Sunday, 19 June 2016

वड आणि वडील

कोणतेही बहरलेले, फळलेले, फुललेले झाड मनाला प्रसन्न करुन टाकते. वड, पिंपळ हे वृक्ष दीर्घायुषी असतात. अशा वृक्षांच्या छायेखाली रोजच वावरायला मिळाले तर? किती छान!! हा आनंद आम्ही सर्वांनीच घेतला आहे. माझ्या बाबांनी अकोल्यातील नगर परिषदेच्या शाळा क्र. मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. शाळेच्या भव्य पटांगणात(मैदानात) मध्यभागी खूप भले मोठे वडाचे झाड आहे. मधल्या सुट्टीत या झाडाच्या पारावर, पारंब्यांवर मुले मस्ती आणि मजा करीत. मुलांची डबा खाण्याची वेळही हीच असल्यामुळे झाडाच्या पारावर, वटवृक्षाच्या छायेखाली जेवणाचा आनंद ते सर्वच लुटत. बाबांची आत्या डबा घेऊन येत असे याच झाडाच्या पारावर त्यांची वाट पाहत असे; बाबा सांगायचे.
  मी, अमोल विशाल याच प्राथमिक शाळेत शिकलो. माझी आई मधली सुट्टी लागायच्या बराच वेळ आधी वडाच्या पारावर बसत असे.
आईचे खूप दाट, जाड, मोठ्ठे, लांब केस वडाच्या दाट, जाड, मोठ्या, लांब पारंब्या! दोघेही एकमेकांचे सोबती वाटत. हे दृश्य रोजही मला पाहायला मिळायचे आनंद व्हायचा आई दिसली की!
इतके तास आईविना शाळेत जाणे म्हणजे लहान मुलांना सुरुवातीला खूप त्रासदायक वाटते. 'होम सिकनेस' जाणवतो.
  आम्ही सर्व मैत्रिणी जेवण झाल्यावर पारंब्यांना मनसोक्त लटकायचो. धम्माल करायचो. कोण या पारंबीवरुन त्या पारंबीवर पटकन जाईल; अशी स्पर्धाही लावायचो. लुपाछुपीच्या खेळातही वडच सोबती असायचा. वडाच्या पारंब्या जमिनीपर्यंत लोंबायच्या. आजही तो वड आहे. बहुतेक सर्वच मुलींच्या आई, मावशी, काकू यांच्यापैकी कुणी ना कुणी मधल्या सुट्टीत डबा घेऊन येत याच पारावर बसत.अनेक जणींनी कितीतरी वेळा आणि कितीतरी सुखदुःखाच्या आठवणी, गंमती-जंमती, या पारावर केल्या असतील याला तर आजपर्यंत गणतीच नसेल! या सर्व घटनांचा तो वड साक्षी आहे. त्या वयात फारसे समजत नाही. ते झाड म्हणजे मस्तीचे, खेळण्याचे ठिकाण एवढेच आम्हांला ठाऊक होते. माझ्यासारखेच अमोल आणि विशालनेही त्या झाडाच्या छायेखाली शाळा केली.
  हिवाळ्यात थंडीमुळे वर्गात बसणे कठीण होई. मग 'बाई'(तेंव्हा टीचरला 'बाई'
म्हणतः-) झाडाखालीच वर्ग भरवित. कोकिळेचे मधुर स्वर कानावर पडत. बाबा तर त्या वडाच्या, शाळेच्या अनेक आठवणी आम्हांला सांगत.
  इतक्या अनेक वर्षांपूर्वीचा तो वटवृक्ष आज मला स्थितप्रज्ञ, धीरगंभीर पण तितकाच शांत, अविचल ऋषी-मुनींसारखा वाटतो. केंव्हाही, कधीही त्या रस्त्याने गेले की त्या वडाजवळ जावेसे वाटते, त्याला बिलगावेसे वाटते. तो वड जणू काय मला माझ्या वडीलांसारखाच वाटतो. वड आणि वडील!!!!!........ दोघेही निर्हेतुक, निःस्वार्थ आणि अखंड माया करणारे, मायेची शीतल, थंडगार पखरण करणारे आणि सावली देणारे वाटतात.
  शेगावचे संतशिरोमणी 'गजानन महाराज' प्रथम प्रगटले ते वडाच्याच झाडाखाली! सर्व लोकांनी त्यांना दुपारी अडीच वाजता तिथेच पाहिले. आजही ते वडाचे मोठ्ठे झाड शेगावात आहे आणि अनेक लोक दर्शनासाठी त्या वडाला जातात. संस्थानने आता भक्तांना बसण्यासाठी त्या वडाच्या झाडाजवळ मोठे सभामंडप बांधले आहे. हा शेगावीचा वड मीही पाहिला आहे. वडाच्या झाडावर शिवशंकराचा निवास असतो असे म्हणतात. असा हा वड अनेक पिढ्यांना अॉक्सिजन आणि पॉझिटिव्ह एनर्जी निःस्वार्थपणे देतच आहे आणि राहील.
 आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने दाटून आलेल्या अनेक भावनांच्या कल्लोळांनी आणि आठवणींच्या खजिन्याने माझे मन सैराट आणि झिंगाट झाले आहे.

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

     १९ जून २०१६.

No comments:

Post a Comment