Saturday, 30 September 2017

विजय पताका


आज उगवला दिवस सोनेरी

विजयादशमीचा दिवस सोनेरी

पानें आपट्याची भासती मनोहारी

मन घेवो सदा चैतन्य भरारी

झेंडुची फुले ही केशरी

सजल्या रांगोळ्या, तोरण दारी

दारांतील तुळस हासे; डोले मंजिरी

विजयोत्सव असे हा महिषासुरमर्दिनीचा

विजयोत्सव असे हा रामाच्या झुंजीचा

विजयोत्सव असे हा पांडवांच्या वीरतेचा

रामलीला महोत्सव दशानन संहारी

शुभ दिनाला या खूप असे महत्त्व भारी

 

विजयच विजय मिळो सर्वदूरी

विजया तू, प्रसन्न, देवी कृपा करी

निनाद विजयाचा पडो कानांवरी

घडो आम्हां हा तव साक्षात्कार देवी

आनंदाने लुटू सोने विजयाचे

सडा पडो आम्हांवरी

 

शब्द सोने मिळवायचे आहे

शब्द कण सोनेरी वेचायचे आहे

साहित्य सोने लुटायचे आहे

आनंद सोने वाटायचे आहे

शुभेच्छा सोने भरायचे आहे

कित्ती नि काय करायचे आहे

विजयी होवो हा संकल्प माझा तरी

आई अंबिके कृपा राहो मजवरी

 

आई वडिलांची मिळाली छत्र छाया

भावांची तशीच असे प्रेमळ माया

भविष्यात आपुलकीची फळे अशीच

मिळो चाखाया.... मिळो चाखाया

आठवणींच्या साठवणी झाल्या सोनेरी

मधु, कैटभ, चण्ड,मुण्ड, शुम्भ, निशुम्भ

आणि महिषासुर

या राक्षसांचा देवी तू केला संहार

देवी, तू केला संहार

म्हणून विजयादशमीला होतसे

तुझा जयजयकार

देवी, तुझा जयजयकार

नाश होवो शत्रूंचा

नष्ट होवो अविचार

नष्ट होवो अत्याचार

स्त्रियांवरील अत्याचार

राज्य नांदो सदाचारी

दहशत जावो खरोखरी

सीमोल्लंघन हेच आज देवी तू करी

आज देवी तू करी

आयुष्याची कर तू अमुच्या वाट ही सोनेरी

कर तू वाट ही सोनेरी

शुभेच्छांचे सोने द्यावे वाटे घरोघरी

विजयी पताका फडको सर्वदूरी

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment