Thursday, 21 July 2016

अनुभवांचा मागोवा

 "मोगरा फुलला, मोगरा फुलला,
फुलें वेंचू जाता बहरु कळियांसी आला
इवलेसे रोप लावियेले द्वारीं
त्याचा वेलू गेला गगनावे-ही" - ज्ञानेश्वर महाराज.
    लावलेल्या रोपाचे एक दिवस फळाफुलांनी लगडलेले झाड व्हावे आणि अनेकांना आसरा देत त्याच्या फळांनी पशुपक्ष्यांची माणसांची तृप्ती करावी म्हणजे होणारा आनंद खरोखरच अवर्णनीय! फळाफुलांचे संवर्धन हा माणसाच्या आनंदाचा फक्त एक भाग झाला. त्याच्याद्वारे त्याच्या अंतःसृष्टीचे संगोपन होते हे विसरुन चालणार नाही. निर्भेळ आनंद जर कुठे गवसत असेल तर तो इथेच! अनेकानेक चांगल्या इच्छांची जन्मदात्री म्हणजे ही धरित्री आणि त्या मृण्मयीच्या साह्याने फुलणारी ही बागाईत म्हणजेच तर सावता माळ्याची 'कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी'
    "केला मातीचा पशुपतीपरी मातीस काय महती? शिवपूजा, शिवपूजा, शिवास पावे l माती माझी, माती माझी, माती माझी l मातीस पावे"
  या मातीत ज्यावेळी चैतन्य अवतरते त्यावेळी तो होणारा आनंदाचा साक्षात्कार पेलण्याला तयारी असावी लागते. ती नजर, ती दृष्टी, ती भरारी आभाळाला गवसणी घालणारी असते. "सदा माझे डोळा l जडो तुझी मूर्ती" किंवा "रुप पाहता लोचनी l सुख जाले वो साजणी"l - हा तुकारामांचा अनुभव घेण्यासाठी अंतर्बाह्य मनोवृत्तीची ठेवण- त्यांच्यासारखीच करणे आवश्यक आहे. "मन हे धाले l पूर्ण विठ्ठलचि झाले l अंतर्बाह्य रंगुनि गेले l विठ्ठलचि l विठ्ठलचि" l - हेच खरे!
 "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें
 पक्षी ही सुस्वरें आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास
  नाही गुणदोष अंगा येत
  आकाशमंडप, पृथ्वी आसन
   रमे तेथे मन, क्रीडा करी तुका म्हणे हा या मनासी संवाद आपुलाचि वाद आपणासी"
  सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या संसाराच्या आसक्तीत डुंबलेल्या माणसांना हा अनुभव येणे अशक्यच!
  "दुःख ना आनंदही अन् अंत ना आरंभही
नाव आहे चाललेली कालही अन् आजही
मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा
मी नव्हे की बिंब माझे मी माझा आरसा
वाद नाही, साद नाही ना सखी ना सोबती
नाद आहे ह्या घड्याला अन् घड्याच्या भोवती सांध्य छाया आणि काया जोडुनि यांचा दुवा नाव आहे चाललेली दूरची हाले हवा एकला मी नाही जैसा, नाही नाही मी दुणा जीवनाला ऐल नाही, पैल तैसा, मध्य ना"
   इतकी आध्यात्मिक पातळीची कविता आरती प्रभूच लिहू शकणार! कारण अल्पवयातच ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले त्यामुळे अनुभवसृष्टी तर व्यापक झालीच असणार पण कोंकणच्या निसर्गरम्यतेतला विहारही विसरुन चालणार नाही.
हा नाद रोमरोमातून भिनायला
"आली कुठुनशी कानी टाळमृदंगाची धून
नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमांतून"
  अशी अवस्था व्हायला जी परिणतप्रज्ञ स्थिती असावी लागते ती ज्यांना लाभली त्यांचा आनंद काय वर्णावा!
   अनुभवांची समृध्दता, साध्या साध्या विषयात मोठा आशय धुंडाळण्याची वृत्ती, समाजाच्या प्रत्येक थरातील माणसांच्या प्रश्नांचा घेतला जाणारा मागोवा, एकूणच सर्व माणसांशी, त्यांच्या भावभावनांशी जपलेली जवळीक, ,सर्वत्र एकत्वाचा प्रत्यय घेण्याची आत्मरति या गुणांनीच उत्तम कवितेचा आविष्कार होत असतो. अमर, अजर साहित्याचे गमक हेच! संतसाहित्याचा मागोवा घेणे हे यासाठी खूप महत्त्वाचे!
  "मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले
परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केंधवा तुम्हास त्याचे दिसले
स्मित करुन म्हणाल्या मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे त्यांनाच पुससी तू, आहे की तो नाही"- कुसुमाग्रज.
  अशा सुंदर कवितांचा आस्वाद घ्यायला मन समृध्द करा!
  नरसिंह चिंतामण केळकर म्हणत की, पाण्यात लहानसा खडा टाकला म्हणजे एकामागून एक आणि एकापेक्षा एक मोठी अशी जशी वर्तुळे उठतात, तशी विचारांची आणि भावनांची वर्तुळे वाङमयामुळे आपल्या मनात उमटली पाहिजेत. एकामागून एक, एकापेक्षा एक मोठी, एवढी मोठी की शेवटी विश्वाच्या वर्तुळात ती विलीन झाली पाहिजेत. व्यक्तीचा आणि विश्वाचा जे समन्वय घडविते ते 'वाङ्मय.'
   नागरमोथ्याच्या बेटातून वाहणाऱ्या ओहोळाच्या पाण्याला जसा सुगंध असतो, तसे सौजन्याचे आणि सद्भावनांचे मळे ज्या अंतःकरणात फुललेले आहेत त्यातून येणारे सारे वाङ्मय सुंदर आणि सुवासिक असते. लेखक ही काही वेठ नाही. ती एक उर्मी आहे, तो एक नाद आहे.      
 उत्तम वाङमय मनाला आभाळात घेऊन जाते. अचाट सामर्थ्याची आणि पराक्रमाची कामें करण्याची मनात इच्छा उत्पन्न करते. वाल्मीकीने रामाच्या हातून रामायण घडवून आणले. शिवरायांच्या वेळेस आगिनदास शाहिराने महाराष्ट्राला जागे केले.
   कोंबाचा वृक्ष व्हावा, थेंबाचे तळे व्हावे, बिंदूचा सिंधू व्हावा आणि हिमकणाचा हिमालय व्हावा असे महान संकल्प मनात धरल्यास गौरीशंकर होणे काहीच कठीण नाही.
     
      संगीता पाटखेडकर.
         २१//२०१६.

No comments:

Post a Comment