Tuesday, 5 September 2017

निरोप


आपली मराठी भाषा अनेक वेगवेगळ्या शब्दांनी, एकाच शब्दाच्या अनेक अर्थांनी, वेगवेगळ्या वाक्प्रचार म्हणींनी सुंदर, समृद्ध आणि संपन्न आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'निरोप' या शब्दाचा मन वेध घेत आहे. मराठीतील इतर अनेक शब्दांप्रमाणेच हाही वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. शेजारी कुणाला, काही प्रसंग, कार्यक्रमानिमित्त आमंत्रणं द्यावयाची असल्यास, निरोप धाडायला आपण घरच्या सदस्याला पाठवितो; आणि नंतर तो किंवा तिला खात्री करुन विचारतोही, 'दिला ना निरोप सगळ्यांना, कार्यक्रमाचा?' मग तो 'निरोप' सुखाच्या कार्यक्रमानिमित्त असेल किंवा दुःखाच्या!!

प्रेक्षकांची रजा घेणे म्हणजेही निरोपच!

एखाद्या एका तासाच्या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात celebrity guest बोलावले जातात; परंतु इतर ठिकाणी शुटींगमध्ये busy असल्यामुळे ते पूर्णवेळ कार्यक्रमात उपस्थित राहू शकत नाही; तेंव्हा ते जाण्यापूर्वी सर्व प्रेक्षकांचा आदरपूर्वक 'निरोप' घेतात; त्यामुळे हा 'निरोप' शब्द देण्यातही असतो आणि घेण्यातही असतो. काही 'निरोप' सुखद असतात, मनाला आनंद देणारे असतात; तर काही 'निरोप' मनाला कायम चटका लावणारे असतात. अशा निरोपांची आठवण मनांत कायमच असते.

मुलीला सासरी पाठवितांना देण्यात येणारा 'निरोप' हा आई वडिलांचा कंठ दाटून आणणारा असतो. घरातील वडिलधा-या मंडळींना देण्यात येणारा कायमस्वरुपी 'निरोप' मनाला दुःखद यातना देणारा असतो. ते पुन्हा कधीच आपल्याला दिसणार नसतात.

भाद्रपद महिन्यात, गणेशोत्सव असतो. पृथ्वीवर दहा दिवस येणारा पाहुणा असतो गणपती!! त्याच्या आगमनापासूनच सर्वांमध्ये उत्साहाची लहर येते. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणीही गणपतींची प्रतिष्ठापना होते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आरास केली जाते. यावर्षीही अनेक मंडळांनी वृक्षसंवर्धन, एड्स जनजागृती, कुपोषित मुलांची समस्या, विविध रोग आणि त्यावरील उपचारांसंबंधीची माहिती, स्वच्छ भारत अभियानासंबंधित देखावे, विविध स्तोत्रांचे पठन, असे अनेक देखावे सादर करुन सर्वांचे लक्ष वेधले. 'लोकमत' या वृत्तपत्र समूहाने या वर्षी 'ती' चा गणपती ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणली. नारी शक्तीचे महत्व जाणून आता या वर्षीपासून दरवर्षी महिलांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीला नवं रुप येणार...नवी आरास मांडली जाणार आणि स्त्री शक्तीचं नवं तेज या निमित्तानं सगळीकडे झळकणार; या उद्देशाने राबविलेली 'ती' चा गणपती ही 'लोकमत' ची संकल्पना स्तुत्य होती. एक दिवस का होईना मीही तेथील कार्यक्रमांचा आनंद घेतला. बदल घडतोय आणि समाजात चांगले-चांगले उपक्रम या उत्सवाच्या निमित्ताने राबविले जात आहेत, याबदृल आनंदच आहे.

दहा दिवस अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने आपण ज्या गणेशाचे पूजन, स्तवन आणि मनन करतो, प्रसादासाठी मोदक आणि खिरापत करतो, त्या आपल्या लाडाच्या, कौतुकाच्या बाप्पाला 'निरोप' देणे प्रत्येकालाच जड जाते. दहा दिवस कसे भुर्र्... उडाले असतात. विसर्जनाची, निरोपाची वेळ जवळ येत असते. मनाची घालमेल आणि कालवाकालव सुरु होते. मी स्वतः यादिवशी खूप नाराज असते. आम्ही भावंडे लहान असतांना बाबा आम्हाला अकोल्यातील सर्वच ठिकाणचे गणपती बघायला घेऊन जात. आम्ही शहर पालथे घालत होतो. पायीच जात होतो. काही ठिकाणचे देखावे आणि आरास पाहून नजर हटत नसे. आमच्या विभागात 'युवा' गणेशोत्सव मंडळ होते. ते मोठ्या पडद्यावर सिनेमा दाखवित. त्यावेळेस मनोरंजनाचे तेच एक साधन होते. टेलिव्हिजन घराघरात पोहोचला नव्हता.

"जगात येणा-याला एक ना एक दिवस या जगाचा 'निरोप' घ्यावयाचा असतो. देवांनाही हा 'निरोप' सुटला नाही, हेच बाप्पालाही या उत्सवातून भक्तांना सुचवावयाचे असते. बाप्पाचे आगमन होतांना जो तामझाम असतो, नाचून, गाऊन, ढोल आणि ताशांच्या गजरात जो आनंदाचा डोह असतो, तो प्रत्येकाजवळ ओतप्रोत भरलेला असतो. अगदी तसाच तामझाम बाप्पाला 'निरोप' देतांनाही असतो. मनाला हुरहूर लागली असली तरी एक आशा प्रत्येकाला दिलासा देणारी असते की, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार आहेत."- अशा शब्दात विसर्जनाच्या दिवशी मी नाराज असली की बाबा मला समजावून सांगत.

आज सप्टेंबर २०१७. श्री गणेशाला 'निरोप' द्यायचा दिवस!! कठीण समय!! वरील सर्व घटना आठवणे स्वाभाविक!! ज्या वडीलांनी मला हे तत्वज्ञान सांगितले त्यांनी वर्षांपूर्वीच आमचा आणि जगाचा 'निरोप' घेतला. आमच्या मनातल्या आठवणींना मात्र या जीवात जीव असेपर्यन्त 'निरोप' नाही. दरवर्षी या उत्सवाच्या दहाव्या दिवशी हे आठवल्याशिवाय राहत नाही.

...... चला तर मग, पुन्हा पुढच्या वर्षीसाठीचा उत्साह, आनंद, यश, ज्ञान, हे सर्व बाप्पाला भरभरून मागून त्याला आनंदाने 'निरोप' देऊ या. पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी!!

'गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या'...... असे म्हणून आज या लेखापुरता मी तुम्हा वाचकांचा तात्पुरता 'निरोप' घेते. धन्यवाद.

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

सप्टेंबर २०१७.

No comments:

Post a Comment