श्रावण मासातील पुत्रदा एकादशी म्हंटले की ती. बाबांची आठवण येणे अपरिहार्य आहे. पुत्रदा एकादशीचा जन्म असला तरी दुसऱ्या दिवशी बाबा वाढदिवस साजरा करीत. नागपूरला त्यावेळी जे कोणी उपस्थित असतील व मुद्दाम त्यानिमित्ताने आलेही असतील त्या सर्वांसोबत अत्यंत मनःपूर्वक हा वाढदिवसाचा समारंभ होत असे. सर्वांना भेटीगाठीची ती एक पर्वणीच असे. प्रमोद, मी, विश्राम, अरुण, राजू प्रत्येकजण आपापल्या 'करीयर' मध्ये मग्न असल्यामुळे व परगावी असल्यामुळे आम्हा सर्वांना त्याप्रसंगी आवर्जून बोलावले जायचे व आम्हीही सर्वजण तो समारंभ साधण्याचा प्रयत्न करीत असू.
जसजसे आपले वय वाढत जाते व आपणही आपापल्या आयुष्याला तोंड देताना जे काही शिकत असतो त्यातून आपल्याला आपल्या आईवडिलांची, नातेवाईकांची एक समृध्द करणारी ओळख मिळत गेलेली असते. ती. आई व बाबांनी आम्हा सर्वांना आयुष्यात खूप समृध्दतेचा, सुसंस्कृततेचा, विचारांच्या परिपक्वतेचा व एकंदरीतच जीवनाला निरलसपणे, निर्भीडपणे सामोरे जाण्याचा जो सर्वांगीण अनुभव दिला आहे त्याला तोड नाही.
अनेक गुण वारसाहक्काने मिळत असतात. आईबाबांमध्ये जीवनाला शिस्त कशी लावायची याचे उदाहरणाद्वारे दाखविण्याचे जे कसब आणि कौशल्य असते ते भरपूर प्रमाणात होते.
'अभ्यासोनि प्रकट व्हावे' हे संस्कार तर त्यांनी दिलेच ; पण 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' याचाही संस्कार आपोआपच मिळाला.
निःसंग होऊन बाबा जीवनाला सामोरे गेले. आपण थोडे जरी त्यांच्यापासून शिकू शकलो तरी फार झाले.
8 august ला ही पुत्रदा एकादशी आलेली आहे. बाबांच्या स्मरणाने व्याकुळ होऊन हे चार शब्द लिहिले आहेत. अनेकांना प्रेरणा देणारे, अनेकांच्या जीवनाला हातभार लावणारे 'बाबा' तुम्हाला विनम्र अभिवादन व श्रदांजली. 🙏🌹
संगीता पाटखेडकर
८/८/२०२२
No comments:
Post a Comment