Thursday, 31 January 2019

गोष्ट सोरंगट्टीची


  आज सकाळपासून दुपारी शाळेत जाईपर्यन्त चिंटूने आईजवळ एकच घोशा लावला होता; 'आई, सांग ना गं? आजोबा आज किती वाजेपर्यन्त येतील?' आई म्हणाली, 'अरे! चिंटू , धीर धर ना! आजोबा लांबच्या गावाहून येत आहेत. रात्र होईल त्यांना! आणि हे बघ! आल्या-आल्या लगेच गोष्ट सांगण्याचा हट्ट नको करु बरं! थकले राहतील ते!' स्वरचित गोष्टी लिहिणारे आजोबा चिंटूला फार प्रिय होते. आजोबांचं येणं म्हणजे त्याच्यासाठी 'उत्सव' असायचा, धमाल असायची; कारण ते वेगवेगळ्या गोष्टींचे दिवस असायचे! केंव्हा एकदा शाळा आटोपते, दिवस संपतो आणि आजोबांची भेट होते ह्या विचारातच चिंटू गुंग झाला होता.

  अखेर तो क्षण आला. एरवी रोज रात्री लवकर झोपी जाणारा चिंटू आज मात्र टक्क जागा होता. रात्री उशिरा त्याचे लाडके आजोबा भरपूर सामानासह घरी आले होते. चिंटूची सगळीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आजोबा एक-एक वस्तू दाखवत होते. आजीने बनविलेल्या शेवया, सांडया, कुरडया, पापड, लोणची, तिळाची, कारळाची, लसणाची, मिरचीची....अशा विविध चटण्या आणि इतर फळभाज्यांचे जिन्नस त्यांनी चिंटूच्या आईजवळ दिले. एका पिशवीत चिंटूसाठी को-या वह्या आणि खूप सारी गोष्टींची पुस्तके होती. चिंटूची पहिली नजर त्या पुस्तकांवर गेली आणि तो म्हणाला, 'हे  हो काय आजोबा? तुम्ही लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक कुठे आहे?' आजोबा हसले आणि म्हणाले, 'चिंटू, अरे! चिंता नको करु! तुला मी एक छान गोष्ट सांगणार आहे बरं का! मी लिहिलेली! पण उद्या हं!' चिंटू आजोबांच्या मांडीवर जाऊन बसला आणि दुस-या दिवसाची वाट पाहू लागला. मनांतच खुदकन हसला आणि रात्री आजोबांजवळच झोपला.

  दुस-या दिवशी शाळेतून आल्यावर चिंटूने पटकन 'होमवर्क' पूर्ण केले. थोड्या वेळानेच आजोबांनी त्याला हाक दिली. आता आजोबांची गोष्ट ऐकण्यासाठी पूर्ण वातावरणनिर्मिती तयार झाली होती; कारण चिंटूचे आई-बाबा सुध्दा गोष्ट ऐकण्यास उत्सुक होते. 'ऐक चिंटू! ही गोष्ट आहे आफ्रिका देशातल्या 'सोरंगट्टी' नावाच्या जंगलाची! ह्या जंगलात सर्व प्रकारचे प्राणी गुण्या-गोविंदाने राहत होते; पण वाघ-सिंह जिथे, मरणही लवकरच तिथे! अशी भयभीत अवस्था सर्वच प्राण्यांची होती.
हरीण-काळवीट आणि इतरही प्राण्यांना रोज मरणाचे भय वाटे; कारण प्राण्यांची रोज शिकार करुन वाघ-सिंह फडशा पाडत.
हरीण-काळवीट, बक-या, या गरीब प्राण्यांना जीवन जगणे कठीण जाऊ लागले. आता काहीतरी मार्ग काढायलाच हवा असे हरीण कंपनीतल्या म्होरक्याने ठरविले. ह्या जंगलात सहज जीवन जगायचे असेल तर प्रचंड शक्तीने आणि एकजुटीने या वाघ-सिंहांना प्रतिकार करायलाच हवा याबाबत प्राण्यांनी सक्तीची मिटींग घेतली. कुणीच एकटं राहायचं नाही; सतत घोळक्यानेच जंगलात वावरायचं अशी सर्व प्राण्यांनी शपथ घेतली, पण हरणांच्या कळपातलं एक हरीण जायबंदी झालं होतं आणि एका पायाने लंगडत होतं. आता म्होरक्यासहित सर्वांना अशी दाट शंका येत होती की, ह्याची शिकार करण्याचा प्रयत्न निश्चितच वाघ-सिंह करतील, तेंव्हा याला आधी वाचवणं महत्त्वाचं असं ठरलं! म्होरक्याचा अंदाज खरा ठरला होता. दुस-याच दिवशी त्याच्या मागे वाघ लागला; पण ते हरीण मुळात तसं खूप चपळ असल्याने, जिद्दी असल्याने दाट जंगलात ते लपून राही. आता काळवीटांच्या कळपानेही त्याला संरक्षण दिले होते. सगळे मिळून जोरात पळत होते आणि वाघाला पराभूत करण्याचा प्रयत्न करत होते.
खूप पळवा-पळवी आणि लपाछपीनंतर अखेर हरीण-काळवीटांचा विजय झाला आणि त्या वाघाला काहीही शिकार मिळता परत जावे लागले. आता दरवेळी प्राण्यांचे संगठन अशीच युक्ती करु लागले आणि त्यांच्यातल्या एकजुटीने एक दिवस असा उजाडला की, वाघ-सिंह कायमचे ते जंगल सोडून गेले.'

  आजोबांनी चिंटूला प्रश्न केला, 'सांग! या गोष्टीचं सार?' चिंटू उत्तरला, 'एकीचं बळ असेल तर कुणाचाही एकाधिकार चालत नाही.' चिंटूच्या उत्तरावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. दुस-या दिवशी शाळेत गोष्टींच्या वर्गात चिंटूने हीच गोष्ट रंगवून सांगितली.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment