"सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी,
नारायणी नमोsस्तुते."
"जयदेवी जयदेवी
जय महालक्ष्मी
वससी व्यापकरुपे तू
स्थूलसूक्ष्मी"
सर्व जगात जिची अधिसत्ता
चालते ती म्हणजे 'लक्ष्मी.' ज्यांना ही प्रसन्न असेल त्यांच्या जीवनात आनंदीआनंदच असतो.
सर्व सुखे पायाशी लोळण घेतात ते हिच्यामुळेच!! ती सूक्ष्मरुपात सगळीकडे असते. सर्व
अलक्ष्मीचा नाश व्हावा आणि सगळीकडेच मंगलमय वातावरणनिर्मिती व्हावी यासाठी सर्वजण हिची
आराधना करतात. अशा या महालक्ष्मींचे आगमन, पूजन आणि विसर्जन गणेशोत्सवात होते. याच
दिवसांत का? असा प्रश्न मनाला पडतो. घरोघरी गणपतींची प्रतिष्ठापना झाली असते. असे म्हणतात
की, गौरी म्हणजेच पार्वती, घराघरात जाते आपल्या मुलाला भेटायला! मग त्याच्यासहित त्यांचेही कोडकौतुक केले जाते.
"गौरी" म्हणजेच माहेरी आलेल्या मुली. फक्त तीन दिवसांचे
त्यांचे माहेरपण असते. 'फक्त' हा शब्द मी जरा दबकूनच वापरला; कारण हे फक्त तीन दिवस
नसतात, तर अत्यंत कठीण आणि कडक सोवळे पाळून करावयाचे हे व्रत असते. मग तीन दिवसच का
या येतात? असा प्रश्न मनात आला. केवळ आपल्या हिंदुधर्मातच नाही तर इतर धर्मातही तीन
या आकड्याला महत्व आहे. त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश. 'ब्रह्मरुपिणी' असे
आणखीन् हिचे एक नाव. पृथ्वी, आकाश, पाताळ तीनच! तीन पानांचाच 'बेल' असतो. गणपतीला ज्या
'दुर्वा' आपण अर्पण करतो; त्याही त्रिदल असतात. पळसालाही पानें तीनच असतात. ख्रिस्ती
धर्मात पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, हे तीन महत्वाचे मानतात. मुस्लिम धर्मात ७८६
हा बिस्मिल्लाचा नंबर आहे. या तीन अंकांची बेरीज केली तर ती २१ होते; आणि या दोन अंकांची
बेरीज केली तर ती तीन होते. असा आहे 'तीन' चा महिमा. हे सर्व तीन शुभ!! अशुभातही तीन
महत्वाचे. 'तीन तिघाडा, काम बिघाडा' अशी म्हण. कोणत्याही शुभ कार्याला तिघांनी एकत्र
जाऊ नये, असा पूर्वी समज होता. तीन संकटे एकाचवेळी आली असतील तर 'तीन त्रांगडं' झालं!
असं मराठीत आपण म्हणतो. त्रिशंकू अवस्था!!
'गौरी' आगमनाची खूप
आधीपासून पूर्वतयारी असते. अलक्ष्मी म्हणजेच अस्वच्छता घालविली तरच लक्ष्मी येणार!!
या 'गौरीं'च्या स्वागतासाठी डोळ्यात तेल घालून घरातील प्रत्येक
सदस्याला सज्ज राहावे लागते. हे व्रत म्हणजे तोंडाच्या बाता नव्हेत. संपूर्ण घर स्वच्छ
करणे, देवांचे साहित्य एकत्र ठेवणे, जास्तीची भांडी तयार ठेवणे, सोन्याचे दागिने, चांदीची
भांडी polish करणे, भारी साड्यांची तयारी असणे, विविध धान्यांच्या राशी ठेवणे, त्यात
प्रामुख्याने तांदूळ आणि गहू. पैसा म्हणजे लक्ष्मी तसेच धान्य आणि पाणी म्हणजेही लक्ष्मीच!!
मोदक, करंज्या, साटो-या, पात्या, शंकरपाळे, अनरसे, लाडू, चकल्या, असा सोवळ्यात फुलोरा
तयार करणे!! या काळात सोळा ला खूप महत्व! षोडशगुणी विडा,म्हणून 'तांबूल' बनविला जातो.
षोडश 'मातृका' असतात, म्हणून सोळाचे महत्व!!
विविध फुलांचे हार आणि पत्री तयार ठेवणे, सजावटीचे सर्व साहित्य घेणे, एक ना
अनेक व्याप. 'सोळा' प्रकारचे गौरीचे शृंगार असतात, म्हणूनही सोळाला महत्व!! भारी साड्या
नेसवून, वेगवेगळे दागिने घालून, गजरे घालून, फुलांचे सुंदर झुबकेदार, चमकी असलेले,
हार घालून, सुंदर ठुशी आणि नथ घालून या माहेरी आलेल्या गौरींना सजविले जाते. आजच्या
काळात तर विविधरंगी दिव्यांची रोषणाईही मखरात केली जाते. मखर स्वहस्ते तयार करणे हा
अजून एक ज्याच्या त्याच्या हौसेचा भाग.
दुसऱ्या दिवशी विविध
पदार्थांचा नैवेद्य त्यांना दाखविला जातो. पुरणपोळी, सोळा भाज्यांची भाजी, पातळभाजी,
त्यासोबत आणखी दुसरी भाजी, पंचामृत, हिरव्या मिरच्यांची चटणी, विविध कोशिंबिरी, कढी,
वरण, भात, साधी पोळी, घा-या, आंबिल, भजे, वडे, असा पदार्थांचा थाटमाट असतो. 'आंबिल'
प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बनविली जाते.नागपूरकडे ती हळद, तिखट, कढीपत्ता घालून
फोडणीची बनविली जाते. अकोल्यात ती बिनफोडणीची आणि पांढरीशुभ्र असते. या आंबिलीवर पिठीसाखर
आणि दूध टाकले जाते. काही घरी पिठीसाखरेऐवजी गूळ घातला जातो. गौरीपूजनाच्यावेळी लक्ष्मीची सोळा किंवा सहस्त्र
आवर्तने यजमानांनी घेणे विशेष महत्वाचे असते.
ॐ हिरण्यवर्णाम् हरिणीम्, सुवर्णरजतस्त्रजाम्, चन्द्राम् हिरण्मयी
लक्ष्मीम् जातवेदो म आवह, ताम् आवह जातवेदो, लक्ष्मी मनप गामिनीम्, यस्यां हिरण्यम्
विन्देयम् गामश्वम् पुरुषानहम्...... पासून ते 'न क्रोधो नच मात्सर्यम् न लोभो नाशुभाम्
मतिम्, भवन्ति कृतपुण्यानाम् भक्तानाम् श्रीसूक्तम् जपेत्'...... ते 'अश्वदायी, गोदायी,
धनदायी, महाधने, धनम् मे जुषतां देवीं सर्वकामांश्च देहि मे' अशी शेवटी फलश्रुती म्हंटली
जाते. 'श्रीसूक्त' मला तोंडपाठ आहे. आई रोज म्हणायची. तिचे ऐकता ऐकताच माझे पाठ झाले;
त्याच्या अर्थासहित. अशीच गत वेगवेगळ्या आरत्यांचीही झाली. आईचे ऐकता ऐकताच माझ्या
मनात अनेक आरतींचा संग्रह तयार झाला. आजच्या काळात याच आरत्या आणि श्रीसूक्त, पुरुषसूक्त,
मनाचे श्लोक, मारुतिस्तोत्र, रामरक्षा....,,, मुलांना पाठ असाव्यात, अस्खलित संस्कृत
यावे, यासाठी पालक त्यांना संस्कारवर्गात पाठवितात. Convent मध्ये शिकत असलेल्या मुलांना
मी संस्कारवर्गात शिकतांना पाहिले आहे. सहजसंस्काराचा सुंदर अनुभव आईने आम्हाला दिला.
'आई' हे आपल्या घरातील अखंड लक्ष्मीचे रुप असते.
'अन्नदान' हे आपल्या
संस्कृतीतील पुण्यदान!! गौरीपूजनाच्या निमित्ताने अनेक आप्तस्वकीय, नातेवाईक, हितचिंतक,
शेजारी, या सर्वांना प्रसादाचे राजीखुशीने आमंत्रण दिले जाते. सुवासिनी स्त्रियांची
ओटी भरुन, हळदी, कुंकू लावून, त्यांनाच गौरीरुप समजून, त्यांचा यथोचित पाहुणचार केला जातो. मुलगी आणि जावई
या दिवशी जेवायला असणे, शुभ समजले जाते. स्त्रीशक्तीचा मान, सन्मान, प्रेम, आदर राखणारा
हा सण. प्रसाद ग्रहण करण्यासाठी आलेल्या सुवासिनी स्त्रियाही तिची खण आणि नारळाने,
हळकंड, सुपारी, हळदी-कुंकू, पैसे, काजू, बदाम, मनुके, तांदूळ घालून यथाशक्ती ओटी भरुन
पदरात कुटुंबाच्या समृद्धी, शांती, स्वास्थ्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी तिच्याजवळ दान
आणि आशिर्वाद मागतात. सुखकर्ता, दुःखहर्ता ही आरती झाल्यानंतर अनेक आरत्या या दिनी
म्हंटल्या जातात. 'जय जय नदीपति प्रियतनये, भवानी महालक्ष्मी माये, आदि क्षीरसागर रहिवासी,
जय जय कोल्हापुरवासी,'...... 'आरती त्रिपुरसुंदरीची, अंबिका माय रेणुकेची.'
'त्रिपुरसुंदरी' हे
अजून एक तिचे नाव!!
ह्या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त भरुन पावल्यासारखी स्थिती त्या
घरातील माय, माऊलीची होते. मुले-सुना, लेक-जावई, नातवंडे, जावा, नणंदा, माहेरची, सासरची
माणसे यांना एकत्र आनंदाने नांदतांना पाहून ती तृप्त होते. सण एक आणि उद्देश अनेक साधले
जातात.
लक्ष्मी त्यांनाच
प्रसन्न होते, जे अथक ज्ञान मिळवून परिश्रम करतात, सन्मार्गाने तिला मिळवितात, सहृदयी
अंतःकरणातून समाजसेवा करतात, अशांजवळ ती चिरकाल टिकते. लक्ष्मी चंचल असते म्हणतात.
ती एकाच ठिकाणी खूप काळ थांबत नाही. जिथे दुराचार,
अनीती, भांडणे, वाद, फसवणूक आहे, अशा लोकांना ती तात्पुरता आनंद देते, पण नंतर तिच्याद्वारे
होणाऱ्या सूडालाही सामोरे जावे लागते.
तिसऱ्या दिवशी या गौरी
महात्म्याची कथा वाचली जाते. कथावाचन संपायच्या आत गाठी पाडाव्या लागतात. आरती होते,
मंत्रपुष्पांजली होते. यजमान तिच्यासमोर नतमस्तक होऊन नाक घासतात. संध्याकाळी शेजारच्या
स्त्रियांना हळदी, कुंकू लावले जाते, आणि 'पुनरागमनायच' म्हंटले जाते. त्या त्यांच्या
गावी निघून जातात. सर्वांना हुरहूर लागली असते. 'पुनरागमनायच' यात अनेक अर्थ, माझ्या
मते दडले आहेत. तुझ्या येण्याने सतत सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे अखंड पुनरागमन होत
राहो, नातेवाईकांच्या भेटीचे पुनरागमन होत राहो, प्रामाणिकपणे केलेल्या कष्टांचे चीज
होऊन तुझ्या स्थिर आणि चिरंतन रुपाचे पुनरागमन होत राहो, तू, शक्तीरुप आहेस, आमच्यातल्या
शक्तींचे, सामर्थ्याचे, जिद्दीचे, यशाचे महत्व जगाला दाखविण्यासाठी पुनरागमन होत राहो,
स्त्री ही अबला नसून सबला आहे, हे, तू परोपरीने पटवून दिले आहेस; त्याची जाणीव जगामध्ये
अखंड जागृत राहो, कोणत्याही स्त्रीवर अन्याय न होवो, यासाठी, हे गौरी, तुझे अखंड पुनरागमन
होवो...... असा 'पुनरागमनायच' या शब्दाचा व्यापक आणि उदात्त अर्थ आहे.
आजही अनेक घरांतून
कुळाचाराप्रमाणे हा सण साजरा केला जातो. आमच्या पाटखेडकरांकडे सध्या गौरींचे आगमन अमरावतीला
होते. मोठ्या काकांचा नातू केयूर पाटखेडकर याच्याकडे!! त्याची पत्नी श्रुती ही
M.E. असून सध्या स्थानिक Engineering कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, आणि आता P.H.D. करीत
आहे. आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम म्हणजे 'श्रुती.' लुगडे, दागिने, नथ घालून
प्रसन्न चेहऱ्याने ती सासवांना यादिवशी सोवळ्यात मदत करीत असते. सर्व नैवेद्य घरीच
बनविला जातो. अनेक मंडळी जेवायला असतात. पाटखेडकरांच्या कर्तबगार सुनांपैकी हीही एक.
'श्रुती', तुला या लेखाद्वारे माझ्यातर्फे सलाम!! Keep it up!!!
आमच्या सोसायटीत 'शास्त्री'
यांच्या घरी माझ्या आईला गौरीपूजनाचे आमंत्रण होते. आई आरतीच्या वेळी गेली आणि तिने
महालक्ष्मी समोर स्वहस्ते बनविलेले अनरसे ठेवले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल तिला पुन्हा
त्यांनी दर्शनाला आमंत्रित केले. अनरश्यांची काय तारीफ केली हो सगळ्यांनी!! त्यांच्या
घरच्या स्त्री वर्गाने आईकडूनच अनरसे करण्याचा आणि शिकण्याचा निश्चय केला; तिच्या देखरेखीखाली!!
'तुम्ही इतक्या सुशिक्षित असूनही ही पक्वान्नें बनविण्यात पारंगत आहात आणि सुगरण आहात;
जे की आज दुर्मिळ आहे' - अशा शब्दांत त्यांच्याकडील पुरुषवर्गाने तिचे खूप कौतुक केले.
सोसायटीत आईला खूप मानाची आणि आदराची वागणूक मिळते. तिने बनविलेल्या अनरश्यांचा आस्वाद
आत्तापर्यंत अनेकांनी घेतला आहे. 'अनरसा' तिनेच करावा; इतका मऊ आणि देखणा अनरसा खायला
मिळणे हे भाग्याचेच! हा पदार्थ बाहेरुन मागविण्यात मजा नाही. तो खूपच कडक आणि बेचव
असतो. दरवर्षी या सणाला आमच्याकडे अनरसा केला जातो.
....... एकूणच काय
तर सगळीकडे निसर्गसौंदर्याचा फुलोरा असतो. बालगोपाळांची तर खूपच मजा असते. सगळीकडे
आनंदीआनंद आणि उत्साहाला पारावार नसतो.
हे गौरी, तू, तुझ्या
आगमनाने आम्हा सगळ्यांना पूर्णानंद देतेस!! माझ्या अल्पमतीने मी तुझे तीन दिवसांचे
महात्म्य वर्णन करुन, तुला शब्दरुपी फुलोरा अर्पण करण्याचा अल्पसा प्रयत्न केला. हे
सरस्वती, हे अंबिके, हे गौरी, हा फुलोरा गोड मानून घे. सेवा मानून घे आई.
"ॐ श्री महालक्ष्मी
च विद्महे, विष्णूपत्नीच धीमही, तन्नौ लक्ष्मी प्रचोदयात." - गौरीर्पणमस्तु.
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
११/९/२०१६.
No comments:
Post a Comment