आज २१ सप्टेंबर २०१६. जागतिक शांतता दिन. International
Peace Day.
संपूर्ण जगात
शांतीपूर्ण वातावरणनिर्मितीला किती महत्त्व आहे, याचाच विचार आज सकाळपासून मनांत येत
आहे. आज माझे मन 'शांती' या शब्दाचा वेध घेत आहे. नुकत्याच 'ऊरी' येथे झालेल्या दहशतवादी
हल्ल्यांमुळे आपला भारत देश शोकाकुल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महाराष्ट्राच्या
आणि देशाच्या ज्या-ज्या जवानांनी संपूर्ण ताकदीनिशी आणि भरघोस शस्त्रसाठ्यांसह घुसलेल्या
अतिरेकी दहशतवाद्यांशी निकराने आणि जिद्दीने झुंज दिली आणि अमर झाले, त्यांना कोटी
कोटी नमन!! पण, असे किती दिवस चालणार? किती
दिवस असेच हल्ले होत राहणार? आपले जवान शहीद होत राहणार? आपण त्यांना श्रद्धांजली वाहत
राहणार? असे कितीतरी प्रश्न या निमित्ताने सर्वच भारतीयांच्या मनात उपस्थित झाले.
राष्ट्राराष्ट्रांमध्ये
शांतता प्रस्थापित करावयाची असेल तर जे-जे, त्या-त्या राष्ट्राचे नागरिक आहेत, त्यांच्यावर
लहानपणापासून चांगले संस्कार झाले पाहिजेत.
चांगल्या, उदार विचारसरणीच्या व्यक्तिमत्चांची त्यांना ओळख असली पाहिजे आणि जाणही असली
पाहिजे. काही राष्ट्रे नेहमीच अतिरेकी आणि दहशत फैलविणारे प्रशिक्षण बालपणापासूनच त्यांच्या
देशातील मुलांना देत असतात म्हणूनच पुढे त्यांचे मन आणि शरीरही अतिरेकीच बनते. विवेकी
वागणूक आणि विचार यांना त्यांच्या ठिकाणी थारा नसतो. ही अतिरेकी विचारसरणीच शांततामय
वातावरणनिर्मितीला बाधक आहे. या ठिकाणी मला माझ्या बाबांचे वाक्य आठवले; "कुंभार
मातीचे मडके बनवितात. ते कच्चे असले तरच त्याला चांगला आणि हवा तसा आकार देता येतो, ते भाजल्यावर नाही,- असेच संस्कारांचेही आहे."
जगाला लागलेला कायमस्वरुपी व्हायरस म्हणजेच 'दहशतवाद' आणि या दहशतवादी मनोवृत्तींवर
मात करणारे अँटी व्हायरस म्हणजेच 'शांतीदूत' असतात, असे मला वाटते.
आजपर्यंतच्या इतिहासात
जगात अनेक 'शांतीदूत' निर्माण झाले. सिद्धार्थ गौतम बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा गांधी,
नेल्सन मंडेला. या सर्वांनी संपूर्ण मानवजातीला शांतीचा महान संदेश दिला.
सिद्धार्थ गौतम बुद्धाचे
महान विचार खालीलप्रमाणे;
'What is the
difference between I like you, I love
you?'
Beautifully answered by Buddha:-
"When you like a flower, you just pluck it. But When
you love a flower, you Water it daily."........!!
One who
understand this, understands life.
'खरा तो एकचि धर्म,
जगाला प्रेम अर्पावे.'
'हे विश्वची माझे घर'
म्हणणा-या ज्ञानेश्वरांनी तर संपूर्ण मानवजातींवर प्रेम केले. सर्वांविषयीच आपुलकी,
जिव्हाळा, प्रेम असेल तर संस्कारी मन अतिरेकी होत नाही. कोणत्याही समस्येच्या मुळाशी
जाऊनच विचार करणे केंव्हाही योग्यच!!
आपल्या हिंदु धर्माची
शिकवण आणि संस्कार महान आहेत. कोणत्याही आरतीनंतर आणि मंत्रपुष्पांजलीनंतर आपण सर्वजण
ॐ शांतीः शांतीः शांतीः म्हणतो!! जगातील सर्वच धर्मांची शिकवण ही मानवतावादी दृष्टीकोन,
प्रेम आणि शांतीचा संदेश देणारी आहे.
'कलिंग' च्या युद्धात
झालेला अमानुष मानवी संहार पाहून 'सम्राट अशोक' चे मन हळहळले, व्याकुळ झाले आणि त्यानंतरच
त्याने शांतीचे, सलोख्याचे आणि प्रेमाचे महत्त्व जाणून बुद्ध धर्माचा स्वीकार केला
आणि प्रसारही केला. महात्मा गांधी हे तर अहिंसा आणि शांतीचे पुजारी होते. नेल्सन मंडेला
हे दक्षिण आफ्रिकेचे नेते! जगात शांती नांदावी यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रमांद्वारे
अथक प्रयत्न केले. प्रत्येक धर्माने आपापल्या देशातील महनीय व्यक्तींचे आदर्श आणि त्यांचे
महान विचार यांचा संदेश जगाला दिला पाहिजे. आपल्या हिंदू धर्मात तर संत आणि महंतांची
काहीच कमी नाही. त्यांचे विचार संपूर्ण जगाला माहित करुन देण्याची आवश्यकता आहे. विविध
देशांतील, धर्मातील आणि जातीतील सद्सद्विवेकाच्या विचारांचे आदान आणि प्रदान राष्ट्राराष्ट्रांमध्ये
झाले पाहिजे; विशेषतः शाळकरी आणि तरुण मुलांवर!!
विवेकशील, विचारी,
संस्कारी, ज्ञानी विचारांचे आणि मनाचे लोकच जगात शांततेचे आणि प्रेमाचे मनोरे बांधू
शकतात. दहशतीला आणि अतिरेकी विचारांना
नेस्तनाबूत आणि पराभूत करु शकतात.
चला.... तर मग, आजच्या शांतीदिनी आपणही सर्वांनी 'शांतीदूत'
होण्याचा संकल्प करु या..... !!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
२१/९/२०१६.
No comments:
Post a Comment