Thursday, 21 July 2016

आईची अनन्यता

९१ वर्षांपूर्वी १४ जुलैला एक सुंदर मुलगी मुरलीधर सत्यभामा सास्तीकर यांच्या कुळात जन्माला आली. ही 'सुशीला' एक मोठा कालखंड दुमदुमवून टाकणार असा ललाटलेख तर लिहिलाच गेला असणार! अनेक कुटुंबे आणि अनेकानेक गावे यांच्याशी ती संबध्द झाली. कुटुंबे- अर्थातच सास्तीकर हे पहिले. यात भगवंतराव सास्तीकर, भय्या सास्तीकर, दादा सास्तीकर हा वणी, यवतमाळ, दारव्हा वगैरे गावांशी संबंधित परिवार.
    सत्यभामा- आईची आई ही अणे परिवाराशी संबंधित. तिला तिच्या काकांकडून इस्टेट मिळाली होती; कारण त्यांना अपत्य नव्हते. बापूजी अणे हे अणे परिवारातील स्वातंत्र्य-संग्राम चळवळीशी संबंधित असे प्रसिध्द व्यक्तिमत्त्व होते. शेती आणि घर असे या संपत्तीचे स्वरुप होते. बाकी आर्थिक मदतीसंबंधी लिहिण्याचे प्रयोजन नाही. ती काळानुसार कमीजास्त असू शकेल. मुरलीधरपंत यांचे किराणा दुकान होते त्यांना ते नेटाने चालविणे अशक्य झाले. तेही स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणारे होते. त्यांना नंतर स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून पेन्शनही मिळत असे. वणीचे घर सुंदर होते. वणीला पुराणिक कुटुंब आईच्या घरापासून जवळच राहत असे. बापूजी पुराणिक खूप श्रीमंत म्हणून प्रसिध्द होते. तत्वादी मास्तरांचा उल्लेख आईच्या बोलण्यात नेहमी असावयाचा.
    भगवंतराव सास्तीकरची पत्नी काकी, हिची बहीण म्हणजे बबन मंगदेची आई बहिना. लहानपणीच्या वणीच्या आठवणी आईच्या मनात ताज्या आहेत. माझा जन्म वणीचाच! तो काळ इंग्रजांच्या अत्याचाराला ऊत आलेला काळ होता. १५ अॉगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले पण ते खूप लोकांच्या सहनशक्तीची कसोटी घेऊनच. प्रमोद मी स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलो. वणीचे घर अर्थातच मला आठवते आवडलेही होते. एक व्यक्ती कशी अनेकांशी संबंधित असते हे सांगण्यासाठी हा उल्लेख केला.
     वणी हे श्रीमंत गाव. निरगुडा नदी शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख नदी गावाच्या सौंदर्यात भर घालणारी! बायका लांबून पाणी आणायच्या. डोक्यावर दोन हांडे, कमरेवर घागर दुसऱ्या हातात बादली असा तोल सांभाळणा-या बायका हे रस्त्यांवरचे दृश्य! बायकांना व्यायाम करण्याची वेगळी गरज नसे. पुरुष शेतीव्यवसायात मग्न असत. पैशांची कमतरता असे पण धान्याची नाही. अण्णाजी तीन तीन तास पूजापाठ करावयाचे. गोपाळकृष्ण मंदिरात काकड आरतीला जाणारे मोठी आई-अण्णाजी मला आठवतात. घराशेजारीच शंकराचे मंदिर होते. ताईबाई पुराणिक हालत डोलत त्या मंदिरात रोज दर्शनाला येत असे. मोठी आईच्या हातची खिचडी, लोणकढे तूप कैरीचे गुळाचे लोणचे याची सर कशालाही येणार नाही. मोठी आई अत्यंत सुगरण. फेण्यासुध्दा करता येणारी. त्या सर्व खाद्य पदार्थांच्या चवी आजही जिभेवर आहेत. आई मावशी या दोनच बहिणी जगल्या. अपत्ये जगत नसत. आई नवसासायासाने झालेली. अत्यंत हुशार तल्लख बुध्दीमत्तेच्या या बहिणी योगायोगाने नागपूरात विवाहबध्द होऊन आल्या. आईचे लग्न १५ व्या वर्षी झाले. मावशी आईपेक्षा वर्षांनी लहान. आई 'मोहरीर' कुटुंबात आली मावशी 'हरदास' कुटुंबात!

बाबा शिक्षक असल्यामुळे अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनींचे परिवार या दोघांनाही ओळखत. बाळशास्त्री प्रसिध्द कीर्तनकार. संघाचे स्वयंसेवक गोळवलकर गुरुजींशी संबंधित. तरुण भारत, महाराष्ट्र या वृत्तपत्रांशी लेखनद्वारा निगडीत! 'पुस्तक परीक्षक' म्हणून काम करणारे पुण्याला 'वसंत व्याख्यानमाला' गुंफणारे प्रथम वैदर्भीय साहित्यिक म्हणून विख्यात असल्यामुळे आई-बाबांचेही या सर्व घटितांशी जवळचे संबंध आले.
      ऋग्वेदी ब्राह्मणांचे नातेवाईक एकमेकांशी कुठे भेटतील याचा नेमच नाही. अण्णाजींची बहीण देशपांडे कूटुंबात दिलेली. ती भाऊसाहेबांची (दुर्गा आत्याचे यजमान) आई. त्यामुळे भाऊसाहेब आईला सुशीला म्हणत असत. प्रत्येक कुटुंब कमीतकमी -१० जणांचे असावयाचेच; त्यामुळे परिवाराला पारावार नसावयाचा!
     आम्हा मुलांमुळे ती वेगवेगळ्या गावांशी तेथील अनेक ओळखींशी संबंधित झाली. मुंबई, बंगलोर, रुरकी, हैद्राबाद, कानपूर, भिलई, अमरावती, अकोला, तुमसर, ब्रह्मपुरी, अमेरिका अनेकानेक ठिकाणी ती फिरली तिथल्या सौंदर्यस्थळांचा आनंद तिने घेतला. सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध, अगदी स्वादिष्ट पदार्थ करुन सर्वांच्या पोटात स्थान मिळविणे हे तिचे वैशिष्टय!
    वाचन हा तिचा आवडता छंद. बाळशास्त्रींची लायब्ररी तिनेच वाचून काढली. मासिकांची वर्गणी लावली होती. बबन मंगदे मासिके आणून द्यायचा. ती मासिके त्या काळातील गाजलेली असावयाची. मासिकांना एक अभिरुची संपन्नता असावयाची त्यामुळे ज्ञानही अद्ययावत मिळायचे. बाबा, मी विजया मराठीच्या एम.. त्यामुळे तीही सर्व पुस्तके तिने वाचली. बहुश्रुतता स्मरण यांच्या योगाने तिचे व्यक्तित्व अत्यंत विलोभनीय बनले. मुले मुली या सर्वांच्या अडीअडचणींशी ती नेटाने झगडली. सर्वांना पुरुन ती उरली. इतके सामर्थ्य अचंबित करणारे आहे. बाबांच्या आयुष्याशी ती समरस झाली. काल आणि आज हा भेद नेहमी राहणारच आहे, पण सर्व परिस्थितींशी समायोजन करण्याची तिची क्षमता वादातीत आहे.
     बरे असो; नसो, कर्तव्यतत्परता तिने कधी सोडली नाही. 'तिच्याइतके सुंदर' असून निगर्वी असणे हे दुर्मिळच! फुलोरे करणेच नव्हे तर चटण्या-घोटण्या, भाज्या, पुरणपोळ्या, वडे, पंचामृत यांनी ताट तर सजवायचेच पण कितीतरी व्यक्तींना वाकून वाढावयाचे; कारण ताट-पाट-रांगोळ्यांची पंगत! खरेच तो काळ आणि हे सर्व करणाऱ्या स्त्रिया यांच्यासमोर नतमस्तक होणाऱ्यांना कृतघ्नच म्हणावे लागेल. ख्याति करावी लागत नाही ती अशी वा-याबरोबर कुठच्या कुठे जात असते. ती फुली फुलून येते मुलानातवंडांच्या कौतुकाने! तिच्या आयुष्याची परडी अनेकांच्या यशाच्या सुगंधी परिमलाने दरवळून गेली आहे.

 पायाच्या दुखण्याने तिला नेहमी बराच त्रास दिलेला आहे. माझ्यासाठी देवाजवळ मरण मागा असेही तिने बरेचदा म्हंटले आहे; पण ती १०० वर्षांची होऊन 'मोहरीरकुटुंबात तिने तोही एक रेकॉर्ड करावा अशी आमची इच्छा आहे.
    बाबांमुळे तिला खूप देवधर्म, पूजापाती, यात्रा घडल्या आहेत. एका निष्ठामय आयुष्याचा आता उत्तरार्ध आहे. अतिशय संयत, शांत, समाधानी, हुशार, तल्लख स्मृती असणारे हे व्यक्तित्व अनेकांना आश्चर्याने तोंड वासायला लावणारे आहे.
    आई-बाबांचे पुण्य सर्वांच्या कामी येऊन आम्हाला एक मोठा वारसा लाभलेला आहे. हा वारसा एक 'मैलाचा दगड' ठरला आहे. याला ओलांडून पुढे जाताना विसाव्यासाठी कितीतरी काळ थांबावे लागणार आहे.
   सुधीर आणि सौ. कविता मोहरीर यांच्याकडे (तिच्या शेवटच्या मुला-सुनेकडे) ती बंगलोरला सध्या वास्तव्याला आहे. आता ती कुठे जाण्याच्या विरोधात आहे. सुधीरने तिची उत्तम सोय ठेवलेली आहे. तशी कदाचित दुसरे कोणी ठेवू शकले नसते! ती सर्वांशी फोनने संबंधित आहे. २०१५-२०१६ हे वर्ष श्री सदाशिव मोरेश्वर मोहरीर यांचे जन्मशताब्दीचे वर्ष! (आमचे बाबा). त्यानिमित्ताने सर्वांच्या लेखणीला बहर आलेला आहे. प्रत्येकजण लिहितो आहे. हा आनंदही ती घेत आहे.
    ४० व्या वर्षापासून तिने रात्रीचे जेवण सोडून दिले. आहारावरील हा संयम खूपच वाखाणण्याजोगा आहे. हरदास मोहरीर हे परिवार खूप जवळ, एकाच मार्गावर, एक वळण अंतरावर राहत असल्याने एकमेकांच्या अडीअडचणीत परस्परांनी परस्परांना खूप मदत केलेली आहे. आई-वडील एक बहीण हाच आईच्या माहेरचा परिवार असल्यामुळे या सर्वांशी तिचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. मावशीला अपत्य नसल्यामुळे ती आम्हा सर्व बहिण-भावंडांना अपत्यवत मानत असे. या बहिण-भावंडांनीही तिला तिच्या अखेरच्या काळात खूप साथ दिली. हे सर्वच वातावरण आज बघायला मिळणे दुर्मिळ आहे.
     काळ कितीही बदलला असला तरी मनातील आपुलकी आम्हा सर्वांना एकमेकांशी जोडून ठेवीत आहे. या आपुलकीवर काळाचा कोणताही परिणाम झालेला नाही.
    मुले-सुना, मुली-जावई, नातवंडे, पणतवंडे यांची यादी मोठी आहे. या सर्वांवर तिच्या मायेचा पाखर आहे. तिच्या काळातील सर्व आप्त-परिवार मंडळी कालाधीन झाली. 'मी एकटीच उरली आहे' असे ती म्हणते. या अश्वत्थ वृक्षाची सावली अशीच चिरंतन राहो ही आम्हा सर्वांचीच त्या परमेश्वराजवळ नितांत भक्तीने प्रार्थना आहे.

      संगीता पाटखेडकर.

        १४ जुलै २०१६.

No comments:

Post a Comment