Saturday, 18 February 2017

शेगावीचा राणा - गजानन


शेगावीचा राणा गजानन

तव श्रध्दा-भक्तीने भरले आज अंतःकरण

स्वीकारावे अमुचे हे भक्तीसुमन

'गण गण गणांत बोते' हा नाममंत्र जपून

उध्दरिले कित्येका हो तुम्ही दयाघन

ll शेगावीचा राणा गजानन ll

ll शेगावीचा राणा गजानन ll

 

तपोबलाचे, योगबलाचे धनी

गजानन बलवान

प्राचीच्या बालरवीसम

तेजःपुंज सामर्थ्यवान

वायूसमान वेगवान

चालगति मारुतिसमान

अनंतकोटी ब्रह्मांडनायका तुम्ही

सत् चित् आनंद निधान

गजाननाचा महिमा गाऊ

करुनि भजन, नामसंकीर्तन

ll शेगावीचा राणा गजानन ll

ll शेगावीचा राणा गजानन ll

 

इच्छिले फळ देणार गजानन

चिंतामणी कल्पतरुसमान

श्रध्देने जो करील तयांचे

भक्तीमय चिंतन मनन

श्रध्दा, परोपकार ठेवी जो सर्वांठायी

त्याच्याच हृदयी वसती गजानन

'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणूनी

करिती जे उदरभरण

तयांना जीवनी ह्या

पडे कधी काही न्यून

दुःखित, पीडितांसाठी गजानन हो

माऊली जाण

 

ll शेगावीचा राणा गजानन ll

ll शेगावीचा राणा गजानन ll

 

संतशिरोमणी गजानन

तव चरणी आम्ही सदा लीन

भावभक्तीचे करुनि मिलन

विघ्नांचे अमुच्या करिसी कंदन

कृपाकटाक्षे तव निरंतर

सुमार्गी लागो सदा जीवन

हाचि वर द्यावा तुम्ही गजानन

होऊनि आम्हांवरी प्रसन्न

ध्यान लावुनि आज आलो

तव पायी आम्ही नित शरण

 

ll शेगावीचा राणा गजानन ll

ll शेगावीचा राणा गजानन ll

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

१८//२०१७.

श्रींचा प्रगटदिन.


No comments:

Post a Comment