आमची गीता:
मोहरीरांची
गीता, पाटखेडकरांची संगीता
७ जुलै रोजी
७१ वर्षांची होत
आहे. १९४५ चा
तिचा जन्म. आमची
सर्वात मोठी बहीण.
आज गतकाळ डोळ्यासमोर
आहे. १९६५ पर्यंतचा
काळ अतिशय बिकट
होता. या काळात
आईबरोबर गीताला किती कष्ट
करावे लागले असतील
याची कल्पना तेव्हा
आली नाही. पण
आज त्याची जाणीव
होत आहे.
बाबांचे
सोवळे, अन्न पाण्याला
विटाळ, काम करणाऱ्या
बाईला घरात प्रवेश
नाही, गीतानंतर पाच
लहान बहीण भाऊ,
गीता काॅलेजच्या पहिल्या
वर्षाला असतांना राजूचा जन्म.
मातीचे घर, रोज
शेणानी सारवल्याशिवाय देवपूजा नाही. आंगणात
रोज सडा, रांगोळी
झालीच पाहिजे. चुली
सारवल्याशिवाय स्वयंपाक नाही, गॅस
नाही, प्रेशर कुकर
नाही. मातीच्या चुली.
भुसा, लाकडे, लाकडी
कोळसा, दगडी कोळसा
यावर स्वयंपाक. पंचेंद्रियांवर
धूराचे नित्य आक्रमण. पितळी
भांडी, चुलीवर ठेवण्याआधी मातीची
बुडं घ्यावी लागत.
वाड्यात
वीज आली नव्हती.
मातीच्या तेलावर बेडलँप, कंदील
अन् स्टँड रात्री
उजेड करायचे. त्यांच्या
उजेडातच रात्रीचे जेवण व
रात्रीचा अभ्यास. त्यांच्या काजळलेल्या
पायल्या रांगोळीने स्वच्छ घासून,
वातींवर चढलेला गूल नखाने
खुडून टाकून सूर्यास्तापूर्वीच
सर्व दिवे रोज
रात्रीसाठी तयार ठेवणे
हे काम काही
लहान नव्हते. ते
तर आज समजावून
सांगूनही समजणार नाही.
साथीच्या
दिवसात माजघरात तीन चार
जण आजारी असायचे.
नऊ जणांचे कुटुंब,
पैशाची चणचण, नित्य येणारे
जाणारे, लैजाच्या सुट्या, कधी
नळाला पाणी न
येणे. अनंत अडचणी.
अशा परिस्थितीत आनंदी
राहून आईला मदत
करण्याचे काम गीतानेच
केले.
गीताच्या
जीवनाला एक आध्यात्मिक
बैठक आहे. ती
धार्मिक प्रवृत्तीची असून तिचा
देवावर प्रगाढ विश्वास आहे.
स्वानुभवाने बनलेले तिचे विचार
ठाम आहेत. आणि
ते ती परखडपणे
मांडते. ती सुखी
आहे की नाही
हे सांगणे कठिण
आहे पण आनंदी
व समाधानी निश्चितच
आहे. ती समाधान
मानून घेत नाही,
ती तिची वृत्ती
आहे. वैचारिक मतभेद
असतील पण तिचे
सर्वांशीच सख्य आहे.
ती अफाट शब्दसंपत्तीची
धनी आहे. भाषेवर
प्रभुत्त्व आहे हे
म्हणणे थोडे सौम्य
वाटेल, तिची शब्दांवर
हुकुमत आहे. मी
माझ्या संसारात सुखी आहे
असे ती नेहमी
म्हणायची. ती मुकुंदरावांची
नेहमी स्तुती करत
असे. त्यांच्या संदर्भात
ती कधीही कुणाजवळही
तक्रारीच्या सुरात बोललेली ऐकिवात
नाही. आशुतोषच्या लग्नात
७५ वर्षांचे असतानाही
ते व गीता
नाचताना सर्वांनी पाहिले आहे.
जीवन आनंदात कसे
जगावयाचे याचे गीता
एक उदाहरण आहे.
शालेय जीवनात तिने अनेक
पारितोषिके मिळवलीत. वक्तृत्व, वादविवाद,
निबंध या स्पर्धांमध्ये
तिला हमखास बक्षिसे
मिळायची. इतकेच नाही तर
शुद्ध लेखन, पाठांतर,
रांगोळी स्पर्धांतही ती नेहमी
पहिली यायची.
ती एम् ए
ला मराठी विषयात
नागपूर विद्यापीठातून दुसरी मेरीट होती.
विदर्भ साहित्य संघातर्फे घेण्यात
येणाऱ्या साहित्य पारंगत या
एम् ए समकक्ष
परीक्षेत ती पहिली
होती व तिला
सुवर्णपदक मिळाले. १९६४ मधे
विवेकानंदांवर झालेल्या अखिल भारतीय
निबंध स्पर्धेत तिला
भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डाॅ.
झाकीर हुसेन यांच्या
हस्ते प्रथम पारितोषिक
मिळाले. गीताने सात वर्षे
महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम
केले.
गतवर्षात
तिने लिहिलेले लेख
वाचले असता तिच्या
प्रगल्भ बुद्धिमत्तेची, दांडग्या व्यासंगाची व
शब्दसंपत्तीची कल्पना येते. तिच्या
हातून अशीच साहित्य
सेवा घडत राहील
अशी अपेक्षा आहे.
लेखक: विश्राम मोहरीर
७-७-२०१६
७-७-२०१६
-------------------------------------------------------------------------
आता तर फक्त
७१ झाले
अजून खूप काही
करायचय
तुला शंभरचं तरी व्हायचय
खूप खूप वाचायचं
आहे
अजून बरच तुला
लिहायचय
तुला शंभरचं तरी व्हायचय
अजून नातू पाहिला
नाही
पणतूला पण तुला
बघायचय
तुला शंभरचं तरी व्हायचय
आज पर्यंत कमावलेलं
तुला सर्व लुटून
द्यायचय
तुला शंभरचं तरी व्हायचय
हे सगळं करायला
तुला निरोगी राहायचय
तुला शंभरचं तरी व्हायचय
लेखक: विश्राम मोहरीर
७-७-२०१६
-------------------------------------------------------------------------
माझी वंदनीय, अनुकरणीय ज्येष्ठ भगिनी - काही आठवणी:बेबी माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठी. बेबीविषयीची माझी पहिली आठवण राजूला सांभाळणारी, मी हट्ट केला की त्याला मला मांडीवर घेण्याची परमिशन देणारी, मला त्याला नीट सांभाळायला शिकवणारी अशी आहे. जेवायला बसलो की बाबांचा मोठा पाट माजघरातून स्वयंपाकघरात येणाऱ्या दरवाज्यासमोर, नंतर भावांची पाने, अरुणनंतर जिन्याजवळ एका काॅर्नरला माझे पान व मग वळून आपल्या पाटावर कडेला राजूला बसवून त्याला चिऊ काऊ चे घास भरवणारी बेबी. माझ्या वेण्या घालून देण्याचे कामही तिच्याकडे असायचेच. पण ह्या कामात तिला हातभार लावणाऱ्या असायच्या. कारण आज कोणाकडून वेणी घालून घ्यायची हा निर्णय माझा असायचा. आई, बेबी, विजया व मावशी इतक्यांना ह्या कामाकरिता सज्ज रहावे लागत असे. घरात इतर कामांना हात लावलेला न चालणाऱ्या दिवसात ती पुढील महिन्यात लागणारे धान्य निवडून, पाखडून ठेवत असे. एका बैठकीत डबा डबा गहू तांदूळ ती निवडून ठेवत असे. डबा म्हणजे चौदा पायल्या गहू मावेल एवढा मोठा बरे!
दिवस जात होते. आम्हीही हळूहळू मोठे होत होतो. आता बेबीची काही कामे खालच्यांकडे सरकली होती. कामाचे योग्य वाटप करण्यात आईचा हातखंडा होता व तिने नेमून दिलेली कामे करण्यात कुणाकडूनही कसूर होत नव्हती. बेबीची कामे कमी झाली असली तरी अभ्यास खूप वाढला होता. मला शब्दांच्या व्युत्पत्या माजघरात फेऱ्या मारत मारत पाठ करणारी बेबी आठवत आहे. 'थोडे मोठ्याने म्हण म्हणजे माझेही पाठ होईल' असे आई म्हणायची. खरोखरच बेबीच्या एम. ए. च्या वेळी 'मी जर परीक्षा दिली तर नक्की पास होईन' असा विश्वास तिला होता. असो. संध्याकाळी सहा ते आठ ती university libraryत अभ्यास करायला जात होती. ती घरी येईपर्यंत आईबाबांना चैन नसायची. याच दरम्यान तिने साहित्य स्नातक व साहित्य पारंगत ह्या परीक्षा प्रथम श्रेणीत पास केल्या. एम. ए. ला ती मराठीत दुसरी मेरीट आली होती. पण वरील दोन्ही परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली होती. तिचे मराठीतील एवढे घवघवीत यश पाहून स्व.बाळशास्त्रींना तिचे खूप कौतुक वाटायचे.
बाळशास्त्री ११ ऑगस्ट १९६८ ला गेले. बेबी त्यावेळी ब्रह्मपुरी च्या नेवजाबाई हितकारिणी काॅलेजमध्ये शिकवत होती. आईही तिच्या कडे गेली होती. श्रावणातला सोमवार होता तो. आई सकाळच्या बसने परत येणार होती. अकरा साडेअकरा पर्यंत ती पोहोचली. बाळशास्त्रींच्या निधनाचे दुःखद वृत्त कळताच ती रस्त्याने धावतच मावशीकडे गेली. बेबी काॅलेजला गेली. तिला तिथे ती वार्ता समजली. सुटीचा अर्ज देऊन तिने बाराची बस पकडली. पाचला तीही पोचली. पण तिला त्यांचे अंत्यदर्शन झाले नाही. तिचे त्यावेळचे ढसढसा रडणे आठवते. बाळशास्त्रींच्या प्रथम स्मृतिदिनी तिचे भाषण झाले होते.
आता बेबी तुमसरच्या काॅलेजमध्ये लेक्चररशिप करू लागली. यू. जी. सी. स्केल लागू झाला. पगार खूप हँडसम झाला. आतापर्यंत बरेच दिवस खूप काटकसरीत गेले होते. आता आम्हाला आमची बेबी श्रीमंत वाटायला लागली. मनाने तर ती होतीच, पण आता धनानेही झाली. पण तिने पैसा उधळला नाही. तिच्यामुळे घरी आधी गॅसची शेगडी आली. त्यावरचा स्वयंपाक चालायला बाबांना त्यावेळी सर्वच मोठ्यांना खूप मनवावे लागले होते. गॅसला ओके केल्यावर मग प्रेशर कुकर आला. हे सर्व बेबीच्या कृपेने. आता कष्टाची कामे हळूहळू सोपी व्हायला लागली. आमची तर चंगळच झाली. तसा माझा नंबर शेवटी शेवटी, त्यामुळे मला परिस्थितीची झळ कधी बसलीच नाही. मागेल ते मिळायचे. फारसा कपड्यांचा हव्यास मला नव्हता. पण बेबीच्या स्वभावाला एकट्याने आनंद लुटणे मान्य नव्हते. तिच्या साड्यांचा नंबर हळूहळू वाढू लागला. दर नागपूरच्या ट्रीप मध्ये ती आम्हालाही अदलबदल करता यावा म्हणून आमच्या करिता तीन तीन साड्या घेऊन यायची. तिच्या वस्त्रश्रीमंतीने तिने आम्हालाही श्रीमंत केले. दक्षिण भारतात तिची आईबाबांबरोबर जी ट्रीप झाली त्यात तिने आमच्यासाठी कानातले, गळ्यातील शंख शिंपल्यांच्या माळा इतक्या आणल्या होत्या की खूप दिवस त्या घालून मी मटकत होते. माझ्या या संपत्तीचा मैत्रिणींना त्यावेळी खूप हेवा वाटत असे. 'आता देत आहे तर घेऊन घ्या. नंतर मी देऊ शकेन की नाही मला माहित नाही' असे ती नेहमी म्हणायची. पण तिने आम्हाला खूप गोष्टी स्वतःच्या वागणुकीतून शिकवल्याही व खूप भरभरून दिल्याही.
२१ जून ही प्रमोदच्या लग्नाची तारीख ठरली होती. बंगलोरला रजिस्टर्ड मॅरेज होणार होते. बेबी तुमसरच्या काॅलेजला लेक्चरर होती. त्यावेळी काॅलेज २१ जूनला सुरू होत असत व पहिल्या दिवशी हजर राहणे आवश्यक होते. नाहीतर पूर्ण उन्हाळी सुट्यांचा पगार तिला मिळाला नसता. ह्या कारणाने तिला लग्नाला येणे शक्य नव्हते. ती हिरमुसली. पण आम्हाला जाण्याच्या तयारीत तिने पूर्ण मदत केली व नंतर नागपूरला दिलेल्या रिसेप्शन मध्ये व घर चक्क ठेवण्यात तिचा सिंहाचा वाटा होता.
तुमसरला असताना एकदा ती खूप आजारी पडली. आजारी असल्याची तार तुरकर पटवाऱ्याकडून आली. आई काही दिवस तिची काळजी घेण्यासाठी गेली होती. आता तिचा ताप उतरला होता पण अशक्तता खूप आली होती. कोणीतरी तिच्या जवळ असणे आवश्यक होते. मग मी व मोठ्याई गेलो होतो. मी फक्त मोठ्याईला सोबत म्हणून व बेबीला भेटायला. आम्ही आठवडाभर होतो. तिची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती. अशक्तता होती. पण आमच्या समोरच ती काॅलेजला गेली. पहिल्या दिवशी मला सोबत घेऊन गेली होती. विद्यार्थिनींनी तर तिला गराडा घातलाच पण सह अध्यापकांनीही खूप आपुलकीने तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तिची काॅलेजमधील लोकप्रियता त्यावेळी मला पहावयास मिळाली.
आठवणी खूप आहेत पण किती लिहिणार, व सर्वांना माहित असलेल्याच गोष्टी माझ्या अप्रचुर भाषेत लिहून मी माझे हसे तर करून घेत नाही ना असे वाटते म्हणून इथेच थांबते. लिहिण्याची कला अवगत नसतांनाही राहवले नाही म्हणून हे सगळे लिहिले आहे. यातील काही गोष्टी तिच्या मुलांना नक्कीच माहिती नसतील कारण बेबी कितीही बोलकी असली तरी 'आपुली आपण करी स्तुती' ह्यातली नक्कीच नाही ह्याची मला खात्री आहे.
लेखिका: वृंदा आमोद देव
७-७-२०१६
-------------------------------------------------------------------------
ब्रह्मरात्र:
दिवस मोजू नये
म्हणतात, पण मी
ते मोजले
दोन हजार एकशे
आणि वर एक्याण्णव
भरले
एक नाही कमी,
अगदी एकही ज्यास्त
नाही
दोन शून्य दोन दोन
आता दूर नाही
दिवस जातील भराभरा, सवयच
त्यांना तशी
काहीतरी
उत्तम घडो येणाऱ्या
दिवसाशी
बोटे पालटो ग्रंथपाने, नवी
लिंक टिचकीसरशी वाचन
मंथन अध्ययनाने भेट
ज्ञानसुरभीशी
लेखणी येवो नित्यच
हाती, उमटो समोर
पानी
शब्दांच्या
पलिकडल्या अर्था उमटू द्या
लेखांनी
स्वांत:
सुखाय लेखन असते,
बाबांची ही दीक्षा
कोणी वंदो, निंदो,
आपण घालावी ना
भिक्षा
उघडी ठेवा शत
शत द्वारे तुमच्या
मनकप्प्यांची खुंट हालवा,
पुसा हवी तर
रेघही दगडावरची विचारवादळ
शिरू द्या मनी,
घालू द्या थैमान
सत्यशोध घ्या, जरी असे
ते कटू, झुकू
द्या मान
सत्तरीत
तो रिता करावा
कुंभ शिळ्या मंत्रांचा
ढग रूढींचे फोडुनी
घ्यावा वेध नीलानंताचा
असाच जावो काळ,
सत्य तुमचे तुम्हास
कळावे अशी सहा
वर्षे जावोनी, ब्रह्मरात्रीने
यावे
लेखक: अरुण मोहरीर
७-७-२०१६
-------------------------------------------------------------------------
बेबी:
खळखळणारी नाही जी
त्या नदीचे पात्र तू
पंडितांची
जर आई गीता
पीडितांची
ज्ञानेश्वरी तू
मी असाच अबोल
रेडा
वेदही मी नाही
वदलो
अभंग जगले अभंग
तरले
त्याच काळी मी
ही जगलो
खूप झाले ऋषी
मुनी
कुणी ध्यानी कुणी धुनी
अभंग तरले ज्या
पाण्यावर
त्या नदीचे पात्र तू
संध्याकाळी
नदिपात्रावर
कितीक रेडे पाणी
पीती
पाण्यामध्ये
पाय टाकुनी
हात धूती पाय
धूती
रेडे असो वा
वेडे असो
तू सर्वांना शांती दिली
तुळशीसोबत
जिचे पाणी
त्या नदीचे पात्र तू
काळाचे हे अथांग
पाणी
साठविते
जी आठवणी
सदाशिवाच्या
जटांजटांतुन
धरणी आले जिचे
पाणी
त्या नदीचे पात्र तू
लेखक: सुधीर मोहरीर
७-७-२०१६
-------------------------------------------------------------------------
आणि बांध फुटलाच!
कष्ट, सोशिकता, त्याग
हे शब्द आम्ही
फक्त तोंडपाठ केले
मोठ्याई,
आई, बेबीमाईने
ते जगून दाखविले
।।१।।
कधी मला तू
गडकऱ्यांची सिंधू वाटली
तर कधी ज्ञानेश्वरांची
मुक्ता
भावंडांसमोर,
मुलांसमोर आदर्श ठेवला
पाणी लपवत, हसता हसता
।।२।।
UGC स्केल
तू सोडले
ज्यांची
तुझ्या पायाचे तीर्थ
घेण्याचीही
पात्रता नाही
त्यांना
मिरविताना तू
सहजतेने
पाहिले ।।३।।
ज्या तालमीत तू घडलीस
त्याच तालमीत मुलांनाही घडविलेस
एक वर्तुळ पूर्ण झाले
आणि आज? आज
हे सर्व
तू अलिप्ततेने पाहिले ।।४।।
वाटते तितके सोपे नव्हते
आयुष्य!
मलाही वाटले अनेकदा,
व्हावे तुझे शिष्य!!
दोन तीन वर्षांपूर्वी
एका डिसेंबरच्या मध्यरात्री
बांध फुटलाच
प्रत्येकाला
आरुणी कुठे भेटणार
हो!?!
एक्काहत्तरीत
चार्वाक,
चार्ली चापलीन गाणारी तू!
बेबीमाई
चिरायू हो!
शता़युषी
हो!!
मराठी साहित्यात चिरंजीव हो!!!
लेखिका: विजया पारखी
७-७-२०१६
-------------------------------------------------------------------------
तुम्ही सर्वांनी इतके भरभरुन
माझ्या बाबतीत लिहीले आहे.
तुम्ही सर्वजण मला अत्यंत
प्रिय आहात. तुमच्या
प्रेमाबद्दल मी सर्वांची
ऋणी आहे. उतराई
होऊ शकत नाही.
तुमच्या ऋणात राहायला
मला आवडते. मला
आज सर्वांचीच प्रकर्षाने
आठवण येत आहे
व डोळे सारखे
पाणावत आहेत. परमेश्वराने मला
इतके सर्व दिले
याबदृल त्याची आराधना करावी
तितकी थोडीच.
मोठी आई,
अण्णाजी, शांता मावशी-बाळशास्त्री,
बाबा, प्रमोद, कमाविसदार
मामा, तात्याजी पुराणिक,
रघुनाथराव पत्तरकिने, भय्याजी पत्तरकिने,
बापूराव पत्तरकिने, बबन मंगदे,
आत्या, भाऊसाहेब या सर्वांनीच
माझ्यावर निःस्वार्थ प्रेम केले.
मला कधीच
कळले नाही. इतके
काय माझे भाग्य
की, अनेकांनी त्यांच्या
वात्सल्याचा वर्षाव माझ्यावर केला?
हे देणे फिटता
फिटणारे नाही.
माझ्या सर्वच भावजया,
भाचे मंडळी यांचे
अफाट प्रेम मला
मिळाले. सासरचे, शेजारचे, संपर्कात
येणारे सर्वच यांनी तारफेचे
पूल बांधले. माझे
भाग्य! दुसरे काय?
अमोल-कृपा आलेले
आहेत. त्यांच्याबरोबर चिखलद-याला जाण्याचा
बेत ठरत आहे.
गडबडीत आहे, त्यामुळे
इथेच आवरते घेते.
धन्यवाद!!!
लेखिका: संगीता पाटखेडकर.
७-७-२०१६
No comments:
Post a Comment