Thursday, 21 September 2017

शक्ती आवाहन


पळें जाती

घटिका जाती

घटा-घटांत घरोघरी

सुघट तव स्थापिती

घटकांभर का होईना

मनरमणी, तुज नमना

भक्त सारे विसावती

 

ये गं ये नवरात्री ये

ये गं ये रेणुका ये

ये गं ये जगदंबा ये

 

नवचेतना तू , विघ्ननाशिनी

नवदुर्गा तू , दुर्गतिनाशिनी

आनंददायी तू , रातजागेश्वरी

त्रिकालदर्शी तू , रक्षणकर्ती

नवदिनांत तू , अखंडज्योति

 

ये गं ये नवरात्री ये

ये गं ये रेणुका ये

ये गं ये जगदंबा ये

 

स्त्री भृणहत्या, पीडित शोषण

मुला-मुलींचे कुपोषण

बाजारु झाले आज शिक्षण

शुंभ-निशुंभ हे आजचे तू जाण

घटना अशा ह्या कलियुगास...

देती अवकळा

कळानष्ट ह्या सृष्टीस,

नवरुपिणी तू दे नवकळा

 

ये गं ये नवरात्री ये

ये गं ये रेणुका ये

ये गं ये जगदंबा ये

 

नवरंगी पुष्पांच्या गुंफियेल्या माळा

नव-वस्त्रें परिधान करता तुज

सुंदरी रेणुके, सृष्टीत ह्या पसरती...

चैतन्य झळा....

नवविधा भक्तीत ये तू

अंतर्मनी प्रकट होसी अमुच्या तू

शक्तिस्वरुपे स्वबळा

कामक्रोधादि षडरिपूंना जाळूनी

करु तुझी आरती

 

ये गं ये नवरात्री ये

ये गं ये रेणुका ये

ये गं ये जगदंबा ये

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२१//२०१७.

घटस्थापना.

No comments:

Post a Comment