वाड्यातल्या खजिन्यावर जेव्हा
विश्रामने लिहिलेले वाचले तेव्हा
अनंत विचारांनी मन
भारुन गेले. फक्त
तेव्हढाच खजिना नव्हता. दोन
अपत्यें आई-बाबांची
गेली याची मला
प्रकर्षाने जाणीव झाली. जोशी
काका जिथे राहत
होते तिथे आधी
आई-बाबा राहत
होते. मी लहान
होती; पण बारशाच्या
आधी जे मूल
गेले तो प्रसंग
मला आठवतो आहे.
जोशी काकांचे ते
भाड्याचे घर मोठ्या
तीन खोल्यांचे होते.
शेवटच्या खोलीत एक पडदा
लावून बाळंतिणीची व्यवस्था
केली होती. त्या
मर्त्य मुलाला घेऊन आई
बसली होती. पडदा
सोडून जी खोली
होती तेथे कमाविसदार
मामा व बाबा
बसले होते. बाबा
मोठ्याने रडत होते.
कमाविसदार मामा समजावित
होते. शांता मावशी
स्वयंपाक घरात काहीतरी
काम करीत होती.
दुसरे अपत्य १०
महिन्यांचे होऊन गेले.
त्याला रिकेटस् झाल्या होत्या
असे आई सांगायची.
त्याचे फुगलेले पोट मला
आठवत आहे. त्या
दोघांची कमतरता आज कां
कोण जाणे मला
प्रकर्षाने जाणवत आहे.
पुस्तकांचा इतका मोठा
साठा घरी होता;
पण इतक्या लहान
वयात काहीच त्यादृष्टीने
उपयोग करुन घेण्याची
कुवत नव्हती. आधीच्या
पिढ्यांची माहिती करुन घ्यावी
ही समजही नव्हती.
पुस्तकांची नीट काळजी
घेतली नाही तर
त्यांना उधई लागते.
ती ब-याच
पुस्तकांना लागली होती असे
आठवते. त्या पुस्तकांची
एक यादी तरी
करुन ठेवावी लागत
होती व इतर
व्यापातही त्यांची अपत्यवत काळजी
घ्यावी लागत होती
असे आज वाटून
काहीच उपयोग नाही.
हाही खजिना आपण
गमावला आहे.
बाबांजवळून
बरीच माहिती मिळू
शकत होती, पण
ती समजच नव्हती;
त्यामुळे आपला मोलाचा
खजिनाही आपण गमावला
आहे.
इतिहास संशोधक मंडळे
मोठमोठया लोकांची माहिती खूप
संशोधन करुन मिळवितात,
त्यांची माहिती अमर राहावी
म्हणून माहितीचे संकलन, संवर्धन
करतात. खूप व्यक्ती,
जे त्यांचे मित्र
वगैरे साहित्यिक होते
त्यांचे साहित्य प्रकाशित करतात.
उदा. बालकवी वयाच्या २८
व्या वर्षी गेले.
त्यांचे साहित्य विद्यापीठातून अभ्यासाला
आहे. भा.रा.
तांबे यांच्या कविता
मायदेव, माधवराव पटवर्धन यांनी
प्रसिध्द केल्या. ज्ञानेश्वरीचे संस्करण
एकनाथांनी केले. बरीच उदाहरणे
देता येतील. ही
समाजातील वृत्ती वाढावयास हवी
आणि अप्रकाशित चांगल्या
कृती व व्यक्ती
समाजाला माहीत करुन द्यायला
हव्यात. हा खजिना
व वारसा खूपच
अनमोल असतो पण
लोकांच्या चुप्पीमुळे व आपल्या
नासमजीने आपण तो
गमावतो हे केव्हा
कळणार?
प्रमोद, मोठीआई-अण्णाजी,
मावशी-बाळशास्त्री, आपली
सर्व आप्तस्वकीय मंडळी,
आत्या-भाऊसाहेब, पत्तरकिने
मंडळी, कमाविसदार मंडळी, पुराणिक
मंडळी, देशपांडे मंडळी, आपले
शिक्षक, मित्र हा सर्वच
आपला खजिना! तो
सांभाळायला पाहिजे;- आठवणींच्या
रुपाने का होईना
त्यांच्या स्मृतींना जागवायला पाहिजे
असे मला वाटते.
विश्राम, तू चांगले
लिहितो आहेस. खूप काही
आहे लिहिण्याजोगे ते
सर्वच लिही.
तुझे शब्द अभिव्यक्तीला
समर्थ वाटतात.
"नात्यास
नाव अपुल्या देऊ
नकोस काही
सा-याच चांदण्यांची
जगतास जाण नाही"
- हे 'नटसम्राट' मधील
गाणेही आज आठवले.
काय अर्थ घ्यावयाचा
तो प्रत्येकाने घ्यावा.
संगीता पाटखेडकर.
१६ जून
२०१६.
No comments:
Post a Comment