Sunday, 19 June 2016

विश्वशक्तीचा आलोक

 ७२ करोड नाडी माणसाच्या शरीरात आहेत. कितीतरी असंख्य पेशी त्याला कार्यरत करीत असतात. शरीराची निर्मिती हे एक फार मोठे विज्ञान आहे. एकाचे सात झाले, साताचे कितीतरी झाले. प्रत्येकाचे जीवन, मन, विचार, संस्कार, वेष, सौंदर्य - प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. ही जी सर्व निर्मिती आहे ती मोठी विलक्षण आहे.
 बरेच महाभाग लग्न करीत नाहीत; म्हणून ते एकाचे अनेक झाले नाहीत असे म्हणता येईल काय? त्यांनी अनेकांना आपली संततीच मानले. अटलबिहारी वाजपेयी, लता मंगेशकर यांनी लग्न नाही केले, पण त्यांचा संसार तर कितीतरी मोठा झाला.
 मच्छिन्द्रनाथांनी एका स्त्रीला मंत्रून विभूति दिली. नाथसंप्रदायात, दत्त उपासनेत विभूतीला फार महत्व आहे. गिरनार असो की नृसिंहवाडी, कारंजा असो की कोणतेही दत्तमंदीर असो तिथे विभूतीचे महत्व लक्षात येते. ती बाई खूप श्रीमंत होती, पण अपत्य नव्हते. ज्या इतर बायांनी तिला, कोण्यातरी गोसाव्याने भस्म दिले हे पाहिले, त्यांनी तिला, कोण तो गोसावडा? काय त्याचे ऐकतेस? काही त्या भस्माला महत्व देऊ नको- वगैरे सल्ले दिले. तिने ती विभूती उकीरड्यावर फेकून दिली. मच्छिन्द्रनाथांनी त्या बाईला सांगितले होते, 'मी बारा वर्षांनी येईन आणि तुझ्या पुत्राच्या हाताने भिक्षा घेईन.' भूमीच्या पोटात एक गर्भ वाढू लागला. बारा वर्षांनी तो प्रगट झाला. तोच 'गोरक्षनाथ' - ज्याने नाथसंप्रदायाला महत्ता प्राप्त करुन दिली.
 अशा अनेक गोष्टींवर विश्वास ठेवणारे जसे आहेत तसेच ठेवणारेही; पण याने काहीच फरक पडत नाही. घटना घडलेल्या असतात. गजानन महाराजांनी कोरडी विहीर पाण्याने भरुन टाकली. कोरड्या वृक्षाला त्यांचा शिष्य पितांबराने पालवी आणली. मृताला जिवंत केले;- वगैरे जे साक्षात्कार घडविले त्या त्यांच्या सिध्दी होत्या. त्या सिध्दींसाठी त्यांनी जे काय तप केले असेल ते करण्याची क्षमता आपल्यात निश्चितच नसते.
  संत लोकांनी जी सिध्दी काही वेळा प्रकट केली ती ते नेहमीच प्रकट करत नाहीत; कारण ते सर्वांना समजण्याची क्षमता सर्वांजवळ नसते, त्याप्रमाणेच समाजात भोंदूगिरी वाढू शकते याचे ज्ञान त्यांना असल्यामुळे संतमहात्म्यांचे ज्ञान ते पूर्णार्थाने लोकांना सांगत नाहीत. अलौकीक ज्ञान समजण्याची क्षमता सर्वसाधारणांना नसतेच.
 जनाबाईला विठोबा दळण दळू लागत होता, तिची कामे, तिला साह्य करुन हलकी करत होता;- वगैरे आपणाला खोटे वाटते. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' हा प्रत्यय ज्यांना आला त्यांचा तो प्रत्यय आपण का म्हणून खोटा मानायचा? आपण त्या लायक नाही असे समजणे जास्त योग्य!
 व्यास ही एक व्यक्ती नाही. तो बुध्द आहे. हा बुध्दच विठ्ठल आहे. माणसाचा स्थूल देह नष्ट होतो, पण सूक्ष्म देह नष्ट पावत नाही. अतीन्द्रिय शक्तींचे आपल्याला ज्ञान नाही म्हणून ज्याला त्याला आपण 'थोतांड' म्हणतो. अतीन्द्रिय शक्तींचे सामर्थ्य ज्यांनी वाढविले ते बुध्द झाले, व्यास झाले, विठ्ठल झाले, विवेकानंद झाले. रामनामाच्या सामर्थ्याने सेतू तयार झाला. विश्वास नाही ठेवला तरी काय बिघडले? रामायण तयार झालेच. विश्वशक्ती विश्व चालवणारच आहे. त्यात तुमचा हिस्सा किती? याचा विचार करणे योग्य ठरेल!

      संगीता पाटखेडकर.

       १५ जून २०१६.

No comments:

Post a Comment