Thursday, 21 July 2016

विदर्भातील निसर्गरमणीय सौंदर्यस्थळः 'वारी हनुमान'

श्री समर्थ रामदासस्वामींनी ४०० वर्षांपूर्वी स्थापन केलेले पहिले हनुमानाचे मंदीर म्हणजेच 'वारी हनुमान.' रामदासांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक हनुमान मंदिरं स्थापित केली.,विदर्भातील अकोला या गावापासून ५५ कि.मी. अंतरावर असलेले वारी हनुमान मंदीर खूप सुंदर आहे. हनुमानाची मूर्ती; इतर मूर्तींपेक्षा वेगळीच आहे. मूर्ती इतकी देखणी आहे की तीवरुन नजर हटत नाही. मूर्तीची उंची फूट आहे. अकोला ते वारी हनुमान; प्रवासी मार्गसुध्दा खूपच विलोभनीय आहे.     रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठमोठी हिरवीकच्चं झाडे, हिरवीगार शेतं, केळीच्या बागा, डाळिंबाच्या बागा मन प्रसन्न करतात.
    गांधीग्राम, चोहट्टा, वेताळी बाबा, हिंगणी बुद्र्क, आकोट, वडाळी सटवाई, चितलवाडी, पळसोद, हिवरखेड अशी गावं वारीला जातांना लागली. चितलवाडी या गावात दुतर्फा केळीच्या बागा आहेत. मार्गात गाई, शेळ्या, मेंढरे, खेचर, म्हशी, माकडे, तसेच निरनिराळे पक्षीही दिसले. एक मोठ्ठा पक्षी अमोलच्या कारसमोर उंचच उंच उड्या मारत होता. लाल चोचीचा तो पक्षी कोणता असावा हे नीट बघूनही कळले नाही. ज्या अंतरापर्यंत कार चालविली त्या अंतराच्या बरोब्बर पुढे तो उडत होता. आमच्या समोर-समोर करत होता. जणू काय अमोलला मंदीराचा मार्गच दाखवित होता असे वाटले. पक्षी मात्र खूप सुंदर आणि मनस्वी वाटला!
    भैरवगडावर हे मंदीर आहे. मंदीराला खूप सा-या पाय-या आहेत. आई मात्र तरुणाईला लाजवेल अशा पध्दतीने पाय-या चढली आणि उतरली! तिच्यामधील स्फूर्ती आणि ऊर्जेला सलाम ठोकावासा वाटला! ती अशीच राहो कायम!
   कोणतेही देवस्थान बघा; खूप उंचावर असते. मग ते ज्योतिर्लिंग असो, देवीची मंदीरं असोत, की दत्तात्रयांची असोत! माहूरला तर सती अनुसूयेचं शिखर चढणे आणि दर्शन घेणे खूपच कठीण कार्य!
  देवस्थानं इतक्या उंचावर का असतील? असा प्रश्न मला नेहमीच पडतो! कुणाला हा प्रश्न विचारता मीच स्वतः या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. एकेक पायरी सर केल्याशिवाय, पाय-यांतील चढ-उतारांचे कढ सोसल्याशिवाय, उंचावर आल्याशिवाय माझे दर्शन होत नाही; असा यामागे त्या सर्वशक्तिमानाचा मानवाला संदेश असावा असे मला वाटते. मानवी जीवनाचेही अगदी असेच आहे. यशाचे उंच शिखर गाठायचे तर आयुष्यातील एकेका टप्प्याचे, चढ-उतारांचे कढ सोसावेच लागणार! याठिकाणी चढ-उतार म्हणजे आयुष्यातील सुखदुःखे सहन करुन यशासाठी एकेक पायरी चढत मार्गस्थ होत राहणे!
   कधी यश मिळेल तर कधी मिळणारही नाही. कधी एखाद्याला देवदर्शन होईल; नाहीतर एखाद्याला तिथपर्यंत जाऊनही, दम लागला, तब्येत बिघडली तर एका पायरीवर बसूनच दर्शन घेतल्याचे समाधान मानावे लागेल!
  जसजसे वारी गाव जवळ येऊ लागले तशा सातपुड्याच्या लांबच लांब पर्वतरांगा मार्गाला खुणावू लागल्या. मंदीरात शुक्रवार असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती. रिमझिम पाऊस सुरु होता त्यामुळेही गर्दी नसेल! दर्शन अगदी मनाजोगे झाले.
   यामंदीरात, यापूर्वी १९९६ साली आम्ही बाबांसोबत गेलो होतो. ही दुसरी वेळ! अर्थातच बाबांची तीव्र आठवण आली!
या मंदीराची स्थापना जरी रामदासांनी केली असली तरी मंदीर परिसर सुंदर करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा 'भैरवगड' हा किल्ला होता. त्या काळातील लोक इतक्या उंचावर जाणे-येणे करुन, कसा काय निर्वाह करत होते याचा अचंबा वाटला.
   या देवळात रामदासस्वामींची तेजस्वी मूर्ती दोन ठिकाणी आहे. मूर्तीसमोर 'दासबोध' हा ग्रंथ आहे. आईने पुजा-याला विचारले की, 'कसे काय रामदासांनी त्या काळी एवढी फूटी मूर्ती उभारली?' पुजा-याने उत्तर दिले, 'सिध्दपुरुषाला कोणतेही महान कार्य कठीण जात नाही. आम्हाला रामरक्षेच्या पुस्तिका अर्थासहित मिळाल्या. दर शनिवारी, रामनवरात्र, हनुमानजयंतीच्या काळात येथे मोठा उत्सव असतो. तिथे भक्तांच्या निवासाची सोय आहे. मंदीर परिसर खूप भव्य-दिव्य आहे. साधारण दहा लोक त्या मंदीर परिसरात राहतात. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था तिथेच करण्यात येते, त्या लोकांना खाली उतरण्याची गरज नाही. हे सर्व पाहून खूपच आश्चर्य वाटले! वान नदी दिसली. वान! वा! वा! अमोलने भरघोस देणगी दिली. कारमधून सगळा परिसर पाहतांना डोळ्यांचे पारणे फिटत होते
     आता नदीवर पूल बांधण्यात आला आहे. पूर्वी नदी पार करुन जावे लागत होते. गोमुख होते, त्यातून पाण्याचा अखंड स्त्रोत वाहत होता. अर्थातच स्वच्छ आणि निर्मळ पाणी! झरा होता! गोमुख आणि झरा यावेळेस दिसले नाही. पाणी मात्र पूर्वीसारखेच शुध्द आणि निर्मळ वाटले. आई इतक्या वर चढून गेली याचे तेथील लोकांना आश्चर्यच वाटत होते. ते म्हणत होते, 'मावशीला इतक्या वर कशाला आणले?'
   हनुमानाची आरती आणि मारुतिस्तोत्र समोरच दिसते. आता तिथे ट्रस्टी मंडळ स्थापन झाले आहे. मंदीर परिसर अत्यंत स्वच्छ होता. आम्ही जुलै २०१६ रोजी सकाळी :१५ ला निघालो आणि दुपारी ला अकोल्याला येऊन पोहोचलो. रिमझिम पाऊस होता. संकटमोचन हनुमान म्हणतात याचा आम्हाला प्रत्यय आला. कुणालाही काहीही त्रास झाला नाही. इतक्या उंचावर इतकी दाट वृक्षराजी! सगळा अचंबाच अचंबा!
  समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली; त्यापैकी पहिला मारुती अकोला जिल्ह्यात आहे याचा आम्हाला अभिमान वाटला.
 एकूणच वारीची वारी छान झाली. हे सगळे आता पंढरपूरच्या वारीचे दिवस आहेत. आमची ही वारी घडली.
 'वारी वारी जन्म-मरणाते वारी' असे म्हणावेसे वाटले.

      मृदुला पाटखेडकर.

      १०//२०१६.

No comments:

Post a Comment