Sunday, 19 February 2017

सामर्थ्य शिवाजीचं


सामर्थ्य शिवाजीचं असं होतं

स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान केलं होतं

सह्याद्रीच्या कडेकपारी, डोंगरखिंडीतून

'जय भवानी' साद घालत होतं

 

सामर्थ्य शिवाजीचं असं होतं

सोळाव्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकणा-या

शौर्य, साहसाची प्रचिती देणारं होतं

सोळावं वरिस धोक्याचं म्हणतात हो....

इथे मात्र शिवाजीचं सोळावं वरिस

यवनांसाठी धोक्याचं होतं

 

सामर्थ्य शिवाजीचं असं होतं

जाणत्या राजाचं जाणतं नेतृत्व होतं

अतुल्य पराक्रमाच्या जोडीला

बुध्दीमत्तेची साक्ष देणारं होतं

 

सामर्थ्य शिवाजीचं असं होतं

एकीचं बळ जाणणारं होतं

मावळ्यांसाठी शिवाजी म्हणजेच...

सर्वकाही होतं

जीवाला जीव देणाऱ्या जीवा महालाचं

स्वामीप्रेम होतं

प्राणांची बाजी लावणा-या बाजीप्रभूचं

वेड होतं

'आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं'!!

अशी प्रतिज्ञा घेणाऱ्या तानाजीचं होतं

 

सामर्थ्य शिवाजीचं असं होतं

माँसाहेबांचा शब्द न् शब्द झेलणारं होतं

मातृपितृ भक्तीचं आदर्श उदाहरण होतं

काळासोबत चालता चालता

काळापुढचंही भान ठेवणारं होतं

 

सामर्थ्य शिवाजीचं असं होतं

युगानुयुगे सरली तरी.....

अमर, चिरंतन प्रेरणेचं बलस्थान होतं

 

सामर्थ्य शिवाजीचं असं होतं

युगानुयुगे सरतील तरी....

छत्रपतींच्या छत्राखाली राहावंसं वाटतं

पराक्रमी वीरासमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं

चिरंतन प्रेरणेचं दान मागावंसं वाटतं

असामान्यांच्या इतिहासाचं सोनेरी पान

उघडावंसं वाटतं

 

जाणत्या राजाला पुन्हा नव्याने

जाणून घ्यावंसं वाटतं.....

जाणत्या राजाला पुन्हा नव्याने

जाणून घ्यावंसं वाटतं.....

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

१९//२०१७.

शिवाजी जयंती.

No comments:

Post a Comment