Saturday, 11 June 2016

संस्थानांच्या विलीनीकरणावरची ('The Princes'); मनोहर माळगावकरांची अजोड कादंबरी.

भारताच्या स्वातंत्र्याच्या पाठोपाठ येऊन, तिचा अद्भुतपणा विशेष म्हणावा लागेल अशी घटना म्हणजे ६०० देशी संस्थानांचं विलीनीकरण! भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास लिहिणा-या माणसाला तर या घटनेचा विस्तृत ऊहापोह करावा लागेलच पण बाह्यात्कारी अत्यंत शांतपणे घडलेली ही क्रांती इतकी नाट्यपूर्ण आहे की तिच्यावर लिहिण्याचा मोह एखाद्या कुशल कादंबरीकाराला व्हावा.
 इतकी संस्थाने एके काळी होती काय आणि नंतर ती पार लयाला गेली काय! लहानमोठे राजे, महाराजे, त्यांचे दरबार, डोळे दिपविणारे त्यांचे सरंजाम, शिकारखाने, जामदारखाने, महाल, रंगविलास, एकतंत्री सत्ता ही सर्व उन्मळून पडली. राजनैतिक कौशल्याचा बोळा भराभर फिरत होता आणि संस्थानिकांना काहीही करता येत नव्हतं. तख्तामागून तख्त कोसळलं. राजमुकुट आणि राजदंड यांना अर्थ उरला नाही. भारतीय प्रजासत्ताकाच्या एकहाती अंमलाखाली प्रजा नांदू लागली. 'वल्लभभाई पटेल' हे नाव या संदर्भात खूप महत्त्वाचे आहे
   कुशल कथाकाराच्या प्रतिभेला आव्हान देणारी ही घटना निश्चितच! संस्थानिकांनी काय थोडी खळखळ केली असेल? सर्व प्रकारच्या कायदेशीर खटपटी तर त्यांनी चालविल्या होत्याच पण वेळ आली तर सशस्त्र उठाव करुन यादवी माजविल्यास आपापली राज्ये तर आपल्याला टिकविता येतीलच परंतु कदाचित मुलुखगिरी देखील करता येईल अशा हिशेबानं काही बड्या संस्थानिकांनी हालचालींना सुरुवात केली होती; परंतु हे सारे ताबूत थंड झाले
   अमक्या संस्थानिकाला बारा तोफांची सलामी, तमक्याला सतरा असे सारे संस्थानिक पाहता पाहता नामशेष झाले. देशाच्या नकाशावर पिवळ्या रंगाचा बारीक ठिपकादेखील उरला नाही. देशाच्या एकूणएक विस्तारावर अशोक चक्रांकित तिरंगी झेंडा फडकू लागला
  या सा-या घटनांचा ज्याचा अभ्यास आहे ही कथा रंगविण्याची ताकद ज्यामध्ये आहे असा एक महाराष्ट्रीयन कादंबरीकार निघाला. त्याने ही घटना इंग्रजीतून लिहिली. जागतिक साहित्याच्या क्षेत्रातल्या इंग्रजी वाचकांसाठी त्याने लिहिली. 'Hamish Hamilton' या नामवंत प्रकाशन संस्थेने ती प्रसिध्द केली. 'लिटररी गिल्ड' नावाच्या अग्रेसर अमेरिकन साहित्य संस्थेने ती आपल्या पाच लाख ग्राहकांसाठी निवडली. 'Hamish Hamilton' कडून रॉयल्टीचे जे काही पैसे मिळावयाचे ते तर लेखकाला मिळालेच; परंतु शिवाय 'लिटररी गिल्ड' कडून रॉयल्टीचे म्हणून बेचाळीस हजार डॉलर्स लेखकाला मिळाले. कीर्ति आणि संपत्ती दोन्ही विपुलतेने मिळवून देणाऱ्या कलाकृतीच्या निर्मात्याचं नाव आहे श्री. मनोहर माळगावकर; आणि त्याच्या कादंबरीचं नाव आहे, 'The Princes'. 
   दक्षिण रेल्वेच्या 'लोंढा' स्टेशनपासून १०-१५ मैलांच्या अंतरावर 'जगलबेट' नावाचे गाव. या गावी माळगावकरांचे सधन कुटुंब राहत असे. मराठी वाचकांना हे नाव फारसे परिचित नाही, परंतु इंग्रजी वाचकांना सुंदर कथा लेख लिहिणारे श्री. मनोहर माळगावकर यांचा परिचय दीर्घ काळाचा आहे
  उंच बांधा, किंचित वाकून चालणारा, बुध्दीमान चेहऱ्याचा, काहीशा ओढल्याप्रमाणे वाटणाऱ्या डोळ्यांचा, मृदुभाषी, आदबशीर अशा या कलावंतांला लहानपणीच शिकारीचा इतका षौक लागला की इंग्रजी आणि संस्कृत भाषा घेऊन बी.. ची पदवी मिळविल्यानंतर धंदेवाईक शिकारी होण्याचे त्याने ठरविले; पण नंतर सरकारी नोकरीत प्रवेश केला. दुसरं महायुध्द सुरु झालं तेव्हा माळगावकर सैन्यात प्रविष्ट झाले आणि इन्फन्ट्री अॉफिसरचे कमिशन त्यांनी मिळविले. युध्द समाप्तीनंतरही ते लष्करी नोकरीत राहिले आणि लेफ्टनंट कर्नलच्या हुद्द्यापर्यंत चढले. १९५३ साली त्यांना घरी परत यावं लागलं म्हणून त्यांनी लष्करी पेशा सोडला
  माळगावकर कुटुंबाची इस्टेट North Canada च्या जंगलात होती. त्यांच्या मालकीच्या मँगनीजच्या खाणी होत्या. या इस्टेटीची देखभाल त्यांनी केली. नागरी जीवनापासून दूर एकान्त आयुष्य त्यांनी कंठले. विरंगुळा वाटावा म्हणून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. पहिली कुदळ मारावी आणि मँगनीजची खाण गवसावी तसे झाले. 'साहित्यसोनियाच्या खाणी' हे वचन निराळ्याच अर्थानं खरं ठरलं! त्यांच्या कथांची संख्या मोठी असून त्यापैकी बहुतेक 'इलस्ट्रेटेड वुईकली अॉफ इंडिया' मध्ये प्रसिध्द झाल्या आहेत.
  मलाया, इण्डोनेशिया, थायलंड, इण्डोचायना, इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड, पश्चिम जर्मनी अशा देशांत त्यांनी संचार केलेला आहे. त्यांची प्रवासवर्णने जशी लोकप्रिय ठरलेली आहेत; त्याचप्रमाणे 'कान्होजी आंग्रे', 'देवासचे पवार' यासारखे ऐतिहासिक चरित्रात्मक ग्रंथही नावाजले गेले आहेत. बी.बी.सी. साठी आणि टेलिव्हिजनसाठी कित्येक श्रुतिका त्यांनी लिहिल्या आहेत
'दि प्रिन्सेस' कादंबरीच्या असामान्य यशानंतर त्यांच्या लेखनाची अनावर मागणी वाढली. 'दि प्रिन्सेस' ही त्यांची पहिली कादंबरी नाही. 'Distant Drum' ही त्यांची पहिली कादंबरी. दुसरी 'Combat of Shadows'. या कादंबरीचा फ्रेंच भाषेतील अनुवाद Paris येथील एका मोठ्या प्रकाशन संस्थेने प्रसिध्द केला. 'दि प्रिन्सेस' इंग्लंडमध्ये प्रथम प्रसिध्द झाली. ती वाईकिंग प्रेसमार्फत अमेरिकेत प्रसिध्द झाली. फ्रेंच, Spanish, जर्मन अशा भाषांतून तिचे अनुवाद आहेत. फार सुंदर आहे ही कादंबरी! 'दि प्रिन्सेस' च्या जातीची कादंबरी लिहिणा-याला - सत्य आणि कल्पित यांच्या बेमालूम मिश्रणाचं रसायन वापरावं लागतं
  लहान नाही, फार मोठं नाही असं एक काल्पनिक संस्थान त्यानं घेतलं. या कादंबरीच्या कथानकाचा गाभा म्हंटलं तर दहा वाक्यात सांगता येण्यासारखा आहे. मध्य भारतात कुठेतरी खडकाळ, डोंगराळ मुलुखात 'बेगवाड' नावाचं संस्थान होतं. वार्षिक खर्चासाठी १० लाख रुपये घेता यावेत एवढ्या उत्पन्नाचे! १२ तोफांच्या सलामीचा मान. दोन मोठे राजप्रासाद. लहानमोठ्या तीस मोटारगाड्या, हत्ती, घोडे, असा सरंजाम. संस्थानच्या अधिपतीचं नाव 'हिरोजी महाराज' किंवा 'दादा महाराज.'  युवराजाचं नाव 'अभय.' दुसरं महायुध्द सुरु झालं तेंव्हा हिरोजी महाराजांनी ब्रिटिश सरकारला सैन्यबळ आणि द्रव्यबळ; दोहोंचेही पुष्कळ साह्य केलं. भारतातून निघून जाताना ब्रिटिशांनी सत्तेचं उदक सोडलं काँग्रेसच्या हातावर. आता काँग्रेसवाले उठले संस्थानांच्या जिवावर. बेगवाड संस्थानचं विलीनीकरण अटळ आहे असं बघितल्यावर जिथं फुलं वेचली तिथं गोव-या वेचण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं असं हिरोजी महाराजांनी ठरविलं. त्यांच्यामागून अभयराज गादीवर आला; परंतु त्याची कारकीर्द फक्त ४९ दिवसांची ठरली. त्याला पदच्युत व्हावं लागलं
   कथाभाग फक्त एवढाच! कादंबरी संपवून हातावेगळी करतांना वाचकाला भास होतो की वज्राघातानं कोसळणा-या एखाद्या वटवृक्षाचा अधःपात जणु आपण बघितला. कारुण्यानं वाचकाचं अंतःकरण भारावून जातं! कथारचनेची, स्वभावरेखाटनांची आणि निवेदनाची किमया अद्भुतच आहे. बेगवाड संस्थानचा युवराज अभय; एकंदर सारी कहाणी सांगतो आहे अशी कल्पना माळगावकरांनी केली आहे. हिरोजी महाराजांची कारकीर्द त्याच्या डोळ्यांपुढे आहे. वडिलांचे गुण, दोष, मोठेपणा, दुराग्रह अशा प्रकारच्या मनोविश्लेषणामुळे कथारचना आणि स्वभावदर्शन या दोन्ही गोष्टी साध्य होतील असे चातुर्यपूर्ण अवधान लेखकाने ठेवले आहे
   लहानपणी अभयचं बापावर प्रेम, नंतर न्यायनीतीच्या कसोटीवर बापाचं वर्तन तपासून पाहण्याइतकी बुध्दी प्रगल्भ झाल्यानंतर पितृभक्तीला तडे जाऊ लागले. राज्यकारभारविषयक बापाची भूमिका पटेनाशी झाली. इतकी अप्रीती निर्माण झाली की कधी कधी बापाचा जीव घेण्याचं त्याच्या मनात यावं. अभयराज अजून मोठा झाला. चरित्रातल्या निषेधार्ह गोष्टींवर नवा प्रकाश पडला, बापाचे दुर्मिळ गुणविशेष लक्षात आले आणि बापाविषयी अपरंपार प्रीति वाटू लागली. हिरोजी महाराजांचा आकस्मिक मृत्यू घडला तेव्हा अभयराजच्या मनाची खात्री पटली की आपले पिताजी माणसांचे खरेखुरे 'राजे' होते, ती एक असामान्य व्यक्ती होती. त्यांच्या तोडीची दुसरी असामी होणे नाही
  अभयराजच्या मनाची ही स्थित्यंतरं हाच कादंबरीचा विषय ठरतो. हिरोजी महाराजांचा जुना इमानी हुज-या हैबत, शिकार - कामगार हनुमानसिंह, अभयराजला अश्वारोहणाची विद्या शिकविणारा हमीदुल्ला, संस्थानचे दिवाण लाला हरिकिशोर, स्वरुपानं सामान्य, वयस्कर अशी बाबीबाई, उत्तरेकडची स्वरुपसुंदर नर्तकी अमीनाबेगम, दक्षिणेकडची शेरावती अशा हिरोजी महाराजांच्या तीन रखेल्या, अमीनाबेगमची छोटी पुतणी झरीना, चांभाराच्या कुळात जन्मलेला, प्रथम अभयराजच्या स्नेहाला पात्र झालेला, त्याच्याच कृपेने शाळाकॉलेजातलं शिक्षण घेऊन पदवीधर होणारा, पण पुढे राजवंशाचा द्वेष करु लागणारा, बेगवाडच्या प्रजेचा पुढारी होणारा आणि अखेर हिरोजी महाराजांच्या वै-याची भूमिका घेऊन संस्थानावर घाव घालणारा 'कनकचंद'. अशी छोटी मोठी अनेक पात्रें या कादंबरीत आहेत. जिच्याशी अभयराजचं लग्न झालं ती 'अखेती' च्या राजाची कन्या 'कमला' लेखकाच्या कल्पनेला सुचली. ज्या अँग्लो इंडियन पोरीच्या रुपावर अभय इतका भाळला, की तिच्याशी लग्न करण्याचे तो विचार करु लागला, ती चटकचांदणी 'मिनी' लेखकाने निर्माण केली. अभयराजच्या मातेचं - बेगवाडच्या महाराणीचं पात्र उभं राहिलं, आणि तिचा मुसलमान प्रियकर अब्दुल्लाजानदेखील निर्माण झाला
   या सर्वांपेक्षाही एक बहारदार कल्पना लेखकाला सुचली. बेगवाडच्या राजधानीपासून काही अंतरावर बुल्वारा खिंडीत असलेल्या 'पाताळपाट' नावाच्या दोनशे वर्षांच्या जुन्या किल्ल्यातला गुप्त, प्रचंड खजिना, आणि बुल्वारा खिंडीतले साधेसुधे अडाणी पण कमालीचे राजनिष्ठ असे भिल्ल लोक!
  सुष्ट-दुष्ट, सदाचारी-दुराचारी अशा अनेकविध पात्रांचे राग-लोभ, प्रेम-द्वेष आणि बरेवाईट संकल्प यांच्या क्रिया-प्रतिक्रिया घडू लागल्या आणि त्यातून एक चित्तवेधक कथानक निर्माण झालं
  बेगवाडकरांचे दोनशे वर्षांपूर्वीचे पूर्वज मध्यभारतातल्या ज्या लुटारु टोळीवाल्यांना 'पिंडारी' म्हणत असत त्यापैकीच होते. चोरी, दरोडेखोरी, लुटालूट, हत्या, जाळपोळ करण्याचा धंदा करणाऱ्या जातींना 'बेरड' म्हणतात. या शब्दाचाच अपभ्रंश म्हणा किंवा अधिक प्रतिष्ठित रुप 'बेडर' असं झालं आणि बेगवाडच्या अधिपतीचं उपनांव म्हणून ते रुढ झालं
   हिरोजी महाराजांना घराण्याचा अभिमान! आपल्या बढाईला इतिहासाची अडचण होते आहे असं पाहिल्यावर त्यांनी अलाहाबादचे एक विख्यात इतिहासाचे प्रोफेसर आणले आणि त्यांच्याकडून बेगवाडच्या राजवंशाचा आपल्या मनाजोगता नवा इतिहास लिहून घेतला. अभयच्या मनाचा ओढा आईपेक्षा बापाकडे लहानपणी जास्त. जसजसा अभय वाढू लागला, मोअरटन साहेबाच्या देखरेखीखाली त्याचं शालेय शिक्षण होऊ लागलं, ते संपल्यावर, आग्रा येथील राजकुमार कॉलेजमध्ये युरोपिअन प्रोफेसरांच्या अध्यापनाचे आणि क्रिकेट, टेनिससारख्या क्रीडाप्रकारांचे संस्कार झाल्यावर त्याची बापाविषयीची नितांत भक्ती ओसरु लागली. तो आईच्या सहवासात अधिक येऊ लागला. अनेक अज्ञात गोष्टी त्याच्या लक्षात येऊ लागल्या. त्याच्या जन्मानंतर आई-वडीलांचे संबंध संपले होते. ती फक्त नावाची महाराणी होती. मातृभक्तीवरही लवकरच आघात झाला.  
   अभयच्या आईशी हिरोजी महाराजांचा विवाह होण्याच्या आधीच दोन वर्षे बीबीबाईंच्या पोटी 'चारुदत्त' नावाच्या मुलाचा जन्म झाला होता. अभयची अडचण दूर केली तर आपला मुलगा चारुदत्त गादीवर येईल अशा कल्पनेनं बीबीबाईंनी अभयवर विषप्रयोग केल्याच्या संशयावरुन एकदा खाजगी तैनातीतल्या सा-या नोकरांना कमी करण्यात आलं, जुन्या Palace अॉफिसरलाही काढून टाकण्यात आलं. ब्रिटीश मुलुखातल्या पोलीस खात्यातल्या एका वरिष्ठ अंमलदाराला नवा Palace Officer म्हणून आणण्यात आलं. त्याचं नाव अब्दुल्लाजान. .......... असे काही प्रसंग घडले की या माणसाविषयी अभयच्या मनात कमालीची तिरस्कारबुध्दी निर्माण झाली; आणि काही दिवसांनी अभयला आढळून आलं की हा माणूस आपल्या आईचा प्रियकर आहे! त्याची अवस्था मन हेलावून सोडते
   अभयराजच्या १९ व्या वर्षापर्यंतच्या या हकीकतीनं 'दि प्रिन्सेस' कादंबरीचा १३१ व्या पानापर्यंतचा जवळजवळ एक तृतीयांश भाग व्यापलेला आहे. अनेक लहानसहान वेधक प्रसंग आहेत पण कादंबरीची गती संथच वाटते. 'मिनी' हे पात्र प्रविष्ट झाल्यापासून कादंबरीत एकदम रस निर्माण होतो
  अभयराजचं राजकुमार कॉलेजातलं शिक्षण पूर्ण झालं त्या सुमारास दुसरं महायुध्द सुरु झालं. लष्करात दाखल होण्याची अभयला इच्छा झाली. हिरोजी महाराजांनी मोडता घातला नाही. मुलाखतीसाठी अभय सिमल्याला गेला. तिथल्या मुक्कामातच मिनी त्याला भेटली. ती प्रथम परिचयाच्या वेळी एकटी नव्हती. 'सातपुडा रेजिमेंट' मधील Captain Faren नावाच्या एका लष्करी अंमलदाराबरोबर ती होती. तो तिचा नवराच असावा असं अभयला वाटलं, पण नंतर त्याला समजलं की तो फक्त तिचा मित्र होता आणि तिचं संपूर्ण नाव 'Mini Bradley' असं होतं. त्या दोघांची आणि अभयची ओळख झाल्यावर तीन दिवसांनी Captain Faren ची १० दिवसांची रजा संपल्यामुळे तो निघून गेला. 'पंच' असे त्याचे टोपण नाव होते. त्यांची टोपणनावाने हाक मारण्याइतकी दोस्ती जमली होती
  पाहताक्षणीच अभयला मिनी आवडली. एखाद्या तरुण मुलीची भुरळ पडावी असा अनुभव त्याला प्रथमच येत होता. मुलाखत झाली. बेगवाडला अभय वापस येणार होता पण मिनीनेच त्याला फोन केला. रात्रीच्या जेवणाचे त्याने तिला आमंत्रण दिले. तिने रुकार दिला. तो आणि मिनी मोटारीतून दूर रानात गेले. वनभोजनाचा कार्यक्रम झाला. त्या रात्री मिनी हॉटेलातल्या खोलीवर अभयकडे आली. पुढे अभय लष्करी नोकरीवर गेला; तो मिनीचा ध्यास घेऊनच! छावणीतल्या वास्तव्यात त्याच्या टेबलवर मिनीचा फोटो नेहमी होता. ब्रह्मदेशातल्या आघाडीवरसुध्दा मिनीचा ध्यास होता. आईवडिलांजवळ त्याने आपली इच्छा व्यक्त केली, पण त्यांनी संपूर्ण नापसंती दाखविली, पण त्याचा निश्चय अढळ होता आणि या निश्चयाचा शेवट काहीसा अकल्पितपणे घडला!
  मिनी अत्याधुनिक वर्तनाची अँग्लो इंडियन तरुणी होती. अभयलादेखील ती सती सावित्री वाटत नव्हती. Faren कडून त्याला समजलं होतं की 'टोनी साईक्स' नावाचा एक लष्करी अंमलदार तिचा प्रियकर होता, पण अभय तिच्या या प्रेमप्रकरणांकडे उदार बुध्दीनं बघत होता. ब्रह्मदेशातल्या लढाईत योगायोग असा आला की  टोनी साईक्स Adjutant होता आणि त्याच्या हाताखाली अभय 'इंटेलिजन्स अॉफिसर' म्हणून काम करत होता. जपानी सैन्याच्या रेट्यापुढे ब्रिटिशांच्या फौजांनी माघार घेतली. त्या धांदलीत टोनी साईक्स मारला गेला. त्याच्या जागेवर Adjutant म्हणून अभय काम करु लागला. टोनी साईक्स याच्या मृत्यूची बातमी त्याच्या आप्तांना कळविता यावी आणि जी चीजवस्तू असेल ती घरी पाठविता यावी म्हणून टोनीची खाजगी कागदपत्रं अभय पाहू लागला आणि ते करताना त्याला मिनीचं पत्रं सापडलं. त्या पत्रात तिनं टोनीला लिहिलं होतं, 'माझं प्रेम तुझ्यावर आहे.' अभयची प्रीति संपली
  'अखेती' ची राजकन्या कमला हिच्याशी विवाह करण्यास त्याने संमती दिली आणि त्याला आश्चर्यचकित करणारी गोष्ट कळली की मिनीला गाठून अभयराजशी लग्न करण्याचं वचन घेण्याचं आणि त्याची सारी प्रेमपत्रं तिच्याकडून ताब्यात घेण्याचं काम त्याच्या वडिलांनी संस्थानचे दिवाण लाला हरिकिशोर यांना सिमल्याला पाठवून केव्हाच करुन घेतलं होतं. यासाठी पंधरा हजार रुपयांचा तोडा मिनीला देण्यात आला होता
   महायुध्द संपलं आणि अभयराज परत बेगवाडला आला. येथपर्यंतच्या हकीकतीनं कादंबरीचा आणखी एक तृतीयांश भाग व्यापलेला आहे. येथून राजकीय घडामोडींचं मुख्य आख्यान सुरु होतं. भारताच्या स्वातंत्र्याचे वारे खेळू लागतात. देशी संस्थानांभोवती संकटांचे ढग जमू लागतात. प्रजेच्या चळवळीचं वादळ उठून सारी देशी संस्थानं नष्ट होतात!
   चांभाराच्या कुटुंबात जन्मलेला कनकचंद आता वकील झाला आहे. संस्थानी प्रजेच्या चळवळीचा अग्रेसर पुढारी बनलेला आहे. संस्थानी प्रजा जागृत झालेली आहे. राजवंशाला तिलांजली देण्यासाठी उभी आहे. बुल्वारा खिंडीतले भिल्ल लोक मात्र गादीशी एकनिष्ठ आहेत. बुल्वाराच्या खिंडीत प्रचंड धरण बांधण्याची ब्रिटीश राजवटीच्या दिवसांपासूनची एक योजना आहे. आता काँग्रेस सरकार आलं की त्या योजनेची पूर्तता होणार आहे. आपल्या घरांच्या आणि जमिनीच्या रक्षणासाठी भिल्ल लोक प्राण द्यायला तयार आहेत आणि असा बंडावा केला तर 'संस्थानाची अंतर्गत परिस्थिती अधिपतींना आवरता येत नाही म्हणून आम्हाला हस्तक्षेप करणं भाग आहे' असं म्हणून संस्थान वा कारभार हाती घेण्यास काँग्रेसचं सरकार टपलेलं आहे
   या स्फोटक परिस्थितीचं वर्णन खूपच वाचनीय आहे. कनकचंदच्या हस्तकांनी संस्थानी निशाण काढून टाकलेलं आहे पण महाराजांनी परिस्थितीवर मात करत पुन्हा ज्यावर दुधारी परशूची पिवळी आकृती कोरलेली आहे असा जांभळ्या रंगाचा संस्थानी ध्वज पुन्हा फडकविला आहे. सगळ्यांनी महाराजांचा जयजयकार केला. हा प्रसंग माळगावकरांनी खूपच सुंदर रेखाटला आहे
  हिरोजी महाराजांच्या चरित्राचा शेवट करणारा प्रसंगही असाच चित्तथरारक आहे
 बेगवाडच्या संस्थानात लोकमतानुवर्ती सरकार निर्माण झाल्यास विलीनीकरणाचा हट्ट गृहखातं धरणार नाही अशी महाराजांची अटकळ; पण ती अपयशी ठरली. 'प्राण गेला तरी विलीनीकरणाच्या कागदावर सही करणार नाही' असे शेवटपर्यंत ते म्हणत होते
  महाराजांचा शिकार कामगार हनुमानसिंह बातमी आणतो. 'कौलारचा राक्षस' म्हणून ज्या वाघाची ख्याती आहे तो जंगलातल्या लोकांना दिसला. महाराजांना शिकारीची फार आवड. ही त्यांची १०० वी शिकार ठरली असती. ते शिकारीला गेले. एक गोळी वाघाला लागली. तो जायबंदी झाला पण दुसरी गोळी हुकली. जखमी वाघाला गाठून संपविण्याचं काम त्यांनी पूर्वी खूपदा केलं होतं; पण यावेळी जाताना त्यांनी मागे वळून पाहून अभय हनुमानसिंह यांना हसत सलाम केला. अखेरचा निरोप घेतल्याप्रमाणे. दादांच्या मुज-यात कसला तरी भयंकर अभद्र अर्थ तर नव्हता ना! असे मागून अभयला वाटायला लागले. बंदुकीत गोळ्या भरता महाराज वाघाच्या स्वाधीन झाले. विलीनीकरणाची विटंबना नको म्हणून त्यांनी शूरवीराचं मरण पत्करलं होतं
  अभय महाराज बेगवाडच्या गादीवर अधिष्ठित झाले. भिल्लांनी 'आम्ही उपाशी मरतो आहोत' असा आर्त स्वर काढला; तेव्हा त्यांना तात्पुरती मदत म्हणून १० हजार रुपये अभयने देऊ केले. भिल्लांना चिथावणी पैसेही पुरवीत असल्याचा आळ त्यांच्यावर आला. अभयराजांनी पदच्युति स्विकारली. ४९ दिवस त्यांची कारकीर्द कादंबरीकाराने दाखविली. लेखकाने ४९ दिवसात ही कादंबरी लिहिली आहे
  पाताळपाटचा किल्ला हे कादंबरीतील एक पात्रच आहे. तोही अखेर जलसमाधी घेऊन अंतर्धान पावला ही लेखकाची कल्पना मनाला चुटपुट लावून जाते. खूप बहारदार सौंदर्यस्थळांनी कादंबरी अक्षरशः गजबजून गेली आहे. मूळ लिखाणावरचे लिखाण पूर्ण सौंदर्य कधीच उलगडवून दाखवू शकत नाही. कितीही उत्तम अभिरुचीचा आस्वादक असला तरी मूळ ते मूळच! त्याची आस्वाद्यमानता त्यावरील लिखाणाला येणे अशक्यच
   मुल्कराज आनंद, के. अब्बास, आर.के. नारायण असे कित्येक भारतीय लेखक इंग्रजी कादंब-या लिहिणारे म्हणून प्रसिध्द आहेत. भारतीय जीवनावर कथा साहित्य निर्माण करणारे .एम. फार्स्टर, जॉन मास्टर्स, स्टेन्ले वॉलपर्ट यांच्यासारखे इंग्रज आणि अमेरिकन लेखकही पुष्कळ आहेत; पण मनोहर माळगावकर ते मनोहर माळगावकरच! असे ठामपणे म्हणावेसे वाटते
  जीवनपट हा लेखकाचा आशय असतो. जीवनाची व्यामिश्रता, संदिग्धता, अनाकलनीयता आकळायला तितकेच सहृदय अंतःकरण असावे लागते. चांगल्या लेखकाची उंची गाठायला रसिक मनाला तळाचा ठाव घ्यावा लागतो. विषयांची जीवनात काहीच कमतरता नसते. प्रत्येक जीवन ही एक मोठी कादंबरीच असते. नाट्यमय घटना नाटकें निर्माण करण्यास उपयोगी पडतात. विनोदी प्रसंग विनोदाची पखरण करतात; पण जीवन यांना कळले हो! म्हणण्याइतपत रसिकतेची परिसीमा सर्वांजवळच असते असे नाही. जे आकळले ते इतरांना कळवून देण्यासाठी जी क्षमता असते ती मोजक्याच लेखकांत असल्यामुळे काहीच कलाकृती अक्षर वाङ्मयात जमा होतात.
मनोहर माळगावकरांच्या कादंब-यांचे अनुवाद मराठीतही कुमुदिनी रांगणेकरांनी केले आहेत असे मला आठवते. माझ्या महाविद्यालयीन काळात मी ते वाचलेलेही आहेत. त्याचा असा उपयोग आयुष्याच्या उत्तरार्धात होईल असे मला वाटलेही नव्हते. वाचनाचा संस्कार किती प्रभावी असतो याचे हे एक उदाहरणच!

      संगीता पाटखेडकर.

         ११//२०१६.

No comments:

Post a Comment