चार्ली चॅप्लीनची आई एक
नटी होती. सन
१८९४ साली इंग्लंडमधील
एका नाट्यगृहात करमणुकीचा
कार्यक्रम चालू होता.
लष्करी जवानांची गर्दी. अभिनय
आणि गायन यात
पारंगत असलेली देखणी २०-२२ वर्षाची
स्त्री! वयाच्या १८ व्या
वर्षी ती एका
मध्यम वयाच्या श्रीमंत
माणसाबरोबर आफ्रिकेत पळून गेली
होती. मोठ्या
ख्यालीखुशालीत राहिली, तिला एक
मुलगाही झाला पण
नंतर या श्रीमंत
माणसाबरोबर राहणं तिला नकोसं
झालं. इंग्लंडला परत
येऊन आपला नटीचा
पेशा तिनं पुन्हा
सुरु केला. आफ्रिकेला
जाण्यापूर्वी ज्या एका
नटानं तिचं प्रियाराधन
केलं होतं त्यांच्याशी
तिने विवाह केला.
लग्नाच्या नव-यापासून
एक छबकडा मुलगा
झाला. तो रोज
रात्री आईबरोबर नाट्यगृहात येत
असे. विंगेत उभा
राहून आईचे काम
पाही. तिची सर्व
गाणी त्याला मुखोद्गत
होती. आईचा आवाज
चिरकायला लागला होता; अशावेळी
मॅनेजरने या मुलाला
पुढे केले कारण
तो नाटककंपनीतल्या मंडळींना
आईच्या कामाच्या व गाण्यांच्या
नकला करुन दाखवित
असे. त्या मुलाचा
कार्यक्रम खूप गाजला.
प्रेक्षकांनी दौलतजादा चालू केला.
'आधी नाणी वेचतो
मग पुढचं गाणं
म्हणतो' असे तो
म्हणाला. सगळे खळखळून
हसले. मॅनेजर पुढे
आला. नाणी वेचू
लागला. 'हा चोर
आता मला कसली
नाणी देतो?' म्हणून
त्याने प्रेक्षकांकडे पाहून चक्क डोळा
मारला. हंशा-टाळ्यांना
पारावारच राहिला नाही. हाच
तो चार्ली चॅप्लिन.
पुढे जवळजवळ
६०-६५ वर्षे
हे नाव अखंड
गाजत राहिलं. त्याच्या
चित्रपटांनी जगभर सा-या प्रेक्षकांना
अक्षरशः वेड लावलं.
वाढती कीर्ति, अगणित
संपत्ती, विदूषकांचा बादशहा हा
किताब. स्वित्झर्लंडमध्ये एखाद्या राजाच्या थाटात
तो राहिला. लहानपणीचा
दारिद्रयाचा काळ कधीचाच
मागे टाकला. कोट्याधीश
झाला. 'My Autobiography' हे त्याचे
आत्मचरित्र!
लिली चार्लीचं
सौंदर्य बघायला, अभिनय, गाणी
आणि नृत्य पाहायला
प्रेक्षकांची गर्दी लोटत असे.
आपल्या आईवर आलेल्या
दुर्दिनांचे वर्णन चार्लीने केले
आहे. आईच्या आठवणी,
मातृभक्ती, आदर आणि
अभिमानाने चमचमणा-या आहेत.
तिचं धैर्य, तिची
माया, सदा हंसतमुख
राहण्याची वृत्ती याचे वर्णन
त्याने जिव्हाळ्याने केले आहे.
दारिद्रयाशी झगडता झगडता तिला
वेड लागलं. इस्पितळात
रवानगी झाली. घरी आल्यानंतर
पुन्हा वेडाचा झटका आला.
भ्रमिष्ट अवस्थेत तिला पाहण्याचे
त्याला धैर्य होईना. 'अखेरच्या
सात वर्षात ती
चांगली राहिली, माझी भरभराट,
माझं वैभव तिनं
बघितलं' असं चार्ली
म्हणतो.
१३ व्या
वर्षांपासूनच तो नटाचा
पेशा करु लागला.
विस्मयकारकरीतीने यशशिखरावर पोहोचला; त्यामुळे
महाविद्यालयीन शिक्षण होऊ शकले
नाही. मोठेपणी त्याने
चांगले-चांगले ग्रंथ मिळवून
वाचले. जेव्हा तो शाळेत
जात असे तेव्हा
कोणत्याच विषयात त्याचे मन
रमले नाही. गणित
रुक्ष, कवितेचा अभ्यास म्हणजे
पाठांतर- स्मरणशक्तीचा व्यायाम! भूगोलही तसाच.
इतिहास म्हणजे काय तर
लढाया, जुलमी कारकीर्दी आणि
बायका, भाऊ, पुतणे
यांची हत्या अमानुषपणे
करणाऱ्या महत्त्वाकांक्षी, खुनी राजाची
परंपरा. त्याच्या भावना हालतील
असा कोणताही विषय,
कोणत्याही शिक्षकांकडून शिकविला गेला नाही
असे तो म्हणतो.
'शिक्षणाची पध्दती वेगळी असती
तर मी मोठा
पंडित झालो असतो
खास' असेही म्हणतो.
तो स्वतः
कोट्याधीश झाला पण
धनिक लक्ष्मीधरांचा आणि
सत्तेच्या स्थानावर बसलेल्या नालायकांचा
तिरस्कार व उपहास
हा त्याच्या कलाकृतींचा
ठरीव विषय होऊन
बसला.
ज्याला इंग्रजीत 'अंडर डॉग'
म्हणतात त्याचा कैवार, दरिद्री,
दलितांविषयीची करुणा आणि सहानुभूती
हाच त्याच्या कलाविषयक
चिंतनाचा आणि प्रचारांचाही
स्थायीभाव होऊन बसला!
साम्यवादाकडे तो अधिकाधिक
झुकत गेला. रशियाचा
पक्षपाती बनल्याचा आरोप त्याच्यावर
आला. अमेरिकेच्या बहुसंख्य
जनतेने त्याचा छळ करुन,
अमेरिकेतून निघून जाण्याची पाळी
त्याच्यावर आणली या
सा-या घटनांचा
एकच अर्थ निघतो-
दुर्दैवाचे दशावतार या कलावंतानं
कोवळ्या वयात बघितले
होते.
'कार्नो कंपनी'चं
'शर्लाक होम्स' नावाचं नाटक
रंगभूमीवर यायचं होतं. त्या
नाटकात एका छोट्या
हरकाम्या पो-याच्या
भूमिकेसाठी त्याची निवड झाली.
करार होता ४०
आठवड्यांचा. दर आठवड्याला
अडीच पौंड म्हणजे
महिन्याचा पगार १४०
रुपये. चार्लीने एवढी रक्कम
कधी पाहिली नव्हती.
'कार्नो कंपनी'च्या नाटकातल्या
भूमिका चार्ली करु लागला.
त्याचा एक प्रेक्षकवर्ग
तयार झाला. चार्ली
हे नाव जाहिरातीत
अग्रभागी घातल्या जाऊ लागलं.
'कार्नो कंपनी' अमेरिकेच्या प्रदीर्घ
दौऱ्यावर निघाली. सातासमुद्रापलीकडच्या अमेरिकेची
सोनेरी स्वप्नं त्याला पडू
लागली.
चार्ली स्वतःचं चरित्र
लिहीत आहे हे
कळल्यावर एका सुप्रसिध्द
लेखिकेनं त्याला विचारलं, 'प्रामाणिकपणाने
सारं सारं लिहिणार
आहात का तुम्ही?'
तिचा रोख त्याच्या
राजकीय मतांवर नव्हता. त्याच्या
आयुष्यातली सारी प्रेमप्रकरणं
तो उघड करणार
की नाही, यावर
होता. त्रिखंड कीर्ति
आणि अलोट संपत्ती
मिळविणा-या या
स्वरुपसुंदर नटश्रेष्ठाला बायकांनी घेरलं नसतं
तरच नवल होतं!
माणसाच्या सा-या
वर्तनाच्या बुडाशी लैंगिक प्रेरणा
असते, हा फ्रॉइडचा
सिध्दांत चार्लीला मान्य नाही.
भूक ही सर्वात
जबरदस्त प्रेरणा असे त्याचे
मत!
कलावंताच्या बाबतीत नवनिर्मितीचा
ध्यास हा सगळ्यात
प्रभावी. या ध्यासात
कलावंत इतर गोष्टी
विसरुन जातो. तरीदेखील हेटी
केली बरोबरची भेट
त्याने वर्णिली आहे. ती
एक नृत्यकुशल नटी
होती. एका नाटकात
दारुड्याचं काम करताना
तू आपल्या नाकाला
लाल रंग लावीत
असतोस. या लाल
नाकाशिवाय तू कसा
दिसतोस हे मला
माहीत नाही असे
ती म्हणाली. दुसऱ्या
दिवशी त्याने त्याचा
फोटो दाखविला तेव्हा
ती म्हणाली, 'तू
ब-याच वयाचा
असशील अशी मी
कल्पना केली होती,
निदान तीस वर्षांचा!'
'मला अजून एकोणिसावं
वर्षदेखील लागलं नाही,' असं
तो म्हणाला. चार्लीचे
रविवारचं आमंत्रण तिने स्विकारलं.
त्याने ठेवणीतला पोशाख केला!
हातात काळ्या वेताची
छडी घेतली. ठरलेल्या
संकेतस्थळी तो लवकरच
गेला. मजेशीरच सगळे,
त्याला कळेना आपण तिला
रंगभूमीवर नटल्या-सजल्या अवस्थेत
पाहिले आहे. प्रत्यक्षात
ती सुंदर नसेलही.
ट्राम मधून एक
स्त्री उतरली. चार्लीच्या दिशेने
येऊ लागली. ती
दिसायला अगदीच भुक्कड होती.
त्याला धूम ठोकाविशी
वाटली; पण तसे
न करता नजरानजर
होताच त्यानं अभिवादन
करण्यासाठी डोक्यावरची Hat ऐटीत उचलल्यासारखं
केलं. त्या स्त्रीनं
रागानं डोळे वटारले,
मान झटकली आणि
मोठ्या तो-यात
ती निघून गेली.
'दैवानं खैर केली'
असे म्हणून त्याने
श्वास सोडला. नंतर
हेटी आली. प्रत्यक्षातही
ती खूप सुंदर
होती. 'इतकी देखणी
मुलगी मला कुठे
लाभायला?' असा विचार
त्याच्या मनात येत
होता आणि प्रत्यक्षातही
तेच घडलं; पण
आयुष्यभर तिच्याविषयीची एक नाजूक
भावना मात्र कायम
राहिली. पुढे १०
वर्षांनी इंग्लंडला धावती भेट
देण्यासाठी तो आला
तेव्हा हेटीला भेटायचं हे
ठरवीतच! पण तिच्या
भावाकडून त्याला कळले की
हेटी मरण पावली
होती.
कार्नो कंपनीचा अमेरिकन दौरा
संपत आला तेव्हा
चॅप्लीन कष्टी झाला. नशीबाची
मेहेरनजर याच देशात
आपल्यावर होणार असे त्याला
वाटत होते. चाळीस
वर्षाच्या एका भविष्य
सांगणाऱ्या बाईने त्याला सांगितले
की, 'हा हात
पैसा देणारा आहे.
न्यूमोनियाच्या विकाराने तू ८२
व्या वर्षी मरशील.
तीन बायकांचा योग
आहे.' चॅप्लीन म्हणतो
तिचे भविष्य खरे
ठरले. एका कंत्राटदाराच्या
आमंत्रणावरुन पुन्हा दीर्घ मुदतीच्या
दौऱ्यावर अमेरिकेला कार्नो कंपनी
आली. अर्थातच चॅप्लीनही.
'A night in an
English Music Hall' हे कार्नो कंपनीचं नाटक
चॅप्लीनच्या दारुड्याच्या भूमिकेमुळं खूप गाजलं.
या भूमिकेनं चित्रपटसृष्टीची
द्वारं त्याच्यासाठी खुली झाली.
'मी कधी काळी
चित्रपटनिर्माता झालो तर
पहिलं बोलावणं या नटाला
धाडीन' असे प्रेक्षागृहातला
एक माणूस म्हणाला.
मॅक सेनेट नावाचा
हा प्रेक्षक. त्याने
पुढे कीस्टोन फिल्म्
कंपनी काढली.त्याने
चॅप्लीनला तार करुन
निमंत्रण दिलं. दर आठवड्याला
तीन छोट्या चित्रपटात
काम करावं व
महिन्याला १३५० रुपये
पगार ठरला.
कार्नो कंपनीचा दौरा
संपल्यानंतर चॅप्लीन लाॅस अॅन्जलसला
आला. मूक चित्रपटांच्या
त्या काळात अशी
पध्दत होती की,
सहा रिळांचा मुख्य
चित्रपट दाखविण्याआधी एकेका किंवा दोन
दोन रिळांचे छोटे
चित्रपट दाखवायचे. हे छोटे
चित्रपट विनोदी असत आणि
कुणाचा कुणीतरी पाठलाग करीत
आहे अशी कल्पना
करुन त्या पाठलागाच्या
अनुषंगाने विनोदी घटना घडविलेल्या
असत. हा विनोद
अगदी सवंग स्वरुपाचा
व उथळ असे.
इंग्रजीत ज्याला 'Slap-Stick म्हणतात त्या जातीचा
असे.
चॅप्लीनच्या विनोदाबद्दलच्या स्वतंत्र
कल्पना होत्या. केवळ गल्लाभरु
चित्रपट कीस्टोन कंपनी काढत
असे. चॅप्लीनला ते
पसंत नव्हते. माझे
चित्रपट मी स्वतःच
डायरेक्ट करीन असा
चॅप्लीननं हट्ट धरला.
कीस्टोन कंपनीच्या पहिल्याच विनोदी
चित्रपटात काम करताना
चॅप्लीननं आपल्या भूमिकेची वेषभूषा
आणि विशिष्ट मनोवृत्ती
खोल विचार करुन
ठरविली. विसंगति म्हणजेच सार्या विनोदाचं
मूळ आहे या
सिध्दांतानुसार त्यानं आपलं सोंग
सजविलं. सैल बोंगी
विजार व लांडा
तंग कोट, पायात
फताडे बूट तर
डोक्यावर लहानशी Hat. अगदी लहान
मिशी आणि हातात
एक छडी. वेशभूषा
करुन मॅक सेनेटपुढे
तो उभा राहिला.
हातातील छडी फिरवित
फेऱ्या घालून दाखवू लागला
आणि भूमिकेचा स्वभावधर्मही
त्याला स्पष्ट कळू लागला.
या भूमिकेचा
स्वभाव एकेरी नाही. तो
भटक्या आहे. 'आवारा' आहे.
कवि आहे. स्वप्नात
दंग होणारा आहे.
मनाने एकाकी आहे.
मानवी आयुष्य प्रेमानं
आणि अद्भुतानं भरलेलं
आहे अशी त्याची
श्रध्दा आहे. ते
प्रेम आणि ते
अद्भुत कुठे तरी,
केव्हातरी आपल्याला भेटेल म्हणून
तो वाट पाहत
आहे. शास्त्रज्ञाची, संगीतकाराची,
अमीराची, क्रीडापटूची मिजास या
माणसात आहे; परंतु
रस्त्यात पडलेलं सिगारेटचं थोटूक
उचलून पेटवून ओढताना
किंवा एखाद्या लहान
मुलाच्या हातातल्या मिठाईची चोरी
करताना त्याला काही वाटत
नाही आणि त्याचा
राग डिवचला गेला
तर एखाद्या बाईच्या
पार्श्वभागावर लाथ मारायलाही
तो कमी करीत
नाही. अंगावर घातलेल्या
वेषभूषेनं जणू त्याची
भूमिका जिवंत झाली होती.
परोपरीच्या विनोदी घटना त्याला
सुचत होत्या आणि
हास्यनिर्मिती करणारे, एरवी सुचले नसते, असे
अनेक लहानमोठे प्रसंग
त्याला सुचत होते.
चेहऱ्यावरचा मुग्धपणा घेऊन
वावरणारी वर उल्लेखिलेली
वेषभूषा व स्वभाव
यांनी साकारलेली चॅप्लीनची
'आवारा' भूमिका पुढे कित्येकांनी
अनुसरली. (राज कपूर
आठवा.) चॅप्लीनच्या चित्रपटांना पहिल्यापासूनच
विलक्षण लोकप्रियता लाभली. त्याने
महिना १२ हजार
रुपयांची मागणी कीस्टोन कंपनीकडे
केली. ती मान्य
न झाल्याने त्याने
कंपनी सोडली व
तो 'एसाने' कंपनीत
दाखल झाला.
'आवारा'च्या वेषातल्या
त्याच्या छोट्या मूर्ति लहानमोठ्या
शहरातल्या सर्व दुकानातून
विकल्या जाऊ लागल्या.
एवढंच काय, 'झाईगफील्ड
फॉलीज गर्ल्स' या
नावाची जी एक
प्रख्यात कंपनी होती तिनं
आपल्या सा-या
नाचणा-या मुलींना
चॅप्लीनच्या 'आवारा'ची वेषभूषा
दिली आणि ते
नृत्य बघण्यासाठी प्रेक्षकांच्या
झुंडीच्या झुंडी लोटू लागल्या.
'एसाने' कंपनी सोडून त्यानं
आपल्याकडे दाखल व्हावं
म्हणून इतर कंपन्या
त्याला खूप मोठ्या
पगाराचं आमिष दाखवू
लागल्या. एकदा तो
शिकागो शहराकडे निघाला तेव्हा
वाटेतल्या दरएक स्टेशनवर
त्याला बघायला प्रेक्षकांची प्रचंड
गर्दी लोटली. बादशाही
हॉटेलच्या मालकांनी त्यानं आपल्याकडे
एक दिवसाचा तरी
मुक्काम करुन पाहुणचार
घ्यावा म्हणून सन्मानपूर्वक आमंत्रणं
दिली. ठिकठिकाणच्या मेयरकडून
त्याचा सत्कार झाला. शिकागो
शहरी तो पोचला
तेव्हा शहराच्या सगळ्यात मोठ्या
चौकात विद्युद्विपांनी उजळलेल्या
मोठमोठया पाट्या त्याला दिसल्या.
'म्युचुअल' फिल्म कंपनीनं त्याच्याशी
वार्षिक ७२ लक्ष
७० हजार रुपये
पगाराचा करार केला
होता. तो त्या
मोठमोठया पाट्यात जाहीर केला
गेला होता. चॅप्लीन
या सर्व गोष्टींनी
गोंधळून गेला होता.
कीस्टोन कंपनीसाठी त्यानं
३५ चित्रपटात काम
केलं. 'एसाने' कंपनीनं चॅप्लीनचे
५५ चित्रपट काढले.
म्युचुअल कंपनीत १२ चित्रपटात
काम केलं. आता
त्याला स्वतःची कंपनी असावी
असं वाटू लागलं.
डग्लस फेअर बॅक्स
आणि मेरी पिक्फोर्ड
यांची जोडी त्या
काळात चित्रपटसृष्टीत फार
गाजली होती. या
दोघांशी चार्लीचे जिव्हाळ्याचे संबंध
जडले होते. त्या
दोघांनी 'The First National
Films' नावाची कंपनी काढली तेव्हा
चॅप्लीन एक भागीदार
झाला.
१९१४ सालापासून
पुढच्या ७ वर्षात
चॅप्लिननं काम केलं
असे एकूण ६७
चित्रपट निघाले, पण ते
सारे एकेक-दोनदोन
रिळांचे. तीन रिळांचे
तीन, चार रिळांचा
'कार्मेन' हे चारच
चित्रपट अपवाद म्हणावे लागतील.
First National मध्ये चॅप्लीन दाखल झाल्यानंतर
प्रथम असेच छोटे
छोटे ५ चित्रपट
काढण्यात आले; पण
एक धाडसी चित्रपट
६ रिळांचा चॅप्लीनची
मुख्य भूमिका असलेला
काढण्यात आला. 'The Kid' हे या
चित्रपटाचं नाव. या
चित्रपटाने उत्पन्नाचे उच्चांक मोडले,
व संपूर्ण लांबीच्या
चॅप्लिन चित्रपटाचा पायंडा तर
पडलाच पण 'जॅकी
कूगन' नावाचा बालनट
प्रकाशात आणला. त्याने लाखो
प्रेक्षकांची प्रीति संपादन केली.
एक भटक्या माणूस
आणि ज्याला त्यानं
आश्रय दिला असा
एक बालक अशी
एक जोडी निर्माण
करुन त्या दोघांच्या
सहजीवनाभोवती हास्यकारक आणि कारुण्यपूर्ण
प्रसंग गुंफले तर अपूर्व
रंगतीचा एक सुंदर
आणि प्रदीर्घ चित्रपट
तयार करता येईल
या कल्पनेनं चार्लीच्या
मनात घर केलं
होतं.
१९४७ सालच्या उत्तरार्धात सॅम
गोल्डविननं त्याला
फोन करुन एका
पार्टीचे आमंत्रण दिले. तिथेच
मिलड्रेड ॕहॅरीसशी
त्याचा परिचय झाला. त्याने
तिच्याशी लग्न केले,
पण थोड्याच दिवसात
ते विभक्त झाले.
चित्रपटाच्या कामातही त्याचे चित्त
लागेना. जगद्विख्यात लेखक एच.
जी. वेल्स यांच्या
पत्रामुळे तो हवापालटासाठी
लंडनला गेला. इंग्लंडमधल्या सा-या वृत्तपत्रांनी
त्याच्या स्वागतार्थ अग्रलेख लिहिले.
महायुध्दानंतर तह झाला
त्यादिवशी जनतेच्या हर्षोन्मादाचे जे
प्रदर्शन घडले ते
काहीच नाही नव्हेसं
वाटावं असा चार्लीच्या
स्वागताचा जल्लोष उडाला.
तो नंतर
हॉलीवूडला आला. 'First National' च्या व्यापातून
तो मुक्त झाला
होता. 'युनायटेड आर्टिस्ट' साठी
'A Woman of Paris' हा पहिला चित्रपट त्याने
काढला. 'दि गोल्ड
रश' आणि 'The Circus' हे
त्याचे चित्रपटही गाजले. 'City Lights' हा
चित्रपट त्याने काढला. याच
सुमारास चित्रपटांना वाचा फुटली.
'वॉर्नर ब्रदर्स' नी तयार
केलेला पहिला बोलका चित्रपट
चार्लीने बघितला. मुद्रित होणाऱ्या
ध्वनीच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याची
युक्ती माहीत नसल्यामुळे त्या
चित्रपटात खूप दोष
निर्माण झाले, पण नंतर
त्याचाही शोध लागला.
'मेट्रो गोल्डविन मायर' कंपनीनं
'दि ब्रॉडवे मेलडी'
हा संपूर्ण लांबीचा
संगीतप्रधान चित्रपट काढला. तो
निर्दोष निघून भलताच गल्लाभरु
ठरला.
याही काळात
'City Lights' हिट ठरला. प्रत्येक आठवड्याला
अडीच लाखाचा गल्ला
जमा होऊ लागला.
चित्रपट निर्मितीचा सारा खर्च
१२ आठवडे हा
चित्रपट चालल्यामुळे भरुन तर
निघालाच पण १२
लाख रुपयांचा फायदाही
झाला. चित्रपटसृष्टीतून निवृत्त
होऊन हाँगकाँग शहरी
जाऊन निवृत्त आयुष्य
काढण्याचा तो गंभीरपणे
विचार करु लागला,
पण दैवाची योजना
निराळी होती. पॉलेट गोडार्ड
नावाची नटी त्याच्या
आयुष्यात आली.
१९२४ साली
'दि गोल्ड रश'
सिनेमाचं काम चालू
असतांना लिटा ग्रे
या नटीशी चार्लीचं
दुसरं लग्न झालं.
तिच्यापासून त्याला दोन मुलगे
झाले, पण या
लग्नाचा शेवटही घटस्फोटातच झाला.
पॉलेट गोडार्डचाही तिच्या
नव-याशी घटस्फोट
झाला होता. हे
तिसरं लग्नही फार
काळ टिकलं नाही.
'Modern Times' नावाचा पूर्ण लांबीचा
मूक चित्रपट चार्लीने
काढला. पॉलेट गोडार्ड या
चित्रपटाची नायिका होती. हा
चित्रपटही गाजला. भांडवलशाहीचा शत्रू
व कम्युनिझमकडे झुकणारा
असा वाद त्याच्याबाबतीत
याच चित्रपटामुळे निर्माण
झाला. 'दि ग्रेट
डिक्टेटर' या चित्रपटाच्या
वेळी मित्रांनी त्याला
सल्ला दिला की
कम्युनिझमचा प्रचार करण्याच्या भानगडीत
पडू नकोस. हाही
चित्रपट गाजला. कोणत्याही चित्रपटाने
दिला नव्हता एवढा
पैसा या चित्रपटाने
दिला.
कम्युनिझमचा
प्रचार करणारा एक विरोधी
सूर त्याच्याबाबतीत जोरदार
सुरु झाला होताच
त्याला आता धारदार
रुप आले. अमेरिकन
सरकारदेखील त्याचा द्वेष करु
लागलं. जोन बेरी
नावाच्या एका स्त्रीशी
यावेळी त्याची ओळख झाली
होती. तिच्या नादीही
तो होता. चॅप्लीनची
चौथी बायको म्हणून
वृत्तपत्रांतून तिचा निर्देश
व्हायला लागला होता. तिची
बुध्दिमत्ता अगदी सामान्य
असल्याचे त्याच्या लक्षात आले.
त्याला तिचा वीट
आला, पण ती
त्याच्या बंगल्यावर येत राहिली. चॅप्लीनच्या
हितशत्रूंनी या गोष्टीचा
फायदा घ्यायचे ठरविले.
जॉन बेरीने;
तुझ्यापासून मला दिवस
गेले आहेत. माझ्या
मुलासाठी मी मागते
तेवढी रक्कम तुला
द्यावी लागेल अशी नोटीस
तिने वकीलामार्फत पाठविली.
खरी गोष्ट चार्लीने
तिचे तोंडही पाहिले
नव्हते. लोकापवाद, सार्वजनिक नाचक्की,
मनस्ताप, मानहानी, विटंबना या
सर्वांचा कडू घोट
त्याला आता गिळावा
लागणार होता. हॉलीवूडमधल्या विख्यात
नटावर येणारं हे
ठरलेलं संकट होतं.
'माझं जीवन म्हणजे
एक भयंकर स्वप्न
होऊन बसलं' असे
चार्लीने लिहीले आहे, पण
या खटल्यात चार्ली
दोषमुक्त होऊन सुटला.
'सामान्य जनतेचं माझ्यावर अलोट
प्रेम आहे याचा
पुरावा मला मिळाला;
जेव्हा खटल्याचा निकाल लागल्यानंतर
कोर्टात जमलेल्या प्रचंड जनसमुदायाने
माझा जयघोष केला
तेव्हा,' असे उद्गार
चार्लीने या घटनेनंतर
काढले.
सुप्रसिध्द नाटककार यूजेन
ओनील यांची ऊना
नावाची सौंदर्यवती मुलगी. तिने
६० वर्षांच्या चार्लीशी
लग्न केलं. ती
होती १८ वर्षांची.
हे चौथे लग्न
खूप यशस्वी झाले.
'मसीअ व्हर्डो,' 'लाईमलाईट,'
'दि किंग इन
न्यूयॉर्क' असे तीन
चित्रपट त्याने लग्नानंतर काढले
आणि ते गाजलेही,
पण आता चार्ली
अमेरिकेतल्या वास्तव्याला विटला होता.
तो अखेर स्वित्झर्लंडमध्ये
स्थायिक झाला. उद्योग सोडावे
व स्वस्थ बसावे
असे वाटणे त्याच्या
स्वभावात नव्हते. त्याच्या मुलांच्या
ठिकाणी असणाऱ्या जन्मजात अभिनयकौशल्यासाठी
चित्रपटकथा लिहाव्या आणि दिग्दर्शन
करावं; एक नाटक
लिहावं आणि एक
मोठी संगीतिकासुध्दा, अशी
इच्छा त्याला होतीच.
सुखाचे आयुष्य ऊनाशी लग्न
झाल्यापासून मी जगलो
असे तो म्हणतो.
एकंदर चार्लीच्या आयुष्याचा
विचार करता अनेकांना
स्फूर्तिदायी ठरलेला हा कलावंत
आयुष्याशी खूपच झगडला
असे दिसते. त्याचा
'आवारा' अवतार अविस्मरणीय ठरला.
शिक्षणात गोडी नसूनसुध्दा
मोठमोठ्या मानसशास्त्रज्ञांना जे जमणार
नाही ती माणसाची
नस या कलावंताने
ओळखली होती. केवळ
हावभावांच्या भरवशावर केलेला अभिनय
वाचिक वेल्हाळतेपेक्षा सर्वश्रेष्ठ
त्याने ठरवून दाखविला. पाश्चात्त्य
संस्कृतीच्या गुणदोषांना त्याला सामोरे
जावेच लागले.
'दुरितांचे तिमिर जावो'
या विचारसरणीचा जणू
तो प्रणेता होता;
पण मोठमोठया संतमहात्म्यांनाही
ज्या यातना भोगाव्या
लागल्या त्याच वादांच्या भोव-यात अडकण्याच्या
आणि कम्युनिस्ट विचारसरणीचा
म्हणून त्याला सहन कराव्या
लागल्या. एकूण सामान्य
असो की असामान्य,
सुख-दुःख या
चक्रातून कोणाचीच सुटका नाही
हा मतितार्थच अखेर
जीवनाचे सार ठरते.
संगीता पाटखेडकर.
१२/७/२०१६.
चार्लीविषयी याआधी काहीच माहीत नव्हते. आई, तू चार्लीचे गहजब चरित्र लिहिलेस!!!!!
ReplyDeleteHats off to you!!!!!