स्त्री ही दुहिता
असायला हवी, असे
आजोबा नेहमी म्हणायचे.
ते आईला दुहिता
म्हणत असत. दुहिता
म्हणजे सासर-माहेर
ह्या दोन्ही कुळांचं
हित साधणारी. वडिलांचा
हाच उपदेश तिने
कायम लक्षात ठेवून
त्याप्रमाणेच ती सासरी
वागली. स्त्रीला पृथ्वीची उपमा
दिली जाते. अपार
सहनशीलतेचं रुप म्हणजे
पृथ्वी. मानवाने तिच्यावर कितीही
आघात केले तरी
सहन करणारी पृथ्वी.
आई तिच्या सासरीही
याच सहनशील वृत्तीने
वागली. लग्नानंतर पतीसोबतच स्त्रीला
त्याच्या इतर नातेवाईकांशीही
जुळवून घ्यावे लागते. सासरचे
आणि माहेरी घालवलेले
दिवस यात नेहमीच
तफावत असते. तिने
सासरीही अपार कष्ट
केले. आमची मोठ्याई(तिची सासू)',
आम्ही मुलं वडिलांच्या
आईला मोठ्याई म्हणत
असू. आईने सासूची
खूप सेवा केली.
ती नंतर पायाने
लंगडी झाली होती.
माझ्या मधल्या काकांकडे हपशीवर
पाणी भरताना ती
जोरदार पडून लंगडी
झाली. ती फक्त
'श्रीराम' लिहू शकत
असे. माझे बाबा
तिचे आठवे अपत्य;
म्हणून बाबांचे नाव मुकुंद.
ती प्रेमाने त्यांना
मक्या किंवा कधी-कधी 'मकू'
म्हणत असे. बाबांनंतरही
तिला नववे अपत्य
मुलगी होते. तिचे
नाव कुसुम. इतक्या
अपत्त्यांमधून तिची चारच
अपत्ये वाचली. माझे मोठे
काका, माझे मधले
काका, माझे बाबा
आणि माझी आत्या
कुसुम. तीही लग्नानंतर
पहिल्या अपत्त्याच्यावेळी दुःखद मरण पावली.
अर्थातच या सगळ्या
घटना आईने पाहिल्या
नाहीत. ती पाटखेडकरांच्या
घरात येण्यापूर्वीच्या या
घटना! मोठ्याई मुलीचे
दुःख कधीच विसरु
शकली नाही. तिच्या
या भावनिक संघर्षात
आईजवळ ती मन
मोकळे करीत असे.
खूप रडत असे.
वयाने तरुण मुलगी
दिसली की, 'तू
माझी कुसुमच आहेस'
असे म्हणायची. आमचे
अजून एक काका
होते जे त्याकाळी
वृत्तपत्रातून, मासिकातून लेख आणि
कविता लिहित असत.
बाबांना त्यांच्या लेखातील आणि
कवितेतील ओळी तोंडपाठ
होत्या. आज असे
वाटते; हे सर्व
तेंव्हाच लिहून घ्यायला हवे
होते. नुसतेच बाबांच्या
तोंडून ऐकले. माझ्या बाबांना
या भावाचे खूप
कौतुक होते. आज
तो असता तर
तुझे आणि त्याचे
सूर खूप छान
जुळले असते; असं
बाबा आईला म्हणत!
नरहरी पाटखेडकर उर्फ
नाना असे त्यांचे
नाव. आमच्या आत्याचा
कुठलाच फोटो उपलब्ध
नाही; त्यामुळे ती
दिसायला कशी होती?
आम्ही काहीच पाहू
शकलो नाही. माझे
सर्वात मोठे काका
ज्यांना आम्ही बडे बाबा
म्हणत असू; बाबांपेक्षा
२१ वर्षांनी मोठे.
अर्थातच बाबांसाठी पितृतुल्य! त्यांनाही
आईच्या कर्तृत्वाचे कौतुक होते.
ते आईला नेहमी
' तुम्ही' म्हणत असत. 'तुम्ही
आकाशवाणीवर कार्यक्रम देऊ शकता'
असे त्यांनी आईला
सुचविले होते. माझे दोन्हीही
काका अकोल्यातच(तेव्हा)
वास्तव्याला असल्यामुळे नेहमी गाठीभेटी,
गप्पागोष्टी होत. महालक्ष्म्यांना
सगळे एकत्र नांदत
होतो. मोठ्या काकूला
मदत करायला आई
तत्पर असावयाची; कारण
सण साजरा करायचा
म्हणजे कामे पडली
अनंत, वेळ मात्र
मर्यादित असे असते.
आईचे तिच्या मोठ्या
जावांशीही सख्य होते.
मोठी काकू आईला
नेहमी गीता म्हणत
असे. तिलाही आईचे
खूप कौतुक! 'गीता,
आता तू एकही
काम करायचे नाही,
बस स्वस्थ' असे
म्हणून ती आईला
कामातून स्वतःच Break देत असे.
माझे मधले काका
आणि तारा काकू
दोघेही म्हणत, 'तुम्ही घराला
खूप छान वळण
लावले. मोठ्याईने एकदा आजीला
सांगितले, 'तुम्ही तुमच्या मुलीवर
खूप छान संस्कार
केले; माझ्या मक्याचे
भाग्य थोर त्याला
गीतासारखी बायको मिळाली.' एके
दिवशी संध्याकाळी मोठ्याई
आईच्या पाया पडायला
लागली. आई म्हणाली,
'हे काय करताय
तुम्ही?' मोठ्याईला इतके भरुन
आले की ती
म्हणाली, "तू माझी
इतकी सेवा केलीस
की,'अनंत हस्ते
कमलावराने, देता किती
घेशील दो कराने'
अशी तुझी अवस्था
होईल; हा माझा
तुला अगदी बेंबीच्या
देठापासून आशिर्वाद आहे." असा,
सासूने सुनेला दिलेला आशिर्वादाचा
प्रसंग मी डोळ्यांनी
पाहिला आहे. आजही
आपल्या सासूच्या(अन्नपूर्णा पाटखेडकर)
आठवणी सांगताना तिला
दाटून येते. प्रत्येक
व्यक्तीला समजून घेऊन त्याप्रमाणे
प्रेमाने आणि सहानुभूतीपूर्वक
वागण्याचे तिचे वर्तन
असल्यामुळे सासरच्या मंडळींची मनेही
तिने जिंकून घेतली.
कोणत्याही स्वभावाच्या व्यक्तीबरोबर तिला
जुळवून घेता येते.
तिच्या स्वभावात कमालीची adjustment आहे.
बाबांवर आणि आम्हा
मुलांवर तिचा भारी
जीव. बाबांची सतत
बदलीची नोकरी, त्यामुळे बरेचदा
घरचे आणि बाहेरचेही
व्याप तिलाच सांभाळावे
लागत. आमचे आजारपण,
अकोल्यात त्याकाळी खूप पाण्याचा
दुष्काळ. बाहेरुन मिळेल तिथून
पाणी भरावे लागत
असे. संकटांची आणि
कष्टांची मालिका अखंड सोबती!
त्यातही आनंदी आणि समाधानी
राहून तिने आम्हा
चिल्ल्या-चिमण्यांना अखंड मायेचा
घास भरविला.रोजच्या स्वयंपाकात
एक दोन पदार्थ
करुन तिचे समाधान
होत नसे. अनेक
प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी, भाज्यांनी
युक्त ताट सजलेले
राही. अनरसा, लाडू
आणि चिरवंट करण्यात
तिचे कसब! तिचे
पुतणे, पुतणसुना यांनाही तिचे
कौतुक! बडे बाबांचा
मुलगा मोहन दादा
याने तर तिने
त्याच्यासाठी केलेल्या सर्व पदार्थांचे
कौतुक आपल्या आईला
सांगितले; त्याची पत्नी श्रध्दा
हिलाही आईबद्दल खूप आदर!
असे हे सर्वांचेच
मन जिंकून घेणारे
आईचे आगळेवेगळे रुप!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
७/७/२०१६.
No comments:
Post a Comment