधून कधी मोरपीस, कधी
गुलाबाच्या पाकळ्या तिला दर्शन देत.
अचानक वाचता-वाचता एका पानावर बराच
वेळ तिची नजर ठहरली
आणि तो वर्णिलेला प्रसंग
ती परत वाचू लागली.
तिच्या डोळ्यांतून पाणी आलं आणि
आजीची अपूर्ण राहिलेली इच्छा आपण पूर्ण करु
असा निर्णय तिने घेतला. आजीची
बहुतांश वैशिष्ट्ये ऋचामधे उतरली होती; त्यातलंच एक म्हणजे रुचकर
पदार्थ करणे! आजीसारखाच सुगरणीचा हात ऋचाचाही होता,
म्हणूनच तिला असं वाटलं
की, जे आजीचं करायचं
राहून गेलं ते आपण
करु. संध्याकाळ झाली. आजी घरी यायच्या
आत ऋचाने गुपचूप ती डायरी जिथे
होती तिथे ठेवली.
कॉलेजचं वार्षिक स्नेह संमेलन आणि आंतरमहाविद्यालयीन पाककला स्पर्धा.
मैत्रिणीसोबत आदल्या दिवशी जाऊन, बाबांनी दिलेल्या पॉकेटमनीतून ऋचाने पदार्थांसाठी लागणारं सर्व साहित्य तयार
ठेवलं. आजीने डायरीत सांबार वडी आणि श्रीखंडाची
जशी साहित्य-कृती लिहिली होती
अगदी तशीच करण्याचा ऋचाने
प्रयत्न केला, कारण स्पर्धेची अट
होती, दोन पदार्थ स्वहस्ते
घरुन करुन आणायचे. सजावटीसाठी
फुलांचे गुच्छ, तयार केलेले पदार्थ
घेऊन ऋचा उत्साहात आणि
जिंकण्याच्या आशेने कॉलेजला गेली. ती बाहेर निघण्यापूर्वीच
पदार्थांचा घमघमीत सुवास घरभर पसरला होता.
केंव्हा एकदा आपल्या पोटात
ऋचाने बनविलेले पदार्थ खातो, असे घरच्या मंडळींना
वाटले. कॉलेजमधे खूप स्टॉल लागले
होते. परीक्षक एकेका टेबल जवळ येऊन
प्रत्येकीच्या पदार्थांची चव घेऊ लागले.
काही मनोरंजक कार्यक्रम आणि स्पर्धा यात
दिवस कसा निघून गेला
कळलेच नाही आणि संध्याकाळी
निकाल लागला. प्रथम क्रमांकाचे बक्षिस ऋचाला मिळाले. "माझी आजी तरुण
असतांना एका मोठ्या पाककला
स्पर्धेत तिच्या आईची तब्येत बरी
नसल्याने भाग घेऊ शकली
नाही. हेच दोन पदार्थ
तिने त्यावेळी केले होते. तिने
याविषयी लिहिलेली खंत मी तिच्या
डायरीत वाचली आणि नातीच्या रुपाने
तिचे स्वप्नं पूर्ण करायचे ठरविले."
ऋचाचे
हे दोन शब्द पाठीमागे
बसलेली आजी ऐकत होती
आणि डोळे भरुन नातीकडे
बघत होती.
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
No comments:
Post a Comment