२६ जानेवारी उजाडायच्या
चार दिवस आधी पोलिस
स्टेशनमधे एक फोन येतो,
'इन्स्पेक्टर, मी विवेक! माझ्या
घरी झालेल्या मोठ्या चोरीची तक्रार नोंदवायला मी काही दिवसांपूर्वी
येऊन गेलो. काही पत्ता लागला
का त्या चोरांचा'! इन्स्पेक्टर
सावंत यांनी खाली मान घातली
आणि नाईलाजाने 'नाही' उत्तर दिले आणि नंतर
बराच वेळ ते याच
गोष्टीवर सखोल विचार करु
लागले. पाच अट्टल चोरांची
टोळी शहरात सक्रिय होती आणि मुख्य
म्हणजे चतुराईने ते पोलिसांच्या हातावर
तुरी देऊन मुक्तपणे कुठेतरी
संचार करत होते. निदान
येत्या २६ जानेवारीपर्यन्त तरी
हे चोर आपल्या हाती
लागावे आणि हा दिवस
आपल्या कारकीर्दीत संस्मरणीय ठरावा अशी त्यांची इच्छा
होती.
हाश्श! हुश्श्! करत, दम खात,
धापा टाकत, जड पावलांनी, आजूबाजूला
बघत, ते पाच चोर
रात्रीच्या सुनसान वेळी, शहराच्या मध्यभागी, राष्ट्रध्वज जिथे फडकविला जातो,
त्या मोठ्या स्टँडखाली बेशरमासारखे येऊन बसले. प्रत्येकाच्या
हातात भलामोठा चोरीचा माल होता. 'चोराला
पोलिसांचे भय' आणि वर
दिसत असलेलं आकाशातलं चांदणं चोरांच्या मनांत नेहमीच असतं'! 'चोराच्या मनांत चांदणं'!! काही वेळच ते
तिथे विसावले आणि लगेच पळ
काढण्याचे ठरवून, तिथेच लागलेल्या एका फलकाजवळ थांबले.
त्या चोरांपैकी एक चोर त्यावर
काय लिहिले हे वाचू लागला.
येत्या २६ जानेवारीला कुण्या
'विवेक' नावाच्या वक्त्याचे इथे भाषण होणार
आहे आणि समाजातील, देशातील
प्रतिष्ठित उद्योगपती मंडळी, इतरही व्यवसायातले धनवान लोक इथल्या कार्यक्रमाला
उपस्थित राहणार आहेत, असा मजकूर त्या
फलकावर होता. 'विवेक' नाव वाचल्यावर त्या
चोराला काहीतरी आठवलं आणि तो दचकला.
इतरही चोरांना ते नाव ओळखीचं
वाटलं आणि काही दिवसांपूर्वीच्या
चोरीची आठवण त्यांना आली.
अंधा-या रात्रीची ती
घरफोडी, ते सोनं, चांदी,
हि-यांचे दागिने आणि तीच 'विवेक
संत' या नावाची मोबाईलच्या
उजेडात वाचलेली नावाची पाटी! सगळं काही लख्ख
आठवत होतं त्यांना! आता
त्या चोरांना दरदरुन घाम फुटला आणि
तिथून ताबडतोब ते निघाले.
विवेकच्या आजीचे आणि आईचे परंपरागत
दागिने चोरीला गेले. आजी आणि आई
रोज एकमेकींजवळ रडायच्या! कारण चोर सापडत
नव्हते. त्या चोरांच्या नावाने
आजी बोटं मोडू लागली
आणि अंतःकरणातून निघालेले तळतळाट त्यांना देऊ लागली.
२६ जानेवारीला वेष
बदलून शहरातल्या या कार्यक्रमाला जायचे
त्या चोरांनी ठरविले. एक चोर विरोध
करुन म्हणाला, 'खुळं की काय
तुम्ही?' तिथे आपल्याला पोलिसांनी
ओळखलं आणि पकडलं तर?
सगळी मेहनत वाया जाईल!' त्यावर
ते बाकी चोर म्हणाले,
'तू चल तर आमच्यासोबत!
बघू तरी! हे उपदेश
करणारे विवेकसारखे लोक काय सांगतात?' पुढे
तोच कुत्सितपणे म्हणाला, 'ह्याच्या घरी आपणच चोरी
केली! जरा मजा घेऊ
त्याच्या बोलण्याची!'
देशभक्तीपर गीतांनी आणि तिरंग्याच्या तीन
रंगात सजलेल्या एकूणच वातावरणाने सभामंडपात येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साहाने भारलेली 'देशभक्ती' दिसत होती. सगळीकडे
चोख सुरक्षा व्यवस्था होती. साध्या साळसूद वेषात, इतर लोकांप्रमाणेच ते
पाचही चोर तिथे आले
आणि सोबतच खुर्च्यांवर बसले. जिल्हाधिका-यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात राष्ट्रध्वजाला सलामी दिली गेली आणि
नंतर 'जनगणमन' झाले. काही नेत्यांची भाषणे
झाली. आता बोलण्यासाठी व्यासपीठावर
'विवेक' आला.
त्याने समस्त प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला,
'राष्टध्वजाला हात लावण्यास खरा
समर्थ कोण?' कुणाचेच उत्तर नाही आले. आता
विवेकने सर्वांना एक प्रयोग सांगितला,
सर्वांनी आपल्या दोन्ही हातांची ओंजळ उघडा आणि
मग स्वतःलाच प्रश्न करा, मी कधीही
कुणाला फसवले नसेल, चोरी, लांडीलबाडी केली नसेल, माझ्या
मनांत खोटेपणा, पाप नसेल तर
अशा माझ्यासारख्या प्रत्येकाला राष्ट्रध्वजाला हात लावण्याचा अधिकार
आहे, अन्यथा नाही! कारण, मित्रहो! तिरंगा पवित्र आहे आणि त्याची
शानही! चोरांनी शरमेने मान खाली घातली,
ते धावतच विवेकच्या पाया पडले आणि
सर्वांसमोर गुन्हा कबूल करुन पोलिसांच्या
स्वाधीन झाले.
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
No comments:
Post a Comment