Sunday, 10 December 2017

माझी आजी


मायपित्याचे दिर्घायु छत्र तुज लाभले

बहिणीच्या मायेचे सुख तू अनुभवले

बालपणीचे सौंदर्य यौवनी खुलले

सुशीलेचे नामांतर प्रमिलेत झाले

तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले
 

सनई आल्या, चौघडे आले

वाजंत्री वाजल्या, उखाणे झाले

सदाशिवाच्या वाडा सदनी

पाऊल गृहलक्ष्मी तुझे पडले

 
तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

 
सोवळे झाले, ओवळे झाले

पदर खोचून डोंगर काम

कसे तू लीलया पेलले?

कित्येकांच्या उदरांनी

तृप्तीचे ढेकर दिले

सुगरण तुझ्या हातांनी

अन्नास पूर्णत्व दिले

 
तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

 
मुले झाली, मुली झाल्या

सुखदुःखाच्या कळा

आता तुझ्या वाढल्या

रांगणे झाले, रडणे झाले

एकेकाच्या बाल क्रीडेत

बालपण तुझे तुला दिसले

 

तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

 

शाळा संपली, कॉलेज सुटले

उदंड लेकुरे तुझी आता

उच्च विद्याविभूषित झाली

विद्यालंकारांनी आता

द्वार तुझे सदा सजविले

 
तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

 
यात्रा झाली, परदेश वा-या झाल्या

उन्हाळे झाले, हिवाळे झाले

आयुष्यात तुझ्या कित्येक

पावसाळे आले

क्षणाक्षणांनी कसोटीवर तुला

कितीदा पकडले

डोळे, पापण्या नि कडा

कितीदा तरी पाणावले

 

तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

 
सुना आल्या, जावई आले

लेकरांचीही लेकुरे आली

आजवरची आई तू

आता आजी झाली

नातवांच्याही प्रगतीने

धन्य धन्य तुला केले

देश विदेशी तेही सारे गेले

तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

 
वाडा तुझा समृध्द झाला

घर तुझे गोकुळ बनले

पणतू पणतींनी आता

तुला पणजी केले

वयाच्या एकेका वर्षाने

कसब तुझे बघितले

डगमगता, धीराने

आयुष्य तू उभे केले

तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

 
स्मरणशक्ती नाही गेली

९३ व्या वर्षीही मनशक्ती

क्षीण नाही झाली

सा-यांस प्रेरणा, स्फूर्ती

अस्तित्व तुझे देत राहिले

 
तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

वर्षै गेली, पर्व संपले

नातू आले, पणतू आले

पण.. तुझे सौंदर्य गं आजी

म्हातारे अजून नाही झाले

 
तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

 
तुझेच आयुष्य तुझ्यासाठी

सुंदर टाळ्या वाजवू लागले

 
मृदुला मुकुंद पाटखेडकर.

१० डिसेंबर २०१७.

No comments:

Post a Comment