Thursday, 28 September 2017

सूरसम्राज्ञी


"अजीब दास्ताँ है ये.... कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी??.... ना वो समझ सके ना हम"..... या दोनच ओळी, प्रत्येकाच्याच आयुष्याची कहाणी सांगून जातात. माझे आवडते गाणे; लताजींनी गायलेले. २८ सप्टेंबर १९२९ रोजी संपूर्ण जगावर आपल्या आवाजाची जादुई मोहिनी घालणारी सुरसम्राज्ञी, गानकोकिळा लता मंगेशकर जन्माला आली. तिचे वडील दीनानाथ मंगेशकर यांनाच आयुष्यातील आणि संगीतातील गुरु मानणारी, अत्यंत हलाखीच्या आणि गरीब परिस्थितीतून आपल्या सुरमयी आवाज आणि गायकीच्या माध्यमातून जगाशी निरागस सूर जोडणारी, वडिलांचा उजवा हात असणारी, लहान बहीण भावंडांनाही प्रेम आणि वात्सल्य देणारी, त्यांनाही संगीताचे ज्ञान देणारी, संगीतालाच आपला जीवनसाथी आणि सर्वस्व मानणारी, मराठी गाणी, भावगीत, शात्रीय संगीत, हिंदी सिनेमाची अनेकानेक गाणी, विविध भाषांमध्ये लीलया सूरसाज लावणारी, 'आनंदघन' या नावाने कवितांना चाली आणि संगीत देणारी, 'सा, रे, , , , , नि, सां,' या सप्तसुरांशी घट्ट मैत्री असणारी, संगीत ही फार मोठी साधना आहे आणि या साधनेशी आयुष्यभर एकरुप असणारी अशी ही अद्वितीय, अतुलनीय व्यक्ती म्हणजेच 'लता मंगेशकर.

" मेरे वतन के लोगों!! जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुएँ है उनकी जरा याद करो कुर्बानी" - ही कवी प्रदीप यांची रचना तिने अजरामर करुन ठेवली. करुण रसाचा सागर असणाऱ्या ह्या ओळी आणि त्याच धाटणीचे संगीत आणि लताचा करुण आणि स्फूर्तिदायी सूर या गाण्याला प्रत्येक भारतीयाच्या मनांत शहीदांविषयीची कायम जाण आणि ओळख देऊन गेला. पंडित नेहरुंच्या डोळ्यांत अश्रू तरळले!! हे गाणे ऐकल्यावर!! प्रत्येक भारतीयाचीही त्यांच्यासारखीच स्थिती होते. शब्दांमध्ये, सुरांमध्ये, संगीतामध्ये, आणि गायकीमध्ये जेंव्हा जीव ओतला जातो तेंव्हाच या अमर गाण्यांची निर्मिती होत असते. हे गाणे ऐकून प्रत्येक भारतीय भावविवश होतो.

नम्रता आणि विनयशीलतेच्या बाबतीतही लताजी अग्रेसर असतात. आजवर गायिलेल्या अनेक गाण्यांबद्दल त्यांना जे अनेक पुरस्कार मिळाले; ते स्वीकारतांना त्यांना कधीच अहंकाराचा वारा स्पर्शला नाही. आपल्या यशाचे श्रेय नेहमीच त्यांनी त्यांचे कुटुंब, त्यांना लाभलेले संगीतकार, गीतकार यांना दिले. 'चांगलं संगीत देणारे संगीतकार नसते तर आज मीही तुमच्यासमोर नसते,' असे त्या नेहमी म्हणत असतात!!

' नमोजी आद्या l वेद प्रतिपाद्या l जय जय स्वसंवेद्या l आत्मरुपा' ll - या ज्ञानेश्वरांच्या ओळी. लताजींच्या गोड गळ्यातून हा ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष आपण त्या ओमकारालाच भेटतो आहे असे वाटते. 'मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरु कळियांसी आला'...... हे सूर त्यांच्या मुखातून ऐकल्यावर आपला सर्वांचाच चेहराही त्या मोग-यासारखाच फुलतो!! इतकी अवीट गोडी आणि मऊ, मुलायम, तरल लय त्यांच्या गायकीमध्ये आहे. 'संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या मला गायला मिळाल्या; हे मी माझे परमभाग्य समजते'; असे त्या एका मुलाखतीत बोलल्या होत्या.

 

परमेश्वरावर त्यांचा अतूट विश्वास!! 'प्रतिभा' ही दैवी देणगी असते; त्यामुळे काही व्यक्तिमत्त्वे जागतिक (Universal) ठरतात, त्यापैकीच एक म्हणजेच लता मंगेशकर. सप्त सुरांप्रमाणेच त्यांच्या नावातही सात अक्षरे!! 'लता' या नावाला उलटे केले तर 'ताल' हा शब्द येतो. दैवी देणगी आणि सुरावटींचा साज चढविणा-या लता मंगेशकर या महाराष्ट्रात, मराठी मातीत जन्माला आल्या याचा सार्थ अभिमान वाटतो. थकलेल्या, शिणलेल्या, रोजच्या दैनंदिनीशी झगडणा-या, एकूणच जगातील सर्वांनाच या गायिकेने आपल्या गायनांतून; 'आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग, आनंदाचे'- या ओळींप्रमाणेच आपल्या मनातील आनंदाचा डोह तुडुंब भरविला आणि आपल्या सर्वांनाच उपकृत केले.

 

अशा या गानकोकिळेचा आज जन्मदिवस. आज त्यांचे ८९ व्या वर्षात पदार्पण झाले. ज्या सर्व रसिकांना त्यांनी भरभरून आनंद दिला त्या लताजींना माझ्यातर्फे या लेखणीच्या माध्यमातून मानवंदना!!

आपणांस, आरोग्यसंपन्न आणि उदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा!!!

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२८ सप्टेंबर २०१७.

No comments:

Post a Comment